Dhukyataln chandan - 3 books and stories free download online pdf in Marathi

धुक्यातलं चांदणं .....भाग ३

धावतच ते ऑफिसच्या बाहेर आले. " कूठे भेटणार आहात ? " ," स्टेशनला ",
" किती वेडा आहेस रे तू , स्टेशनला कोणी बोलावते का भेटायला. " , सुवर्णा हसत म्हणाली.
" अरे , तिला घरी जायला लेट होईल ना मग, म्हणून स्टेशनला बोलावलं " ,
" ठीक आहे मग ." विवेक आनंदात होता आज, चेहरा तर किती खुलला होता.
" विवेक विचारू का एक ." ,
" विचार." ,
" अगदी सहजच ना भेटायला चालला आहेस " ,
" का गं ? " ,
" तुझ्यात खूप बदल अनुभवते आहे मी. नक्कीच काही नाही ना." विवेक जरा बावरला.
" नाही, असं का वाटतं तुला ? " ,
" नाही , मला तसं वाटलं म्हणून. " . थोडावेळ कूणीच काही बोललं नाही. स्टेशनला पोहोचले ते.
" तू कसा ओळखणार तिला. ? " ,
" तिचा फोटो बघितला होता ना मी, नाहीतरी ती ओळखेल मला." ते दोघे बोलत होते, तेव्हाच मागून आवाज आला , " विवेक … " ,विवेकने वळून पाहिलं. पूजा … विवेक तिच्याकडे बघत राहिला. average उंची, जराशी मध्यम अंगाची, गोऱ्या रंगाची , केस मागे बांधलेले, डोळे काळेभोर असले तरी त्यावर चष्मा, गोबरे गाल आणि चेहऱ्यावर किंचितशी smile, अगदी फोटोत होती तशिच पूजा ,विवेकच्या समोर उभी होती. दोघे एकमेकांकडे कधीचे बघत होते. सुवर्णानेही पूजाचा फोटो पाहिला होता. शिवाय विवेक तिच्या संबंधी रोज काहीना काही सांगायचा. आज तिला प्रत्यक्षात बघत होती. हळूच तिने हाताच्या कोपराने विवेकला धक्का दिला. विवेकची तंद्री भंग झाली. " Hi …. Hi पूजा ", " Hi विवेक ." ," तू… तुला कसं कळलं मी आहे ते , मागून कसं ओळखलस मला… " विवेकने चाचरत प्रश्न केला.


पूजाला जरा हसू आलं. chatting करताना कसा मोकळेपणाने बोलतो, आता कसा घाबरत बोलत आहे.
" तू काय मला घाबरतोस का ? असा का झालाय आवाज तुला ? ",
" हा… जरा excitement होती ना म्हणून, बाकी काही नाही. " ,
" OK … OK …. actually, मी तुमच्या अगोदर आली आहे स्टेशनला. तुला नाही, मी सुवर्णाला बघितलं पहिल. नंतर तू दिसलास. १० मिनिटांपासून तुम्हा दोघांना पाहते आहे मी." पूजा बोलली.
" मला कसं ओळखलस ? " ," सुवर्णाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
" तुझा एक फोटो विवेकने मला mail केला होता, तेव्हा तुला ओळखलं. " , सुवर्णाने विवेककडे पाहिलं. त्याने होकारार्थी मान हलवली. सुवर्णाला राग आला त्याचा. मला न विचारता , याने माझे फोटो तिला दाखवले. अक्कल नावाची गोष्टच नाही याच्याकडे. तिघेही तसेच उभे.
सुवर्णाच बोलली मग," काय करायचे आहे आता , नाहीतर मी घरी निघते. माझी ट्रेन येईल आता.",
" हो… हो…, चल कॉफी घेऊया. तुला आवडते ना पूजा. " ,
" आवडते, पण आता नको, ट्रेन गेली तर पुन्हा उशीर होईल घरी जायला. पुन्हा कधीतरी." विवेकचा जरा हिरमोड झाला.
" OK , No problem. तुझी ट्रेन येईल ना आता, जा तू पूजा… हि सुवर्णा देखील C.S.T. ला राहते. तुमचा छान वेळ जाईल. Bye.",
"Bye विवेक." म्हणत पूजा धावतच गेली ट्रेनसाठी. सुवर्णाने विवेकला नेहमी सारखं "Bye " केलं, त्याचं कूठे लक्ष होतं पण,तो कसल्याशा विचारात गुंतला होता. सुवर्णा त्याचाकडे पाहत होती. ट्रेन आली, एकाच ट्रेनचे तिन्ही प्रवासी. विवेक त्याच्या डब्यात चढला. पूजा आधीच जाऊन बसली होती, ladies compartment मध्ये. सुवर्णाने विवेकला डब्यात जाताना पाहिलं आणि तीही ladies compartment मध्ये आली. पूजाने सुवर्णाला " Hi " केलं. सुवर्णाने Reply दिला. आणि तिने मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. तिला काही interest नव्हता , पूजाशी बोलायला. ती तिचे song's ऐकू लागली. पूजाला जरा विचित्र वाटली सुवर्णा, परंतू असते एकेकाला सवय… प्रवासात गाणी ऐकण्याची, असं स्वतःलाच म्हणत तिने दुर्लक्ष केलं तिकडे.


