Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 8 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ८

विचार करता करता डोकं दुखायला लागलं. सुप्री डोक्याला हात लावून बसलेली. संजना चहा घेऊन आली.
" उरलेलं डोकं पण गेलं वाटते. " संजना सुपारीला हसून बोलली.
" बोला बोला ... गरिबांना काय पण बोलतात लोकं .. " ,
" तुला काय झालं डोकं पकडायला. " ,
" आकाश गं ... " ,
" हा ... त्याचा आलेला का कॉल ... मेसेज.. " संजनाने लगेच विचारलं.
" एकदा आलेला .. पण आवाजच येतं नव्हता त्याचा. पुन्हा केला मी, तर लागला नाही. मेसेज आलेला कि मी सुखरूप पोहोचलो. कुठे आहे ते सांगितलं नाही. मी उद्या निघायचं ठरवलं आहे. पण जाऊ कुठे " सुप्रीने अडचण सांगून टाकली एकदाची.


तश्या दोघी विचार करू लागल्या. " एक मनात आलं माझ्या म्हणजे बघ हा... " संजना बोलली.
" बोल तर ... " ,
" आपल्याला तो फोटोग्राफी चा कॅम्प कुठे आहे ते माहित आहे... तो तिथे नाही गेला तर दुसऱ्या वाटेने गेला असेल. बरोबर ना... " सुप्रीला पटलं ते.
" जरी दुसऱ्या वाटेने गेलो तरी लहान नसेल ना ती जागा... भटकायला लागेल ना... एकटी कशी जाणार हि गरीब मुलगी... काय माहित... " सुप्री स्वतःला उद्देशून बोलत होती. संजनाकडे तिरक्या नजरेने बघत बोलत होती.


संजनाला कळला सुप्रीचा उद्देश. " ब्लॅकमेल बरोबर करता येते तुला.. " तिचा गालगुच्च्या घेत संजना बोलली.
" येते मी सोबत पण घरी काय सांगायचे. ते तरी ठरले का तुझं... किती दिवस लागणार , त्याच्या तरी प्लॅन आहे का .. " संजनाच्या या सर्व प्रश्नावर सुप्रीने पुन्हा डोक्याला हात लावला.
" विचार केला नाही या सर्वाचा ... आकाश असतो ना सोबत ... तोच काय तो विचार करतो . आपलं डोकं कोण कशाला वापरतो आहे.. " सुप्रीच्या या वाक्यावर दोघी हसू लागल्या.
" बरं ... सांगू काहीतरी..... आधी सरांना काय काय सांगावे ते बघावं लागेल. तुझे झालं आहे सांगून , मला घरी कोणाला तरी आजारी पाडावे लागेल ... पण मला माझी सुट्टी मुळे कट्ट केलेली सॅलरी तुझ्याकडून पाहिजे हा... जास्त लाड नाही करणार ... " ,
" किती करते ना तू माझ्यासाठी... " सुप्रीने तिला कडकडून मिठी मारली.
" एकच पीस आहेस तू ... तोही देवाने माझ्या गळ्यात बांधला आहे. मग , सांभाळावे लागेल ना ... " तश्या दोघी पुन्हा हसू लागल्या .


============================== ============================


"तुम्ही शहरात असताना पण... तरी बरीच माहिती आहे तुम्हाला निसर्गाची.. " आकाश अजूनही त्या रखवालदारासोबत होता. त्या आमराईत दुपारपासून थेट संध्याकाळ पर्यंत दोघांच्या छान गप्पा रंगल्या होत्या.


" मी भटकत असतो ... फोटोग्राफी साठी, माझी नोकरी तीच आहे.. म्हणून माहिती मला. " आकाशचे उत्तर.


" आणि बायको, मुलं ... त्यांना सोबत घेऊन फिरता का... " आकाश हसला त्यावर.
" आणि सारखे हसत असता तुम्ही .... का ते " ,
" लग्न झालं नाही अजून, पुढल्या २ वर्षात होईल "
" असं आहे तर... पण साहेब , एका सांगा.... लग्न झालं नाही म्हणून असं मोकळं फिरायला , भटकायला मिळते... संसारात अडकलात कि पोरं-बिर ...घर ... नोकरी ... यात अडकून पडणार कि असे फिरत बसणार... "
त्याचा प्रश्न तर बरोबर होता. समोर संध्याकाळचा सूर्य... आमराईत लपत-छपत मावळत होता. सोबतीला पाहुणे म्हणून आलेले पावसाचे काळे ढग होते. पक्षी एव्हाना आपापल्या घरट्यात परतले होते. आमराईत स्वतःच्या घरात नुसता कलकलाट करत होते सर्वच. आमराई जणू जिवंत झालेली. त्या रखवालदाराने बरोबर विचारलं. सुप्री सोबत एकदा संसाराच्या बंधनात अडकलो तर जमेल का अशी भटकंती पुन्हा मला ... कदाचित नाही..


विचारात गढून गेलेला आकाश हेही विसरला , कि संध्याकाळच्या आधी तंबू उभा केला पाहिजे. मोठा प्रश्न उभा राहिला. " चला माझ्या घरी ... इथून ५ - १० मिनिटावर माझे घर आहे, आमच्या मंडळी खूप छान जेवण करतात. " आकाशचा प्रश्न सुटला. रात्री त्याकडेच जेवण करून त्याच्या घराच्या ओसरीत झोपी गेला


============================== ============================


पूजाची सकाळ आज अंमळ लवकर झाली. कसल्याश्या आवाजाने झोप मोड झालेली. तंबूच्या बाहेर आली. घड्याळात पाहिलं तर सकाळचे ७:१५ झाले होते. हवेत कमालीचा थंडपणा वाढला होता. सहजच तिचे लक्ष वर आभाळात गेले. मागून कादंबरी सुद्धा जागी झाली.


