Ayushach sar - 3 books and stories free download online pdf in Marathi

आयुष्याचं सारं (भाग-3)



                दोन तीन वर्षाआधीची गोष्ट आहे . मी आणि माझी मैत्रीण 

राशी आम्ही वर्धेला कॉलेज करत असताना   . दुपारी तीनची ट्रेन असायची म्हणून  कॉलेज मध्ये टिफिन न खाता स्टेशनवर येऊन  खायचो . 

    त्या दिवशीही आम्ही स्टेशनवर येऊन टिफिन खायला बसलो . तेवढ्यात आम्ही जेवण करत असताना एक म्हातारे आजोबा आमच्या जवळ आले आणि आम्हाला म्हणाले ," बेटा , मला खूप भूक लागली काही खायला देता का ? " आम्ही दोघींनी आमच्या डब्यातून एक एक पोळी आणि भाजी काढून त्यांना दिली . आजोबाने ते जेवण आपल्या थैलीत भरलं आणि तिथून निघून गेले . 

दुसऱ्या दिवशी कॉलेज आटोपून आम्ही स्टेशनवर आलो . नहेमीप्रमाणे जेवण करायला बसलो . घास घेतच तर आजोबा समोरून आले आणि काही खायला असेल तर दे म्हणाले . डब्यातून दोघींनीही पोळी भाजी काढून त्यांना दिली . राशी आणि माझ्या डब्यात दोन दोनच पोळ्या असायच्या . आणि आम्ही आजोबांना नाही म्हणू शकत नव्हतो . असे चार पाच दिवस निघून गेलेत . आजोबाजवळ घडी नव्हती पण त्यांना आम्ही कॉलेज मधून स्टेशनवर यायचा वेळ कसा कळायचा माहिती नाही .  

तिथून चार पाच दिवसाने , आम्ही कॉलेज मधून आलो टिफिन खायला बसलो आजोबा येतील म्हणून एक पोळी डब्यांच्या झाकणात बाजूला काढून ठेवली . आमचं जेवण पण संपत आलं पण आजोबा आले नाही . ते येतील ह्या आशेने आम्ही ती पोळी न खाता डब्यात भरून ठेवली म्हटलं आजोबा समोर आले तर देऊ त्यांना . अस म्हणतं आम्ही टिफिन बॅग मध्ये भरला . ट्रेनचा वेळ झाला होता . पण ट्रेन अलाउन्स  नव्हती झाली . आजोबा दूर वरून काडी टेकत येताना दिसले . ते आमच्याचकडे येत होते . जवळ येऊन माझ्या बाजूला बसले . आज आजोबांनी आम्हाला खायला काहीच  मागितलं नाही . खरं तर ते आमची जेवणाची वेळ निघून गेल्यावर आले . 

मी आजोबांना म्हटलं , ' आजोबा तुम्ही कुठे होता एवढा वेळ , भूक नाही लागली का तुम्हाला आज ? '  ह्यावर ते म्हणाले , 

' पोरी भूक रोजच लागते  . तुम्ही दोन भाकरीतून एक भाकर मले देता पण तुमची बी भूक नसणं जातं तुम्ही कोलेजात शिकणाऱ्या पोरी बाहेर गाव वरून येता तुम्हाला बी भूक रहाते म्हणून सण्यांनी म्या आज आलो नाही मले बी तै बेस नाही वाटलं . ' 

आजोबाच बोलणं खरचं होतं गेल्या चार पाच दिवसापासून आमची पण भूक नव्हती जात . ते आजोबा इथे का राहतात त्याचं कोणीच नाही का म्हणून मी त्यांना विचारलं , 

' आजोबा तुमचं कोणीच नाही का तुम्ही इथे का रहाता ? ' 

आजोबा म्हणाले ,

' बाई , मी आहो हिंगणघाटचा  . दोन तीन वर्षे झाले पोरानं घराच्या बाहेर काढलं . लय शिकवलं हाडच काड करून त्याले मास्तर बनवलं वावर शेत घेऊन ठेवलं आता बायको लै त्यांचा बाप नाह्य पाह्यजे म्हणते . पोटच्या पोरानं मले घर सोडून नाहय जात म्हटलत लाथा मारून घरा बाहेर काढलं .' 

