Protsahan books and stories free download online pdf in Marathi

प्रोत्साहन


* प्रोत्साहन *
काही वर्षांपूर्वी शिक्षक या पदावरून निवृत्त झालेले जोशीकाका दिवाणखान्यात रविवारचे वर्तमानपत्र वाचत बसलेले असताना त्यांच्या हरिनाम संकुलात राहणारा, चौथ्या वर्गात शिकणारा राम नावाचा मुलगा त्यांच्या घरी आला. त्या संकुलातील तीन मजल्यावर सहा कुटुंबं राहात होती. त्यापैकी एक कुटुंब म्हणजे जोशीकाका आणि काकू! जोशीकाका-काकूंनाही लहान मुलांची खूप आवड असल्यामुळे संकुलातील मुले त्यांच्या अवतीभवती राहात असत. जोशीकाका दररोज सायंकाळी संकुलाच्या वाहनतळावर सर्व मुलांना एकत्र जमवून 'परवंचा' घेत असत. संस्कार गीते,बडबडगीते, छोट्या बोधकथा त्यांना सांगत असत. सोबतच मुलांनी शाळेत शिकलेल्या कविता आणि गोष्टी मुलांना सांगायला लावत. कुणी त्यास 'संस्कार वर्ग' म्हणे तर कुणी 'बाल आनंद मेळावा' असे म्हणत असे. त्या संकुलात राहणारे राम, रहिम, मालिनी, समीर आणि शेजारचा तेजस ही मुले दररोज सायंकाळी न चुकता संस्कार वर्गाला उपस्थित असत. राम-रहिम ही जोडी चौथ्या वर्गात, मालिनी-समीर हे तिसऱ्या इयत्तेत तर तेजस दुसऱ्या वर्गात शिकत होते.
रामची चाहूल लागताच जोशीकाकांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवून विचारले, "का रे राम, आज एकटाच?..." तितक्यात रहिम तिथे आल्याचे पाहून काकांनी विचारले, "अरे, रहिमही आला. काही काम आहे का?"
"काका, उद्या ना, आमची साप्ताहिक परीक्षा आहे."
"अभ्यास करायचा आहे का? काही अडचण आहे का?" काकांनी विचारले. अधूनमधून संकुलातील मुलांना अभ्यास करताना अवघड जाणारा भाग जोशीकाका समजावून सांगत.
"तसे नाही काका. अभ्यास झाला आहे. आमच्या बाई की नाही, साप्ताहिक परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्यांना कधी फूल, कधी पेन तर कधी वही बक्षीस देतात."
"अरे, वा! छान! तुम्हाला कधी असे बक्षीस मिळाले का?" काकांनी विचारले.
"नाही ना. त्याचे असे होते, आम्हाला कधी सतरा, कधी अठरा गुण मिळतात पण वीस पैकी वीस गुण कधीच मिळाले नाहीत." राम म्हणाला.
"अरेरे! थोडक्यात हुकतय की, तुमचं बक्षीस. बरे, तुम्ही कुठे चुकताय हे तुम्हाला समजते काय?"
"काका, मी की नाही, चार-पाच ठिकाणी ऱ्हस्व, दीर्घ अशा चुका करतो. आणखी की नाही, आणि या शब्दातील 'णि' हे अक्षर नेहमीच दीर्घ लिहितो. शिवाय अनेक हा शब्द 'अन्नेक' असा लिहितो." रामने प्रांजळपणे सांगितले.
"काका, माझ्याही अशाच चुका होतात. बाई म्हणतात की, या अशा चुकांमुळे आम्हाला एक-दोन गुण कमी मिळतात. त्यामुळे आम्हाला बक्षीस मिळत नाही." रहिमनेही खरेखरे सांगितले.
"काका, मी परीक्षेच्या आधी हे शब्द खूप घोकतो, पण परीक्षेत मात्र चुकीचेच लिहितो." राम म्हणाला.