" काय गं पोरी... झोप-बीप आहे कि नाही तुला... मला पण जागे केलेस ना... " डोळे चोळत ती पूजाच्या शेजारी येऊन उभी राहिली. पूजा अंदाज बांधत होती वातावरणाचा.
" पाऊस येतो आहे ... ",
" ह्या .... एवढच ना... पहिल्यांदा पडतो आहे का... एवढी वर्ष तर बघतो आहोत आपण पाऊस... नवीन काय.. " कादंबरी अजूनही आळस देतं होती.
" हो ... दरवर्षी येतो पाऊस, पण या वर्षी ना .... काही वेगळं फील होते आहे. " ,
" का ... त्याची आठवण येते आहे का .. तुझा ' तो'...... " ,
" नाही .... म्हणजे हो ... या वेळेला ना , खूप काही वाटते आहे.... माहित नाही का... त्याच्या आठवणी दाटून आल्या आहेत... " पूजाचा गळा दाटून आला. कादंबरीने तिच्या खांद्यावर हात टाकला.
" होता है ... " कादंबरी आणखीनच बिलगली. " पूजा ... जाऊ दे ना ... पुढे काय करावे तर सांग... " पूजा भानावर आली.
" हो.. थांबावे लागेल इथेच ... पावसात नको ना प्रवास.... "


==========================================================

आकाश आभाळाकडेच बघत होता. त्याने त्याची सॅक तयार केली. रात्र त्याने त्या ओसरीत काढली होती. " काय झालं साहेब... पाऊस येतो आहे ते बघता का .. " ," होय.. " आकाशने सॅक पाठीवर लावली. " चला मी निघतो आता... कालचे जेवण छान होते ... आभारी आहे, पाऊस येण्याच्या आत निघतो पुढे... " ," किती हि जलद धावा तुम्ही... त्याला जर भेटायचे असेल ना तुम्हाला .... गाठेल कुठंही तुम्हाला ... " रखवालदाराने छान वाक्य म्हटले. आकाशला पटलं ते. निरोप घेऊन निघाला.


============================== ============================


" पाऊस "


ज्या डोंगर माथ्यावर मातीचा करडा- राखाडी रंगच आपले वर्चस्व दाखवत असतो, त्याठिकाणी हिरव्यागार रंगाची साय पसरावी.... हि जादू कोणाची. नाहीतर सात - आठ महिने आभाळाचा एकच रंग.... निळा, त्यावर कधी काळ्या गडद तर कधी इंद्रधनूच्या सात रंगाची मेजवानी घेऊन येणारा.. कोण तो... लाखमोलाची हजेरी लावत येतो तो... किंबहुना , त्या वर्षभरापासून मळलेल्या पायवाटा... नुसत्या कोरड्या ठक्क... तिथेही रानटी का होईना, रंगीबेरंगी फुलांची रास पैदा करतो ... वाटेच्या दोन्ही बाजूंना.... जमीनदार तो ... आला कि अगदी गाजत - वाजत येतो विजांसोबत.... जीवन देणारा जमीनदार ... या काळ्या जमिनीचा खरा मालक !! आला कि हात अजिबात आखडता घेतं नाही, सर्वाना समान वाटणी त्याची. आभाळ कायमचं काळभोर आणि बरसायच्या तयारीत. त्याने सांगितलं कि नुसतं बरसायचं. सोबत घेऊन येतो तो धुक्याची चादर. मग आठवण होते ती भग्न झालेल्या तट- बुरुजांची, पाय आपसूकच वळतात तिथे. तिथे पोहोचताक्षणी वाऱ्यासोबत आलेला ओल्या मातीचा गंध भोवताली फेर धरू लागतो . गड- किल्ले त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगू लागतात आणि त्यासोबत आठवण होते ती आभाळाएवढा पराक्रम करणाऱ्या आपल्या पूर्वजांची. मनात पावसाच्या गंधासोबत त्या इतिहासाची जाणीव होते आणि छाती आणखीनच फुगते. एक - दोन दिवसापूर्वीच मातीतून नुकत्याच वर आलेल्या कोंबांनाही पावसाची जाणीव होते. झाडे डोलू लागतात. पक्षी नव्याने घरकूल बांधतात आणि काळी माती सुद्धा मग आपल्याशी बोलू लागते. एका मोठ्या उत्सवाला सुरुवात होणार असते. जमीनदार येणार असतो ... खरा मालक.... पाऊस !!


पूजाने ते वाचून दाखवलं. तिच्या डायरीमध्ये लिहिलेलं होते ते. आजूबाजूला बसलेल्या तिच्या ग्रुप मधल्या सर्वांना आवडलं ते. वर पावसाने फक्त काळोख करून ठेवला होता. ५- १० मिनिटांनी वारा जोरात वाहू लागला तसे सर्व आपापल्या तंबूत जाऊन बसले.
" किती छान लिहिलं तू .......कधी दाखवलं नाही ते. " ,
" मी नाही... त्याने लिहिलं आहे ते... एकदा असच बोलले त्याला... पावसाबद्दल लिहितो का , तेव्हा त्याने हे डायरीत लिहून दिलं मला. असाच होता क्षण. पावसाची सुरुवात होणार होती तेव्हा " पूजाने त्या लिखाणावरून हात फिरवला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: