Majha sinh gela - 3 in Marathi Adventure Stories by Rajancha Mavla books and stories PDF | माझा सिंह गेला - भाग-३

माझा सिंह गेला - भाग-३

भाग ३ - शिकार

(माझा सिंह गेला या ऐतिहासिक कथेचा हा शेवटचा भाग. काही ऐतिहासिक प्रसंग कल्पनाशक्तीची जोड देऊन रंगवलेले आहेत. आपला अनमोल अभिप्राय मिळावा ही अपेक्षा. )

शिवाबराजेंनी धनुुष्यातील बाण भक्षावर ताणला होता. त्यांची नजर फक्त त्या वाघावर खिळली होती.

अन अचानक, कोंडाजीला दोरीचा हिसका बसला. झुडपात खसखस वाढू लागली तशी कोंडाजीने दोरी वर ओढायला सुरुवात केली. बहिर्जी वर वर जाऊ लागला. आता, वाघ त्या शेळीवर झडप घालण्याच्या पवित्र्यात असतानाच.. अचानक, शिवबा अन त्यांच्या साथीदारांनी सप सप बाण वाघाच्या दिशेने सोडले. एका बाण वाघाच्या डोक्यावरून गेला. वाघ सावध झाला. तो मान वळवणार तोच दुसऱ्या क्षणी एक बाण त्याच्या डाव्या कानसुलात घुसला तर दुसरा पुढच्या पायाच्या वर तर बाकीचे हुकले. त्यासरशी त्याने मोठयाने एक डरकाळी फोडली. त्याच्या आवाजाने सारा आसमंत दुमदुमून गेला. त्याच्या कानातून रक्ताची धार लागली होती. मानेला झटके देत गुरगुरत तो बाण आलेल्या दिशेने झोकांड्या देत, तोल सावरत झेपावू लागला. पुन्हा एकदा सप सप बाण सुटले. यावेळीही दोन तीन बाण त्याच्या शरीरात घुसले. त्यासरशी ते अजस्त्र धूड जमिनीवर गुरगुरत धाडकन कोसळलं. कोंडाजी, येसाजी, बहिर्जी अन त्यांचे चार पाच साथीदार खाली आले. वाघाच्या मागच्या बाजूने हातात भाले घेऊन पुढे सरसावू लागले. शिवबा अन तानाजीही हातात भाले पेलत जाळीतून बाहेर आले. वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज अजूनही येत होता. शिवबा धीमी पावलं टाकत अन भाला पेलत समोर येत होता. अचानक ते धुड उठलं अन डोळ्यांचं पातं लवते न लवते तोच ते मोठ्याने गुरगुरत शिवबावर झेपावलं. एकदम अंगावर आलेलं ते एवढं मोठं धुड अन त्याचा तो आवेश पाहून शिवबा क्षणभरच गंगारला. पण दुसऱ्याक्षणी स्वतःला सावरत, होत्या नव्हत्या शक्तीनिशी भाल्याचा वार वाघाच्या छताडावर केला. वार हुकला. तोवर तानाजीनेही स्वतःला वाघ्यावर भल्यासकट झोकून दिले होते. रक्ताची चिळकांडी शिवबाच्या तोंडावर उडाली. शिवबा दोन तीन पावलं जाऊन मागे कोसळला.

कोंडाजी अन येसाजी एकदम ओरडले, "शिवबा ssssssss तान्या ssss".

दोघेही एकदम शिवबाकडे धावले. वाघाच्या पंजाने निशाणा साधलेला होता. शिवबाचा अंगरखा डाव्या खांद्यापासून छातीच्या उजव्या भागापर्यंत फाटला होता. रक्ताच्या तीन लकेरी छातीवर स्पष्ट दिसू लागल्या अन त्यातून रक्त डोकावू लागलं. पण तोवर तानाजीच्या भाल्याचा फाळ वाघाच्या छताडात घुसून आरपार झाला होता. भळभळ रक्त वाहू लागलं होत अन ते अजस्त्र धुड जमिनीवर निपचित पडलं होतं. तानाजीलाही वाघाच्या पंजाचा वार झाला होता. येसाजी अन कोंडाजीने धावत जाऊन शिवबाला उचलले. तानाजीने पुन्हा दोन तीन वेळा भाला वाघाच्या पोटात खुपसून खात्री केली.

शिवबाने मागून तानाजीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला,

"शाब्बास ताना ssss, आज तुझ्यामुळे आम्ही बचावलो."

