Pritichi Premkatha - 12 books and stories free download online pdf in Marathi

प्रीतीची 'प्रेम'कथा - 12

१२

जगदाळे..

अर्थात

कांदेपोहे!

घरी आली तर आई वाटच बघितल्यासारखी उभी होती. म्हणाली, "बरं झाले बाई तू आलीस. तुझीच वाट पाहात होते."

"जेवायला?"

"नाही. तुझ्या तात्यांचा फोन होता. कुणीतरी येणार आहेत पाहुणे."

"हुं.. परत कुणी लेखक असेल. खाईल श्रीखंड पुरी आणि होईल बेपत्ता!"

मी प्रेमवरचा राग असा काढेन असे मलाही वाटले नव्हते! पण तो आपोआप निघाला!

"पण आई येणार आहे कोण?"

"अगं कुणी आहेत पाव्हणे. तुला बघायला येणार आहेत."

"मला? आणि बघायला? मी काय शोकेसमधली बाहुली आहे?"

"अगं, तुझ्या वयातल्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या आणि तुझा कशाचाच पत्ता नाही!"

आहे! पत्ता आहे! आणि माझ्याजवळ त्याचा पत्ताही आहे! हे सारे मनातल्या मनातच. मी बाहेर पडायची संधी शोधत होती आणि आईची बडबड सुरूच होती!

"तुझ्या वयातल्या पोरींना दोन दोन पोरं झाली आणि तू अजून मागेच!"

हे खरेय.. मी आहेच मागे.. माझ्या प्रेमच्या! माझा प्रेम? अजून कशाचा पत्ता नाही. नसो! पण सकारात्मक विचार! माझा आणि माझाच तो! अर्थातच मनातल्या मनाचे म्हणजे अंतर्मनातले विचार! आता बाहेर पडते. ते गाणेय ना.. आपके पहलू में आके रो दिए! पहलू म्हणजे काय? कोणास ठाऊक. पण तिकडे जाऊन रो दिए! नाही. मी नाही रडणार! आणि मला आता मरून ड्रेस घालायला हवा! मी आत जाणार तर आई म्हणाली, "साडीच नेस मने. पोहे भिजवून ठेव नंतर. कांदे चिरून ठेवू नाहीतर ऐनवेळी डोळ्यांत पाणी येईल."

"मी नाही कुणाला बघणार नि दाखवून घेणार!"

हे मी प्रकट म्हणायला नि आई पुढचे वाक्य बोलायला एकच गाठ पडली!..

"अगं जळगावहून यायचेत पाहुणे. मोठा मुलगा त्यांचा. कुणी जगदाळे आहेत!"

जगदाळे! मी रणांगणात सारी शस्त्रे खाली टाकून अर्जुनाने उभे रहावे तशी उभी राहिली. जळगाव.. जगदाळे.. भिंगारदिवे.. आणि आज त्यांच्याबरोबर तात्या! काही साखळी जरूर जोडली जात होती. म्हणजे हा जगदाळे तो जगदाळे तर नव्हे? नाहीतर एकाएकी त्या भिंगारदिव्यास जळगाव कुठून सुचले असते? असणार. असेल माझा हरी.. तर देईल खाटल्यावरी! अगदी होम डिलिव्हरीने येणार माझा प्रेम! असले योगायोग तर हिंदी सिनेमात पण नाही होत! मरून ड्रेसचे नुसते नाव काढताच नशीब फळले की काय माझे? असणार. स्वामींची कृपा आणि काय!

आता मी बाहेर जायचे विसरून मनापासून तयारीला लागली. कांदेपोहे बनवायचा पहिलाच प्रसंग हा! म्हणजे अशा कामासाठी. आधी कांदे चिरून ठेवू. आई म्हणते ते खोटे नाही काही. कां शेवटच्या क्षणी डोळ्यांत दाटून यावे पाणी? वा! अशा ओळी सुचतात.. कविता सुचायला लागलीय.. म्हणजे काही संकेत चांगलाच दिसतोय. मनही मन में लड्डू फुटे म्हणजे काय ते मला आता समजत होते. पण जुन्या पुस्तकात असते तसे माझे दुसरे मन एकाएकी समोर येऊन म्हणायला लागले, 'प्रीती, थांब. एकतर हा तोच आहे हे तुला ठाऊक नाही. एकाच नावाचे दोन काय शंभर निघू शकतात! आणि तो आला की त्याने पसंत करावे असा नियम नाही. आणि अशा ठरवून लग्नात आपल्याला स्कोप कमीच. त्याने नाहीच म्हटले तर? पुढचा मार्गच बंद!' पण पहिले मन लगेच म्हणाले, 'पण अशा परिस्थितीत दुसरा रस्ता तरी आहे का तुला? त्यापेक्षा आहे त्याचा फायदा घे. कुणी सांगावे.. हा तोच असेल. दैवी संकेत वेगळे असतात नि तुझ्या सकारात्मक विचारांचे फळ मिळणारच एक दिवस तुला!'

