Netajinchya sahvasat - 3 books and stories free download online pdf in Marathi

नेताजींचे सहवासात - 3

नेताजींचे सहवासात

प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33

नेताजींचे सहवासात

नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग ३(अ)

मित्रांनो,
आज नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आहे. त्या निमित्ताने या पुस्तकाचा परिचय भाग 3 सादर करीत आहे.
आज तिथीनुसार स्वामी विवेकानंदांची जयंतीही साजरी होत आहे. (दिनांकानुसार दि 12 जानेवारी)

भाग 3 (अ) - नेताजी निवास

सिंगापूर बेटाच्या पुर्व किनाऱ्यावर समुद्रकाठी एकएका धनिकांचे ऐसपैस बंगले आहेत. त्या विभागास ‘कातोंग’ म्हणतात. स्थानिक लोकांच्या धनाने, श्रमाने बांधलेल्या या इमारतीत पाश्चात्यांची चैनबाजी चालत असे. अतिपुर्व युद्धाची वावटळ सुरू होऊन इंग्रजांचे राज्यछत्र उडू लागल्या बरोबर ऐषआराम करणारे युरोपियन, अमेरिकन, ज्यू, अरब, चिनी इत्यादि अठरापगड जातींचे लोक दाही दिशांना पांगले, त्यांच्या मिळकतीचे तीन तेरा वाजले. तेंव्हा त्याची मिऴकत ही शत्रूचीच मिळकत असे समजून आंतरराष्ट्रीय व्यवहारास अनुसरून जपान्यांनी ती ताब्यात घेतली. अशाच पैकी ‘मेयर’ नामक एका यःपलाय केलेल्या ज्यू कोट्याधीशाचा एक महाल आहे. सिंगापुरातील खाजगी इमारतीत पाहू जाता हाच महाल उत्तम होता. तेथील जपानी कारभाऱ्यांनी नेताजींचे सिंगापुरातील निवास म्हणून ही हवेली हिन्दी स्वातंत्र्य संघाच्या हवाली केली. या भवनच्या आवाराचे समोरील बाजूस दोन पुरुष उंचीचा एक निळसर खडबडीत कोट आहे. कोटाचे दोन्ही टोकास दोन जड लोखंडी फाटके आहेत. एका स्वातंत्र्य सैनिकाचा तेथे बळी पडला होता. दोन्ही फाटकापाशी एक एक बंदूकधारी पहारेकरी असे. पलिकडे पहाऱ्याची चौकी असून तेथे आठ सशस्त्र पहारेकरी नेहमी तयार बसलेले असत. या दोन्ही रस्त्यांच्या मधोमध बाग असून निर्गमन फाटकापाशी ही दुसरा लहानसा सेवक निवास आहे.
बंगल्याच्या मजबूत सागवानी पिंगलवर्णी प्रवेश द्वारातून आत शिरताच वरील बाजूस जाड काचेचा एक घुमट आहे. यावर अनेक रंगांची वेलबुट्टी असून त्यातून मंद प्रकाश आत येतो. दोन्ही बाजूंनी दोन वक्राकृती संगमरवरी सोपान प्रवेश दवाराच्या माथ्यावर युति पावून पुढ एकाच विस्तीर्ण निश्रेणीच्या रुपाने दुसऱ्या मजल्याच्या चरणी लीन होतात. तेथे नंगी तलवार हातात धरलेला स्वातंत्र-सैन्याचा एक पहरेकरी सतत पहाऱ्यावर उभा राही.
समुद्रकाठास समांतर अशी 5 फूट रुंदीच्या लालदगडांची लांबलचक फरसबंदी केलेली असून त्यास सीमेंटच्या नक्षीदार खांबांचा 3 फूच उंचीचा कठडा आहे. मधोमध तीन पायऱ्या केलेल्या असून त्यायोगे क्षीरसागरात बुडवून पाय शीतल करता येतात. समुद्रकाठच्या लाल फरसबंदीवर एक बंदूकधारी स्वातंत्र्य सैनिक येरझाऱ्या घालीत अफाट सागराचा व अनंत आकाशाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करी असे. न जाणो, या बाजूने कोणी राहू, केतू आमच्या चंद्र नेत्यास ग्रासण्यास यायचा!
