Rudra - 13 books and stories free download online pdf in Marathi

रुद्रा ! - १३

वेळ सकाळी अकराची होती.
न्यायमूर्ती श्री हरिप्रसाद यांचे कोर्ट, खचाखच भरलेले होते. त्याला तसेच कारणही होते. कोट्याधीश संतुकराव सहदेव यांच्या खुनाची केस त्या दिवशी सुनावणीस असणार होती. न्याय निष्टुर जजेस मध्ये हरिप्रसादांचे नाव बरेच वरच्या बाजूस होते. अपराध्याला जास्तीजास्त शिक्षा सुनावण्याकडे त्यांचा कल असतो, असा आजवरचा इतिहास सांगत होता. त्याच बरोबर ते आरोपीस निरपराधत्व सिद्ध करण्याची संधी पण आवर्जून देत, हे हि खरे होते.
दुसरी महत्वाची बाब होती ती, संतुकराव सहदेव यांचे जगजाहीर 'इच्छापत्र!'. आरोप सिद्ध होऊन, जर आरोपी सही सलामत सुटला तर, पंधरा शे कोटीचे साम्राज्य त्याचे स्वागत करण्यास सज्ज होते, पण ते अशक्य होते! आणि न्या. हरिप्रसादजी असताना तर केवळ अशक्य!!
तिसरी महत्वाची बाजू होती ती म्हणजे, सरकारी वकील, अडोव्हकेट दीक्षित! दीक्षित म्हणजे क्रिमिनल केसेस मधला किडा!. इन्स्पे. राघव आणि दीक्षित वकील म्हणजे पुराव्याची आणि पैरवीची भक्कम तटबंदी!
आणि या सर्वान विरुद्ध होता रुद्रप्रताप रानडे! ज्याने 'माझ्या हातून खून झाला आहे!' हे लिहून दिले होते.
'कोर्टाने सलग वेळ दिला तर, फक्त चारच दिवसात हि केस निकाली लागेल!' असे दीक्षित राघवला म्हणाले होते.
पट्टेवाल्याने पुकार केला, तशी इतकावेळ,जी कोर्टात कुजबुज चालू होती ती क्षणात शांत झाली. सर्व जण उठून उभे राहिले. कोर्ट स्थानापन्न झाले तशे सर्वजणहि आपापल्या जागी बसले. कार्यवाही सुरु करण्याचा आदेश कोर्टाने दिला. सुरवातीच्या औपचारिकता संपल्या.
"आरोपी रुद्प्रताप रानडे, आपला कोणी वकील आहे का?" कोर्टाने विचारले.
'इतका सज्जड पुरावा असताना आणि अपयशाची खात्री असताना कोण घेणार याची केस?' दीक्षित जरी स्वतःशीच पुटपुटले तरी ते अख्या कोर्टानी ऐकले. रुद्राने क्षणभर दीक्षितांच्या कडे अश्या नजरेने पहिले कि दीक्षितांच्या अंगावर काटा आला.
" नाही. माझा कोणी वकील नाही!"
"आपणास कोर्टाकडून वकील मिळू शकतो. तुम्ही घेणार का?"
"धन्यवाद. पण मला वकील नको!"
" मग, तुमची बाजू कोर्टा समोर कोण मांडणार?"
"माननीय न्यायमूर्तीनी परवानगी दिली तर मीच माझी बाजू मांडीन!" रुद्रा नम्रपणे म्हणाला.
प्रेक्षकात कुजबुज वाढली. हा तरुण कशी काय केस लढवणार? न्याय. हरिप्रसादजी समोर आणि दीक्षितांन सारख्या नामवंत वकिलांविरुद्ध?
"ऑर्डर! ऑर्डर!! शांतता पाळा!" कोर्ट आपला लाकडी हातोडा मेजवर आपटत गरजले,आणि रुद्राकडे वळून म्हणाले.
"आरोपी रुद्रप्रसाद, आपण पुरेसे गंभीर आहेत ना? हा तुमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे!"
" महोदय,मला याची पूर्ण जाणीव आहे. फक्त एकच विनंती आहे!"
"बोला!"
" महोदय, मी ज्ञानाने किंवा पेशाने वकील नाही. मी न्यायदेवतेचा आदर करतो. माझा, न्यायव्यवस्थेवर आणि आपल्या न्यायदानावर पूर्ण विश्वास आहे. पण बोलण्याच्या ओघात कधी अनुचित बोलून गेलो तर मला समजून घ्यावे."
