Jayanta - 5 - Last part books and stories free download online pdf in Marathi

जयंता - 5 - Last part

जयंता

पांडुरंग सदाशिव साने.

५. कलिंगडाच्या साली

मी तेव्हा मुंबईस होतो. आणि ते उन्हाळ्याचे दिवस. रात्रभर मला झोप आली नव्हती. जेथे राहत होतो तेथे ना वारा ना काही. मुंबईत राहणे महाकर्म कठीण असे वाटले. मला नेहमी उघड्यावर राहावयाची सवय. परंतु मुंबईत मी उघड्यावर कोठे झोपणार ? परंतु मी जथे होतो. तेथे झोपायला जागा तरी होती. माझ्यासमोर ती लाखो माणसे आली, जी एकेका खोलीत डझनावेरी राहतात. त्यांची काय दशा असेल ? फुटपाथवर ती झोपतात. परंतु पावसाळ्यात काय करीत असतील ? कधी त्यांना राहायला नीट चाळी मिळतील ? रात्रभर या विचारातच मी होतो. पहाटे जरा डोळा लागला. परंतु लवकर उठलो. एका मित्राला अगदी उजाडत भेटायला जायचे होते. उठणे भाग होते आणि चाळीतील हालचालींमुळेही लागलेला डोळा लगेच उघडला. शहरात केव्हाच रहदारी सुरु होती. बाराएकला मिलमधील कामगार सुटतात. शेवटची ट्रॅम मुंबईला एक वाजता परतते. ती दोन-तीन तासांनी पुन्हा सुरु. लोकल गाड्या तीनपासून पुन्हा सुरु. दूधवाले भय्ये तीनसाडेतीनपासून स्टेशनांवरुन दिसू लागतात. आणि पाण्याचे होते तेव्हा दुर्भिक्ष्य. उन्हाळ्यामुळे पाणी कमी. पहाटे तीनसाडेतीन पासूनच मायबहिणी उठायच्या. नळावर भांड्यांचे आवाज. धुण्यांचे आवाज. परीक्षा जवळ आल्या होत्या. मुलेही लवकर उठून वाचू लागली होती. मी तेथे गॅलरीत कसा झोपणार ? सर्वत्र कर्ममय जागृतू असता मी का लोळत राहू ? मीही उठलो. थोड्या वेळाने मित्राची भेट घ्यायला बाहेर पडलो.

मला ग्रॅंटरोडच्या बाजूला जायचे होते. दादरला गाडीत बसलो. वसईहून आलेली मंडळी अजून बाकांवर झोपलेली होती. लोक त्यांना उठवीत होते. ते जांभया देत उठत होते. मी बाजूला बसलो. काय हे जीवन, असे मनात येई. कृत्रिम, अनैसर्गिक जीवन. दूधवाले भय्ये केव्हा उठत असतील ? ते कष्ट त्यांनीच काढावे. आणि दिवसा तेथेच गुरांजवळ चा-यावर झोपताना मी त्यांना पाहिले आहे. त्यांना कोणी उठवू लागले म्हणजे वाईट वाटे. परंतु सर्वांचीच धावपळ. कोणी कोणास दोष द्यावा ?

ग्रॅंटरोड आले. मी पटकन उतरलो. आता चांगले उजाडले होते. मी झपझप चाललो होतो. तो एक कुरुप दृश्य मला दिसले. मी काय पाहिले ? झाडूवाले लांब केरसुण्यांनी कचरा गोळा करीत होते. झाडूवाल्या मायबहिणी गोळा केलेला कचरा टोपल्यांनी एकत्र करीत होत्या. वास्तविक ठायीठायी खांबांना कचरापेट्या आहेत. परंतु त्यात कपटे. कचरा, साले टाकायची आपल्या लोकांस अजून सवय नाही. सुशिक्षीत माणसेही खिडकीतून खाली साली फेकतात, फुटलेल्या काचा खळकन् फेकतात. सार्वजनिक नीतीचा सद्गुणच नाही. आगगाडीत तेथेच शेंगा खाऊन साले टाकतील. संत्री खाऊन घाण करतील. तेथेच थुंकतील. सिगरेटची थोटके टाकतील. खिशांतील कागद फाडून फेकतील. स्वच्छ डबा घाण करुन ठेवतात. आणि रस्त्यावरची घाण तर विचारुच नका. सार्वजनिक स्वच्छता हे राष्ट्र कधी शिकणार ?

उन्हाळ्याचे दिवस खानदेशातील फळांची मला आठवण येई. तिकडील नद्यांच्या पात्रांत उन्हाळ्याची फळे अपार होतात. टरबुजे, खरबुजे, साखरपेट्या, गुळभेल्या, नाना फळे. मुंबईलाही ती येतात. कलिंगडाच्या राशी मुंबईत ठायीठायी दिसत. फुटपाथवर कलिंगडवाले बसतात. खांपी करुन ठेवलेल्या, येणारे-जाणारे घेत आहेत. खाऊन साली फेकीत आहेत. असे सकाळपासून शेवटचा सिनेमा सुटेपर्यंत चालायचेच. तो लाल थंडगार गर ! कलिंगडे कापून देणारे जवळ एक भांडे ठेवतात, त्यात कापताना पडणारा रस साठवतात. ते सरही कोणी रसिक पितात ! लालसर सुंदर रस. कलिंगड अद्भुत वस्तू. फुलेफळे ही एक थोर सृष्टी आहे. कलिंगडाचा तो लाल रंग किती सुंदर दिसतो ! आणि मधून डोकावणा-या त्या काळ्या बिया. त्या वाळूतून एवढी माधुरी प्रकट होते. हे रंग, हे रस नद्यांच्या वाळवंटांतून मिळतात. गंमत वाटते नेहमी मला.

