Everything is for you... books and stories free download online pdf in Marathi

दृष्ट लागण्याजोगे सारे...

दृष्ट लागण्याजोगे सारे...

(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पण आजकाल जवळ जवळ बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती असते.)


तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...

तुझ्या माझ्या लेकरांना घरकुल हवं...

डोळे मिटून बेडवर निवांत पडून गाणं ऐकण्याची मजा काही औरच असते. कुकर ची शिट्टी वाजली तशी नीता एकदम दचकून जागी झाली. मोबाईल उचलून पहिले तर ८ वाजले होते. आज सोमवार, नवऱ्याच्या डब्याची तयारी. तिचा नवरा किशोर... पलीकडच्या रूम मध्ये व्यायाम करत होता. रंगाने गहुवर्ण, सहा पावणे सहा फूट उंच, सिक्स पॅक नाही पण पिळदार शरीरयष्टी, धारदार नाक अन ओठांवर लहान पण छान मिशा. पुण्यामध्ये नामांकित आय टी कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत. जास्त कुणाशी कामाव्यतिरिक्त बोलत नसे. मितभाषीच म्हणा. तर नीता एकदम बडबडी, भरभरून बोलणारी पण मनातलं मनातच ठेवणारी. रंगानं तशी गहुवर्णचं पण जरा गोरी कांती. काळेभोर पाणीदार डोळे, तांबूस काळे लांबसडक केस, रेखीव भुवया, उभा चेहरा अन चेहऱ्याला साजेसं सरळ नाक, सडपातळ पण कमनीय बांधा. साडीमधे तर तिचं सौंदर्य एवढं खुलून दिसायचं, कि पाहणारा पाहातच राहायचा. कॉलेजमधे ती मुलांशी कधीच बोलत नसे. तिच्या घरातील वातावरणचं असे होते कि, त्यामुळे तीने कधी मुलांशी मैत्रीच केली नाही. पण एकदा लायब्ररीमध्ये किशोरशी एका प्रसंगामधे तिची ओळख झाली अन दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले कळलंच नाही. घरच्यांचा विरोध पत्कारून दोघांनी प्रेम विवाह केला. आता लग्नाला दोन वर्षे होत आली होती. नीताचा रोजचा दिवस सकाळी आवरा आवर करण्यात निघून जायचा. किशोर ऑफिसला गेला की एकटीच घरात असायची. मग कुठे पुस्तके वाच, टीव्ही वगैरे बघ, दुपारी झोप अन संध्याकाळी एकटीच चहा घ्यायची. रात्री सात आठ च्या सुमारास नवरा आला की जेवण करून झोपणे. हे आता नित्याचेच झाले होते.

दिवसभर ऑफिस मध्ये काम करून कंटाळलेला किशोर रात्री तिच्याशी जास्त बोलत नसे. आठवड्यातून एखाद दुसऱ्या रात्री तिला जवळ घेई. नाहीतर तसाच झोपून जाई. पण त्या गोष्टीसाठी त्याने कधीच तिच्यावर जबरदस्ती केली नाही. जर तिची इच्छा नसेल तर तोही निमूट झोपी जायचा. निताही त्याला कामाच्या दिवसांमध्ये त्याच्याकडे कशाचा हट्ट करत नसे. पण शनिवार अन रविवारीही तो एक तर पुस्तके वाचत बसलेला असायचा किंवा काही न काही काम करत बसलेला असायचा. बाहेर कुठे फिरायला नाही की, जरा विरंगुळा म्हणून भटकायलाही जात नसे. नाही म्हणायला त्यातल्या त्यात दोघेही शनिवारी किंवा रविवारी हॉटेलला जेवायला जात असत. तेवढाच नीताला आराम अन जरा बाहेरही फिरून यायचं समाधान मिळायचं. पण नीताला या रुटीनचा कंटाळा आलेला होता. किशोरचही आता हे रोजचंच रुटीन झालं होतं. त्यामुळे नवीन असे काही संसारात नव्हतं. पण इकडे नीताच्या मनाची घुसमट वाढत चालली होती. भौतिक सुखं तर सगळी पायाशी होती. पण शारीरिक सुख फक्त नावापुरतच उरलं होत. सुरुवातीला किशोरमध्ये असणारी क्रेज, जोश अन शृंगार नाहीसा झाला होता. रात्री कधीतरी तो तिला जवळ घेत असे, ती प्रेमासाठी आसुसलेली असायची. तो तिला त्याच्या मजबूत बहुपाशांत घट्ट धरून ठेवायचा. ती तेवढा वेळ सुखायची. तो शांत झाला की लगेच झोपून जायचा. नीता मात्र तळमळत असायची. पण त्याला कधी काही बोलत नसे. हळू हळू तीही किशोरशी जास्त बोलेनाशी झाली होती. अशीच होती ती, मनातलं मनातच दाबून ठेवायची. संवाद कमी होत चालला होता.

