Bhavishyvede books and stories free download online pdf in Marathi

भविष्यवेडे


◆◆ भविष्यवेडे ◆◆
'पेपर...' बाहेरुन आवाज आला आणि अजय कॉफीचा प्याला बाजूला ठेवून बाहेर धावला. पोऱ्याने टाकलेला पेपर उघडत तो आत आला. सोफ्यावर टेकल्याबरोबर त्याने भविष्याचे पान काढले. आगामी आठवड्यात नवीन वर्ष सुरु होत असल्यामुळे ज्योतिष्यकाराने संपूर्ण वर्षाचे भविष्य दिलेले होते.अजयची शोधक नजर त्याच्या राशीवर स्थिरावली. ठळक भविष्य त्याने वाचले. 'क्रांतिकारी बदल!' हा मथळा वाचून अजयला खूप आनंद झाला. त्याच आनंदात त्याने हावरेपणाने एका दमात सारे भविष्य वाचून काढले. तो आणखी आनंदला. एकंदरीत त्याचे आगामी वर्ष उत्कृष्ट, भरभराटीचे आणि आनंदमयी जाणार होते. भविष्यातील शेवटच्या काही ओळी वाचून तो थबकला. कारण वर्तवलेले ते भविष्य जणू त्याच्या वैवाहिक जीवनात आमुलाग्र बदल करणारे होते. ते भविष्य खरे ठरले तर धमाल होईल या विचाराने त्याच्या सर्वांगाला गुदगुल्या झाल्या. एक वेगळीच संवेदना त्याच्या शरीरात पसरली....अजयचा सुरुवातीला तसा भविष्यावर विश्वास नव्हता. भविष्य एक थोतांड आहे असाच त्याचा विचार होता परंतु लग्न झाले आणि तो हळूहळू भविष्याच्या विश्वात ओढल्या गेला. लग्न झाल्यानंतरचा पहिलाच रविवार त्याला आठवला.......
अजय आणि आशाच्या लग्नाला नुकतेच चार दिवस झाले होते. त्यांच्या वैवाहिक जीवनातील जोर, जोम, जोश,उत्साह सारे काही पूर्णपणे भरतीवर होते. हनिमूनसाठी थंड हवेच्या ठिकाणी पोहोचलेल्या अजयने त्या सकाळी त्याच्या खोलीत येऊन पडलेले वर्तमानपत्र उचलले. तो ते वाचत असताना आशा तिथे पोहोचली. त्याच्याजवळ असलेली रविवारची पुरवणी घेत तिने विचारले,
"आज रविवार ना?"
"तुला दिवसांचाही विसर पडला का? रविवारची आठवण का झाली?"
"रविवारच्या पुरवणीत भविष्य असते. सापडले. भविष्याचे पान सापडले. तुमची रास कोणती हो?"
"आता राशीचा काय संबंध? या चार दिवसात आपण छत्तीस वेळा एकत्र आलो असू तेव्हा आता छत्तीस गुण उतरले काय...."
"तुमचा फाजीलपणा, चावटपणा पुरे झाला हं. तुमचे भविष्य तर पाहू..."
"आता त्याचा काय फायदा? आता कसलं आलय भविष्य?"
"बघा हं. पुन्हा तुमचा वात्रटपणा सुरु झाला...."
"तुझा भविष्यावर विश्वास आहे?" अजयने विचारले.
"शंभर टक्के! तुम्हाला सांगायला हरकत नाही. आपले लग्न जमले त्यानंतरच्या रविवारच्या पुरवणीत आलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले होते."
"असे काय होते भविष्य?"
"त्यात अगदी हुबेहूब तुमच्यासारखा वर मिळेल..."
"माझ्यासारखा म्हणजे कसा बुवा?"
"म्हणजे.... म्हणजे.... शिंग असलेला, शेपूट असलेला...."
"आशेटले, बघ हं. दाखवू का तुला?"
"नको. नको .चार दिवस झाले की...सांगा ना हो, तुमची रास कोणती आहे?"
"असे कर, सर्वच राशींची भविष्य मोठ्याने वाच."
"तसे का? इतर राशींच्या भविष्याशी आपला काय संबंध?"
"ज्या राशीचे भविष्य आत्यंतिक चांगले असेल ती माझी रास."