"आपण सर्वजण समजूतदार आहोतच. आणि दीक्षित आहेतच तुम्हाला ट्र्याकवर ठेवायला!"
कोर्टात नर्महश्या पिकला.
" तर मग ठीक. आरोपी वरील आरोपांचे वाचन करण्यात यावे!" कोर्टाने सुनावले.
" आरोपी रुद्रप्रसाद रानडे ,वय २९वर्ष, रा. मुंबई, यांनी दि १२ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास श्री संतुकराव सहदेव यांचा, नाक तोंड दाबून खून केला! म्हणून रुद्रप्रसाद रानडेंवर -सदोष मानव हत्येचा -आरोप आहे!"
रुद्रा वरील आरोपाचे गंभीर आवाजात वाचन झाले.
" आरोपी रुद्रप्रसाद,काय आपणास हा गुन्हा मान्य आहे?" कोर्टाने रुद्रास विचारले.
"महोदय, मी हा खून केलेला नाही! मी हा गुन्हा अमान्य करतो!"
राघव क्षणभर सुन्न झाला. रुद्रा स्वतः खुनाचा पुरावा घेऊन पोलिसांना शरण आला होता! 'मला अटक करा' म्हणाला होता! अटक झाल्यावर 'माय प्लेजर! त्यासाठीच आलोय!'म्हणाला होता! आणि आता गुन्हा नाकारतोय? त्याने दीक्षितांकडे नजर टाकली. त्यांना फारसे आश्चर्य वाटल्याचे दिसत नव्हते. कारण सर्वच आरोपी सुरवातीला 'गुन्हा' अमान्यच करत असतात, त्यात नवल ते काय?
" कोर्ट इज ऍडजर्न टील नेक्स्ट डेट!" म्हणत कोर्ट उठले.
त्या दिवशीचे काम काज संपले होते.
०००

पुढील तारखेस पुरावा म्हणून दाखल केलेले जसवंतचे घेतलेले जवाब, रुद्रास वाचून दाखवण्यात आले. राघवने हा भाग कोर्टास सांगितला. दीक्षितांनी काही जुबुबी प्रश्न जसवंतच्या संदर्भात विचारले.
"आरोपी रुद्रप्रसाद, आपणास जसवंतच्या जबानी समंधी काही विचारावयाचे असेल तर तुम्ही इन्स्पे. राघवला विचारू शकता. आपले काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा. "
रुद्राने ऑब्जेक्शन घेतले नाही.
त्यांनतर इन्स्पे. राघवाची साक्ष झाली. त्यात त्याने जाधव काकांचा फोनवरील इन्टिमेशन पासून ते शव पोस्टमोर्टम साठी पाठवल्या पर्यंतची माहिती सांगितली.
रुद्राचे 'नो ऑब्जेक्शन!
मग पोस्टमोर्टम करणारे डॉ., त्यांत त्यांनी मृत्यूचे कारण,मृत्यूची वेळ, या गोष्टी संदर्भात माहिती दिली. त्या दिवशी शेवटची साक्ष झाली ती फिंगरप्रिंट एक्सपर्टची. त्याने रुद्राचे फिंगरप्रिंट्स आणि संतुकरावांच्या मृत देहावर, विशेषतः नाकावर आणि कानाजवळचे ठसे, आरोपीचेच असल्याचे प्रमाणित केले.
तरीही रुद्राचे 'नो ओब्जेक्शनचं! त्या दिवशीचे कोर्टाचे कामकाज संपले, तेव्हा कशालाच जर हा रुद्रप्रसाद हरकत घेत नसेल तर, गुन्हा का नाकबूल केलाय? हाच प्रश्न कोर्टात हजर असल्याच्या मनात होता. काही 'चटपटीत' बातमीच्या मागावर असलेल्या स्थानिक वृत्तपत्रांचा रिपोर्टर्सची निराशा झाली होती. नाही म्हणायला, सरकारी वकील श्री दीक्षितांनी हि केस लवकरात लवकर निकाली निघावी या दृष्टीने माननीय कोर्टास सलग तारखा देण्याची विनंती केली होती. इतर कामाचा दबाव असूनही कोर्टाने विनंती मान्य केली होती! पुढील तारखे पासून या केस साठी 'विशेष बाब' म्हणून सलग दहा दिवस सुनावणी साठी दिले जातील असे जाहीर करून टाकले!
