Rahasyamay Stree - 1 books and stories free download online pdf in Marathi

रहस्यमय स्त्री - भाग १




रेशमा आणि अमरच्या ७ वर्षाच्या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव मिळालं होत . रेशमाच्या आई वडिलांना खूप समजवल्या नंतर हा सोन्याचा दिवस त्याच्या आयुष्यात आला होता .

अमर अनाथ असल्याने रेशमाच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीशी अमरच लग्न लावून देणं अयोग्य वाटत होत , मात्र मुलीच्या हट्टा पुढे व सुखापुढे ते तयार झाले , तसेच अमरच स्वतःच घर होत , त्याचे घर त्यांच्या घरापासून तास - भर अंतरावर होते . अमर सोबत रेशमा सुखी असेल तसेच मुलगी नजरें समोर असेल या विचारांनी त्यांनी दोघांचं लग्नं लावून दिलं ....

दोघंही खूपच खुश होते , २ महिने कशे गेले कळलेच नाही .
नेहमी प्रमाणे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दोघं रेशमाच्या घरी जेवणासाठी जायचे तसेच एके दिवशी म्हणजे
दिनांक २४ मार्च २०१८
रात्री १०.००
रेशमा : जानू चल ना लवकर , ठेव ना तो लॅपटॉप आपल्याला पोहोचायला उशीर होईल .... सर्व वाट पाहत असतील ...२ कॉल येवून गेले आईचे ..

अमर : बेटा फक्त २ मिनिट , थोडच काम बाकी आहे  !!!

रेशमा : ( गाल फुगवत ) ठीक आहे नको जाऊयात आपण , कर तू तुझं काम !!!

अमर : अरे सोनू ठीक आहे ...येवून संपवतो काम चल जाऊयात !!!

अस म्हणत लॅपटॉप बंद करून कार ची चावी घेतली आणि रेशमाच्या घरी जाण्यास तय्यार झाला .

बाहेर पाऊस पडत असल्याने त्याने सोबत छत्री घेतली .
घरातून निघाले तेव्हा घडीत १०.१७ होवु लागले होते .
रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते . रात्रीच्या अंधाराला कारच्या हेड लाईटच्या मदतीने नाहीस करत ते आपला प्रवास करू लागले होते . पावसाचे एक एक थेंब कारच्या समोरच्या काचावर पडत होते . रेशमाच्या घरी जाताना एक दफनभूमी लागत असे ... पण रेशमा नेहमीच  दफनभूमी येताच देवाच नाव घेत असे ...

कार आता दफनभूमीच्या जवळ पोहचली आणि रेशमाची ३६ कोटी देवांना आठवायची वेळ ही झाली होती . दफनभूमीची भिंत जास्त उंच नसल्याने आतील सर्व गोष्टी नजरेस दिसत होते .
अमर मात्र कार चालवत असताना त्या दफनभूमीत निरखून काही तरी बघत होता , पण स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं . म्हणून त्याने कार थोडी स्लो केली आणि त्याला आता दफनभूमीत असलेल्या स्ट्रीट लाईटच्या उजेडाने स्पष्ट दिसल ...
एका कबर जवळ एक मुलगी उभी होती . प्रथम तिला पाहिले तर अमर दचकला पण नंतर जेव्हा त्याने तिला निरखून बघितले तर तिच्या हातातील गुलाबाची फुले त्याला दिसली हे बघून मात्र तो सावरला ... रेशमाला घाबरायला कोणत्या कारणाची गरज नाही हे त्याला चांगलच माहिती होत , त्यात त्या मुलीबद्दल काही सांगितलं तर रात्रभर रेशमा झोपणार नाही हेही त्याला चांगलच माहिती होत . रेशमा अजुनच घाबरु नये म्हणून त्याने तिला काहीच सांगितले नाही .

हळू हळू दफनभूमी मागे मागे पडू लागली होती . अखेर रेशमाने आपले डोळे उघडले कारण तिच घर आल होत ...
घरी जेवण वैगेरे झाल्यावर तिचे वडील म्हणाले ...

" जावई बापू खूप रात्र झाली आहे , यावेळचं रात्री प्रवास करणे बर नाही !! रात्र तुम्ही इथेच घालवा ..."

अमर : आज पहिल्यांदा जातोय का ... सवय आहे आणि काय होणार आहे ??? तसं पण माझं जरा काम बाकी राहिलं आहे म्हणून थांबता नाही येणार नाहीतर नक्कीच थांबलो असतो .... तुम्ही काळजी करू नका मी सांभाळून घेवून जाईन तिला .

" नाही !!! वाटलच तर तुम्ही जा ... रेशमाला रहुद्या आजच्या दिवस इथे , सकाळी घ्यायला या तुम्ही तिला .