तानाजी चटकन म्हणाला, "राजं.. ह्यो ताना एकदाच काय शंभर डाव तुमच्यासाठी मराय तयार हाय."

शिवबाच्या डोळ्यांत अश्रू दाटले अन त्याने तानाजीला मिठी मारली. मावळ्यांनी शिवबाला उचलून गावात नेले. त्या वाघाला उचलण्यासाठी चार पाच माणसं लागली. जखम खूप खोल नव्हती. वैद्यांनी झाड पाल्याचा लेप लावुन जखम बांधुन घेतली. सगळीकडे शिवबा राजेंचा जयजयकार चालू होता. शिवबाराजेंनी वाघ मारला म्हणून सगळीकडे एकच बोभाटा झाला. जो तो मेलेल्या वाघाला बघायला गर्दी करू लागला होता.

वाघाचं धुड घोड्यावर लादून, थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा शिवबाचं अश्वद्ल पुण्याच्या दिशेने दौडू लागलं. सगळेच आनंदात होते, पण शिवबाच्या मनात फक्त एकच भितीयुक्त विचार घोळत होता,

"हे आऊसाहेबांना कळलं तर????"

*****

राजांच्या डोळ्यांत अश्रूनी दाटी केली होती. गड आला होता पण राजांचा सिंहासारखा तानाजी गेला होता. खूप वाटत होत की आत्ता हा तानाजी इथे समोर येऊन म्हणेल,

"राजं.. ह्यो बगा ssss.. ह्यो घेतला म्या कोंढाणा ..."

समोर येऊन राजे तानाजीला कडकडून मिठी मारतील अन राजे अभिमानाने तानाजीच्या दोन्ही खांद्यांवर हात ठवून म्हणतील,

"वाह ताना वाह ssss

शाब्बास रे बहाद्दरा ....

पण ताना कुठाय ssss ..?

कुठाय माझा ताना ssss ..

पालखीचा मान मिळवून स्वतः पालखीत राजासारखा चिरविश्रांती घेतोय."

आऊसाहेबांचे बोल राजांच्या कानात घुमत होते,

'ज्या पालखीला स्वतः राजा खांदा देतो आत बसणारा आपोआप राजाच होऊन जातो.'

'आऊसाब ssss..अहो मी कसला राजा ..

जौहरच्या वेढ्यातून आम्हाला सहीसलामत बाहेर काढणारा फुलाजी ..

घोडखिंड अडवून आमच्या जीवाचं रक्षण करणारा बाजी ..

पुरंदरच्या तहात गड पडू नये म्हणून छातीचा कोट करून धारातीर्थी पडलेला मुरारबाजी ..

आमच्या राजनीतीसाठी आदिलशाही मोगली सरदारांना जाऊन मिळणारा नेताजी ..

अन आता पोराचं लग्न सोडून आमच्या इच्छेखातर हा कोंढाणा घेणारा तानाजी ..

जीवाला जीव देणारी ही माणसंच खरी राजा ..

आम्ही काय कुणाच्या पालखीला खांदा देऊन त्याला राजा करणार ..

राजा तर ती आपल्या कतृत्वानं, धैर्यानं, शौर्यानं झाली'

राजगडावर कोंढाणा घेतल्याची खबर गेली होती पण तानाजीची खबर अजून पोहोचली नव्हती. बालपणापासूनचा सवंगडी गमावून, उरात दुःखाची आणखी एक सल घेऊन, मनात खोल खोल जखम घेऊन राजे राजगडाकडे दौडत होते. आजही राजांच्या मनात हाच विचार होता,

'आऊसाहेबांनी जर विचारलं की, कुठाय ताना?? काय उत्तर द्यावं, काय सांगावं, कसं सांगावं??'

समाप्त

========

जय जिजाऊ

जय शिवराय

जय शंभूराजे

========


( संदर्भ - श्रीमानयोगी - रणजित देसाई, राजा शिवछत्रपती - बाबा साहेब पुरंदरे, गड आला पण सिंह गेला - ह. ना. आपटे, शिवरायांच्या स्फूर्तिकथा - शांताराम कर्णिक)


- ईश्वर त्रिम्बकराव आगम

वडगांव निंबाळकर, बारामती, पुणे.

भ्रमणध्वनी - ९१ ९७६६९६४३९८

Rate & Review

M J

M J 3 years ago

Vijay More

Vijay More 4 years ago

Share