"एक खूप चांगले आहे की, तुमची चूक कुठे होतेय ते तुम्हाला समजले आहे. पण अशी घकमपट्टी करून चालत नाही. तुम्ही वही, पेन आणली आहे का?" काकांनी विचारले.
"हो काका.आम्ही घेऊनच आलो आहोत."
"ठीक आहे. जी अक्षरे चुकतात ना, तीच अक्षरे पन्नास-पन्नास वेळा नीट लक्ष देऊन लिहा. घाईगडबडीत लिहू नका. सावकाश लिहा." काका म्हणाले.
"बरे, काका. लिहितो." असे म्हणून राम-रहिमने लिहायला सुरुवात केली. जोशीकाका त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.
थोड्याच वेळात रामने त्याची नेहमी चुकणारी अक्षरे लिहून काढली. पाठोपाठ रहिमचेही झाले. तसे काका म्हणाले,
"झाले का? शाब्बास! आणा बघू."
दोघांनीही आपापल्या वह्या काकांकडे दिल्या. त्यावर नजर टाकत काका म्हणाले,
"व्वा! छान! दोघांचेही अक्षर सुरेख, वळणदार आहे."
काकांनी एक-एक शब्द तपासायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते म्हणाले,
"राम, तू तुझे शब्द योग्य पद्धतीने लिहिले आहेस. पण दोन-तीन ठिकाणी गडबड केली आहे."
"हो काका. मी ते शब्द घोटणार होतो पण आमच्या बाई म्हणतात की, शब्दांना घोटू नये."
"अगदी बरोबर आहे. रहिम, तुझेही तसेच झाले आहे. लिहितांना, वाचताना लक्ष द्यायला हवे. इकडेतिकडे पाहू नये. तुम्ही दोघेही अधूनमधून एकमेकांकडे बघत होते. बरोबर?" काकांनी विचारले.
"हो काका. परीक्षा देतानाही आमचे असेच होते. शेजारच्या मुलापेक्षा माझे लवकर व्हावे म्हणून मी भरभर लिहितो." रहिमने सांगितले.
" तसे करायचे नाही. आपल्याला गुण मिळतात ते आपण कसे, किती लिहिले याबद्दलचे. तुम्ही लवकर, भरभर लिहिले याचे बाई गुण देतात का? मुळीच नाही. इतरांकडे पाहून लिहिताना अक्षर चांगले येत नाही. साध्या साध्या चुका होतात. कुणाकडेही न पाहता सावकाश, शांतपणे लिहावे. बरे, यापूर्वीच्या तुमच्या उत्तरपत्रिका आणल्यात का?" काकांनी विचारले.
"हो.मी सगळ्या उत्तरपत्रिका आणल्या आहेत." रामसह रहिमही म्हणाला.
"छान! आता एक करा. एक-एक उत्तरपत्रिका हातात घ्या. शांतपणे सारे वाचा. ज्या वाक्यातले अक्षरे चुकली आहेत ते पूर्ण वाक्य पंचवीस वेळा लिहून काढा. करा सुरुवात." काका म्हणाले.
दोघांनीही सोबत आणलेल्या उत्तरपत्रिका काढल्या. प्रत्येक उत्तरपत्रिका सावकाशपणे पूर्ण वाचून काढली. बाईंनी चुका झालेली अक्षरे आणि गणित करताना 'हातचा' न घेतल्यामुळे चुकलेली गणितं यांच्या बाजूला विशेष खूण केलेली होती. दोघांनीही प्रथम चुका झालेली वाक्ये लिहायला सुरुवात केली. दोघेही एकाग्रतेने, एकमेकाकडे न पाहता लिहू लागले. जवळपास सव्वा तासाने दोघांचेही एका पाठोपाठ लिहून झाले. त्यांनी आपापल्या वह्या काकांकडे दिल्या. त्या काळजीपूर्वक तपासून काका म्हणाले,
"अरे वा! अभिनंदन! एकही चूक झाली नाही. तुम्ही ज्या एकाग्रतेने लिहिलेय ना, तसेच उद्या परीक्षेत लिहिले ना, तर तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळणार."
