पाठलाग – (भाग-१३)

युसुफला समोर बघुन दिपकला आश्चर्याचा धक्काच बसला होता. खुप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटावा तसं दिपकने युसुफला कडकडुन मिठी मारली. त्या दिवशी जंगलात चुकामुक झाल्यावर दोघंही एकमेकांना भेटलेच नव्हते. युसुफचं पुढे काय झालं? तो पोलिसांच्या हाती लागला?, का त्यांच्या गोळीने मारला गेला?, का तो सुध्दा दिपकसारखा पळुन जाण्यात यशस्वी झाला ह्याची काहीच कल्पना त्याला नव्हती.

“कहा था यार तु?”, दिपक युसुफला म्हणाला..
“दुनिया छोटी है भाई!! वाटलं नव्हतं परत तुला भेटेन म्हणुन..”, हसत हसत युसुफ म्हणाला..

“खरंच, मलाही वाटलं नव्हतं की इतक्या लवकर तुला भेटु शकेन..”, दिपक म्हणाला..
“अरे पण तु इथं कुठे?”, युसुफने मॉटेलकडे हात दाखवत विचारले, तसं दिपकला स्टेफनी, थॉमसची आठवण झाली. युसुफला बघुन काही क्षण का होईना, तो सगळं विसरला होता. तो ज्या प्रसंगात सापडला होता त्याची आठवण होताच दिपकच्या चेहर्‍यावरील भाव अचानक बदलले..

“काय रे? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?”, युसुफने विचारले.
“हम्म.. चल आतमध्ये चल, तुला सगळं सांगतो”, असं म्हणुन दिपक युसुफला त्याच्या खोलीमध्ये घेउन गेला.

युसुफला काय सांगावे ह्यावर दिपकच्या मनामध्ये काही क्षण चलबिचल झाली. शेवटी युसुफ एक कैदी होता. आणि त्याच्यावर कितपत विश्वास ठेवावा असा काहीसा विचार त्याच्या मनात येऊन गेला. पण त्याच्याकडे दुसरा पर्यायसुध्दा नव्हता. ह्या बिकट प्रसंगात कोणी त्याला मदत करु शकत होता तर तो फक्त युसुफच होता.

पुढच्या १०-१५ मिनिटांमध्ये दिपकने घाई-गडबडीमध्ये जितके सांगता येईल तितके युसुफला ब्रिफ केले..

“सो.. थॉमसची बॉडी अजुनही इथेच, त्याच्या खोलीत आहे?” हनुवटीवरुन हात फिरवत युसुफने विचारले.
“हम्म.. आणि अजुन तासाभरात त्याला इथुन नाही हलवला तर तो अजुन जड होईल आणि शिवाय दुर्गंधी पसरण्याची भिती आहेच..”, दिपक म्हणाला.

“फिकर नॉट, मी काढतो तुला बाहेर ह्यातुन..”, चेहर्‍यावर हास्य आणत युसुफ म्हणाला..
“खरंच?? पण कसं?”, दिपक

युसुफने खिश्यातुन एक व्हिजीटींग कार्ड काढुन दिपकसमोर धरले.

“ए-१ क्लिनींग सर्व्हिसेस”, कार्डवर सोनेरी अक्षरात एक नाव झळकत होते.
दिपकने प्रश्नार्थक नजरेने युसुफकडे पाहीले.