समुद्रकाठच्या या पिछाडीच्या आवारात हिरवळीचे मैदान असून त्यात दोन टेनिस कोर्ट्स होती. एकूण सुमारे दोन वर्षाच्या अतिपुर्वेतील वास्तव्यात नेताजी, या ठिकाणी आठ-दहा वेळा टेनिस खेळले असतील नसतील. कोणत्याही मैदानी व मर्दानी खेळांविषयी नेताजींस आवड आहे. परंतु खेळाकडे लक्ष देण्यास त्यांस स्वातंत्र्यकार्यातून क्वचितच फुरसत मिळत असे. याच आवारात एका बाजूस जमिनीखाली एक वर्तुळाकार भुयार खणून त्यात लाकडी चौकट बसवून एक दोन खुर्च्या ठेवण्यात आलेल्या होत्या. लाकडी छतावर एक लघुतम टेकडी वजा मातीचा ढीग करून त्यावर हिरवेगार गवत उगविलेले होते. भूपृष्ठाच्या व लाकडी छताच्या मधेमध चोहोबाजूस चार इंची फट, हवा आणि उजेड आत येण्याकरिता ठेविलेली होती.
दुसऱ्या मजल्यावर सर्वत्र तपकिरी रंगाचे तकतकीत लाकडी तळ होते. जिन्याच्या कठड्यावर पितळी पत्रा चढवलेला असून त्याची तकाकी एकांदर थाटात भर घाली. जिन्यावरील गालिचा पितळी पट्ट्यांनी पक्का बसवण्यात आला होता. त्या ठिकाणी एक बोळ होता त्याच्या उजव्या बाजूला नेताजींचे शयन गृह व डाव्या बाजूला खलबतखाना होता. खलबतखान्यास लागून असलेल्या खोलीत नेताजी एकांतात वाचन, लेखन, अभ्यास, मनन व सरकारी काम करीत बसत. तेथूनच त्यांना चंचल निळ्या सागरचे आणि अनंत आकाशाचे आल्हाददायक दर्शन घडत असे. सृष्टी देवतेच्या निळसर अंगवस्त्राचे सिंधुजलरूपी सळसळणारे ते घोळ व वर आकाशाचा तो पदर यामुळे आपण एकाद्या मंदिराच्या शांत आणि पवित्र वातावरणात उभे असल्याचा भास होई. वादळाचे वेळी या बाजूने वारा आणि जलतुषार आत शिरू नयेत म्हणून वरचे बाजूस चिकाच्या पडद्यांच्या गुंडाळ्या टांगल्या असत. दूरवर एखाद दुसरे जहाज नांगरून ठेवलेले दिसे. नेताजी-निवासात जसे राजकारणाचे रंग बदलत असत तद्वत् नभातही कधी स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आनंद तर कधी मेघछायेची उदासीनता दृग्गोचर होई.
वरचे मजल्यावर दोहो बाजूस दोन प्रशस्त खोल्या होत्या. त्यात नेताजींचे संनिध्य असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या अधिकाऱ्यांपैकी दोघे राहात असत. खालचे बाजूस मधोमध असलेल्या लांब शोभिवंत दालनाच्या दोहो बाजूला दोन खोल्या होत्या. डावे बाजूची खोली ही भोजनगृह होते. भोजनगृहाला लागून असलेल्या दोन खोल्यापैकी लागून होती तीत कोठार होते. या कोठारगृहास शेपटीवजा एक तिरपा बोळ जोडला असून या बोळाचे शेवटी स्वयंपाकगृह जोडलेले होते. स्वयंपाक गृह दूर ठेवण्याचे कारण म्हणजे पाकनिष्पत्तीचा वास व धूर यांचे पासून लक्ष्मीपती गृहस्वामीस कपाळशूळ होऊ नये.
