Ashtavinayak - 4 books and stories free download online pdf in Marathi

अष्टविनायक - भाग ४

अष्टविनायक भाग ४

आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला.

त्या रागाच्या भरातच ते एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेले .

तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता.

ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली, त्यांनी धावत जाऊन ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली.

इतर मुले भीतीने पळून गेली,पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता.

कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले.

बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला, पण कल्याणशेठजीला त्याची दया आली नाही.

त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले.

कल्याण शेठ रागाने म्हणाले , 'येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. तु जर आता घरी आलास तर ठार मारीन, तुझा आणि माझा संबंध कायमचा तुटला.' असे म्हणून कल्याण शेठ निघून गेले

थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला.

त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. ''हे देवा, तू विघ्नविनाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस… ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.'बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला.

बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले.

गणेश बल्लाळाला म्हणाला, ''तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.''

तेव्हा बल्लाळ म्हणाला – ''तु याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.''

तेव्हा गणेश म्हणाला – ''तुझ्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.'' असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला.

तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळाची कथा गणेश पुराणात आहे.

बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्री धोंडी विनायकाचे मंदिर आहे. बल्लाळाच्या पित्याने फेकून दिलेली हीच ती मूर्ती. प्रथम या मूर्तीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो .

माघी चतुर्थीस मध्यरात्री श्री बल्लाळेश्वर स्वहस्ते प्रसादाचे सेवन करतात अशी श्रद्धा असल्यामुळे असंख्य भाविक या समारंभासाठी येतात.

हे मंदिर सकाळी ८ पर्यंत भाविकांसाठी खुले असते,म्हणजे भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात.
नंतर मात्र भाविक गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत.
गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात.
गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ पंचमी साजरा होतो. चतुर्थीला महानैवेद्य तर पंचमीला दहीकाला याचा नैवेद्य असतो.
भाविक असे मानतात की गणपती स्वतः येऊन त्या नैवेद्याला ग्रहण करतो आणि स्वतःच्या बोटांचे ठसे नैवेद्यावर सोडतो. पाचही दिवस गणपतीची पालखी निघते. तसेच भजन-कीर्तन असा भरगच्च कार्यक्रमसुद्धा असतो.
याशिवाय अंगारकी आणि संकष्टीसुद्धा साजरी केल्या जाते. साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराचे विशेष हे आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो

चौथा गणपती

वरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.
या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे.

हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.
गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे.
येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले
इथे आपल्याला दोन मुर्ती दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आंत.
एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे.
गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्ती दिसतात आणि मग गणपतीच्या दोन मुर्ती . या मुर्ती पूर्वाभिमुख आहेत.

या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत.
या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे.
कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे. आहे.पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.
मंदिराचा हॉल ८० फुट लांब आणि ८० फुट रुंद असून शिखराची उंची २५ फुट आहे
याची आख्यायिका अशी सांगतात
फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मुलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला.

त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरु केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला.

''तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल'' असा त्याने राजाला वर दिला.

काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद.

रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.

एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला.

त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा.

रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला.

शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.

क्रमश:

Share

NEW REALESED