“माझ्या एका अंकलची ही सर्व्हिस कंपनी आहे. जेलमधुन पळाल्यावर मी त्याच्याकडेच जाऊन लपलो होतो. ही कंपनी इथल्या हॉटेल्समधुन अत्यल्प दरात जुने मोडके सामान, भंगार गोळा करते. महीन्यातुन एकदा आमची व्हॅन इथल्या हॉटेल्सना भेट देत असते. हे हॉटेल्स आमच्या सर्व्हिस-लिस्ट मध्ये आहे म्हणुन आज मी आलो होतो.”, युसुफ म्हणाला

“आलं लक्षात…” दिपकचा चेहरा आनंदाने उजळला.. “आमच्याकडे काही जुन्या मोठ्या लाकडाच्या ट्रंक्स आहेत.. त्यातील एका ट्रंक मध्ये थॉमसला भरुन आपण न्हेऊ शकतो, आणि कुणाला कळणार सुध्दा नाही..”
“करेक्ट.. आणि नंतर देऊ त्याला समुद्रात फेकुन.. फिशची पार्टी आज..”, युसुफ दिपकला टाळी देत म्हणाला.

“बिंगो.. चल तर मग, भरु त्याला ट्रंक मध्ये…”, दिपक खुर्चीतुन उठत म्हणाला..
“अरे बसं यार.. जरा दारु बिरु पाज मला.. थॉमसची काळजी तु नको करु, आपली पोरं आहेत व्हॅन मध्ये, ते सगळं साफ करतील..”, युसुफ..
“पण.. “, साशंकतेच्या स्वरात दिपक म्हणाला..

“डोन्ट वरी.. आपल्या मर्जीतील पोरं आहेत.. डोळे झाकुन विश्वास ठेव.. फक्त त्यांना रुम दाखव कुठली ते.. बाकीचं ते सगळं बघुन घेतील…”, युसुफ

“ठिक आहे.. मी स्टेफनीला सांगतो..”, असं म्हणुन दिपक उठला.. रुममधल्या छोट्याश्या फ्रिजमधुन त्याने थंडगार बिअरची एक बाटली काढुन युसुफसमोर ठेवली आणि तो बाहेर पडला..

 
अर्ध्या-पाउण तासांनी घामेजलेला एक पोरगा दीपकच्या रूम मध्ये आला. युसुफ कडे बघत तो म्हणाला, “माल लोड हो गया भाई”

“और बाकीकी सफाई?”, युसुफ
“एक दम चकाचक. किसीको रहने दिया तो समझेगा भी नही यहा मर्डर हुआ था। ”

युसुफने बिअरची बाटली रिकामी केली आणि तो उठुन उभा राहीला.. “चलो.. निकलता हु मै !!.. भेटु परत..”, हात पुढे करत तो दिपकला म्हणाला
“अरे… थांब.. स्टेफनीला भेटुन तरी जा..”, दिपक
“परत कधी.. आधी आपल्या मित्राला समुद्रात पोहोचवुन येतो, मग भेटुच निवांत.. खुदा हाफीज..”..

दिपक खोलीच्या बाहेर येई पर्यंत युसुफ निघुन गेला होता.

दिपक काही वेळ धुळ उडवत जाणार्‍या त्याच्या व्हॅनकडे पहात राहीला आणि मग त्याने एक मोठ्ठा सुटकेचा निश्वास सोडला.

 
दिपक माघारी वळला आणि तडक स्टेफनीच्या खोलीमध्ये गेला. खोली रिकामी होती. युसुफच्या पोरांनी मस्त काम केलं होतं. फ्लोरींग, कार्पेट, बेड सगळं काही स्वच्छ चकाचक होतं. रक्ताच्या थेंबाचाही लवलेश नव्हता. विखुरलेल्या वस्तु जागच्या जागी होत्या. जणु काही इथे काही घडलेच नव्हते.

बाथरुममधुन शॉवरचा आवाज येत होता. दिपक पुन्हा आपल्या खोलीत आला. थंडगार पाण्याने आंघोळीची त्याला सुध्दा गरज वाटत होती. त्याने कपडे उतरवले आणि गार पाण्याच्या शॉवरखाली जाऊन तो उभा राहीला.

न जाणो कित्ती वेळ.. दिपकचे आखडलेले स्नायु गार पाण्याच्या स्पर्शाने मोकळे झाले. स्ट्रेस्ड झालेले त्याचे मन हळु हळु पुर्ववत झाले.

