Makar sankrant - 3 books and stories free download online pdf in Marathi

मकर संक्रांत भाग ३

मकर संक्रांत भाग ३

संक्रांतीचा शेतीशी आणि सौरकालगणनेशी संबंध आहे .

असं म्हणतात की संक्रांती नंतर येणाऱ्या रथसप्तमीपासुन सुर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात.

या दिवशी आपल्या मोठया भावाबरोबर, मित्रमंडळींबरोबर वडीलधार्या माणसांसोबत पंतग उडविण्यात.बालगोपाळ तल्लीन असतात.

भरपुर ठिकाणी पंतग मोहोत्सव देखील आयोजित केल्या जातो. . . पतंग बनविण्याचे देखील शिकविण्यात येते.

पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहाण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते.या राज्यात पतंगाचे या सणाला खुप महत्व आहे .

या पतंग उडविण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सुर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता पतंगा पेक्षा चांगले कारण कोणतेही असु शकत नाही. आणि म्हणुनच मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली असावी.

यामागे करमणूक होणे हा उद्देश असला तरीही शास्त्रीय कारणही आहे. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. याने थंड हवे पासून होणाऱ्या समस्या पासून दूर होण्यास मदत होते.

संक्रांत हा सण केवळ भारतातच साजरा होतो असे नाही तर आशिया खंडातील अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो.

नेपाळमध्ये याला माघी किंवा माघी संक्रात, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते.

भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते.

उत्तरायण' शब्द, दोन संस्कृत शब्द उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा संधी आहे..

भारतीय परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.

सूर्य मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास, नऊ मिनिटे व दहा सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या वर्षी `लीप वर्ष’ धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो.

संक्रांत आणि पानिपतची लढाई संलग्न आहेत .

जगाच्या दृष्टीने भले काही फार मोठा दिनविशेष नाही. पण एक मराठी माणूस म्हणून आपल्या दृष्टीने आज फार मोठा आणि आठवणीत ठेवावा असा हा दिवस. या दिवशी पानिपतचे तिसरे आणि ऐतिहासिक युद्ध झाले होते ..

पानिपतच्या या युद्धाचा सारांश सांगायचा झालाच, तर इतकंच सांगता येईल की जेव्हा आपण "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" असे गातो, त्याची पाळेमुळे या युद्धात आणि त्यामागील काही घटनांमध्ये आहे.

ज्या नजीबुद्दौलाचे आमंत्रण स्वीकारून अफगाण राजा अहमदशाह अब्दालीने १७५७ साली दिल्लीवर आक्रमण केले आणि सुमारे १२ कोटी (त्यावेळचे) रुपयांची लूट गोळा केली, तोच नजीबुद्दौला दिल्ली वाचवायला गेलेल्या राघोबादादांच्या तावडीत सापडला. त्याला जीवनदान देण्याची चूक मराठ्यांना भारी पडली.
त्या घटनेने आणि मराठ्यांच्या वाढत्या साम्राज्याला आळा घालण्यासाठी अब्दालीने १७५९-६० मध्ये परत उत्तर भारतावर आक्रमण केले. यावेळी त्याला थांबविण्यास गेलेल्या विश्वासराव (तत्कालीन मराठी सरसेनापती) आणि सदाशिवराव भाऊ ( तत्कालीन पेशवे पंतप्रधान नानासाहेब यांचे बंधू) यांची पानिपतात अब्दालीशी गाठ पडली. १४ जानेवारी १७६१ रोजी ब्राह्ममुहूर्तावर युद्धास तोंड फुटले. माध्यान्हीपर्यंत अब्दालीच्या सैन्याला वरचढ ठरलेले मराठी सैन्य विश्वासरावांच्या मृत्यूने पार ढासळले आणि दिवसाअखेर अब्दालीच्या सैन्याने पूर्ण सव्वा लाख मराठी सैन्य कापून काढले.
अशाप्रकारे पानिपतचे अपयश महाराष्ट्राच्या पदरी पडले.

