Ye g gourabaai - 1 books and stories free download online pdf in Marathi

ये ग गौराबाई - 1

ये ग गौराबाई भाग १

गणपतीचे आगमन झाले की पाठोपाठ होते गौरीचे आगमन
गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी व नंतर शंकरोबांचे आगमन होते.
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया गौरीपूजनाचे व्रत करतात.
गौरीचा सण महिलांचा विशेषतः माहेरवासिनींचा अमाप उत्साहाचा सण असतो .जुन्या आठवणी उजळून निघणारे माहेरपण भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणावा लागेल. महिलावर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येतो.
गौरी याचा अर्थ एक अनाघ्रात मुलगी ,गौरी म्हणजे पृथ्वी ,
तरुण पत्नी ,तुळशीचे झाड जाईचा वेल असेही अर्थ आहेत.
ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी सोबत तेरड्याचीही गौरी म्हणून पूजा केली जाते .
भाद्रपद महिन्यातील या सणा दिवशी प्रत्येकाच्या कुलाचारा नुसार गौरीचे पुजन केल जाते .हिलाच महालक्ष्मी म्हणतात .ज्येष्ठ नक्षत्रावर पुजाहोत असल्याने ती ज्येष्ठागौरी म्हणले जाते .
पुराणात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.
गौरीच्या सुंदर कोरीव प्रतिमे मध्ये त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे.ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.
याची कथा अशी आहे
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य रक्षण करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.
महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो.
शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात.
लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा,भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.
हे आवाहन तीन दिवसाचे असते .पहील्या दिवशी गौरीचे आगमन होते ,दुसर्या दिवशी गौरी गोडधोड भोजन करतात .
तिसर्या दिवशी गणपती सोबत यांचे पण विसर्जन केले जाते .

स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात.
काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात.
काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात.
सुपात धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात.
किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.
भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो तीन दिवस चालतो.
दक्षिण भारतात प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात

तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात.ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे.
आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते.
विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते.
पाणवठ्यावरून खड्यांच्या गौरी पण ताम्हणातून आणल्या जातात .
गौरी घेऊन येणाऱ्या माहेरवाशीणीचे दुधाने पाय धुतले जातात .
तिला पंचारतीने ओवाळले जाते व हळद कुंकू लावून घंटेच्या नादात घरात आणले जाते .
तेव्हाच गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात.
काही ठिकाणी गौरीसोबत शंकर किंवा शंकरोबा पुजला जातो.
हा शंकरोबा वल्कले नेसलेला हातात भाला घेतलेला व गळ्यात नाग घातलेला निळ्या रंगाचा असतो .
कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.काही घरात उभ्या लक्ष्मी मांडण्याची पद्धती आहे.
गौरीच्या सणाला सुनेला माहेरी पाठवले जाते आणि लेकीला आपल्या घरी आणले जाते .
त्यामुळे हा फार जिव्हाळ्याचा सण आहे .
गौरीच्या आवाहनासाठी अनेक प्रकारची गाणी गायली जातात .
गवराय आली गवराय आली

कोणत्या पावलानं ?

हळदी कुंकवाच्या, हिऱ्या माणकाच्या

..ये ग गौराबाई एवढ जेवून जाई

रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा ..

माहेरी नेण्यासाठी भाऊ येत असतो त्यामुळे
बंधू येईल येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला
अशी आशा पण व्यक्त केली जाते

लोकसाहित्यात गौरीपूजन प्रसंगी म्हटली जाणारी गीते आहेत -

आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको

बाळाला सांगते, धरला हात सोडू नको....

मला आहे हौस, चांदीच्या ताटाची

लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची....

लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी

ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली

मालकाच्या घरी लक्ष्मी आली ...

गौरीच्या रूपाने घरात सुख समृद्धी येते शांतता लाभते असा पूर्वापार समज आहे त्यामुळे अत्यंत उत्साहाने गौरी आणल्या जातात .
रांगोळ्या फुलांनी सजविलेल्या घरात गौराईचे आगमन म्हणजे साक्षात लक्ष्मी, सरस्वतीच्या, धनवृद्धी, धनसंपदा, सोनं नाणं यांच्या पावलाने आगमन असे समजले जाते.
नागपंचमीपासूनच सराव केलेल्या झिम्मा-फुगडीची रंगत आधिकृतपणे गौरी गणपतीच्या सणातच पाहावयास मिळते.
लोकगीतांच्या तालावरील झिम्म्यातील गाणी म्हणजे शारीरिक हालचाल आणि मनाची प्रसन्नता यांचा सुरेख संगमच.
कौटुंबिक नाती आई, वडील, बंधुराया यांच्याप्रती असणारा भावनिक ओलावा अशा गाण्यांमधून प्रकट होत असतो.
माया, ममता, प्रेम प्रकट होते. सासू, सासरे, दीर, नणंदा यांचे पारंपरिक नातेसंबंध आधोरेखित करणाऱ्या गाण्यातील ओळी म्हणजे अनुभवाचे कथनच.
फुगडी, चुईफुई, काटवटकाणा, घागर, सूप हाताच्या तालावर नाचविणे यामधून व्यक्तिगत कौशल्य नजरेस येते. हास्य, विनोद, थट्टामस्करी यामधून खिलाडूवृत्ती वाढीस लागते. लोकजीवनातील ही लोकसंस्कृती सामाजिक प्रगतीला प्रेरणा देते.

क्रमशः