"काका, आता आम्हाला की नाही, हातच्याची बेरीज-वजाबाकीची गणिते द्या. तिथे आम्ही चुकतो."
"ठीक आहे. एक काम करा. तुम्ही दोघेच एकमेकांना गणितं द्या." काका म्हणाले. त्याप्रमाणे राम-रहिम यांनी एकमेकांच्या वह्या घेऊन त्यावर बेरीज, वजाबाकीची गणिते दिली. चार-पाच गणितं सोडवून होताच रहिम म्हणाला,
"काका, बघा ना. रामने गणित चूक दिले आहे."
ते ऐकून राम म्हणाला, "काका, मी ते गणित मुद्दाम दिले. लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही हे मला माहिती आहे. काका,एकदा की नाही, आमची शाळा तपासणीसाठी आलेल्या साहेबांनी आम्हाला हे गणित मुद्दाम दिले होते."
"अरेरे! सर्वांचे गणित चुकले असणार." काका म्हणाले.
"नाही ना. साहेबांनी फळ्यावर गणित लिहिल्याबरोबर आपला राम उभा राहून म्हणाला की, वरची संख्या लहान आणि खालची संख्या मोठी असल्याने लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही." रहिम म्हणाला.
"शाब्बास! मग काय म्हणाले साहेब?" काकांनी विचारले.
"साहेबांनी रामला जवळ बोलावले. पाठीवरून हात फिरवत खिशातून पेन काढून रामला बक्षीस म्हणून दिली."
"व्वाह! बढिया!" काका आनंदाने पुढे म्हणाले, " चला. पुढली गणितं सोडवा. गणितं सोडवून होताच एकमेकांची गणितं तपासा."
काही वेळातच दोघांनीही गणितं सोडवताच वह्यांची अदलाबदल केली. दोघांनी एकमेकांच्या वह्या तपासल्या. दोघांचेही एक-एक गणित चुकले होते. त्यामुळे दोघेही नाराज झाले. ते पाहून काका म्हणाले,
"हरकत नाही. बाकीचे आले ना सारे. शिकतो तोच चुकतो. आता घरी जाऊन जेवण करा आणि वाटलेच तर झालेल्या चुकांचा सराव करा."
राम-रहिम आपापले दप्तर घेऊन निघाले. दारात क्षणभर थांबून काकांना म्हणाले," थँक्स, काका."
त्यानंतर दिवसभर दोघेही खाली आलेच नाहीत. एक-दोन वेळेस मालिनी काकांकडे डोकावून गेली. समीर त्याच्या आईबाबासोबत बाहेर गेला होता. सायंकाळ झाली. तसे काकांनी दोन तीन वेळा खाली वाहनतळाकडे डोकावले. परंतु वातावरण शांत होते ते पाहून तेही खाली गेलेच नाहीत.
सोमवारचा दिवस उजाडला. काकाकाकू सकाळची कामे आटोपत असताना काकांचे लक्ष बाहेर लागले होते. पोरांवर त्यांचा विशेष जीव होता. काकूंनी विचारले,
"अहो, काय झाले? लक्ष कुठे आहे?"
"अग, कालपासून मुले आलीच नाहीत...." काका बोलत असताना जिन्यावर पावले वाजली. दुसऱ्याच क्षणी राम, रहिम, मालिनी, समीर सारे एकदम आत आले आणि सारेच काकांच्या पायाशी वाकले. तसे काका म्हणाले,
"अरे, हे काय करताय? काल दिवसभर कुठे होता?" कुणी काही बोलण्यापूर्वीच रामची आई म्हणाली,
"काका, काही विचारु नका. दोघे दिवसभर अभ्यास करत होते. रात्री दहा वाजता बळेच उठवले."
"तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोघे एकमेकांना गणिते देऊन तपासत होती." रहिमची आई म्हणाली.
