Bhatkanti - punha ekda - 18 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १८)

सुप्री अशीच मधेच आठवणीत हरवून जायची. जेव्हा जेव्हा बाहेर जायचे, तेव्हा आकाश सोबतच असायची. त्याला अजिबात सोडायची नाही. जेवणाचे बघायला जाताना सुद्धा आकाश सोबतच असायची ती. म्हणून तर यावेळेस जेव्हा जेवणाची व्यवस्था करताना सुप्री पुढे होती. आकाशने शिकवून ठेवलं होतं ना, तसेच काही तिने विकत घेतलं गावातून. तिघी निघाल्या पुन्हा त्यांच्या जागी. अचानक संजनाचे लक्ष गेले एकीकडे.
" कोमल... ती बघ... तशीच मूर्ती.." यावेळेस सुप्रीने सुद्धा पाहिली मूर्ती. तिघी त्या गणपतीच्या मूर्ती जवळ गेल्या. सुप्रीला अश्या मूर्तीबद्दल काहीच माहित नव्हतं. कोमल ,संजना शोधू लागल्या काही लिहिलं आहे का मुर्ती खाली. तर तिथेहि तीच गत.. भटक्याने काय लिहून ठेवलं होते, ते नव्हतेच तेथे. त्या तिघींना बघून एक बाई त्याच्याजवळ आली.
" भटक्याची मूर्ती हाय ती... त्यानं उभारून ठेवली आणि गेला भटकायला.... " ,
" हो... कळलं ते.. पण या खाली काही लिहून ठेवतो ना तो... " ,
" व्हय व्हय... लिवतो तो ....,",
" हा तेच.... काय लिहितो तो... " ती बाई विचार करू लागली.
" नाय राहिलं डोस्क्यात... " सुप्री मागेच होती या संभाषणात. ती पुढे आली आणि मूर्ती निरखून पॉहू लागली
" अशी कोणी बनवली गणूची मुर्ती... " सुप्रीचा प्रश्न.


" हा... आठवलं... त्यो असाच बोलायचा ... तुमच्या सारखं... भटक्या... आणि तेच लिउन ठेवलं होता त्यानं.. " ,
" काय ते ... " ,
" माझा गणू... "
" काय " सुप्री किंचाळली. संजनाने सुद्धा ऐकलं ते.
" खरंच तसं लिहितो तो... " सुप्रीच्या डोळ्यात पाणी जमा झालं.
" व्हय... लिवतच नाय... बोलतंय बी मदे मदे ते येडं... माझा गणू .... माझा गणू... " ती बाई हसतच पुढे निघून गेली. कोमलला यातलं काहीच कळलं नाही.
" सुप्रिया ... काय झालं ? " कोमलला तिने घट्ट मिठी मारली. थोडावेळ कोमल blank झालेली, काय झालं हिला नक्की.
" थँक्स कोमल... खूप खूप थँक्स.. " तिची मिठी सोडली आणि तिने संजनाला मिठी मारली. दोघी रडत होत्या, हसत होत्या.
" काय झालं... सांगेल का कोणी मला... " कोमल...
"आता नक्की झालं, तो आकाशच आहे... " सुप्री डोळे पुसत हसत होती.
" कसं काय ? " ,
" गणू.. सुप्रीमुळेच आकाशला सवय लागली होती... गणपतीला गणू बोलायची. पण तो अश्या मूर्ती का बनवतो आहे इथे , हे कळत नाही. " संजना.
" चला म्हणजे... एक बरं झालं... भेटला तो आपल्याला... " कोमलला आनंद झाला.
" तरी प्रश्न आहेचं.. " सुप्री ..
" गेला एक वर्ष... शहरात का आला नाही तो... इथे का भटकतो आहे.. "
" ते नंतर, आधी त्याला भेटू ना... " संजना.
" त्या आधी जेवायला हवे ना आज ... बाकीचे वाट बघत असतील आपली... " ,
" हो हो ... " निघाल्या तिघी. सुप्री पुन्हा मागे वळली. त्या गणपतीच्या मूर्तीला पाया पडली. " थँक्स गणू.. खूप खूप थँक्स... " आताही डोळे पाणावले तिचे. एक वेगळाच आनंद मनात घेऊन सुप्री निघाली.