०००
या तारखेस 'संतुकराव मर्डर केस'चा तुकडाच पडायचा या जिद्दीने अडव्होकेट दीक्षित कोर्टात आले होते. सोबत प्रोजेक्टर आणि स्क्रीन पण त्यांनी आणवला होता. आज काही तरी विशेष पहायला मिळणार याची उपस्थितीत कुजबुज सुरु झाली.
कोर्ट स्थानापन्न होऊन कोर्टाचे कामकाज सुरु झाले तसे दीक्षित घसा खाकरून बोलावयास उभे राहिले.
" न्यायदानासाठी सलग तारखा दिल्या बद्दल आम्ही सर्वजण माननीय कोर्टाचे आभारी आहोत. आजची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण आहे. सरकारच्या वतीने आमचे शेवटचे साक्षीदार आहेत श्री राकेश!"
राकेश साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा राहिला. त्याने न्यायासनास आदरपूर्वक नमस्कार केला.
" राकेश, आपण पोलीस खात्यात काय काम करता ते कोर्टास सांगावे." दीक्षित म्हणाले.
"मी पोलिसात कॉम्पुटर संबंधित सर्व कामे पहातो. सायबर सेल मध्ये असिस्टंट इन्चार्ज आहे."
"आज मी जी व्हिडीओ कोर्टास दाखवणार आहे ती तुम्हास माहित आहे का?"
"हो."
"ती तुम्हास कशी माहित आहे?"
" ती व्हिडीओ माझ्या कडे तपासणी साठी इन्स्पे. राघवनी पाठवली होती."
"म्हणजे तुम्ही ती तपासली आहे! ओके. ती जेनुइन आहे का? का एडिटेड आहे? म्हणजे तुकडे-तुकडे जोडून ती तयार करण्यात आली आहे?"
" ती व्हीडिओ एडिटेड नाही. ती ओरिजिनल आहे! अगदी अस्सल."
"तुम्ही इतके खात्रीपूर्वक कसे सांगू शकता?"
" दोन गोष्टीच्या आधारे! एक तर हि सम्पूर्ण व्हिडीओ सिंगल शॉट मध्ये आहे. आणि दुसरे कारण मी त्यातला तज्ञ आहे."
" धन्यवाद, राकेश. मिस्टर रुद्रप्रताप, आपले काही ऑब्जेक्शन?" रुद्राकडे वळत दीक्षितांनी विचारले.
" मी तो व्हिडीओ पाहूनच माझे ऑब्जेक्शन घेईन!" रुद्रा म्हणाला.
"तर न्यायमूर्ती महोदय, आपली परवानगी असेल तर, आम्ही कोर्टास आरोपी रुद्रप्रसाद यांनी संतुकराव सहदेव यांचा खून कसा केला हे प्रत्यक्ष दाखवणार आहोत!"
'बापरे!आता काय प्रोजेक्टरवर खून दाखवणार कि काय?' ' कमाल आहे इन्स्पे. राघवाची! कसला सॉलिड पुरावा दाखल केलाय!', 'पण खून करतानाचा व्हीडिओ केला कोणी?आणि मग खुन्याला का नाही थांबवलं?' असे अनेक प्रश्न कुजबुजीतून उमटू लागले.
"शांतता! चित्रीकरण दाखवण्याची परवानगी देण्यात येत आहे!" कोर्टाने परवानगी दिली. दीक्षितांनी हाताने राकेशला इशारा केला. राकेशने तत्परतेने ती व्हिडीओ प्रोजेक्टरवर लोड केली. स्क्रीन ऍडजेस्ट केला. तोवर पट्टेवाल्यानी खिडक्यावरील पडदे ओढून घेतले. प्रोजेक्टर ऑन झाला.
पंधरा मिनिटे कोर्टात स्मशान शांतता होती! रुद्राने केलेल्या खुनाचे ते भयनाट्य सम्पूर्ण कोर्टाने पहिले.
" मिस्टर रुद्रप्रताप, आत्ता तुम्ही, मी आणि सर्वानी जी व्हिडीओ पहिली त्या संबंधी आपणास काही ऑब्जेक्शन आहे का ?"दीक्षितांनी विचारले.
" नाही!"रुद्रा खाली मान घालून म्हणाला.
"न्यायमूर्ती महोदय, या व्हिडीओ संदर्भात मला आरोपी रुद्रप्रसाद याना काही प्रश्न विचारायचे आहेत. परवानगी असावी."
कोर्टाने परवानगी दिली.
"आरोपी रुद्रप्रसाद, या व्हिडिओत आपण आहेत काय?"