अशा दोन मनांच्या द्वंद्वात अडकली मी. आणि समोर नुसता कांदा घेऊन बसली. आई ओरडली, लक्ष कुठेय तुझे, तेव्हा एकाएकी जागी झाली. दोन्ही मनांना त्यांच्या जागी परत पाठवून कामाला लागली. मन लावून चिरले कांदे अगदी जणू मोजून.. एक सेंटीमीटर बाय एक सेंटीमीटर नि मग गेली मी साडी नेसायला.. मरून रंगाची! जे जे होईल ते ते पहावे आणि काय! सकारात्मक स्वामी देतीलही फळ!

तात्या आले दुपारी आणि त्यांच्या बरोबर कोण यावे? तर भिंगारदिवे! बोलता बोलता कळले ते इतके की जगदाळे आजच्या दिवस आहेत इकडे. संध्याकाळी जाण्याआधी नजरेखालून घालावी मुलगी म्हणून येणारेत. सारे घडवून आणलेय ते भिंगारदिव्यांनी! म्हणून आज येणार नव्हते की उशीरा येणार होते की काय भिंदि आॅफिसात? जगदाळे येण्याची वाट पाहत बसले दोघे. बोलण्यात कुठे प्रेमचा विषय निघतो का.. असा विचार करे पर्यंतच भिंदिनी उद्याच्या टीव्हीवरच्या कार्यक्रमाचा विषय काढला आणि मी कान टवकारले! अधिक काही माहिती मिळते का ते ऐकायला! पण स्वत:बद्दल झाले तेवढेच सांगत होता भिंदि! त्यात प्रेमच्या मुलाखतीचा उल्लेखही नाही! फक्त त्या तुंबाऱ्याची गोष्ट बद्दल दोन शब्द! तात्याही म्हणाले, आमच्या प्रीतीने वाचलेय ते पुस्तक. आवडले तिला. पुढे काही बोलणार ते तोच जगदाळे आत शिरले!

जगदाळे बसले. आता साठीतला कोणी आणि ऐन तारूण्यातला कोणी सख्खा मुलगा.. कितपत साम्य त्यांच्यातले ध्यानी येणार? त्यामुळे माझ्या आठवणीतला काही आठवड्यांपूर्वी पाहिलेला प्रेम आणि हे जगदाळे यांच्यात कुठल्या कोनातून साम्य आहे का हे पाहण्याचा माझा प्रयत्न फसला. तिघांच्या गप्पा सुरू झाल्या. माझे नसलेले गुण वर्णन करून झाले.. तात्या म्हणाले, "ही प्रीती आमची. एकुलती एक. स्वयंपाकात नंबर वन. बीएला क्लास थोडक्यात चुकला. शिवण टिपणात तरबेज.. आणि गाते सुद्धा छान!"

आजवर बाथरूम सोडून कुठेच गायलेली नाही मी. आणि शिवण म्हणजे दोनचार टाके घालणे! आजचे पोहे पण केलेले आईनेच .. म्हणजे माझ्या सुगरणपणाचा अंदाज यावा! तरी हे असे सांगावे लागतेच! जगदाळेंचा मुलगा मुंबईत असतो. आता त्यांना एकूण मुले किती आणि हा मुंबईतला लेखक प्रेम तो तोच की नाही .. याबाबतीत काहीच माहिती मिळायला तयार नाही! आणि जगदाळे म्हणे असेच आलेले.. म्हणजे तयारीने नाहीत.. त्यामुळे मुलाचा ना फोटो ना गुणवर्णन! फोटो ठीक, नसेल त्यांच्याकडे. पण मुलाचे सत्य नि काल्पनिक गुणही नसावेत ठाऊक? की मुलाचे मुलगा असणेच पुरेसे? तात्यांनी कसा इतक्या शाॅर्ट नोटिसवर माझा बायोडेटा बनवला! बनवाबनवीसाठी बनावट बायोडेटाच बनवावा! नाहीतर सर्वगुणसंपन्न, गुणांची पुतळी नसेल तर कुठून खपणार मुली लग्नाच्या बाजारात?

सगळे बसलेले हातात पोह्यांच्या प्लेटी घेऊन आणि तितक्यात दरवाजावरची घंटी वाजली. तात्या झटकन् उठले दरवाजा उघडायला तर समोर उभी कालिंदी!

"प्रीती आहे का? माझी एक गोष्ट राहिलीय तिच्याकडे!"

तिचा आवाज ऐकून माझे काळजाचे ठोके चुकले. पटकन मी पुढे आली. दरवाजाबाहेर जात तिला हळूच म्हणाली, "तुला यायला हीच वेळ मिळाली की काय? पटकन जा.. मग फोन कर!"