"जा बाई. तुम्हाला चेष्टेशिवाय काही सुचतच नाही का हो?" आशाने रुसल्याप्रमाणे चेहरा करुन विचारले.
"तुला खरे सांगू का, भविष्यावर माझा मुळीच विश्वास नाही. माझा विश्वास आहे, माझ्या हुशारीवर, माझ्या हातांवर आणि मेहनतीवर. नशिबाच्या मागे आपण फिरायचे नसते तर नशिबाने आपल्याला शोधत यावे. हे वर्तमानपत्रात लिहिणारे लोक चांगलेच भविष्य देतात असे नाही. एखाद्याचे भविष्य त्यांनी वाईट लिहिले तर?"
"वाईट असले तरी जीवनाला एक दिशा देणारे असते."
"तसे काहीही नाही."
"आहे! तसेच आहे! मला कळायला लागल्यापासून मी नेहमी भविष्य वाचते. माझे सारे भविष्य अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. पास होणे, संकट येणे , आजाराचे...."
"तसे माझेही एक भविष्य खरे ठरले आहे की..."
"कोणते? सांगा ना." आशा उत्साहाने म्हणाली.
"मागील आठवड्यात मी कधी नव्हे ते माझे भविष्य वाचले. त्यात लिहिले होते की, या आठवड्यात तुमच्यावर फार मोठे संकट येणार आहे..."
"अग बाई, मग हो? काय झाले? कोणते संकट आले?"
"तुला सांगतो, अगदी तंतोतंत खरे ठरले... ते भविष्य की नाही.. याक्षणी माझ्यासमोर..."
"अज्या.....अजय..."
" तुला एक सांगतो, हे भविष्य म्हणजे हवामानखात्याच्या अंदाजाप्रमाणे असते. ढग दिसले की ढगाळ वातावरण राहील, पाऊस सुरू झाला की, पाऊस पडेल."
"विषय भलतीकडे नेऊ नका हं. तुमची रास सांगा ना, प्लीज!" आशा विनवणीच्या सुरात म्हणाली.
"माझी रास...वृषभ!"
"वृषभ... हां. सापडली. अरे, हे काय? हा...हा..." आशाला तशी एकदम हसताना पाहून अजय गोंधळून म्हणाला,
"हसायला काय झाले ग?"
"वृषभ...वृषभ.... अज्या, वृषभ म्हणजे बैल! बैलोबा! किती छान शोभतेय ना तुला?"
"आशे...आशेटले, थांब. बरे, तुझी रास सांग पाहू."
"माझी रास कन्या! कन्या म्हणजे कन्या! इतर काही नाही."
"आशे, तुला सांगतो, वर्तमानपत्राले भविष्य कसे गोलगोल असते ग. वाच, ठळक भविष्य वाच. 'संमिश्र यश', 'भरभराट', 'शुभ फल', उत्कर्ष', ' चांगले यश!' एका तरी राशीचे शीर्षक वाईट अर्थाचे आहे का?"
"अरे, वर्तमानपत्रातले भविष्य हे सर्वसामान्य असते..."
"अग, भविष्य घडवायचे असते ग..."
"हे झाले तुझे मत. परंतु आज सारेच भविष्य पाहतात.... राजकारणीसुद्धा! ".......
"बाई... बाई, काय म्हणावे बाई, तुमच्या या भविष्याच्या वेडाला? अहो, अहो, कॉफीचे चॉकलेट झाले की..." आशाच्या आवाजाने अजय भानावर आला."
"अग, आगामी वर्षाचे भविष्य आलय."
"अस्स! काय म्हणतो आमचा बैलोबा? " अजयला टेकून बसत आशाने विचारले. आशाच्या नाकाचा शेंडा हलवत अजय म्हणाला,
"बैलोबा, आता गायीची साथ सोडणार आहे म्हणे."
"म्हणजे?"आशाने चिंतायुक्त स्वरात विचारले.
"वृषभच्या लोकांना द्विभार्या योग आहे म्हणे. वाच तू...." असे म्हणत अजयने वर्तमानपत्र आशाकडे दिले. त्यातले भविष्य अधाशी नजरेने वाचत असताना आशाचा चेहरा खर्रकन उतरला.
