Mala Kahi Sangachany - 19-1 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय...- १९-१

१९. स्मृति

ती एक एक पान बाजूला सारत वाचत होती .... तोच तिला ते अक्षर कुमारचं असल्याचं लक्षात आलं ... तसं समोर आणखी काय लिहिलं असेल ? स्वतःलाच विचारत तिने पान सरकविले ... पानाच्या मधोमध लिहिलं होतं .....


मराठी शायरीकार माननीय भाऊसाहेब वा . वा . पाटणकर यांच्या ओळी आठवल्या , त्यात जरा भर घालून मन मोकळं लिहायला सुरुवात करतो ...


" आजवर इतक्याचसाठी नव्हती आसवं गाळली ।

गाळायची होती अशी , की नसतील कोणी गाळली ।

आसवांच्या या धनाला जाणून मी सांभाळिले ।

आज या विरहाक्षणी यांनीच मला सांभाळिले ।"


जरावेळ विचार करत तिने ते पान बाजूला केलं ... वाचायला लागली ...


तो दिवस मला आजही आठवण आहे ... दहावीचे वर्ष ... मी परीक्षा पास झालो होतो , मला ७५.०० % गुण मिळाले होते ... आतापर्यंत आमच्या वस्तीत कुणालाही इतके टक्के मिळाले नव्हते म्हणून सर्व माझं कौतुक करत होते ... पाठ थोपटून वाहवा करत होते मी स्मित हास्य देत त्यांचा आशीर्वाद घेत होतो ... त्यादिवशी सकाळपासून वेळ कशी निघून गेली कळलं नाही ... मी खूप खुश होतो , दहावी पहिल्याच दणक्यात पास झालो आणि चांगले टक्के मिळाले म्हणून ... घरी सगळ्यांना भेटून झाल्यावर मी माझी आवडती सायकल घेऊन मित्रांना भेटायला निघालो , सायकल चालवत वस्तीतून बाहेर पडलो तर अचानक ती नजरेस पडली ... ती काही वर्ष्याआधी येथे कुटुंबासह राहायला आली होती ... तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून मला तिच्याशी मैत्री करावी अस वाटायचं ... पण कधीच तिच्याशी एका शब्दाने बोलायला जमलं नाही ... रोज तिच्या घरासमोरून जातांनी तिच्या नकळत तिला बघून निघून जायचं असा दिनक्रम सुरु होता , म्हणून रोजच्या सवयीला आहारी जाऊन एक नजर तिला पाहत मी समोर जायला लागलो पण त्यादिवशी तिने स्वतःहून मला हाक दिली . माझं नाव जेव्हा तिने उच्चारले तेव्हा नुसतं माझं नाव तिच्या तोंडून ऐकल्याने अंगावर जणू काही मोरपीस फिरवलं असं वाटलं ... मी जागेवरच सायकल उभी करून खरंच तिने मला हाक दिली याची खात्री करत हळूच मागे वळून पाहिलं तर तोवर ती माझ्या जवळ आली आणि हात समोर करत म्हणाली... " अभिनंदन कुमार , तु दहावी पास झाला त्याबद्दल "


मी इतक्या जवळून तिला पहिल्यांदाच पाहत होतो , जरावेळ भान हरपून तिला तसाच पाहत उभा राहिलो ... मग तिनेच आवाज दिला तेव्हा तिचा हात हाती घेऊन तिला नुसतंच " थँक्स " म्हणालो ...


" माझी आई सांगत होती की तुला ७५ टक्के गुण मिळाले म्हणून .."


त्यावर हसऱ्या चेहऱ्याने मान हलवून मी तिला हो म्हटलं ... आधीच तिला पाहून नेमकं काय आणि कस बोलावं ते सुचत नव्हतं . त्यात इतक्या दिवसापासून मनात तिच्याशी मैत्री करावी अशी इच्छा असून स्वतःहून कधीच बोललो नाही . आज ती अचानक माझ्याशी बोलत आहे हे खरं वाटत नव्हतं . तिने आणखी काही बोलावं अस वाटत होतं ...


" तु जरा घाईत दिसतो ..." ती म्हणाली


काय बोलावं कळलं नाही आणि पुन्हा एकदा " हो " म्हणून मी मनातच चूक झाली असं बडबडलो


" ठीक आहे , पुन्हा एकदा अभिनंदन ..." म्हणत ती घरात जायला लागली तिला थांबवावं अस वाटत होतं पण मी तिला काहीही बोलू शकलो नाही ... मग काय नाईलाजाने हसत सायकल चालवत निघालो , मनात आनंद मावत नव्हता कुणाला एकदाच सांगून टाकतो अस झालं होतं .. काही अंतर समोर जात लगेच सायकल परत मागे फिरवून दुसऱ्या गल्लीतून घरी आलो . सायकल अंगणात उभी करून धावतच त्याला सांगायला निघालो ... तो म्हणजे माझा जिवलग मित्र , तेव्हा माझा सर्वांत जवळचा मित्र होता " कबीर " , माझ्या घरापासून दोन तीन शेत दूर त्याचा निवास होता . दोन्ही बाजूला शेत असल्याने तेथून बैलगाडी जात असे , त्यामुळे मध्ये गवत वाढलेलं आणि दोन सारखे पट्टे असणारा रस्ता तयार झाला होता . मी सुसाट धावत जाऊन त्याच्याजवळ पोहचलो .... आनंदाच्या भरात मी धापा टाकत त्याला हाक दिली ..