त्याने शॉवर बंद केला आणि तो बाहेर आला. कपडे करुन तो खोलीच्या बाहेर आला तेंव्हा लाऊंजमध्ये स्टेफनी कॉफीचा गरम कप घेऊन टी.व्ही समोर बसली होती. टी.व्ही. वर नेहमीचेच काही तरी रटाळ कार्यक्रम चालु होते. स्टेफनीचेही तसे टि.व्ही.कडे फारसे लक्ष नव्हते पण मन हलके होण्यासाठी टि.व्ही नक्कीच उपयोगी होता. अर्थात पहील्यापेक्षा तिचा चेहरा बराच फ्रेश वाटत होता. दोघांची नजरानजर होताच दोघांच्याही चेहर्‍यावर एक मंद हास्य पसरले.

दिपक स्टेफनीच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसला.

“यु ओके?”, काही वेळ गेल्यावर दिपक म्हणाला..
“हम्म..”, स्टेफनी… काही वेळ गेल्यावर ती म्हणाली, “हा जो कोणी युसुफ होता.. ट्रस्टेड आहे ना?”
“डोन्ट वरी.. चांगला माणुस आहे तो…”.. दिपक..

“हा फारच योगायोग होता. थॉमसचा खुन काय होतो.. आपण त्यात अडकतो काय, सुटकेचा मार्ग दिसत नसतानाच तुझा हा मित्र.. युसुफ अचानक कुठुन तरी येतो काय.. आणि आपण क्षणार्धात सर्व संकटातुन मोकळं होतो काय… आय एम टेलींग यु दिपक.. आय डोन्ट लाईक कोईन्सीडन्स…”, स्टेफनी..

“डोन्ट बी पॅरॅनॉईड.. सगळं काही ठिक होईल..”, दिपक म्हणाला

 
टाईम हिल्स एव्हरीथींग… आयुष्य पुर्वपदावर येत होते. दिपक आणि स्टेफनी जणु काही झालेच नाही अश्या अविर्भावात दिवस ढकलत होते.

एक दिवस स्टेफनीने विषय काढला, “दिपक, आपला मॅनेजर विचारत होता थॉमस सर कधी येणार आहेत? बॅकेतुन काही पेमेंट्स करायची आहेत. थॉमसचे काही चेक्स सही केलेले होते त्यामुळे आत्तापर्यंत भागले.. पण आज ना उद्या आपल्याला थॉमसबद्दल उत्तर द्यावेच लागणार आहे..”

दिपकचा हा विषय नावडता होता. शक्यतो तो हा विषय.. त्याबद्दलचा विचार तो पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत होता.. पण आज ना उद्या ह्या प्रश्नाची उकल करावी लागणार हे ही त्याला माहीत होते.

“हम्म.. मला एक-दोन दिवस दे.. मी काही तरी विचार करुन सांगतो..”, दिपक म्हणाला..

त्या दिवशी संध्याकाळी तो संगणकावर बसुन बरीच शोधाशोध करत बसला. विवीध बातम्यांच्या संकेतस्थळं तो धुंदाळत होता. शेवटी दोन-तिन दिवसांनंतर त्याला हवी अशी एक बातमी सापडली तसे त्याने स्टेफनीला खोलीत बोलावुन घेतले.

“एक मार्ग सापडला आहे..”, स्टेफनीला बेडवर बसवत दिपक म्हणाला…
“काय?”, स्टेफनी
“खरं तर हा प्लॅन माझा नाही, काही दिवसांपुर्वीच टि.व्ही.वर एका क्राईम-स्टोरी मध्ये एक भाग बघीतला होता. गोष्ट खुप वर्षांपुर्वीची होती. पण आपल्याला अगदी योग्य अश्शीच आहे. आपण त्या प्लॅननुसार गेलो आणि त्यात दाखवलेल्या चुका केल्या नाहीत तर सर्व काही सुरळीत पार पडेल..”, दिपक
“……”
“हे बघ.. ही बातमी वाच..”, दिपकने आपल्या संगणकाची स्क्रिन स्टेफनीकडे केली.. दिल्लीतील कुठल्याश्या वृत्तपत्र संस्थेच्या पेपरचे ते एक पान होते. एका कोपर्‍यातील एका बातमीवर बोट ठेवत दिपक म्हणाला…

