Nidhale Sasura - 14 books and stories free download online pdf in Marathi

निघाले सासुरा - 14

१४) निघाले सासुरा!
सीमांतपूजनाचा दिवस उजाडला. तशी वेगळीच घाई सुरू झाली. सामानाची बांधाबांध, पत्रिकेसह इतर कामांवर शेवटचा हात फिरविणे, आलेल्या पाहुण्यांची विचारपूस, येत असलेल्या पाहुण्यांचे स्वागत अशी धांदल सुरू असताना दामोदरपंत म्हणाले,
"दयानंद, पाहुण्यांना म्हणजे कुलकर्णी परिवाराला आमंत्रण घेऊन जावे लागेल हं."
"भाऊजी, गावातच लग्न आहे. तेव्हा..."
"तरीही निमंत्रण द्यावे लागेल. तशी परंपराच आहे. अरे, माझ्या परिचिताकडे गावातच लग्न होते म्हणून त्यांनी वरपक्षाकडे निमंत्रण दिलेच नाही. शिवाय वराच्या घराजवळ ते मंगल कार्यालय होते. वधूपक्षाचे सारे बिऱ्हाड कार्यालयात पोहोचले. वरपक्षाकडील मंडळी येण्याची सारेजण वाट पाहत होते. रात्रीचे नऊ वाजले परंतु वरपक्षाकडील लोक येण्याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हते. तेव्हा कुणीतरी म्हणाले, की फोन लावून विचारा तरी काय अडचण आलीय ते. वधूपित्याने भ्रमणध्वनी लावताच वरपिता कडाडला, 'झाली का आठवण? वरपक्षाला निमंत्रण द्यावे लागते ही बाब तुम्ही विसरूच कशी शकता?' आणखी काही बरेच झापल्यावर स्वतः मुलीचे वडील निमंत्रण घेऊन वराकडे गेले. कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर घर असलेला वर तब्बल अकरा वाजता कार्यालयात पोहोचला. त्यामुळे कुणाला तरी रीतसर आमंत्रण देऊन पाठवू या." दामोदर म्हणाले.
"ठीक आहे. भाऊजी, आपल्या सुधाकरला पाठवू या." त्यांची चर्चा सुरू असताना तिथे आलेल्या सुधाकरने विचारले,
"काय झाले रे मामा? कुणाला कुठे पाठवायचे आहे?"
"अरे, सायंकाळी पाच वाजता तुला नवरदेवाच्या घरी जाऊन लग्नाचे निमंत्रण द्यायचे आहे."
"मला जायचे आहे? छाये, ऐकलंस का? नवरदेवाला म्हणजे तुझ्या भावी नवऱ्याला आणायला मी जाणार आहे."
"मग? त्यात काय झाले?" छायाने विचारले.
"त्यांना घेऊन यायची जबाबदारी माझी आहे. त्यांना कसे आणायचे, केव्हा आणायचे ते सारे माझ्या मनावर. त्यामुळे तू म्हणशील तर मी त्यांना लवकर आणू शकतो."
"म्हणजे? तुला काय म्हणायचे आहे?" छायाने विचारले.
"असे आहे, नवरदेवाला जमत असेल तर मी त्याला सावधान मंगलकार्यालयात आणण्यापूर्वी कुठेही नेऊन टाइमपास करु शकतो." सुधाकर खट्याळपणे म्हणाला.
"कुठे म्हणजे?" छायाने विचारले.
"कुठेही? जब दो यार मिलेंगे तो बैठेंगे ना! सिनेमा, नाटक किंवा एखाद्या बारमध्ये..."
"सु..ध्या.." छाया रागाने ओरडली.
"शिवाय मी श्रीपालचा नात्याने भाऊच लागतो ना तेव्हा येतानाच त्याचे कान असे भरीन ना की तो लवकर बोहल्यावर चढणारच नाही." छायाच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करीत सुधाकर हसत म्हणाला.
"अरे, बाबा असे काही करू नकोस रे." बाई म्हणाली."
"आई, हे तू नाही तर छायाने म्हणायला हवे. अर्थात तिला तिचा श्रीपाल वेळेवर यायला हवा असेल तर माझी फिस मला तिनेच द्यायला हवी."
"मला ब्लॅकमेल करताना हे लक्षात ठेव की, नात्याने तुझी बायको माझी बहीणच लागते आणि तुला तिच्यासोबत जन्म काढायचा आहे."
"ते पाहू नंतरचे नंतर. आज तो हाथोंमे बहुत खुजली हो रही है। यह खुजली मिटाने का तो कुछ इंतजाम कीजीए।" सुधाकर नाटकीपणे म्हणाला.
"बोल... क्या माँगता तू..." छायानेही नाटकी स्वरात विचारले.
"ए, क्या देगी तू?" सुधाकरने त्याच अंदाजात विचारले.
"ए, क्या... क्या मांगता है तू?"
"बस्स! एक पार्टी काफी है।" सुधाकर म्हणाला.
"मिल जाएगी। अब तो खुश?" छायाने हसत विचारले.
"सुधांबो, खुश हुआ। बघ आता 'यूं अस्सा गेलो आणि यूं पकड के ऐसा उठाकर ले आऊंगा।.."
"ओ महाशय, आत्ताच जायचे नाही. दुपारी चारनंतर जायचे आहे. जाताना आहेर, शिदोरी घेऊन जा. नाही तर जाशील हात हलवत. श्रीपालच्या वडिलांना कुंकू लावून अक्षता देऊन, सोबत नेलेला आहेर करून त्यांच्याकडील सर्व पाहुण्यांना मंगलकार्यालयात येण्याचे सन्मानपूर्वक आमंत्रण देऊन यायचे आहे."
"बाप रे! ते सारे निघेपर्यंत थांबायचे? अवघड आहे सारे. त्यांना आणण्यासाठी वाहनव्यवस्था आहे का की मलाच करावी लागणार आहे?" सुधाकरने विचारले.
"आपण एक कार ठरवली आहे. येईल थोड्या वेळाने. ती घेऊन जायची आणि आणायचे." पंचगिरी समाजावून सांगत असताना त्यांच्या घरावरून एक विमान गेले. तो आवाज ऐकून सुधाकरने विचारले,
"मामा, असे करूया का, श्रीपालला विमानात बसवून आणूया का?"
"बाबा सुधाकरा, तुझ्या पोरीच्या लग्नात अख्खं वऱ्हाड विमानाने आणू... लंडनहून!" छाया म्हणाली.
"व्वा! छायाताई, नंबर एक! 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ची आधुनिक आवृत्ती म्हणजे 'वऱ्हाड यायलंय लंडनहून'..." अलका म्हणाली.
"आणि ते नाटक लिहिणार आहे... छायाताई!" आकाश म्हणाला.
"मामा,लग्नाच्या जेवणानंतर आईस्क्रीम, कुल्फी, पान वगैरे ठेवलेय ना?" सुधाकरने विचारले.
"होय. ठेवलीय ना... पित्तशामक गोळी..." छाया हसत म्हणाली.
"छाया, भन्नाट आयडिया! एकदम अभिनव कल्पना! लग्नात तेलकट, तिखट, गोड, आंबट पदार्थ खाऊन प्रत्येकाचेच पित्त खवळते त्यासाठी हा 'दि बेस्ट' उपाय आहे."
"सुधाकर, कुठलाही फिजुल, अवास्तव खर्च करायचा नाही असे मी, भाऊजी आणि कुलकर्णी यांनी ठरवले आहे. त्यामुळे नो चेंज!" पंचगिरी म्हणाले.
"अहो, असे गप्पा मारत काय बसलात? जरा कामाचे बघा. आत्ता चार वाजतील. मग सुरु होईल तुमची लगीनघाई! एकदा कार्यालयात जाऊन या. त्यांनी झाडझुड, साफसफाई केलीय का ते पहा. नसली केली तर आपल्यापैकी कुणाला तरी समोर उभे करून सफाई करवून घ्या. सगळ्या खोल्यांची स्वच्छता करायला सांगा. गाद्या टाकून त्यावर धुतलेल्या, स्वच्छ चादरी टाकायला सांगा. पाण्याच्या टाक्या, कुलरमध्ये पाणी टाकले का ते पहा. पाणी आजच भरलेले आहे याची खात्री करून घ्या. नुसत्याच उंटावरून शेळ्या हाकू नका. गुरूंना बोललात का? त्यांना बरोबर सहा वाजता यायला सांगा. म्हणजे ते सातला नक्कीच येतील. दोन मजूर येणार होते. आले का ते? छाया, ती तुझी ब्युटीक्वीन येणार होती..."