अस ज्याच्या सोबत घडलं त्या घडणाऱ्याच्या यादीत आजोबा एकटे नव्हते . म्हातारपणी आई वडील जड होऊ लागतात मुलांना कोणी वृद्धाश्रमात नेऊन टाकतात तर कोणी जन्म देणाऱ्या आई वडील म्हातारवयात नको म्हणून असं आजोबा सारखं घराबाहेर काढतात . 

आजोबांना विचारलं मग तुम्ही  जेवण कुठे करता ? 

तर आजोबा म्हणाले , ' किती तरी दिवस उपास पडतात . लोकांनी दिलेला एक एक रुपया जमा करत त्याच काही घेऊन खाऊन घेतो . पैसे रोज रोज कुणी देत नाही इथं . पोटात भूक तशीच रहाते . ज्या वयात काम होत होतं त्या वयात उपाशी राहून बी काम केलं ह्या वयात मले इथून तिथं जाणं नाह्य होतं .. '

आजोबा बोलतंच होते एवढ्यात आमची ट्रेन आली . आजोबाला म्हटलं आमची ट्रेन आली आम्हाला निघायला पाहिजे . डब्यात ठेवलेली पोळीभाजी त्यांना देत आम्ही तिथून निघालो . 

दुसऱ्या दिवशी मी आईला डब्यात चार पोळ्या आणि एकस्ट्राची भाजी बांधायला सांगितलं  . त्यावर आई मला म्हणाली तू तर दोनच पोळ्या खाते अजून दोन पोळ्या कुणासाठी नेत आहे ? आईला मी आजोबा बद्दल सांगितलं . आईने काही म्हटलं नाही ती चार पोळ्या आणि जास्तीची भाजी चटणी देऊ लागली . राशी पण आजोबांसाठी दोन पोळ्या जास्त आणत होती . 

   का कुणास ठाव पण त्या आजोबात मला माझे आजोबा दिसायचे . माझे आजोबा जाऊन आता सहा वर्षे झालीत .  माझे दहावीचे पेपर संपले त्या उन्हाळ्यात आजोबा वारले . म्हणतात माती आड गेलेला माणूस परत कधीच नजरेस पडत नाही . आजोबाही मला नंतर कधीच दिसले नाही . त्यांना परत एकदा बघण्यासाठी कितीही मन भरून आलं तरी ते दिसू शकत नाहीत .  आजोबा गेल्या नंतर मी मात्र प्रत्येक म्हाताऱ्या माणसात माझ्या आजोबाला शोधत राहिली  . खूप प्रेमळ स्वभावाचे होते ते . त्याच्या बद्दल मनात अपार आदर होता माझ्या . माझे आजोबा भुकेने व्याकुळ होत राहिले असते तर ते मला कसं पटलं असतं त्या आजोबाच्या भेटण्यानं मला माझे आजोबा परत भेटल्या सारखं वाटायचं .. 

 तीन चार महिने आजोबासाठी जेवण नेण्याचा नित्यक्रम तसाच चालू राहिला .

    उन्हाळा आला आणि आमच्या परीक्षाही . पेपरचा वेळ दुपारी 2.30 ते 5.30 असायचा . आम्हाला आमच्या गाव वरून वर्धेला जायला 9च्या ट्रेन शिवाय दुसरी लोकल नव्हती . म्हणून आम्ही नऊच्या गाडीने जाऊन कॉलेज मध्ये तेवढा वेळ लायब्ररीमध्ये बसून काढायचो . 