विश्वास पानिपतात गेला, संक्रांत कोसळली, पानिपत झाले हे सगळे वाक्प्रचार/म्हणी याच प्रसंगाशी निगडीत आहेत..

पानिपतचा इतिहास माहित असो व नसो, अशाही काही गोष्टी आहेत आपल्याला माहित हव्यात कारण तो मराठ्यांचा इतिहास आहे

अहमदशाह अब्दाली हा राजा होता, त्याच्या गाठीशी भरपूर अनुभव होता पण पानिपतच्या लढ्यापूर्वी सदाशिवराव भाऊ फक्त उदगीरच्या लढाईत उतरले होते, विश्वासराव तर नवखेच होते .
अब्दालीचे सैन्यदेखील मराठी सैन्यापेक्षा किंचित जास्तच होते. तरीही प्रत्यक्ष युद्धात मराठ्यांच्या दीडपट अफगाण सैन्य गारद झाले.

मराठा सैन्याची रसद कापली गेल्याने संपूर्ण सैन्य निदान आठ दिवस अन्न-पाण्यावाचून होते. उलट अब्दालीचे सैन्य ताज्या दमाचे होते.

युद्ध जिंकल्यानंतरही अब्दालीने मराठ्यांचा धसका घेतला. युद्धानंतर अब्दालीने नानासाहेब पेशव्यांना पाठविलेल्या पत्रात विश्वासराव आणि सदाशिवभाऊ यांच्या मृत्यूबद्दल क्षमा मागून, "उत्तर भारतावर परत कधीही आक्रमण करणार नाही" याचे आश्वासन दिले आणि ते शेवटपर्यंत पाळलेही.

पिढ्यानपिढ्या बादशहाचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या राजपुतान्यातून एकही मदत आली नाही, उलट त्यांनी अब्दालीचे मांडलिकत्व स्वीकारून मराठ्यांची कोंडी करायचा प्रयत्न केला.
आज राजपूत म्हणून मिरविणारे कायम कुणाचे ना कुणाचे मांडलिक राहिले, आणि म्हणूनच त्यांची अफाट संपत्ती आजही आहे.
उलट देशासाठी आणि धर्मासाठी कुठलाही समझोता करण्यास तयार न झालेले मराठे कायम युद्धास तयार राहिले, आणि आज पुण्यात पेशव्यांचे फक्त नावच राहिले आहे .

पानिपतात एक अख्खी मराठी पिढी कापली गेली, त्याचा परिणाम ब्रिटीशांच्या सामर्थ्यवाढीत झाला.

पुढची पिढी तयार होताच, मराठ्यांनी प्रथम दिल्ली काबीज केली, आणि सुमारे २५ वर्षे माधवराव पेशवे आणि महादजी शिंदे यांच्या अंमलाखाली "दिल्लीचे तख्त राखिले".

मराठे आणि अफगाण ही दोन्ही त्यावेळी जगातील सर्वात मोठी साम्राज्ये होती. त्यांच्या परस्पर धड्कीने संपूर्ण भारतीय उपखंडाचे प्रचंड नुकसान झाले. याचे उदाहरण आजही वायव्येला दिसते आहे.

जर मराठे जिंकले असते, तर देशात ब्रिटीश राज्य येणे अशक्य होते. पुढच्या शक्यता तर अमर्याद आहेत.

मराठ्यांचे लक्ष्य होते, करारानुसार दिल्लीचे रक्षण करायचे, आणि मराठ्यांनी ते साध्य केलं, भले मग त्यासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली. आपण जिंकलो नाही, पण अब्दाली हरला आणि त्याने मागे पाय घेतला.
यातच मराठ्यांचे कार्य सिद्धीस गेले. अपयशावर रडण्यापेक्षा, स्वतःवर शंका घेण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, त्यानेच पानिपतातील हुतात्म्यांना श्रद्धांजली मिळणार आहे.

ही शिकवण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मिळाली होती .

जय महाराष्ट्र