अमर : बर ठीक आहे ,... सकाळी घ्यायला येतो तिला ,
अस म्हणून अमर ने सर्वांचा गोड निरोप घेतला !!!

कार चालवत तो घरच्या दिशेने जाऊ लागला होता , त्याच्या डोक्यात उरलेल्या कमाबद्दलच विचारचक्र चालू होते . काहीच वेळात तो दफन भूमी जवळ पोहचला , 
पडणाऱ्या पावसामद्धे दफनभूमीतून येणारे स्ट्रीट लाईटची पिवळी किरणे त्याचे लक्ष वेधत होते .
त्याची नजर गेटच्या बाजूला पडली , धुक्यातून त्याने नीट बघितल तर त्याला तीच मुलगी दिसली जी हातात गुलाबाची फुलं घेवून एका कबर जवळ उभी होती .

ती मुलगी अमरच्या कारला हात दाखवत लिफ्ट मागत होती , त्याला हा वेगळाच प्रकार वाटत होता , म्हणून त्याने तिला लिफ्ट नाही द्यायचे असे ठरवले .
पण थोड्याच अंतरावर पोहचल्यावर त्याच्या डोक्यात विचार येवू लागले की जर त्या मुलीच्या जागी  रेशमा असती तर येवढ्या रात्री एकटी , आणि आजकाल चांगले माणसं सुद्धा नाहीत , हिच्या सोबत जर काही बर वाईट झालं तर तो स्वतःला माफ करू शकला नसता ...
खूप विचारा नंतर त्याने गाडी थांबवली ... ती मुलगी आता त्याच्याच कारच्या दिशेने धावत येत होती .

कुठे जायचं आहे तुम्हाला ??? अमरने विचारले

" इथे जवळच अशोक नगर मद्धे " त्या मुलीने उत्तर दिलं

पाऊस जास्त पडत होता म्हणून त्याने कारचा दरवाजा उघडला आणि पुढे म्हणाला .
" मला तिथे नाही जायचयं आहे , पण मी तुम्हाला तिथे सोडू शकतो "

हे ऐकुन तिने एक स्मित हास्य देत आभार व्यक्त केले .

काही मिनिटे भयाण शांतता होती . अमरने ती शांतता नष्ट करायचे ठरवले . आणि एक प्रश्न विचारला

" कोणा साठी येवढ्या रात्री दफनभूमीत ?? "

अमर अचानक बोलल्याने दचकून तिने उत्तरं दिलं
" माझ्या पतीसाठी मी इथे आले होते "

काय ?? मला नाही समजले ... !!

ती म्हणाली "  ... २ दिवस झाले होते आमच्या लग्नाला आणि ते माझ्या आयुष्यात नाही आहेत , माझ्या साठी मेले आहेत ते  !!! "

ओहह माफ करा !!! अमर त्या स्त्रीला म्हणाला

नाही !!! आता वाईट नाही वाटत मला त्याचं ...

तेवढ्यात कारमध्ये चालू असलेल्या रेडिओ वर एक गाणं वाजल . कही दीप जले कही दिल !!
त्या गाण्याला उद्देशून स्त्री अमर ला म्हणाली
" हे आवडत गाणं आहे माझं !!! "

यावर अमरने काहीच उत्तर नाही दिलं ... कार मद्धे फक्त ते गाणं चालू होत आणि कसलाच आवाज नव्हता .

बाहेर पडणारा पाऊस , भयाण रस्ता , लक्क काळोख , सोबत एक अनोळखी स्त्री त्यात हे गाणं ... या सर्व गोष्टीमुळे अमरच्या मनात वेगळीच भीती दाटली होती .

आणि बघता बघता अशोक नगर आल .
त्या स्त्रीने अमर चे आभार व्यक्त केले आणि निरोप घेतला .

अमरने गाडी वळवली व पुन्हा आपल्या घरी जायला निघाला . गाडी वळवून मागे बघतो तर क्षणा भरात ती मुलगी गायब झाली होती . अमरने सगळीकडे पाहिलं मात्र मुलगी अचानक गायब झाली होती . बाजूला एक लॉज होते ... " केसरी लॉज " !!!

अमरने या गोष्टीचा जास्त विचार नाही केला व घरी निघू लागला . ती मुलगी कारच्या मागच्या सीट वर बसली होती मात्र अमरला याची काहीच खबर नव्हती !!

अमर घरी पोहचला . आपल काम करता करता सतत त्या मुली बद्दल त्याच्या मनात विचार येवू लागले की फक्त २ दिवसात पतीचा मृत्यू झाला !!!
काय झाल असेल त्याला ??
म्हणून येवढ्या रात्री ती स्त्री एकटीच तिथे शोक व्यक्त करत होती ??
किती वाईट झालं असेल तिच्या आयुष्यात , आयुष्य सुरु होताच संपलं होत .