दिल्लीजवळील कोण्या एका गावात झालेल्या एका अपघाती मृत्युची ती बातमी होती. मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती आणि पोलिसांनी नातेवाईकांना आवाहन केले होते की एका आठवड्याच्या आत ओळख पटवुन मृतदेह ताब्यात घ्यावा.

स्टेफनीने बातमी पुर्ण वाचली आणि मग ती दिपकला म्हणाली…”मला नाही कळालं.. ह्याचा आपल्याशी काय संबंध…?”
“अगं असं काय करतेस.. हा फोटो पाहीलास? ही व्यक्ती बघ ना थॉमससारखीच आहे. जाड जुड.. भले मोठ्ठे पोट, टक्कल…”, दिपक म्हणाला..
“असेल.. मग?”, स्टेफनी..
“मग? आपण हा मृतदेह थॉमसचा आहे म्हणुन ताब्यात घ्यायचा.. तसेही थॉमस एका नविन हॉटेलच्या खरेदीसाठी नॉर्थला कुठे तरी गेला आहे असे आपण सांगीतले आहे. तिकडेच त्याचा अपघाती मृत्यु झाला म्हणुन घोषीत करायचे.. हा मृतदेह घेऊन आपण तेथेच त्याचे अंत्यसंस्कार करायचे आणि थॉमसच्या नावाने आपण डेथ-सर्टीफिकेट मिळवायचे. एकदा का थॉमस ऑफीशीयली मृत्यु पावला की मग त्याचे बॅंकेचे अकाऊंट्स आणि इतर अधीकार आपल्याला घेता येतील..”, दिपक

“अरे पण.. ओळखं पटवणं इतकं का ते सोप्प आहे?”, स्टेफनी.. “आणि कश्यावरुन अजुनही तो मृतदेह लावारीसच असेल. ही बातमी एक आठवडा पुर्वीची आहे.. कदाचीत त्याची ओळख पटली ही असेल..”
“असेल ना! शक्य आहे ते.. पण आपण चान्स तर घेऊन बघु.. हे बघ.. एक आठवडा ते प्रेत सरकारी शवागरात पडुन आहे. त्याला काही हिरे-मोती लागले नाहीत की पोलिस आनंदाने ठेवुन घेतील. आपण थोडे-फार एफर्ट्स घेतले आणि थोडेफार खोटे पुरावे सादर केले तर मला नाही वाटत पोलिस अधीक खोलात शिरतील.. उलट त्यांना बरंच आहे.. नाहीतर त्यांनाच अश्या प्रेतांचे अंत्यसंस्कार करावे लागतात..”, दिपक

“आर यु शुअर दिपक? एक गुन्हा लपवण्यासाठी दुसरा गुन्हा आणि तो लपवण्यासाठी तिसरा असे करण्याचा हा प्रकार आहे.. आपण नाहक अडकत जाऊ ह्यात..”, स्टेफनी
“डोन्ट वरी स्विटी.. मी पुर्ण प्लॅन तयार केला आहे.. अ‍ॅन्ड आय एम शुअर वुई विल सक्सीड.. आपण दोन दिवसांनी दिल्लीला जातोय….”, दिपक…

[क्रमशः]

 

कथा एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. पुढे काय होणार?? सर्व काही दिपकच्या प्लॅननुसार घडणार? की कथेला काही अनपेक्षीत कलाटणी मिळणार हा कथेचा पुढचा भागच ठरवेल..

***