लंच ब्रेक झाला होता. नेहमीप्रमाणे किशोर अन त्याचा मित्र समीर कॅन्टीन मधे जेवण करत होते. समीर मात्र कसल्यातरी गंभीर विचारात हरवून गेला होता. इकडे किशोरचा टिफिन संपत आला. पण समीरने फक्त पाव चपाती कशीबशी खाल्ली होती.

"काय रे... काय झालं? काही टेन्शन आहे का? ", किशोर ने समीरला प्रश्न केला.

तरीही तो अजून त्याच्याच विचार तंद्रीत होता. किशोरने त्याच्या खांद्याला हात लावत जरा हलवून पुन्हा तोच प्रश्न केला.

तो झटकन जागा होत म्हणाला, "हं.. काय म्हणालास?"

"तू बरा आहेस ना? काही प्रॉब्लेम आहे का? "

"काय सांगू यार... दोन दिवस झाले बायको भांडून माहेरी गेली आहे. आणि इथून पुढे फोनही करायचा नाही म्हणे."

"हम्म... तुझं हे नेहमीचंच झालंय यार. "

"अरे काल काल तर फोन उचलत नव्हती. आणि आज तर स्विच ऑफ येतोय फोन. काय करू काही कळत नाही यार."

"तिच्या घरी फोन करून बघ ना."

"माझ्या घरच्यांना फोन करायचा नाही. असे म्हणाली आहे ती."

"हम्म... एज युजवल... मग? आता?"

"आता काय..! येईल दरवेळे सारखी दोन तीन दिवसांत."

रात्रीच जेवण झालं. निताशी थोडंफार जुजबी बोलून किशोर बेडरूम मध्ये गेला. नीता किचन मध्ये आवराआवर करत होती. समीरच्या विचारात बिछ्यान्यावर पडल्या पडल्या किशोर कधी झोपून गेला, त्याचं त्यालाच कळलं नाही.

दुसऱ्या दिवशी समीर ऑफिसला आलाच नाही. चार वाजत आले होते. दुपारी समीरच्या आलेल्या कॉलमुळे किशोर पुरता हैराण झाला होता. कामात लक्ष लागत नव्हते.

पळून गेली यार ती...

च्यायला...

उठलो यार जिंदगीतून मी तर...

काय नाही केलं तिच्यासाठी ...

ऐपत नसतानाही पाहिजे ते आणून दिलं...

तिचे पाहिजेल ते हट्ट पुरवले...

सगळं तिचं ऐकत गेलो...

तिच्या सगळ्या चुकांवर पांघरून घालत गेलो...

च्यायला माहेरच्या नावाखाली कुणा दुसऱ्या बरोबरच रंग उधळायला जायची...

बरबाद झालो यार मी...

समीरचे शब्द न शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. चेहरा घामाघूम झाला होता. त्याने खिशातून रुमाल काढला. कपाळावर आलेला घाम पुसला. शेजारच्या बाटलीतलं पाणी घटाघटा पिला. पटकन फोन उचलला अन नंबर डायल केला. रिंग वाजू लागली. एक... दोन... तीन... रिंग वाजत होत्या. तशी त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. पलीकडून कॉल रिसिव्ह केला गेला. तसा तो जरा शांत झाला. पलीकडून तोच मंजुळ आवाज आला.

"हॅलो..."

"हॅलो... हाय... नितु... नीता..", खूप दिवसांनी त्याने तिला फोन केला होता. काय बोलावं कळत नव्हतं. समोरून एकजण चहा घेऊन चालला होता.

पटकन तो म्हणाला, "चहा... चहा घेतलास का?"

अचानक आलेल्या किशोरच्या फोन मुळे नीता जरा बावरलीच. लग्नानंतर रोज फोन करून काय करतेस? कशी आहेस? जेवलीस का? चहा झाला का? आराम कर!असे म्हणणारा किशोर हळू हळू कॉल करायचा बंद झाला. अन अचानक एवढ्या दिवसांनी या वेळी त्याचा कॉल होता. तिलाही काही सुचेना काय बोलावे. हृदय धडधडत होत.

"अं.. हं.. हे.. हे.. आपलं च च चहा घेतेय.. तू.. तू.. तुम्ही घेतला.. घेतलास का?" ती तर अगदी भांबावून गेली होती.

तो काहीश्या शांत अन काळजीच्या स्वरात म्हणाला,

"अगं काय झालं? बरी आहेस ना?"