या विचारात त्याला काम सुद्धा करता आले नाही आणि शेवटी त्याला झोप लागली .

बेडरूम मधून कसलातरी आवाज येत होता कुणीतरी रडण्याचा ... म्हणून अमर बेड वरून उठला व त्या आवजाच्या दिशेने जाऊ लागला होता , आत आल्यानंतर वेगळंच जाणवत होत त्याला ... त्याचे डोळे नीट उघडत नव्हते , खूप जड झाले होते त्याचे डोळे .

त्याने पूर्ण प्रयत्न करून आपले डोळे उघडले , खिडकीतून बाहेर बघितले बाहेर भयाण अंधार पसरला होता  , घड्याळ्यात ०३.३३ झाले झाले होते .
खोलीत अंधार होता काही दिसावं म्हणून त्याने लाईट चे बटन दाबले . बटन दाबताच त्याचे डोळे चमकु लागले होते . आपले डोळे चोळत पुढे चालू लागला . खोलीत सगळी कडे बघितल तर कोणीच नव्हत मात्र तो रडण्याचा आवाज एका कोपऱ्यातून येवू लागला होता . तो त्या कोपऱ्याच्या जागी जाऊ लागला होता . तेवढ्यात घुंगरांचा आवाज त्याच्याच दिशेने धावून आला , जणू एखादी स्त्री त्याच्या दिशेने धावत आली असावी .
व काहीच क्षणात त्याला जोरदार धक्का बसला जणू कोणीतरी त्याला दोन्ही हातांनी ढकलले असावे .
व अमर बेडरूमच्या दरवाज्याला आदळला गेला . या आघाताने त्याला जास्त इजा झाली नाही मात्र त्याच डाव्या हाताच एक नख अर्ध तुटल होत .
तो ताबडतोब धावत त्या आवाजाचा पाठलाग करू लागला , व धावत आपल्या डाव्या हातातील मधल्या बोटाच रक्त चाटू लागला . तो घुंगराचा आवाज किचनच्या दिशेने येवू लागला होता .

अमर धावत किचन मध्ये पोहचला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती ...
कारण काल रात्री त्याने ज्या स्त्रीला लिफ्ट दिली होती , त्याच स्त्रीने रेशमाचा गळा दाबून आपल्या एका हाताने तिला उचलले होते .
अमर धावत रेशमाला वाचवायला जाऊ लागला पण तो एखाद्या अदृश्य शक्तीने बांधला गेला होता . तो जाग्याहून हलुच शकत नव्हता . तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता पण आवाज बाहेर पडत नव्हता .
त्याच्या डोळ्या समोर त्याच प्रेम संपताना फक्त तो बघू शकत होता .

तेवढ्यात ती स्त्री म्हणाली ..

" जर तुला तुझी बायको जिवंत हवी असेल तर
राजाराम पाटील , सुबोध मोहिते , जयकांत चव्हाण , सुनील तावडे आणि अभिजित पानसे यांना ठार मार " .

त्या स्त्रीचं बोलण झाल्यावर त्याने वाचा फोडली " वाचवा !!!! वाचवा !!

पण याचा काहीच फरक पडला नाही ,.. उलट रेशमाला  ती अजुनच जास्त त्रास देवू लागली होती .
म्हणून अमर ने तिला होकार दीला !!!

एवढ ऐकुन तिने रेशमाच्या शरीरात प्रवेश केला .
रेशमाच्या शरीरात प्रवेश करताच रेशमा जाग्यावर कोसळली ...

तिचा रेशमाच्या शरीरात प्रवेश करताना बघून अमर ओरडला ....

" ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग "

या आवाजाने त्याची झोप मोड झाली  ...
बघतो तर रेशमाचा कॉल येत होता ... त्याच्या जीवात जीव आला कारण जे पाहिलं होत ते स्वप्न होत .
त्याने कॉल उचलला समोरून आवाज आला . त्या

" राजे झोप झाली ??? , घ्यायला येताय ना ? !!"

" हो येतोय तास भरात पोहचतो तू तय्यार रहा !! "
येवढं बोलून अमरने कॉल कट केला .

दिनांक - २५ मार्च रविवार २०१८

अमरच्या डोक्यात सतत तेच स्वप्न फिरत होत .
म्हणून आपल्या डायरीत त्याने ती पाच नावे लिहून ठेवली .
राजाराम पाटील , सुबोध मोहिते , जयकांत चव्हाण , सुनील तावडे आणि अभिजित पानसे .

              ---------- पुढील भाग लवकरच ----------