ते झाडूवाले कलिंगडांच्या सालीची घाण गोळा करीत होते. स्वस्तिक सिनेमाजवळची ती जागा. रात्रभर फोडी भरभर खाऊन साली फेकलेल्या आणि त्या साली नीट कोण खातो ? सारीच घाई. पटपट वरचा लाल भाग खाऊन, कुरतडून साली फेकलेल्या होत्या. गोळा केलेल्या त्या फोडींजवळ, त्या कच-याजवळ ती पाहा दोन-चार मुले धावत आली. काय पाहिजे त्यांना ? त्या सालींकडे ती पाहत आहेत. त्यांचा का काही खेळ आहे ? परंतु ती पाहा, एक फोड एका मुलाने उचलली. ते अर्धवट उरलेले लाल लाल तो भराभर खाऊ लागला. आणि ती सारी मुले घसरली. ज्या फोडीला थोडेअधिक लाल शिल्लक असेल तिच्यासाठी झोंबाझोंबी, मारामारी. त्या साली लवकर कच-याच्या मोटारीत फेकल्या जातील म्हणून मुलांना घाई. एकीकडे खात असता दुस-या फोडींवर त्यांचे डोळे आशेने खिळलेले असत. त्या फोडी भराभर खाण्यासाठी त्यांचे दात शिवशिवले जणू असत.

मी ते दृश्य पाहत होतो. त्या मुलांना ताजी फोड कोण देणार ? आणि एक दिवस कोणी देईल. रोज कोण देणार ? सकाळ केव्हा होते आणि फार गर्दी ठायीठायी दिसू लागण्यापूर्वी त्या फोडी जाऊन केव्हा खातो असे त्या मुलांना होत असेल. काय ही दशा ! परंतु देशभर अशी दृश्ये ठायीठायी दिसत असतील. आंब्यांच्या साली, कोयी रस्त्यावर टाकलेल्या चूंफताना मी मुलांना पाहिले आहे. उकिरड्यावर टाकलेले अन्नाचे तुकडे गोळा करुन ते खाताना किती तरी जणांना मी पाहिले आहे. ही मुले का त्याला अपवाद होती !

माझे पाय पुढे जाईनात. घाणीतल्या त्या साली. मी का त्या मुलांना स्वच्छतेवर प्रवचन देऊ ? असे खाऊ नये. घाणीतील त्या साली आजूबाजूला थुंकलेले, झाडूने गोळा केलेल्या नका खाऊ. असे का त्यांना सांगू ? मी त्यांना स्वच्छता शिकवू जाणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याप्रमाणे झाले असते.

उन्हाळ्याचे दिवस ! दिवसभर ती मुले कलिंगडाच्या फो़डींकडे आशाळभूत नजरेने बघत असतील. हजारो लोक खाताहेत. आणि आपणाला ? ती गरिब मुले होती. कुठे होते त्यांचे आईबाप, कुठली ती राहणारी ? ना त्यांना शिक्षण, ना संस्कार. कधी कुठे मजुरी करतात, आणा अर्धाआणा मिळवितात. अधिक मागतील तर थप्पड खातात. मी त्यांच्याकडे बघत होतो. अंगावर चिंध्या केस वाढलेले. कुठला साबण, कुठून तेल ? कुठे स्नान, कुठे भोजन ?

एका मुंबईत अशी हजारो मुले आहेत म्हणतात. जी कुठे तरी राहतात, कुठे तरी पडतात. मानवतेची ही विटंबना कशी थांबायची ?

मी माझ्या मित्राकडे जाणे विसरलो. मी विचारमग्न होतो. तसाच चौपाटीकडे वळलो नि समुद्राच्या किनारी जाऊन बसलो. समुद्र उचंबळत होता. माझे लक्ष त्याच्याक़डे होते. माझ्या मनातही शत विचार उसळले होते. एकाएकी लोकमान्यांच्या पुतळ्याकडे लक्ष गेले. स्वराज्यासाठी तो महापुरुष झगडला. कुठे आहे ते स्वराज्य ? सर्वांचे संसार सुखी करणारे स्वराज्य ? ज्या स्वराज्यात अशा मुलाबाळांसाठी बालगृहे असतील, जेथे त्यांची जीवने फुलविली जातील, जेथे त्यांचा स्वाभिमान जागा होईल, अशी स्थिती कधी येईल ? असे स्वराज्य आणणे म्हणजे समाजवाद आणणे. समाजवादाची, सर्वांच्या विकासाची दृष्टी आल्याशिवाय समाजाचा कायापालट व्हायचा नाही ! मी लोकमान्यांच्या पुतळ्याला प्रणाम केला. ते स्वराज्य लवकर येवो, असे मनात म्हणून निघून गेलो.

***