ह्या भोजनगृहाचे तळ लाकडी असून त्यावर मधोमघ सुंदर पातळ गालिचा पसरलेला होता. गालिच्यावर दोहो बाजूस चार चार खुर्चा ठेवलेल्या असून त्यांचे मधोमध एक मेज ठेवलेले होते. मेजाचे अरुंद बाजूस एक एक खुर्ची ठेवलेली होती. खुर्चांची आसने व पाठी गुलाबी मखमलीच्या गादीच्या होत्या. खुर्चांवरील कलाकुसर विशेष गुंतागुंतीची नसली तरी त्यांच्या धाटणीवरून त्या कोठल्यातरी राजप्रसादातील असाव्यात असे वाटे. भिंतीवरचे बाजू छताजवळ असलेल्या खांचात मंदप्रकाश प्रसृत करणाऱ्या विजेच्या लांब काचेच्या नळ्या लावलेल्या आहेत. मधोमध असलेल्या भोजन-मेजावर खुर्चीच्या समोर सुबक नक्षीदार चांदीचे काटे चमचे, सुऱ्या व सोनेरी वेलबुट्टी काढलेल्या चिनीमातीच्या लहान-मोठ्या ताटल्या ठेवलेल्या असत. प्रत्येक थाळी जवळ घडी केलेला स्वच्छ रूमाल असे. प्रवेश द्वारातून शिरताच मेजाचे अरुंद बाजूस मधोमध जी एकुलती एक खुर्ची असे ती त्यांची. तेथेच नेताजी नेहमी भोजनाला बसत.
खालच्या प्रमुख दालनाच्या व द्वार प्रकोष्ठाच्या दोहोबाजूस ज्या खोल्या आहेत त्यातही नेताजींचे संन्निध असलेले लष्करी अधिकारी रहात. नेताजींचे शयनगृह सोडले तर या इतर अवती भोवतीच्या खोल्यातून दोन अथवा तीन पलंग, मेज, आरशाची कपाटे असा तऱ्हेचा शोभिवंत संभार होता. प्रत्येक खोलीच्या आतले बाजूस पाश्चात्य पद्धतीचे एक एक स्वतंत्र स्नानगृह व शौचकूप होते. त्यातील पांढरी स्वच्छ फरशी व रुपेरी मुलामा चढवलेल्या चकाकणाऱ्या दांड्या, खुंट्या इत्यादि पाहिले म्हणजे मन प्रसन्न होई. खालील प्रमुख दालनाच्या डाव्याकोपऱ्यात एक टेलिफोन असून त्याचा तार संबंध नेताजींच्या खलबतखान्यातील टेलिफोनशी असे. समदर्जाच्या कोणी व्यक्तीस खुद्द नेताजींशी टेलिफोनचे सहाय्याने संभाषण करायचे असल्यास खालचे टेलिफोनपाशी बसलेला ग्रहस्थ वरचे टेलिफोनशी तेथे तार संबंध जोडून देत असे. वर घंटा वाजली म्हणजे नेताजीस तेथूनचे बोलणे सोईचे होई. त्यांस उगीच खाली हेलपाटा घालावा लागत नसे. असे प्रसंग पण व्क्वचित येत. कारण प्रत्यक्ष त्यांच्याशी संभाषण करणाऱ्या तोलाच्या व्यक्ती मोजक्या असत. त्या व्यक्ती म्हणजे, आझाद हिंद सरकारचे मंत्री, नाही तर जपानी राष्ट्राचे प्रतिनिधी, वकील, खास दूत, सरसेनापती वगैरे. या व्यक्ती सुद्धा दूरवर कोठेतरी काही महत्वाच्या कामात गुंतल्या असून त्यांस ताबडतोब तेथल्या तेथे एखाद्या निकडीच्या मुद्द्यावर नेताजींचे मत हवे असेत तरच त्यास तेथून टेलिफोनच्या सहाय्याने नेताजींशी बोलण्याचा प्रसंग येई. इतर कामे नेताजींच्या चिटणीसाकरवीच होत. प्रत्यक्ष मुलाखत जर ठरवायची वेळ आली तरी त्याच्या मध्यस्थीनेच. असा रीतीने नेताजीस प्रत्यक्ष टोलिफोन वर फार वेळ बोलावे न लागणे हे त्यांच्या उच्च हुद्यास, मानास, ध्येयास व कार्यास शोभेसेच होते. त्यांचे विषयी सर्वांचे मनात वसत असलेल्या अत्यादराचे ते निदर्शक होते.

***