====================================================


बघता बघता संध्याकाळ होतं आली. आज सई आणि तिचा ६ जणांचा ग्रुप एका गावात थांबले होते. एका देवळाच्या मागेच त्यांनी तंबू उभे केले होते. रात्रीचं जेवण देवळात मिळणारं होते, तर सगळ्यांनी तिथेच जेवण करायचे ठरलं. आकाश नव्हता सोबत. बाकीचे चालून थकले त्यामुळे बसल्या जागीचं आराम करत बसले होते. सई निघाली गावात फेरफटका मारायला. जरासं धुकं जाणवतं होते. कमालीची गोष्ट ना, पावसाळयात सुद्धा धुकं.. संद्याकाळी... बोचरा थंड वारा होता सोबतीला. गावातून फिरताना सई सगळीकडे पाहत चालत होती. किती छान हे, शहरातली आधुनिकता नव्हती इथे, कोणालाच घाई नव्हती आरामात सुरु होते सर्व, म्हातारी माणसं गप्पा मारत बसली आहेत. कोणी मोबाईल वर चॅटिंग , whatsapp करत बसलेली नव्हती. गाई ,त्यांचं सकाळचं काम संपवून वासरासहित गोठयात परतत आहेत. शेतावर गेलेले , आपल्याच नादात..... काही गुणगुणत घरी निघाली आहेत. काही लहान मुलं खरे खुरे 'मैदानी खेळ" खेळत आहेत. आणि एका कोपऱ्यात , आकाश काहीतरी करत बसला होता. सई गेली त्याच्याजवळ. त्याचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. गणपतीची मूर्ती होती. तिलाच पुन्हा पुन्हा माती लावत होता. हा... बोलला तर होता ... सगळीकडे गणपती बनवतो... यानेच बनवली असेल हि... "काय करतो आहेस... " सईने शेवटी विचारलं.


आकाशचं काम झालं होते तसही. तिने विचारल्यावर लगेच तिच्याकडे नजर गेली.
" हे गणू साहेब.... त्याची जरा डागडुजी करतो आहे. पावसाने खूप दिवस अंघोळ झाली ना. म्हणून जरा... " आकाश मंद हास्य करत होता.
" पाऊस तर नाही आहे ना... आणि हो... तुला कळतो ना निसर्ग.. मग थंडीत पडणार धुकं... पावसाळ्यात कसं काय... सकाळचे कळू शकते... आता कसे... बघ गावात, कसं धुकं पसरलं आहे... " सई किती उत्साहात सांगत होती. " म्हणजे मी हे सगळं पहिल्यांदा अनुभवते आहे.. शहरात कुठे असते असं काही... " ,
" धुकं ना...असतेच, शहरात धूर असतो. गावात धुकं... पावसातही असते हा.. निसर्गाचा खेळ.. मागे धुकं पाहिलंत ना... समोर बघा... " असं बोलून आकाश सुद्धा समोर बघू लागला.


समोर एक मोठ्ठा डोंगर होता. पाषाण पुरुष. कधी पासून उभा होता काय माहित, हिरव्या रंगाची शाल पांघरून शांत डोळे मिटून बसला असावा. ध्यानस्थ !! त्याच्या अंगा-खांद्यावर झाडांचे जंगल. घरी परतलेल्या पक्षांचा कालवा नक्की सुरु असेल तिथे. धुकं तर तिथेही दिसतं होते. एखादं ठिकाणी गडद पांढरा रंग उठून दिसतं होता, त्या हिरवळी मध्ये... किती दाट धुकं असावं तिथे. त्याच्या माथ्यावरून जाणारे ढग, त्याला स्पर्श करावा आणि पुढे जावे, हेच करत होते. आकाश मधेच बोलला." या डोंगराला ना... गावातले सगळेच " आजोबा " बोलतात... कित्येक वर्षांपासून तसाच उभा आहे... " त्या आजोबाच्या माथ्याला स्पर्श न करू शकलेले ढग ,त्याच्या कुशीत विसावत होते.... हळूच, त्याला कळूही न देता. आणि .... त्या आजोबाच्या मागे, धुक्याची एक मोठी भिंत उभी होती जणू... या सर्व चित्रामागे, सूर्यास्त होतं होता. अगदी बरोबर त्या आजोबाच्या पायथ्याशी. तसेच वाटतं होते. दिवसाचा कारभार संपवून , आणि आजोबांशी नतमस्तक होऊन सूर्य विश्रांती साठी निघाला, असं कुणी म्हटलं असतं तरी ते वावगं ठरू नये. सई हरखून गेली..अंगावर शहारा आला.


बघतच राहिली ती. तितक्यात काही लहान मुलं आली आकाश जवळ. " दादा... चल ना, खेळायला... " म्हणत त्याचा हात पकडून घेऊन गेली. सई बघत होती सर्व. काहीवेळाने सईजवळ एक बाई येऊन उभ्या राहिल्या.


" नमस्कार !! तुम्ही ओळखता का भटक्याला... " त्यांनी सईला विचारलं.
" नाही... actually ४-५ दिवसच झाले त्याची भेट होऊन. " ,
" असं आहे का.... मला वाटलं , तुम्ही शहरातल्या दिसता.. तर त्याला घेऊन जायला आलात. " ,
" म्हणजे तुम्हाला माहित आहे , तो इथला नाही ते... तुम्ही कोण आहात ? " सईला प्रश्न पडला.
" मी पाटील बाई, हि शाळा दिसते ना समोर... तिथे शिक्षक आहे मी. आता शाळा सुटली. मुलांनी बघितलं त्याला म्हणून घेऊन गेली खेळायला. ",
" म्हणजे सगळेच ओळखतात ना त्याला... " सई..
" हि शाळा आहे ना... त्याच्यामुळेच सुरु झाली पुन्हा... मोडकी-तोडकी शाळा होती. त्यात कोणीच यायचे नाही शिकायला. किती प्रयन्त केले मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी. घरोघरी जाऊन विनवले, मुलांना शाळेत पाठवा... कोणीच तयार नाही. एक दिवस, हा कुठून आला काय माहित, झोपायला जागा मिळेल का विचारत होता. कोणीच तर नसायचं शाळेत .. झोप बोलली त्याला .... नंतर विचारू लागला.... हि शाळा आहे का... त्याची भाषा ऐकून, तो गावातला नाही हे समजलं. त्याला सांगितलं मी सर्व. एक दिवस राहिला शाळेत. गेल्या निघून पुढच्या दिवशी. २ दिवसांनी परत आला तेव्हा गावकरी होती सोबत. त्यांना मदतीला घेऊन, त्याने उभी केली शाळा पुन्हा. परत, गावात जाऊन काय बोलला माहित नाही... शाळा पुन्हा सुरु झाली. आता तर न चुकता मुलं येतात रोज... इतकी येतात कि सकाळ आणि दुपार , २ वेळेस घ्यावी लागते शाळा... कमाल आहे ना... आम्ही सांगत होतो तेव्हा कोणी तयार नव्हतं.. याने काय जादू केली.. सगळेच तयार झाले... आणि ऐकतात हा सगळे त्याचं... " पाटील बाई.


" इकडेच होता का तो... आधी... " ,
" एक वर्ष होतं आलं, २ आठवडे होता गावात. बरीच कामे केली त्याने गावात. लहान मुलांचा तर लाडका दादा झाला होता तो. आणि एक दिवस अचानक निघून गेला , कोणाला न सांगता. वाईट वाटलं सर्वाना. तरी पुन्हा येईल म्हणून वाट बघत होते सर्व. तो कालच आला पुन्हा गावात, हे ऐकलं मी. आज बघितलं त्याला.. छान वाटलं. त्या तो नक्कीच शहरातून आलेला आहे, हे मला माहित होतं. तू दिसलीस , वाटलं... भटक्याचा प्रवास संपला आता.... तर तुही नवीन आहेस त्याला... " ,
" हो... पण खूप छान माणूस आहे ना... तुम्हाला त्याचं नावं माहित आहे का " ,
" तो गेला ना इथून ... तेव्हाच त्याला गावातले "भटक्या" बोलायचे.... भटक्याचा अर्थ, प्रत्येक गावात बदलतो. लोकांना वाटते, सारखा भटकत असतो म्हणून भटक्या.... पण या गावातल्या लोकांनी मुध्दाम नाव ठेवलं ते... मग सगळेच त्याला भटक्या बोलू लागले... "


" काय वेगळं... " सई ....
" या गावात भटक्या म्हणजे देवदूत.. देवाचा माणूस... असं म्हणतात कि देवदूत... आपल्या सारखं रूप घेऊन, या पृथ्वीवर फिरत असतात. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी... तसंच काहीसं केले त्याने या गावात... लोकांनी म्हणून त्याला " भटक्या " नाव ठेवलं. शेजारच्या गावातून सुद्धा त्याचे किस्से ऐकायला मिळायचे... लोकांना सुधारलं त्याने.. अडचणी गायब केल्या... पण त्याच्या अडचणी कळत नाही कोणाला. हे दुःख आहे, बघा जमते का तुम्हाला... आम्ही तर जात नाही शहरात. तुम्ही मदत करू शकता त्याला. " पाटील बाईंच्या त्या वाक्याने सईला विचार करायला भाग पाडले. आकाश समोरच त्या मुलासोबत खेळत होता.


" तू नावं विचारलंस ना त्याच... बाकीच्यासाठी तो भटक्या आहे... मी त्याला वेगळंच नाव ठेवलं आहे.. " ,
" काय ? " ,
" तो एवढा छान बोलतो ना.. जे बोलतो ते मनापासून असते... मलाही त्याने "ताई " केलं, बरं का... तुलाही अनुभव आला असेल त्याच्या बोलण्याचा... पावसावर खूप प्रेम करतो तो.. बोलतो ना कधी... " तुम्ही पाऊस बघितला आहे का ? " हसल्या पाटील बाई स्वतःशीच. " तरी एकदा दाखवला हा त्याने ... पाऊस कसा बघायचे ते... सुंदर अगदी... " पाटील बाईंनी सई कडे बघितलं.
" तू बघितला आहेस का पाऊस कधी.. " सईने नकारार्थी मान हलवली.
" तो बघ समोर.. " त्यांनी आकाश कडे बोट दाखवलं. " त्याला पाऊस म्हणते मी... अचानक येतो... सर्वांना खुश करतो आणि निघून जातो... पाऊसच तो... सगळ्यांना हवाहवासा वाटणारा... पाऊस... " पाटील बाई निघून गेल्या.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: