Mala Kahi Sangachany - 39 - 2 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय..... - ३९ - २

३९. सोबती - जुने कि नवे - 2

या अनुभवातून मी जरा सावरलो होतो , तिच्यावर असलेल्या प्रेमाच्या आहारी जाऊन मी काही वेळाकरिता भरकटलो होतो पण आता मला जाणीव झाली होती की ती जितकी महत्वाची होती तितकीच घरच्यांची माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता होणे हे सुध्दा महत्वाचं होतं ... म्हणून मी मनातलं प्रेम जोवर मी माझं ध्येय साध्य करत नाही तोवर व्यक्त करायचं नाही असं ठरवलं . तोपर्यंत फक्त जे जस आहे तसंच सुरु ठेवावं हेही स्वतःला समजावलं ... सुरुवातीला तिला भेटायचं टाळण खूप कठीण होतं , सारखं मनात यायचं तिला पाहावं , तिच्याशी गप्पा मारत बसावं अस ... कितीही तिच्या आठवणीत रमायचं नाही ठरवलं तरी डोळे मिटल्यावर ती नजरेसमोर यायची , मग मी रोज रोज तिच्यासोबत कॉलेजला जाणं कमी केलं , कधी आठवड्यातून एक दोनदा तर कधी दहा पंधरा दिवस झाले खूपच मन झालं तरच तिला भेटत होतो ...

स्वतःला अभ्यासात झोकून दिलं , मी काही न काही काम शोधून व्यस्त राहत होतो ... पण ज्यापासून दूर राहावं वाटतं कधी कधी नशीब जास्त जवळ घेऊन जातं , माझ्याबाबतीत तसंच झालं ... एक दिवस कॉलेज मधून परत येतांना वाटेत एक युवक भेटला , नावं ' पवन ' आहे म्हणाला होता , पहिल्या दिवशी आमचा परिचय झाला , दोन तीन वेळा अशीच त्याच्याशी भेट झाली आणि एक दिवस त्याने मला एक प्रश्न विचारला , " किर्तीप्रिया आणि माझं नातं काय ? " मी जरावेळ विचारात पडलो होतो " मित्र आहोत " असं सांगितलं , मी त्याला " तु तिला कसा काय ओळखतो ? " विचारणार इतक्यात त्याच घर आलं आणि माझा प्रश्न तसाच राहिला ... त्यांनंतर दोन चार दिवस तो दिसलाच नाही , मी मात्र प्रश्नांनी वेढल्या गेलो होतो , डोकं ठणकायला लागलं होतं .... तिला भेटून एकदा विचारावं का ? हाही प्रश्न मनात होताच . पण मीच तिला गैरसमज होऊ नये म्हणून काहीही विचारलं नाही ...

आठवडा असाच निघून गेला आणि आणखी एकदा अचानक तो मला रस्त्याने भेटला ... त्यादिवशी मला त्याच्याकडून सर्व काही कळलं , समजलं ... जी परिस्थिती निर्माण झाली होती ती अगदीच अनपेक्षित आणि हाताबाहेरची होती ... मन कसतरी सावरून मी घरी आल्यावर सरळ कबीर जवळ गेलो ... " कबीर , अस काही तुला सांगावं लागेल आणि अशी वेळ येईल याची मला जराही कल्पना नव्हती , एक मित्र बनला आहे , पवन त्याच नाव ... आधी त्याने माझ्याशी मैत्री केली मग माझं आणि किर्तीप्रियाच नातं काय हे जाणून घेतलं , मध्ये बरेच दिवस त्याच्याशी भेट झाली नाही आणि काल जेव्हा तो परत भेटला तेव्हा त्याने ' तो किर्तीप्रियाला कसं ओळखतो , त्याला ती खूप आवडते आणि तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो . ' असं म्हणाला होता आणि सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे ' त्याला ती आवडते आणि तो तिच्यावर प्रेम करतो ' असं मित्र या नात्याने मी तिला सांगावं , त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव सादर करून त्याची मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती ... आता मला कळत नाहीये मी काय करायला हवं ? " कितीतरी वेळ मी विचार करत बसलो ...

दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जातांनी तिची भेट झाली .. " कुमार , इतक्यात तु दिसला नाही "

" नाही , कॉलेजला यायला उशीर होत होता आणि परतायला सुध्दा म्हणून "

" अस्स होय , ठीक आहे .."

तिला पवन बद्दल विचारावं कि पवनने जे तिला सांगायला सांगितलं होतं ते सांगावं , मी विचारात गढून गेलो होतो .

" कुमार , इतक्यात तुला भेटणं खूप महत्त्वाचं होतं , तुला एक गोष्ट सांगायची आहे .."

" बोल ना , किर्तीप्रिया , काय म्हणतेस ? "

" MS - CIT ला असतांना सहज पवन नावाच्या मुलाशी मैत्री झाली आणि रोज सोबत असल्याने बरंच काही बोलणं व्हायचं पण त्याने या सगळ्याचा काय अर्थ लावला कुणास ठाऊक ? क्लास संपल्यावर त्याने माझा पाठलाग केला ... "

" बरं पुढे काय झालं ??? "

" एकदा वाट अडवून त्याने मी त्याला आवडते असं सांगितलं ... मी त्याला चांगलंच खडसावलं .. पुन्हा वाटेला आला तर पोलीस स्टेशन जाऊन तक्रार करेल असंही बजावलं ... "

" अरे वा ! तु तर खूप हिंमतीने आणि समजूतदारीने सर्व निस्तारलं .."

तिला त्यादिवशी भेटून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं आणि मनाला समाधान दोन्ही मिळालं ... पण मनात तिच्याबद्दल असलेलं प्रेम जास्त उफारून वर आलं ... मी मात्र ती मनातील भावना आणि पवनचा निरोप व्यक्त केला नाही . बऱ्याच दिवसांनी तिच्याशी बोलत घरी आलो होतो , जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या ... परत एकदा ..! त्यादिवसानंतर परत तिच्या भेटीचा मोह जडला , पुन्हा रोज सोबत कॉलेजला जाणं येणं सुरु झालं होतं .

एक दोन दिवस गेले आणि पवनशी भेट झाली तेव्हा त्याला इतकंच म्हणालो , " दोस्ता , गैरसमजुतीमुळे तु एक चांगली मैत्रीण गमावून बसला ... "

तिला भेटल्यावर प्रत्येक दिवशी ती जास्त आवडायला लागली होती , मनात तिच्याबद्दल प्रेम हि एक भावना दिवसेंदिवस वाढतच गेली , तिचं चित्र जणू हृदयात छापलं होतं .. सणासुदीला मी आवर्जून भेटीला जात होतो , ती सजलेली , शृंगार केलेली , " किर्तीप्रिया " तेव्हा प्रथमच पाहतो कि काय असं वाटायचं , इतकी ती सुंदर दिसायची ... तिच्या लांब केसांनी मनाला भुरळ घातली होती . त्यावर्षी सुध्दा दसरा , दिवाळी आणि नवीन वर्षाच्या तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या ... तेव्हा तिच्याशी बोलतांना वेळ कसा निघून गेला याच मला काहीच भान उरलं नव्हतं , ते क्षण आयुष्यभर आठवणीत राहतील इतकं नक्की ..! या नवीन वर्ष्यात बऱ्याच गोष्टी सकारात्मक परिणाम करून गेल्या , ग्रॅज्युअशन चं दुसरं वर्ष पूर्ण होणार होत , सराव परीक्षा घेतली जात होती आणि तो दिवस उगवला ज्याची सर्वांना उत्सुकता लागली होती ... १४ फेब्रुवारी , वेलेन्टाइन डे ..! यावेळी तिला मनातलं सगळं सांगून प्रपोज करायचं ठरवलं होतं , हा निर्णय मी जरी घेतला होता पण याचं निमित्त आणि प्रेरणास्थान माझे जिवलग मित्र होते ... मला ती आवडते , फक्त आवडते असं नाही तर माझं तिच्यावर प्रेम आहे हे गोड गुपित माझ्याशिवाय फक्त कबीरलाच माहित होतं पण माझ्या जिवलग मित्रांची सर्व गुपित मला माहित होते आणि प्रेमाच्या परीक्षेत ते सर्व यशस्वी झाले होते , त्यात माझा खारीचा वाटा होता ... म्हणून मित्रांसाठी मदत करू शकतो तर स्वतःसाठी का नाही ? हा प्रश्न पडला आणि कितीदिवस असा लपंडाव खेळायचा , बस् खूप झालं , तिला एकदाच सांगून टाकावं असा निश्चय केला होता ...

continue... ... ...