Pritichi Premkatha - 17 books and stories free download online pdf in Marathi

प्रीतीची 'प्रेम'कथा - 17

१७

पूर्णानंदाशी भेट

अर्थात

एकच लक्ष्य: प्रेमचे प्रेम!

उगवत्या दिवसाचा उगवता सूर्य कसल्या आयडिया घेऊन येईल? मी रात्रभर विचार करायचा प्रयत्न केलेला. पूर्णानंदास कसे गाठावे? भिंदिच्या नकळत? नि कदाचित त्या जगदाळे काकांच्याही नकळत. माझे डोके चालेना. पण मिलिंदाने काही तरी डोके लढवले असेल रात्रीतून तर.. असेल नाही .. असायलाच हवे.

सकाळी काकुला फोन लावला. ती म्हणाली, "भिऊ नकोस मुली मी तुझ्या पाठीशी आहे."

म्हटले, "नुसती पाठीशी राहून काय फायदा.. मिलिंदाला काही तरकीब सुचली की नाही?"

"अर्थातच .. तो माझा मिलिंदा आहे! तू ये. सांगते. हम करेंगे तुम्हारे आनेका इंतजार.. करो बहन हमपर तुम ऐतबार.. ये लवकर."

मी म्हटले, चला याच्या डोक्यात काही शक्कल निघाली म्हणजे काहीतरी होईलच चांगले.

काकुकडे पोचली तर मिलिंदा म्हणाला, "लवकरच मला त्या पूर्णानंदाचा पूर्ण नंबर मिळेल.. त्याला बोलावून घेऊ.. पूर्ण विश्वासात घेऊ.. पूर्ण काम होईल तुझे!"

"पण नंबर?"

"हुं.. पत्रकारास अशक्य ते काय. रात्रीत चार लोकांना लावले जळगावात कामाला. सगळे जगदाळे शोधले.. मग त्यात तू म्हणालीस तसा अॅग्रो मधे कामाला असणारा जगदाळे शोधला. जैन आणि जैन अॅग्रोत आहे हा पूर्णानंद. तिकडे आ‌ॅफिसात कुणी आले की त्याचा नंबर हातात! अर्ध्या तासात समज!"

हे असे इतके सरळ होईलसे मला स्वप्नातही वाटले नव्हते.

थोड्याच वेळात पूर्णानंदाला फोन गेला. मिलिंदाच बोलला त्याच्याशी, "हॅलो, मी ज्वालाग्राही सर्वदा चॅनेल मधून बोलतोय .. तुमच्या भावाच्या पुस्तकाबद्दल तुमचे चावे म्हणजे बाईट्स घ्यायचे होते.. हो.. तुम्ही लवकर येऊ शकाल तर बरे.. अहो चॅनेलची माणसे आम्ही, सगळीकडे लक्ष ठेऊन दक्ष असतो आम्ही.. येताय ना.. आल्यावर बोलू सविस्तर .. पाठवतो माझा पत्ता .. भेटू.."

मिलिंदाने त्याला मुलाखतीच्या निमित्ताने त्याच्या आॅफिसात बोलावून घेतले. मिलिंदा हुशार आहे. पण कालिंदीने त्याला पटवण्यासाठी केलेल्या युक्त्या त्याला कळल्या नव्हत्या तेव्हा! की कळून सवरून .. म्हणजे प्रेमला पण माझी ही सारी धडपड कळत असेल.. कदाचित .. कोण जाणे. असेल तर छानच!

आता थोड्याच वेळात एक प्राॅब्लेम सुटणार अशा आनंदात मिलिंदा नि मी त्याच्या आॅफिसात पोहोचलो .. पण माझे काम असे सहज झाले तर मला तपस्विनिचा दर्जा कसा मिळाला असता! पार्वतीला तप करायलाच हवे! आम्ही पोहोचलो आणि पाठोपाठ पूर्णानंद येताना दिसला.. एकटा नाही, तर बरोबर त्याच्या होता तोच.. कुंडलीतला शनि.. भिंदि! मिलिंदा त्याला एकटाच ये असे तरी कसे सांगणार होता?

आता काय? मी हळूच आतल्या खोलीत सटकली आणि किलकिल्या दरवाजातून बाहेर काय होते पाहू लागली.

"कॅमेरामन येईतोवर थांबू.."

"कॅमेरामन की वुमन?"

"मन.. वुमननी जाॅब सोडला! त्यांच्यात घरचे कामावर जाऊ देत नाहीत ना.. तुम्ही थांबा.. मी अालोच!"

मिलिंदा आत आला. तो ही गोंधळलेला. भिंदिला कटवावा कसा?

"मी फोन करू भिंदिला? तात्यांनी बोलावले म्हणून सांगते!"

"नको.. आधीच त्याच्याशी खोटे बोलून झालेय बऱ्यापैकी. अजून नको."

"नाहीतर साहित्य दिवे प्रकाशनातूनच फोन करू..?"

"तुझा आवाज ओळखेल तो.."

"मग?"

"आयडिया! मंचरजी!"