"मी पण खूप अभ्यास केला." मालिनी म्हणाली.
"वा! वा! आज परीक्षा आहे ना, मग व्यवस्थित, शांतपणे आपले आपण लिहा. कुणाकडे पाहायचे नाही. गडबड करायची नाही. आज तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार म्हणजे मिळणार. मी तुमच्यासाठी बक्षीस आणून ठेवतो." काका म्हणाले आणि सारे टाळ्या वाजवत आनंदाने शाळेत गेले. .....
दुपारचे साडेतीन वाजले. काकांनी विचारले,"मुलं शाळेतून किती वाजता येतात ग?"
"असे काय करता? तुम्हाला माहिती आहे ना, चार वाजता येतात ते."
"अग, मुलांना मिळतील ना ग पैकीच्या पैकी गुण?"
"अहो, असे उतावीळ का होताय? त्यांना पुर्ण गुण मिळतील. काळजी करु नका. शांत बसा."
पावणेचार वाजत असताना हरिनाम संकुलासमोर शाळेची बस येऊन थांबली. काही क्षणातच राम, रहिम, मालिनी, समीर हे सारे पळत पळत आधी काकांजवळ आले. चौघांचेही चेहरे आनंदाने फुलले होते. राम-रहिमच्या हातात गुलाबपुष्पांचा सुंदर गुच्छ होता.
"का..का..काका..." रामला एवढा आनंद झाला होता की, त्याला बोलताही येत नव्हते.
"की..की...नाही..." रहिमचही तशीच अवस्था होती.
"तुम्हाला... दोघांनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत." काकाही आनंदाने म्हणाले.
"काका, मला पण वीस गुण मिळाले आहेत." असे म्हणत मालिनीने पाठीमागे लपवलेला पुष्पगुच्छ पुढे केला. तशीच कृती करीत समीर म्हणाला,
"काका, मला ना, साडे एकोणवीस गुण मिळाले. बाई म्हणाल्या की, ते वीसच आहेत. म्हणून मलाही हा गुच्छ दिला."समीर आनंदाने म्हणाला.
"अरे, वा! सर्वांचे अभिनंदन! हे घ्या...बक्षीस!..." असे म्हणत काकांनी खिशातून काढलेल्या पेन प्रत्येकाला दिला. पेन घेऊन सारे जण काकाकाकूंच्या पाया पडत असताना राम म्हणाला,
"काका, आज की नाही, आमच्या वर्गात आम्हाला दोघांनाच वीस पैकी वीस गुण मिळाले आहेत. बक्षीस देताना बाई म्हणाल्या की, आजची प्रश्नपत्रिका अवघड होती."
"किती छान! प्रश्न अवघड असूनही तुम्ही वीस गुण मिळविले. तुमचे डबल अभिनंदन!" काका म्हणाले.
"काका, मी आमच्या बाईंना पुष्पगुच्छ देऊ का हो?"
"का रे, तुमच्या बाईंनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले का?" काकांनी हसत विचारले.
"आमच्या शाळेत साहेब आले होते. ते म्हणाले की, चांगले काम केले म्हणून आमच्या बाईंचा पगार वाढला आहे.... बक्षीस मिळाले आहे."
"राम, अरे, ही तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. काय करा, आपण खाली जी फुलांची दाडे लावली आहेत ना, त्या फुलांचा गुच्छ..." काका बोलत असताना समीर मध्येच म्हणाला,
"काका, तुम्हीच तर सांगितले ना की, झाडांची फुले तोडायची नाहीत..."
"समू, अगदी बरोबर आहे. पण अशा चांगल्या कामाला वापरायला हरकत नाही. जा. पळा. आईला बक्षीस दाखवा." काका म्हणाले. तशी सारी मुले आनंदाने पळत गेली. काकूंनी काकांकडे पाहिले. दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळत होते.
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२,
हॉटेल जय मल्हारच्या पुढे
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१