"आई, ब्युटीक्वीन बोलावलीस का? मज्जाच मग."
"आक्या, भलत्यावेळी मस्करी नको. अरे, मला ब्युटीपार्लरवाली म्हणायचे होते. ती केव्हा येणार आहे ? तिला फोन करुन बोलावून घे. म्हणजे तुला नट्टापट्टा करायला वेळ मिळेल. अहो, हाराचे बघितलेत का? शेवंतीचे हार, लग्नाचे हार आणि बायकांच्या वेणीला लावायचे हार अशीच ऑर्डर दिलीय ना? हार आणायला कुणाला पाठविणार आहात? संध्याकाळसाठी दूध सांगितले का?आक्या, अरे देवा, या घोड्याची अजून आंघोळीच झाली नाही का? काय एकेक माणूस आहे या घरात? तुझे कपडे इस्त्री करून आणलेस का? वऱ्हाड कार्यालयात आल्यानंतर लावायची फटाक्याची माळ आणि लग्न लागल्यानंतर लावायची माळ आणून ठेवलीस का? घरावर लायटिंग करणार होतास त्याचे काय झाले? नुसते हे करतो नि तेही करतो असे म्हणायचे झाले. करायची वेळ आली, की बार फस्स! अहो, कुलकर्णींना आठवण करून द्या. वरात आज रात्री काढणार आहेत की, उद्या सकाळी काढणार आहेत? सकाळी काढणार असले तर लवकर काढा म्हणावे. वेळेवर लग्न लागलेच पाहिजे म्हणावे. ते केटरर्स कधी येणार आहेत? त्याला फोन केलात का? स्वयंपाक उत्कृष्ट म्हणजे उत्कृष्टच झाला पाहिजे असे खडसावून सांगा त्याला. ठरवताना सारे टेप लावल्याप्रमाणे बोलतात.... 'तुम्ही काळजीच करू नका. एकदम फर्स्टक्लास होईल. थोडे जरी कमीअधिक झाले ना तर एक रुपयाही देऊ नका.' असे तोंडदेखल म्हणतात पण नंतर मात्र गोड गोड बोलून आधीच पैसा काढून घेतात. कुठीघरासाठी कुणाची नेमणूक करायची? आपल्या घरचे आहेर कुणाला करायला लावायचे? काही ठरवलेत का? आपण स्वतः तर आहेर करू शकणार नाहीत कारण लग्न लागले, की आहेर करणारांची अक्षरशः झुंबड उडते. अहो, उठा ना. तयारीला लागा. माझ्याकडे असे काय बघत आहात?"
"विचार करत होतो, तू खरे तर नाटकात कम करायला हवे होते..." दयानंद हसत म्हणत असताना सरस्वतीही हसत म्हणाली,
"नशीब माझे, नाटकच म्हणालात, तमाशा म्हणाला नाहीत." त्यानंतर पुन्हा दयानंद हसत निशाणा साधत म्हणाले,
"आयडिया बुरी नही है।"
"जावई, यायची वेळ झालीय आणि तुम्ही नाटक, तमाशाची भाषा करता? उठा..." असे लटक्या रागाने म्हणत सरस्वती आत गेली...
हळूहळू घड्याळाचा काटा सरकत होता. सामानाची आवराआवर, बांधाबांध होत होती. बायकांचा नट्टापट्टा सुरू होता. ब्युटीपार्लरकडून आलेल्या बाईने तिचे काम संपवले. छायासोबतच तिने अलका आणि सरस्वतीचेही सौंदर्य खुलवले.
"बाबा, ब्युटीपार्लरचे बिल द्यायचे आहे."अलका म्हणाली.
"किती झाले आहेत?" दयानंदांनी विचारले.
"पाच हजार सातशे..."
"बाप रे! एवढे? अलके, अग..."
"बाबा, द्या ना हो. त्यांना अजून दुसरीकडे जायचे आहे." असे विनविणीच्या आवाजात म्हणणाऱ्या अलकाला पंचगिरींनी पैसे दिले.
"पाहिलंत भाऊजी, नटण्या-मुरडण्यासाठी एवढा खर्च?"
"दयानंद, अरे, आजकाल ही फॅशनच होऊन बसलीय हे सोपस्कार करावेच लागतात. तुला सांगतो, माझ्या एका मित्राच्या मुलीने तिच्या मैत्रिणीच्या लग्नात स्वतःचे केस रंगविणे, ते अत्याधुनिक रीतीने बसविणे यासाठी तब्बल सतरा हजार रुपये उधळले रे." दामोदर म्हणाले.
"भाऊजी, ही कामे लखोपती, करोडपतींची आहेत. आपणासारख्या मध्यमवर्गीयांची नाहीत."
" माझा मित्र आपल्यासारखाच मध्यमवर्गीय आहे. कसे आहे दयानंद, आजकाल मध्यमवर्गीय लखोपतींच्या पुढे आहेत. तुला आठवत असेल आपण या गोष्टी म्हणजे रंगविलेले चेहरे सिनेमा, नाटक आणि तमाशांमध्ये बघत असू परंतु याच गोष्टी आपल्या घरात पोहोचल्यात." दामोदर म्हणाले.
"खरे आहे, भाऊजी. कालाय तस्मै नमः! चला. सुधाकर, झाले का तुझे? हे घे, हा आहेर! श्रीपालभाऊजींच्या वडिलांना आहेर करून अक्षता द्यायच्या आणि लग्नाला या असे निमंत्रणही द्यायचे आहे. " दयानंद म्हणाले.
"ये बाबा, सरळ कुलकर्णींकडेच जा. नाही तर बसशील..."
"आई, अशावेळी कुठेही बसेलच कसा? तुझे आपल काही तरीच... तर मग छायाताई, कबुतर बनके जा रहा हूँ, घोडा बनकर ले आऊंगा, तुम्हारे सजनको! ये छाये, किती वाजता घेऊन येऊ? माझ्या पार्टीचे नक्की आहे ना?" असे म्हणत हसतच सुधाकर निघाला...
जमलेली पाहुणे मंडळी एक-एक करत सावधान मंगलकार्यालयात जाऊ लागली. कार्यालय जवळच असल्यामुळे पंचगिरी कुटुंबीयांचा बराच फायदा झाला. एक तर माणसांना ने-आण करण्याची गरज पडली नाही आणि सामानही विनासायास, कमी खर्चात पोहोचल्या गेले. त्यामुळे वेळही वाचला.बरोबर सात वाजता कुलकर्णी परिवार त्यांच्या पाहुण्यांसह, ईष्टमित्रांसह सावधान मंगलकार्यालयात पोहोचला. तीन कार, पाच जीप, चार ऑटो या वाहनांमधून सारे वऱ्हाड दाखल झाले. श्रीपाल, त्याचे बाबा, त्याचे मामा यासह काही व्यक्तींचे आकर्षक हार घालून तर इतरांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. चहापाणी झाले. अर्ध्या तासात वऱ्हाडी मंडळी जेवायला बसली. साडेआठच्या सुमारास सीमांतपूजन सुरू झाले. कुलकर्णी-पंचगिरी आणि दामोदरपंतांनी आपसात चर्चा करून केवळ पाच भेटी ठरवल्या. सारे कसे नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. दहा वाजता सीमांतपूजनाचा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला आणि व्यासपीठाचा ताबा आकाश आणि इतरांनी घेतला. दुसऱ्या दिवशीसाठी व्यासपीठ सजविण्याचे काम सुरू झाले. कार्यालयाच्या भिंतीवर पांढरा शुभ्र पडदा लावून दूरदर्शनवरील विश्वचषकाचा सामना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली.सर्वांनाच वेध लागले ते लग्नसोहळ्याचे!
"कुलकर्णीसाहेब, वरात सकाळी काढायची म्हणता..." पंचगिरींच्या बोलण्याचा रोख ओळखून कुलकर्णी म्हणाले
"दयानंदजी, मुळीच काळजी करू नका.लग्न अगदी वेळेवर लागेल. मी स्वतः काळजी घेईन..." कुलकर्णी यांच्या आश्वासनानंतर सारे आपापल्या कामाला लागले...