"हो आहे!" रुद्राचा आवाज कमालीचा शांत होता. त्यात कोठेही भीतीचा लवलेशही नव्हता!
"कोठे आहेत?"
"मी संतुकरावांच्या पाठीमागे उभा आहे!"
"तुम्ही तेथे काय करत आहेत?"
" अहो मी त्यांच्या पाठीशी उभा आहे, हे आत्ताच तर सांगितलंय ना?"
"मला सांगा, संतुकरावांच्या तोंडावर असलेले हात कोणाचा आहे?"
"तो,न, माझाच हात आहे!"
"उजवा कि डावा ?"
"डावा!"
"त्या हाताची बोट कुणाची आहेत?"
" अर्थात, ती माझीच आहेत!"
"तुमच्या त्या बोटानी संतुकरावांचे नाक चिमटीत दाबून धरले आहे का नाही?"
"हो, धरलाय!"
"तो तुमचा डाव्या हाताचा तळहात संतुकरावांच्या तोंडावर दबलेला आहे का नाही?"
"हो, आहे!"
"त्या तुमच्या हाताच्या कृत्याचा संतुकरावावर काय परीणाम होतोय?" 'हात' या शब्दावर विशेष जोर देत दीक्षितांनी विचारले.
"ते धडपडताहेत!"
" मग शेवटी काय झालंय?"
"यात संतुकराव गतप्राण झालेत!"
" धन्यवाद,रुद्रप्रसाद!" दीक्षितांनी रुद्राची साक्ष संपवली.
"न्यायमूर्ती महोदय, आत्तापर्यंतचे पुरावे, आत्ता पाहिलेली व्हिडीओ, त्यानंतरची रुद्रप्रसादांची साक्ष, फक्त, फक्त आणि फक्त एकाच गोष्टीकडे निर्देश करते. आणि ती म्हणजे आरोपी रुद्रप्रसाद रानडे यांनी संतुकराव सहदेव यांचा, अत्यंत थंडगार डोक्याने, क्रूरपणे खून केला आहे! आरोपी वरील खुनाचा आरोप निःसंशय सिद्ध झाला असे मानण्यात यावे. न्यायमूर्तीनी अश्या क्रूरकर्म्यास कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी अशी मी विनंती करतो!" आपले म्हणणे त्रोटकपणे सांगून ऍडव्होकेट दीक्षित विजयी मुद्रेने जागेवर बसले.
"आरोपी रुद्रप्रसाद, आपण खून करतानाची व्हिडीओ आम्ही सर्वांची पहिली आहे. आजवर त्या अनुशंघाने इतरही साक्षी झाल्याचं आहेत. आता तरी आपणास खुनाचा आरोप मान्य आहे का नाही?" कोर्टाने रुद्रास विचारले.
दीक्षितांनी, त्यांच्या साक्षीने रुद्रास करकचून बांधून टाकले होते. आणि आता ' हो' म्हणण्या शिवाय त्याला गत्यंतरच नाही, अशी फक्त दीक्षितांचीच नव्हे तर कोर्टातील उपस्थित सर्वांचीच अपेक्षा होती.
" न्यायधीश महोदय, मी माझे म्हणणे पूर्वीच सांगितले आहे! हा खून मी केलेला नाही!" रुद्रा सावकाश आणि स्पष्ट शब्दात म्हणाला! त्याच्या आवाजात कमालीचा आत्मविश्वास होता!
कोर्टात पिन ड्रॉप सायलेन्स पसरला!
व्हिडीओ सारखा जिवंत पुरावा असूनही, रुद्राने आरोप नाकारला! हेच ऐकले ना आपण? दीक्षितांनी स्वतःलाच विचारले!
"काय? आरोप अमान्य? रुद्रप्रसाद आपण गम्भीर आहेत का? कोर्टाचा बहुमूल्य वेळ जयोय! आपणास आपले म्हणणे सिद्ध करावे लागेल!" कोर्ट रुद्रावर बरसले.
" मला पूर्ण कल्पना आहे,महोदय! माझे निरपराधत्व सिद्ध करण्यास मला संधी दयावी ही विनंती आहे!"
रुद्रा नम्रपणे म्हणाला.
त्या दिवशी रुद्राच्या विनंतीवरून तीन समन्स निघाली. रुद्राचे साक्षीदार होते प्रोफेसर जोगदंड, ओम मॉलचा सेक्युरिटी गार्ड, आणि डॉ. रेड्डी!

(क्रमशः)