ती आ वासून बघेतोवर मी आत येऊन दरवाजा बंद केला. अशा वेळी तोंडावर साळसूदपणाचे भाव आणायला बऱ्यापैकी ॲक्टिंग येत असायला हवी. पण त्या भिंदिने त्याच आपले तोंड उघडलेच!

"ती मुलगी? बरं का घोरपडे.. तीच आली होती आज रेकॉर्डिंगला. मला आवाज पक्का ओळखू येतो!"

"आमच्या मनीची मैत्रीण हो. काॅलेजची. का गं कशाला आली होती?"

"काही नाही उद्या तिला काहीतरी हवे ते सांगायला! नंतर बोलते मी!"

पोहे खाऊन जगदाळे गेले. नि भिंदि त्यांना सोडायला. तसे नाही म्हणायला भिंदिशी माझे थोडेसे झाले बोलणे. फक्त एकदाच भिंदि म्हणाला, "घोरपडे, तुमच्या मुलीचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो!"

मला वाटले तात्या म्हणतील, 'हो ना, रेडिओवर एकदा झाला होता गाण्याचा कार्यक्रम तिचा!' नशीब इतकेही कल्पनाशक्तीस नाही ताणले त्यांनी! पण बिन बुरख्यातल्या माझे बुरख्यातल्या माझ्याशी साम्य त्याला कसे लक्षात येणार होते?

थोडक्यात काय, मुलगी बघण्याचा पहिलावहिला कार्यक्रम पार पडला. सगळे निघून गेले तोवर संध्याकाळ झालेली. आता त्या प्रेमच्या मागावर आता जाण्यात अर्थ नव्हता. त्यापेक्षा जे झाले त्याच्यावर नीट विचार करावा! किंवा नुसतेच पडून राहावे! पण आई तसे करू देईल तर ना. थोड्याच वेळात ती ओरडलीच, "मने, स्वयंपाकखोली आवरून घे. उद्या लग्न होऊन गेलीस तर सासू म्हणेल, माहेरी आईने काहीच शिकवले नाही की काय? उगाच माझा उद्धार!"

सासू! ही या लग्नाच्या पॅकेज डील मध्ये मिळतेच वाटते! मी लगोलग लागली कामाला. तसा विचार तर काम करतानाही करता येतोच हो की नाही? तर एकीकडे हात चालवत होती तर दुसरीकडे डोके.

आज काय घडले त्याचा हिशेब मांडायला हवा. झाले ते काय? सकाळी प्रेमचा पत्ता लागला. नि दुपारी कदाचित त्याच्या घरच्यांचा! इतक्यात परत ते दुसरे मन बाहेर येऊन उभे राहिले! 'प्रीती, चुकतेस तू. एखाद्या बापाचा पोरगा लेखक असेल तर तो ते मिरवणारच की लपवून ठेवणार? त्या जगदाळेच्या बोलण्यात त्याचा उल्लेख ही नाही! हा जगदाळे तो जगदाळे नाहीच. उगाच नसती आशा ठेवू नकोस' प्रीती! पहिले मन मात्र उसळून म्हणाले, 'नाही. स्वामी म्हणतात, फक्त सकारात्मक विचार! तर फक्त सकारात्मकच विचार!'

डोक्याने विचार करता करता मी काय करत होते हाताने.. माझेच मला कळत नव्हते. त्या पोह्यांच्या प्लेटी मी बाथरूममध्ये नेऊन ठेवल्या तर कांद्याची साले भांडी घासण्याच्या सिंकात. आई ओरडली, लक्ष कुठेय तुझे गं मनी? मनीच्या मनी काय सुरू होते ते मनी काय सांगणार होती आईला?

रात्री मी थकून पडली अंथरूणात. म्हटले आज फक्त प्रेमगाणीच आठवत पडते. प्रेम आणि गाणे! उद्या सकाळी आॅपरेशन प्रेमचा द्वितीय अध्याय! दिवसा भेटेल तो की गेला असेल कुठे? सकारात्मक .. अर्थातच असेल! मग मी गाईन गाणे.. मैं तेरी तू मेरा.. दुनियासे क्या डरना! किंवा मग तो म्हणेल, तुम आ गए हो.. तो नूर आ गया है! मी लाजून तोंड झाकून घेतले तर तो म्हणेल, घे झाकून मुख ते चंद्रमुखी! मी म्हणेन त्याला, उडे जब जब जुल्फे तेरी.. अय्या! किती खरेय हे गाणे! प्रेम आणि त्याची उडणारी जुल्फे! अशी कितीतरी गाणी मनात आठवत पडली.. मग डोळ्यात झोप दाटून आली तर म्हणाली त्याला, एक बात कहो गर मानो तुम.. सपनों मे न आना जानो तुम.. मग माझा डोळा कसा लागला तेच कळले नाही!

आणि खरे सांगू, त्या बदमाष प्रेमने माझे ऐकलेच नाही.. आणि आलाच स्वप्नात!