विवेक दादरला राहायचा. तो First class मधून प्रवास करायचा. त्यामुळे एवढी जास्त गर्दी नसायची डब्यात.तसा विवेकला गर्दीचा त्रास व्हायचा, अगदी रोज. पण आज त्याचा मूड चांगला होता. त्याला पूजा भेटली होती प्रत्यक्षात. मजा आली. विवेक मनातच हसत होता. पूजाचेच विचार त्याच्या मनात. छान मुलगी आहे एकदम. विचारसुद्धा जुळतात आमचे. मस्त मैत्री झाली आहे. friendship वरून त्याला सुवर्णाची आठवण झाली अचानक. सुवर्णाला तर विसरूनच गेलो. तिला तर Bye पण केलं नाही आपण आज. तिला काय वाटलं असेल, आणि ती काय बोलत होती रिक्ष्यात…. काही special आहे का, असं का विचारत होती ती… विवेक विचार करू लागला. त्याला आठवलं काहीतरी.आणि त्याचा सगळा मूड बदलला.

ट्रेन दादर स्टेशनला पोहोचली. विवेक स्टेशनला उतरला आणि घरी न जाता तसाच तो स्टेशनच्या पुलावर जाऊन उभा राहिला, येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन बघत. आज वारा वाहत होता. त्यात पावसाळी वातावरण. परंतू पाऊस मात्र पडणार नव्हता. काळवंडलेला आभाळ जरासं.विवेकला आठवण झाली ती त्याच्या पहिल्या प्रेमाची. कॉलेज मधलं प्रेम, ४ वर्ष ते एकत्र होते. इकडे जॉबला लागला तेव्हा सुद्धा ते एकत्र होते. छान जोडी होती दोघांची. लग्नाची गोष्ट केली तेव्हा समोर आला तो धर्म. विवेक मराठी तर ती गुजराथी होती. दोघांच्याही घरी ते चालणार नव्हतं. त्यामुळे ते relation पुढे वाढवण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. विवेकला ते पटत नव्हतं. तिनेच पुढाकार घेऊन " Break-up" केला आणि ती निघून गेली. विवेकला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. ढेपाळला होता अगदी. सुवर्णाने त्यावेळी त्याला सावरायला खूप मदत केली होती. तेव्हाचं त्याने ठरवलं होतं, कि पुन्हा कधी कुणाच्या प्रेमात पडायचं नाही.

विवेक तसाच उभा होता तिथे कितीतरी वेळ. म्हणून सुवर्णा सांगत होती, जास्त गुंतू नकोस कोणामध्ये… नाहीच गुंतणार कोणामध्ये. तेव्हडा कंट्रोल आहे माझा माझ्या मनावर. Thanks सुवर्णा, मला आठवण करून दिल्याबद्दल. विवेकने मनातच सुवर्णाचे आभार मानले आणि ती घरी आला.

पुढच्या दिवशीही तसंच, सकाळपासून chatting सुरु झाली ते संध्याकाळी ऑफिस सुटेपर्यंत. सुवर्णाला ते माहित होतं म्हणून तिने विवेकला disturb नाही केलं. ऑफिस सुटलं तसे विवेक आणि सुवर्णा निघाले घरी जाण्यासाठी. गेटजवळ येऊन विवेक थांबला. सुवर्णा बोलण्याच्या नादात तशीच पुढे चालत चालत गेली. पुढे गेल्यावर विवेक बाजूला नाही बघून ती थांबली. अरे !! हा गेटजवळ काय करतोय… तिने लांबूनच विवेकला " चल " म्हणून खुणावलं. विवेकनेच तिला " इकडे ये " असा हाताने इशारा केला. वैतागतच सुवर्णा परत आली. " अबे , काय time pass करत आहेस … चल ना. " ," थांब गं ." ," कशाला पण ? "," पूजा येते आहे." ," means ? "," अगं, तिचा आणि आपला रस्ता same आहे ना म्हणून मीच तिला बोललो कि आमच्या सोबत ये. " सुवर्णा त्याच्या बाजूला उभी राहिली. ५ मिनिटांनी पूजा आली. " Hi पूजा , कशी आहेस ? ", विवेकने विचारलं. जसे काय सकाळ पासून बोललेच नाहीत दोघे, सुवर्णा मनातल्या मनात. " Hi , मी बरी आहे, तू कसा आहेस ? "," मी पण मजेत. " … बापरे !! यांच सुरु झालं वाटते पुन्हा. " Excuse me, मला वाटते आपण बाकीच्या गप्पा रिक्षात करूया का ? " . तसे दोघे तयार झाले. रिक्षात बसून गप्पा सुरु झाल्या ते स्टेशन येईपर्यंत. ट्रेनमध्ये गेले सगळे, आजही विवेक सुवर्णाला " Bye " करायला विसरला.

============ क्रमश: ===========