" कबीर , कबीर .... आज मी खूप खुश आहे ... मनात मावणार नाही इतका आनंद झाला आज ..."


त्याने जणू इशारा करतच मला विचारले , कशाचा झाला इतका आनंद तुला ?


तो माझा जिवलग मित्र , मी त्याचा इशारा लगेच समजलो आणि त्याला म्हणालो .... " अरे ती माझ्याशी बोलली आज , मला तिने अभिनंदन केलं ... "


तुला कळलं नाही का ? सॉरी , सॉरी ... मी तुला सांगायला विसरलो तिच्या नादात . अरे आज माझा निकाल लागला ना , मी पास झालो म्हणून तिने मला शुभेच्छा दिल्या ... कळलं आता ...


त्याने इशारा करत पुन्हा विचारलं , ती म्हणजे कोण ...?


मी लगेच त्याला म्हणालो , अरे तुला सांगितलं होत ना , एक कुटुंब आलं आहे माझ्या वस्तीत राहायला , त्यांची मुलगी ... जिच्याशी मला मैत्री करायची होती , तुला तिचं नावसुद्धा मी सांगितलं होतं ... तू विसरला वाटतं ... बरं पुन्हा सांगतो , तिचं नाव आहे .... " किर्तीप्रिया " ... हे सगळं त्याला सांगितलं मग कुठे मन जरा शांत झालं , तिचं नाव ओठावर येताच अंगावर रोमांच उभे राहिले ... हृदयाची धडधड अचानक वाढली . कळतं नव्हतं असं का होतं आहे मग मी बाजूलाच त्याला टेकून खाली बसलो . आजूबाजूला माणूस म्हणून कुणी नव्हतं , पाखरांची किलबिल सोडली तर सगळीकडे नीरव शांतता होती ... मी डोळे मिटून तो क्षण पुन्हा पुन्हा आठवून तिचा सहवास अनुभवत होतो ... मध्येच वाऱ्याची झुळूक थंडगार स्पर्श करून जात होती ... कबीर तसाच शांत होता , म्हणूनच तो माझा जिवलग मित्र होता ...


त्याच्याशी माझी अशीच नकळत मैत्री झाली , तेव्हा मी सातवीच्या वर्गात शिकत होतो , सकाळची शाळा होती ... मग शाळा सुटली कि घरी आल्यावर दिवसभर खेळायचं हाच एक छंद होता आणि संध्याकाळी वाचनालयात जाऊन पुस्तक वाचायचं असा काहीसा वेळ मजेत जात होता ... एकदा मी दुपारी शाळेतून घरी आल्यावर शेतात पीक नसल्याने तिथे पतंग उडवीत होतो , मजा येत होती तसा मीही आणखी ढील देत होतो ... पतंग खूप दूर उंचावर गेले आणि अचानक वावटळ आल्याने धागा तुटला , पतंग सैरावैरा भिरभिरत जात होते . मी धावतच मागे मागे जात होतो , वावटळ थांबली तसा वाऱ्याचा जोर कमी झाला , पतंग खाली येऊन एक झाडाच्या फांदीला लटकले ... मी धावतच तिथं पोहोचलो . जवळ जाऊन पाहतो तर भलंमोठं खोड असणार पिंपळाचे झाडं , मी मोठ्या हिंमतीने वर चढून पतंग काढले ... हळूहळू खाली उतरलो , घामाने चिंब झालो होतो आणि जरा दमलो होतो . मग मी त्या विशाल , थंडगार झाडाच्या सावलीत जरावेळ विसावलो . पतंग कुठेही फाटलं नव्हतं , बाबांनी आजच मला ते पतंग घेऊन दिलेलं ... म्हणून मला ते गमावणं शक्य नव्हतं , मनात विचार आला की या झाडांमुळे मला माझं पतंग परत मिळालं ... मी बराचवेळ तिथं बसून होतो , त्याच्या सहवासात मी रमलो .


दुसऱ्या दिवशी मी स्वतः त्या झाडाजवळ पतंग उडवायला गेलो आणि रोजच जायला लागलो ... माझी त्याच्याशी गट्टी जमली आणि एकेदिवशी त्याला टेकून बसलो होतो , कबीरांचे दोहे वाचत असताना मनात विचार आला की जसे कबीर मोलाचं ज्ञान देऊन जगणं शिकवतात , अधीर मनाला आधार देतात तसंच काहीसं हे झाडं मला नवी ऊर्जा , उमेद आणि मनाला शांती देतं म्हणून मी मित्र या नात्याने त्याच " कबीर " असं नामकरण केलं .... आम्ही दोस्त झालो . पुस्तक आणि कबीर यांचा सहवास मला हवाहवासा वाटायचा , म्हणून मी बरेचदा पुस्तक वाचायला तिथं जात होतो , एकाचवेळी दोघांना भेटत होतो ... कधी कबीरशी गप्पा मारत होतो तर कधी पुस्तकांशी .... मग काही दिवसांनी ती माझ्या वस्तीत राहायला आली ... तेथून जणू एक नवीन पर्व सुरु झालं . तिला पाहिलं तेव्हापासूनच तिच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण मला जाणवायचं ... मी तिला बघायचा बहाणा शोधत फिरायचो , पण जेव्हा जेव्हा तिला पाहायचं ठरवलं तेव्हा तेव्हा ती एक नजर सुध्दा दिसायची नाही पण मनात तिचा काहीएक विचार नसतांना , जरा घाई असतांना असच बाहेर पडलो कि ती नजरेसमोर आलीच समजा , मी पार गोंधळून जात असे ...