Me aek Ardhvatraav - 16 books and stories free download online pdf in Marathi

मी एक अर्धवटराव - 16

१६) मी एक अर्धवटराव!
सकाळचे सव्वासात वाजत होते. मी लवकरच उठलो होतो. मी फेसबुक, व्हाटस्अप यावरील संदेश आणि चित्रांचे मनापासून अवलोकन करीत होतो. उलट टपाली संदेशही पाठवत होतो. डोळे, मन, शरीर जरी भ्रमणध्वनीवर खिळून होते तरी कान मात्र एका विशिष्ट आवाजावर लक्ष देऊन होते. तितक्यात मला अपेक्षित असलेला आवाज आला,
"अहो, ऐकलत का?" त्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. मी भानावर येत पुटपुटलो,
'चला. बस करा. महाराज, बुलावा आया है। उठा...'असे म्हणत मी भ्रमणध्वनी टप्प्या-टप्प्याने बंद करीत असताना पुन्हा आवाज आला. मला एक कळत नाही. माझ्या बायकोला एक गोष्ट केव्हाच का कळत नसावी की, शयनगृहातून किंवा स्वयंपाक घरातून दिलेला आवाज बैठकीत किंवा दुसऱ्या खोलीत पोहोचायला थोडा वेळ तरी लागतो ना पण तेवढा वेळ वाट पाहण्याची तयारी नसते. पहिला आवाज कानावर पडत असतानाच पुन्हा लगेचच आवाज येणार.
"अहो, येताय ना? काय करता? कधीही आवाज द्या, पटकन येणारच नाहीत..." बघा. आला की नाही पाठोपाठ दुसराआवाज? यावेळी बोल चढत्या सुरात होते. मी लगबगीने उठून शयनगृहाचे दार उघडून आत शिरताक्षणी आवाज आला,
"तिथल्या औषधांच्या बाटल्या द्या..." बायको सांगत असताना म्हणण्यापेक्षा सरळसरळ आदेश देत होती. मी शेजारच्या सौंदर्य (ड्रेसिंग) टेबलावर ठेवलेली बाटली उचलत असताना आवाज आला,
"किती वेळा सांगितलय की, बाहेर जाताना बेडरूमचे दार उघडे ठेवत जा. बैठकीतले घड्याळ दिसत नसल्याने किती वाजले ते समजत नाही. मग उठायला उशीर होतो आणि सारी कामे खोळंबतात." असे बायको म्हणत असताना तिने पसरलेल्या हातावर बाटली ठेवून मी परतू लागलो. आणि काही दिवसांपूर्वी सौभाग्यवतीने सकाळी सकाळी केलेले याच विषयावरील प्रवचन मला आठवले...
त्यादिवशी नेहमीप्रमाणे मी सौ'च्या आधी उठलो होतो. बाहेर जाताना शयनगृहाचे दार लावायला विसरलो आणि बाहेर येऊन मी माझी कामे करीत असताना सौ. आतून ओरडली,
"काहीच काम नसते तुम्हाला पण उगीच लवकर उठता आणि जाताना दार सताड उघडे टाकून जाता. बरे, बाहेर तरी शांत बसता का तर नाही. काही तरी खुडखुड करीत राहता. त्या आवाजाने झोप मोडते. दिवसभर कामाचे डोंगर आवरताना पाठ कशी ती टेकवायला मिळत नाही. तुमचे काय दिवसातून तीन-तीन वेळा झोपा काढता. बाहेर जाताना बेडरूमचे दार बंद करीत जा. पहाटे पहाटेच चार क्षणाची सुखाची झोप घेऊ देत जा..."
मी बैठकीत पोहचत नाही तोच पाठीवर शब्द आले नि मी वास्तवात परतलो. सौ. म्हणाली,
"अहो, हे काय? फक्त डोळ्याचे औषध दिले? कानाचे औषध कधी देणार? एवढी काय गडबड असते हो? साधे काम धड पूर्ण करीत नाहीत. मोबाईलचं डबडं तोंडासमोर ठेवले की झाले..." ती तशी कोकलत असताना मी पुन्हा आत गेलो. भ्रमणध्वनीवर एका समूहात आलेला संदेश वाचत मी टेबलावरची बाटली उचलून तिच्या हातात दिली आणि त्याच अवस्थेत निघालो असताना प्रिय पत्नी कडाडली,
"अहो, हे काय? कशाची बाटली दिलीत? ही लिपस्टिक काय कानाला फासू काय? अशी महत्त्वाची कामे तरी जरा लक्ष लावून करीत जा. तरी बरे, फक्त हातात द्यायचे काम तेवढे सांगते. माझी मीच औषधी घेते. नाही तर तुम्हाला पोटदुखीची गोळी मागितली तर द्याल डोकेदुखीची गोळी.अशी कशी अर्धवट कामे करता हो. त्यादिवशी तोंडाला लावायची पावडर द्या म्हटलं तर दिलं झुरळ मारायचं पावडर! मी ते पाहता तोंडाला फासले असते तर? तुम्ही माझ्या तापातून सुटला असता आणि माझीही सुटका झाली असती. नुसता ताप आहे डोक्याला..." तिच्या तोंडाचा पट्टा चालू असताना तिने रागारागाने जमिनीवर फेकलेली लिपस्टिक उचलून मी टेबलावर ठेवली. तिथेच असलेली दुसरी बाटली उचलून त्यावरील 'ear drop' हे नाव तीनतीनदा वाचून तिच्या हातावर ठेवली. एखाद्या गुन्हेगाराने जमानत होताच पोलिसाच्या नजरेपासून दूर व्हावे अशाप्रकारे मी बाहेर पडलो. तोपर्यंत वर्तमानपत्र आली होती. ती उचलून मी त्यात तोंड घातले...
काही क्षणातच आमच्या अर्धांगिनी बाहेर आल्या. चूळ भरण्यासाठी न्हाणीत जाताना कडाडली,
"ठेवलात ना संडासातला लाईट चालू? स्वतः असा गोंधळ घालायचा नि मग बील जास्त आले की, आपणच शिमगा करायचा. लाईटचा खटका बंद करायला असे कितीसे कष्ट लागतात हो? पण तेवढेही श्रम करायला जीवावर येते तुमच्या. सवय कशी जाणार..."
"कुत्र्याचे शेपूट वाकडे असे म्हणायचे का तुला?" मी वातावरणात हसू पेरावे म्हणून विचारले.
"वरती हे असे खिजवायचे. स्वतःला काय समजायचे ते समजा. तसे घाणेरडे शब्द वापरून मी माझी जीभ कशाला विटाळून घेऊ." असे म्हणत ती स्वयंपाक घरात निघून गेली. मला वाटले, बरे झाले. शांतता मिळेल पण कसचे काय? काही वेळातच ती तावातावाने परत आली. तिचा तो अवतार बघून मी समजलो की आपल्या हातून काही तरी बिघडले आहे. तिकडून जणू तोफेचा गोळा यावा तसा प्रश्न आला,
"चहा झाला ना तुमचा?"
"तर मग? तुला माहिती आहे की, सकाळी चहा लवकर घेतल्या शिवाय मला..."
"प्रेशर येत नाही. वर्षानुवर्षे तेच ऐकताना कान तर किट्ट झाले पण मलाच आता तुमच्या कामाचे प्रेशर येते त्याचे काय? तुमचे चहा करणे ह्याच गोष्टीचे मला दररोज सकाळी प्रचंड टेंशन येते."
"ते कसे काय? मी लवकर उठतो. मी माझा चहा करून घेतो..."
"हे असे साळसूदपणे सांगायचे. चहा करता हो पण त्या पसाऱ्याचे काय? सारे कसे अस्ताव्यस्त पडते त्याचे काय? साखर-पत्तीचे डब्बे, दुधाचे पातेले उघडेच टाकता. लहान मुलीने भातुकलीचा डाव मांडावा तसे मांडून ठेवता. बघा साखरेचा डबा कसा मुंग्यांनी गच्च भरलाय तो. शिवाय गाळणीतील पत्ता अर्धी बेसीनमध्ये तर उरलेली पत्ती ओट्यावर फेकलीत. एकच काम नसते हो. त्यापेक्षा चहा मीच करुन दिलेला परवडेल. शिवाय माझा चहा मीच करून घेतो की ही दर्पोक्ती तरी ऐकावी लागणार नाही."
"त्यादिवशी तुलाही मी स्पेशल चहा करुन दिला..."
"हो ना. दिला की. साखर टाकण्याचे सोडून चक्क रांगोळीचे पीठ टाकत होता. माझे वेळेवर लक्ष गेले म्हणून बरे नाही तर रांगोळीच्या पिठाचा चहा प्यायला मिळाला असता. सकाळी उठल्यापासून तुमची अर्धवट कामे आवरताना जीव मेटाकुटीला येतो हो. एक ना धड भाराभर चिंध्या!"
"अग, चहावरून आठवले. गेली अनेक वर्षे मी आपल्या दोघांसाठी नियमितपणे सकाळचा चहा करतो. एखादे दिवशी तू करीत असशील तो भाग निराळा. मला एक आठवण करून द्यायची आहे की, त्यादिवशी मला उठायला थोडा उशीर झाला होता. डोळे चोळत मी घड्याळाकडे पाहिले तर आठ वाजत होते. तस्साच उठलो. गडबडीत दात घासतच दोघांसाठी चहा ठेवला. उकळलेला चहा दोन कपात ओतून घेतला आणि तुझा शोध घ्यायला सुरुवात केली. इथे तिथे शोधताना लक्षात आले की, अरे, तू तर गावाला गेलीस हे मी चक्क विसरूनच गेलो. तुझ्या भाषेत हा अर्धवटपणा, बावळटपणा असेल पण मला एक समजत नाही तो प्रकार तुझ्या प्रेमापोटी घडला की तुझ्या भीतीपोटी..."
"प्रेम नाही की भीती नाही. वेंधळेपणा आहे नुसता. खूप झाले आता चहापुराण! जा. पाणी तापवायचे भांडे घेऊन या. आणि हो पाण्याने भरून आणा. नाही तर रिकामे भांडे आणून आदळाल माझ्या डोक्यावर..."
"ओके बॉस!..." असे म्हणत मी उठलो
"व्वा! कुणी ऐकले तर म्हणेल कित्ती आज्ञाधारक नवरा आहे."
"आहेच मग. गाढवाला गुळाची चव..."
"म्हणजे मी गाढव? सरळसरळ म्हणा ना. म्हणीचा आधार घेता कशाला? तेवढेच ऐकायचे राहिले होते ग बाई! चांगले पांग फेडलेतहो माझ्या सहनशीलतेचे. काय पण सोंग गळ्यात..."
"सोंग नाही ग... अर्धवटराव..." मी पटकन म्हणालो तशी सौभाग्यवती खळखळून हसली आणि सारा ताण निवळला...
@ नागेश सू. शेवाळकर