"न.. नाही. तू.. तुझा.. तुमचा.. फोन अचानक या वेळी आला म्हणून जरा....", ती कसबस बोलण्याचा प्रयत्न करत होती.

"हम्म .. ठीक आहे.. आज संध्याकाळी तयार राहा. मुव्ही बघायला जायचंय अन डिनरही बाहेरच करू."

त्याने कॉल कट केला. ती फोन तसाच कानाला धरून बसली होती. भानावर येताच तिला तर काय करू न काय नको असे झाले होते. आपसूकच एक हिंदी गाणं ती गुणगुणू लागली.

'आज मैं उपर..

आसमाँ नीचे...

आज मैं आगे ssss...

जमाना है पिछे l '

एवढ्या दिवसांनंतर आज पहिल्यांदा ती आरश्या समोर छान मेकअप करत होती. किशोरच्या आवडीची नारंगी रंगाची साडी अन त्यावर मॅचिंग डिझायनर ब्लाउज तिने घातला होता. ब्लाउजची बॅक साईडला रेशमी जांभळ्या दोऱ्यांची नॉट बांधली होती. दोऱ्यांना असलेले नारंगी गुलाबी रंगाचे गोंडे जरा खाली वर लटकत होते. कानातही तशाच रंगाचे साखळीचे झुमके लटकत होते. कपाळावर अर्धचंद्राकृती बिंदी अन त्यावर धनुष्य बाणाच्या टोकाच्या आकाराची लहान टिकली लावली होती. केसांची वन सायडेड हेयर स्टाईल केली होती. त्यात गॅलरीतल्या मोगऱ्याची दोन चार फुले तिने छान लावली होती. डोळ्यांना हलकंस काजळ तर ओठांना छान गुलाबी रंगाचा लिपस्टिक तिच्या सौंदर्यात भर घालत होतं. टीव्ही वर छान रोमँटिक हिंदी गाणी ऐकत ती सोफ्यावर किशोरची वाट पाहत बसली होती. डोअर ची बेल वाजली, लैच उघडले. नीताला समोर पाहून तो थक्कच झाला. एकटक तिच्याकडे पाहत राहिला.

वाव...

काय दिसतीये यार आज तू...

असं वाटतंय...

कवेत उचलून एक गिरकी घ्यावं...

गच्च मिठीत घ्यावं...

अन तुझ्या ओठांचं दिर्घ चुंबन घ्यावं...

आज खूप दिवसांनी तो तिला एवढं निरखून पाहत होता. विचारांतून बाहेर येत त्याने बॅग सोफ्यावर ठेवली. बाथरूममध्ये शिरला. फ्रेश होऊन, त्याने आज तिच्या आवडीचा आकाशी रंगाचा शर्ट अन जीन्स चढवली. अगोदरच एका रोमँटिक सिनेमाची त्याने तिकिटं काढली होती. खूप दिवसांनी कॉर्नर सीट वर एकमेकांच्या हातात हात घेत दोघांत एकच कॉफी शेयर केली. एका छानशा रुफ हॉटेल मध्ये शहराचा रात्रीचा नयनरम्य परिसर नजरेस पडत होता. मंजुळ आवाजात जुनी हिंदी रोमॅंटिक गाणी वाजत होती.