एवढे बोलून तो तडक बाहेर गेला. थोड्या वेळात परत आला तर त्याच्या बरोबर एक पारशी गृहस्थ. तोच बाॅस असावा त्याचा. फिरोज मंचरजी. बाहेर येता येता त्याने भिंगारदिव्याला हाक मारली, "अरे भिंगार्दिवा.. तू इकडे कसा साला?"

भिंगारदिवे उठून उभा राहिला.

"अरे चाल नी अंदर. साला केटला साल पछी मारा जानी दोस्त.. चाल चाय पिऊ.. गप्पा मारू."

भिंदि जायला निघाला तसा पूर्णापण निघाला. चहा प्यायला की काय? तसा मंचरजी म्हणाला,

"अरे यंग मॅन, तू बस नी अहियां. ए लोग तुझा इंटरव्ह्यू घेते तोपर्यत, तुजा चाय इथेच पाटवते!"

इंटरव्ह्यू!

भिंदि जाताच मिलिंदा मागे फिरला. पूर्णानंदाला आत बोलावून घेतले त्याने. पूर्णा आत आला.. मला पाहताच म्हणाला, "तुम्ही?"

मिलिंदा त्याच्या कामासाठी निघून गेला. नि

मी त्याला सारे खरे खरे सांगितले. अगदी भिंदिला कसे फसवले प्रेमला भेटण्यासाठी हे सुद्धा आणि आता भिंदिला कटवण्यासाठीच पाठवून दिले हे ही! म्हणजे त्याला माझ्या प्रेमवरील प्रेमाचा अंदाज यावा. त्यावर तो आधी काहीच नाही बोलला. माझे सांगून झाल्यावर म्हणाला, "आता माझे ऐकून घ्या!"

त्याने सांगितलेले ऐकून मी अजूनच उडाले!

काही दिवसांपूर्वी त्याचे ते सीनियर जगदाळे आलेले, ते प्रेमसाठीच! त्यानंतर प्रेम बधत नाही पाहून पूर्णानंदाचा नंबर लावला त्यांनी.

"काही करा. प्रेमला समजावणे कठीण. लग्न म्हटले की तो दूर पळतो. आणि तुम्ही ते करू शकलात तर.. एकतर ते आश्चर्य असेल आणि दुसरे घरी सारे अगदी खुश होतील. तरीही घरी मी तुमच्या या प्रयत्नांबद्दल नाही काही सांगत. आणि मी नकार द्यायला शोधून काढेन काहीतरी कारण! आॅल द बेस्ट! काही मदत लागली तर सांगा. तसा अनुभव नाही मला काही पण तरीही. प्रेम चांगला आहे मनाचा पण जिद्दी आहे. कुणाचेच कधीही ऐकत नाही तो. तो फोन नंबर बदलतो, रहायच्या जागा बदलतो, नोकऱ्या बदलतो.. त्याला जगच बदलायचे म्हणून. त्याला आम्ही अालोत हेही ठाऊक नाहीए. म्हणून तर भिंगारदिवेंकडे राहिलो आहोत. परत एकदा बेस्ट आॅफ लक. त्याची खूप गरज अाहे तुम्हाला. अजून एक.. बाकी काही असले तरी त्याला आवडते ती स्ट्राॅबेरी. महत्त्वाच्या वेळी ती वापरा! तिसऱ्यांदा आॅल द बेस्ट!"

तीनतीनदा हा बेस्ट लक म्हणतोय. आजवर एवढे टेन्शन नव्हते. एक प्रश्न सुटला तरी उत्तीर्ण व्हायला दुसरा सुटायलाच हवा. आजवरचा माझा आत्मविश्वास थोडा डळमळीत व्हायला लागला. तरीही मी उसन्या अवसानात म्हणाली, "तुम्ही म्हणालात ते ठेवते ध्यानात. बघते कसे जमते ते!"

पूर्णानंद निघून गेला. त्याच्याकडून मिळाले ते काय.. फक्त एक स्ट्राॅबेरीची हिंट! बाकी सब अब रामभरोसे! अब तेरा क्या होगा प्रीती?

मिलिंदा परत आला. म्हणाला, "माय बाॅस इज ग्रेट. त्याला पूर्णानंदाची पूर्ण स्टोरी सांगितली तर काम सोडून आनंदाने बाहेर आला."

मग मंचरजीला भेटली मी पण! दिलदार आहे माणूस. "शेवटला ते पेढे खाऊ घाल पोरी.. बायडी बोलते पेढे खाऊन डायबिटीस होतो. मी म्हणते साला माज्याकडे डायाबिटीस कशाला बघते वळून.. लवकर गुड न्यूज दे.. साला ते प्रेम पागल असते काय.. इक्ती चांगली पोर्गी पाठी पडते नि.. एकदा घ्यून ये.. साला ब्रेन वाॅशच करते तेचा! गधेडा साला!"

एक मात्र झाले. सारे अनिश्चिततेचे ढग निघून गेले आता. आता फक्त एकच अनिश्चितता आणि एकच लक्ष्य.. प्रेम आणि प्रेमचे प्रेम! अाता काय नि कसे करायचे ते मलाच बघायला हवे. इथे ती 'प्रेप्रीप्रीबंस' नाही येणार कामी. प्रीतीबाई, कंबर कसून लागा कामाला!