आता आजोबाच्या जेवणाचं कसं हा विचार सारखा डोक्यात यायचा . आजोबांना सांगितलं तुम्ही 9ला आम्हाला प्लॅटफॉर्म 1 वर भेटत जा . पण आजोबा म्हणाले , तिकडे मला येता नाही येत पायऱ्या चढून आणि आम्हालाही जाता यायचं  नाही TC पकडायची भीती . मग आम्ही आजोबांना पेपर झाल्यावर जेव्हा रात्री 7 च्या लोकलने जायचो तेव्हा टिफिन द्यायचो . 

   आमचा 2nd पेपर होता त्यावेळेला पेपर झाल्यावर कॉलेज मध्ये project submission साठी सहा पर्यत थांबायला सांगितलं . 

माझी मैत्रीण आणि मला दोघींना पण खूप भूक लागून गेली होती . तिनेही टिफिन नव्हता आणलं . त्यादिवशी आम्ही खूप धावपळ करत स्टेशन वर आलो . प्लॅटफॉर्मवर गर्दी पण खुप होती . बसायला जागा पण न्हवती मिळत कुठे पोटात भुकेचे डंख मारत होते . ट्रेन अनाउन्स झाली . आजोबा आमची वाट बघत होते ते मला दिसताच मी त्यांना पूर्ण टिफिन देऊन दिला . गाडीही तेवढ्यातच प्लॅटफॉर्मवर आली . राशी मला म्हणाली , ' तू आजोबांना पूर्णच पोळी भाजी देऊन दिली का ? '

मी म्हटलं हो आपण घरी जाऊन जेवण करून घेऊ ना ! 

पेपर होई पर्यंत आम्ही आजोबांना रोज टिफिन द्यायचो . शेवटचा पेपर होता तेव्हा आजोबांना आम्ही उद्या पासून कॉलेजला येणार नाही हे सांगायचं ही राहून गेलं . त्यांना टिफिन देता देता आमची ट्रेन लागलेली असायची तेवढ्याच घाईत आम्हाला  ट्रेन मध्ये चढाव लागायचं . दोन मिनिटं उभं राहून आजोबासॊबत बोलता यायचं नाही . 

कितीतरी दिवस जेवणाच्या ताटावर बसल्यावर पहिलाच घास घेताना आजोबा जेवले असतील की नाही हा विचार यायचा . 

आमचं polytechnic च लास्ट year संपलं आणि त्या कॉलेजला जाणं ही बंद झालं . एकदा मी TC काढायला कॉलेज मध्ये गेली होती तेव्हा 

खूप दिवसांनी 2 महिन्यांनंतर आजोबा मला दिसले तेव्हा मी कॉलेज मध्ये जाऊन लवकर यायचं होत म्हणून टिफिन न्हवता नेला . मी गाडीची वाट बघत 11 वाजता प्लॅटफॉर्मवर उभी होती इकडे तिकडे आजोबा कुठे दिसतात का म्हणून बघत होती . माझी ट्रेन आली तेव्हा आजोबा समोर आले आणि म्हणाले , बाई खायला काही आहे का ? माझ्याडोळ्यात पाणी आलं मी त्या दिवशी टिफिन का आणला नसावा ह्या विचाराने माझं मन मला छळत होतं . मी आजोबांना तेव्हा बॅग मधून बिस्कीटचा पॅकेट काढून दिला . आणि जवळ असलेली पन्नासची नोट त्याच्या हातात ठेवली . 

गाडी रुळावर येऊन उभी राहिली . मी धावतच 8 -16च्या दिशेने वळली .  त्याही दिवशी मी आजोबांना सांगायचं राहून गेली . आता आमचं कॉलेज संपलं येणं होणार नाही ... 

नंतर राशी आणि मी दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन करायला गेलो . आठवणीने घरून आजोबासाठी एक्सट्रा टिफिन घेतला . प्लॅटफॉर्मवर आजोबांना खूप शोधलं पण आजोबा कुठेच दिसले नाहीत . 

आजही आम्ही दोघी सोबत वर्धेला कधी गेलोच तर  एकमेकींना विचारत

असतो ... आजोबा कुठे असतील ??