चाँद सी महबूबा हो मेरी कब

ऐसा मैंने सोचा था ।

हाँ तुम बिलकुल वैसी हो

जैसा मैंने सोचा था ।

टेबलाच्या मधोमध असलेल्या गुलाबी लॅम्पमुळे तिच्या चेहऱ्यावर गुलाबी रंगांची छटा पसरली होती. अन त्यामुळे ती अधिकच खुलून दिसत होती. हॉटेल मध्ये असलेल्या रोमँटिक वातावरणामुळे ती अतिशय भारावून गेली होती. आज ती खूपच सुंदर दिसत होती. स्वर्गातील अप्सराही तिच्या पुढे फिक्या पडतील. आजूबाजूला आपल्या फॅमिली बरोबर आलेली पुरुष मंडळीही निताकडे चोरून कटाक्ष टाकत होते. किशोर तर पुरता घायाळ झाला होता. त्याने तिच्या आवडीचं व्हेज मंचुरिअन सूप, चायनीज कॉम्बो मागवलं. बाईकवर त्याला बिलगून ती बसली होती. कॉलेजचे, लग्नानंतरचे ते गुलाबी दिवस पुन्हा एकदा ती अनुभवत होती. दोघेही घरी आले. दोघांनी कपडे बदलले. ती किचन मध्ये शिरली. बेडरूमधे किशोरने म्युजीक सिस्टीम वर जुनी रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणी हळू आवाजात लावली. नीता किचन मधलं आवरून आत आली. लैच उघडल्याचा आवाज झाला. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं अन तो पाहतच राहिला. आज खूप दिवसांनी तिने निळ्या रंगाची व्हेलवेट ची नायटी घातली होती. अंगाला एकदम घट्ट बसल्यामुळे तिच्या अंगाची वळणं स्पष्टपणे दृष्टीस पडत होती. किती तरी दिवसांनी तो असा तिच्याकडे एकटक पाहत होता. तिच्या छातीचे उभार तिच्या कमनीय बांध्याची साक्ष देत होते. तिचे ते काळेभोर गहिरे डोळे, पाठीवर रुळणारे लांबसडक केस, गुलाबी रसरशीत ओठ, कमनीय बांधा. तो डोळ्यांनीच तिचं सौंदर्य पिऊ पाहत होता. तो तिच्या समोर आला. त्याचे श्वासोच्छवास तिला ऐकू येत होते, तर तिच्या ह्रदयाची धडधड तो अनुभवत होता. त्याची भरदार रुंद छाती, किती दिवस तिने त्यावर स्वतःच डोकं निवांत ठेवलं नव्हतं. तर किती दिवस त्याने तिला प्रेमाने छातीशी कवेत घेऊन कवटाळलं नव्हतं. तो तिच्या आणखी जवळ सरकला. तिने लाजून पापणी खाली केली. श्वासांची गती वाढू लागली. मंजुळ आवाजात गाणं वाजत होतं.

छू लेने दो नाज़ुक होठों को,

कुछ और नहीं हैं जाम हैं ये ।

क़ुदरत ने जो हमको बख़्शा है,

वो सबसे हंसीं ईनाम हैं ये

त्याने हलकेच तिच्या गुलाबी ओठांच चुंबन घेतलं. तिचं अंग अंग शहारलं. तिने आवेगाने डोळे मिटून घेतले. त्याने तिच्या कपाळाचं, डोळ्यांचं, अन हळुवार ओठांचं चुंबन घेतलं. कित्येक वर्षांनी आज ती सुखावत होती. ती डोळे मिटून स्वर्गीय सुखाचा आनंद अनुभवत होती. अन अचानक त्याने तिला दोन्ही हातात उचलून घेतलं. त्याच्या लक्षात आलं, पहिल्यापेक्षा वजन जरा वाढलं होतं. तिने लाजून डोळे मिटून घेतले. तिला अलगद बेडवर ठेवलं अन तिच्यावर गुडघ्यांवर बसून तो तिला न्याहाळू लागला.

"एवढं काय पाहताय. टक लावून?"

"खूप छान दिसतेयस तू"

"हो का? लक्ष आहे म्हणायचं अजून आपल्या बायकोवर..."

"ते तर पहिल्यांदा तुला पाहिल्यापासून होतं."

"मग आज बरं ध्यानात आलं.", ती थोडंसं लाजतच म्हणाली.

तो तिच्या गालांवर ओठ टेकवतच म्हणाला, "तुझ्या डोळ्यांची जादूच काही और आहे अन हे ओठ..."

ती काही बोलणार तोच त्याने तिचा चेहरा आपला ओंजळीत घेतला अन पुन्हा एकदा तिच्या कोमल ओठांचे हळुवार चुंबन घेतले. आता फक्त डोळ्यांची भाषा अन ओठांचे मुलायम स्पर्श बोलत होते. तिचे हात त्याच्या पाठीवर फिरत होते, केसांची खेळत होते. तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होता. तीही त्याला तितक्याच आवेगाने प्रतिसाद देत होती. प्रणयात डोळे बोलतात, ओठ आस्वाद घेतात तर हातांचे स्पर्श ते सुख, तो आनंद, ती भावना अनुभवत असतात. म्युजिक सिस्टीम वर गाणं वाजत होत.

आज फिर तुमपे प्यार आया है l

बेहद और बेशुमार आया है l

धुंद रात्र, रोमांचित शरीरं, आसुसलेले क्षण. आज त्याला ती, अन तिला तो वेगळेच भासत होते. प्रणयाचा उत्कट आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. खूप दिवसांनी आज तो तिला प्रेमानं कुशीत घेऊन निजला होता. तीही त्याच्या कुशीत सुखाधीन झाली होती. मागे मराठी गाणं वाजत होतं.

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे...

जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे!

~ समाप्त ~


@स्वलिखित

ईश्वर त्रिम्बकराव आगम

वडगांव निंबाळकर, बारामती

भ्रमणध्वनी : ९७६६९६४३९८