"का ग काय झाले ग? हे माझे भविष्य खरे ठरले तर काय धमाल येईल नाही का?" अजयने खिजवण्याच्या स्वरात विचारले. तशी आशा उदास स्वरात परंतु तसे न दाखविता ती म्हणाली,
"मला कुठे काय झाले? आणि महाराज, वृषभ राशीचे काही तुम्ही एकमेव नाही आहात म्हटलं. आणि बैलोबा, तुम्ही सरकारी नोकरही आहात."
"सरकारी नोकराचा आणि भविष्याचा संबंध काय? त्यांना काय भविष्य नसते?"
"त्या सरकारी नोकराच्या कुटुंबाचे भविष्य अंधःकारमय होऊ नये म्हणून द्विभार्या प्रतिबंधात्मक कायदा अस्तित्वात आहे बरे."
"अग, तू म्हणतेस तसा कायदा करताना पहिल्या कुटुंबाचाही विचार झाला असेलच की. पहिल्या कुटुंबाला घटस्फोट...."
"का ss य ? अज्या, तू मला ... तुमच्या ओशोला घटस्फोट देणार? न...न..नाही. अजय, असे करु नका हो. मला असे वाऱ्यावर सोडू नका. अजय, मी तुमचा असा कोणता अपराध केला हो? .." म्हणत आशा चक्क रडायला लागली.
"आशा...आशा..."
"नाही. नाही. मला हात लावू नका. अजय, हे तुम्ही काय आरंभले आहे? माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे हो? नको ना, प्लीज! तुमच्याशी कधीही भांडणार नाही हो. अजय, असा अंत नका पाहू हो. तुम्ही तसे केले आणि या घरात दुसरी कोणी आणली ना तर मी जीव देईन बरे. प्लीज, कृपा करा. जन्मभर तुमचे पाय धुऊन पाणी पिईल पण असा भलताच विचार करू नका हो."
"हे बघ, आशा, असा काहीतरी भलताच ...."
"भलताच नाही हो. ठीक आहे. हवे तर तुम्ही दुसरे लग्न करा, मी सवतीच्या हाताखाली सारा जन्म काढेन पण..पण..मला घटस्फोट देऊ नका हो. मी तुम्हाला सोडून नाही राहू शकणार हो, नाही राहू शकणार. तुम्ही खरेच दुसरे लग्न करा, मी तोंडातून ब्र काढणार नाही. मी कोर्टातही जाणार नाही. वाटेल तर तुमच्या लग्नाला मी लेखी परवानगी देते...."
"आशा, अग, शेवटी हे भविष्य आहे. सारीच भविष्य काही खरी होत नसतात."
"होतात हो, होतात. मला स्वतःला अनुभव आहे. तुमच्यासारखा सालस, बलवान नवरा मिळेल हे माझे भविष्य शत-प्रतिशत खरे ठरले हो. काहीही करा पण मला हाकलून लावू नका हो."
"ते जाऊ दे. आता ही कॉफी आत ने आणि चांगली फक्कड कॉफी करुन आण बरे."
"आणते. आत्ता आणते..." असे म्हणत डोळे आणि नाक पुसत आशा स्वयंपाक घरात निघून गेली. आशाच्या तशा वागण्यावर हसावं की रडावं हे अजयला समजले नाही. तो फक्त आशा गेली त्या दिशेने पाहात राहिला......
त्यारात्री अजयने आशाला जवळ घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा ती म्हणाली,
"नको. तुमची येणारी बायको सुंदर असणार, माझ्यापेक्षा वयाने लहान असणार. तुमचे सारे लक्ष, सारे प्रेम तिच्यावरच असणार...म्हणजे मला...मला ....नको. त्यापेक्षा आतापासूनच दूर राहायची सवय केलेली बरी म्हणजे मग जड जाणार नाही."
"आशे, हा काय मुर्खपणा? उगीच भलताच गैरसमज करून स्वतःसह मलाही दुःखात ढकलू नकोस.जे कदापिही होणार नाही..."
"नाही हो. ते होणारच. तुमचे भविष्य खरे ठरणार, एकच उपकार करा, मला हाकलून देऊ नका. तुमच्या सान्निध्यात राहू द्या. तुमच्याकडे पाहात मी राहिलेले जीवन जगायचा प्रयत्न करेल...." असे म्हणून आशा चेहरा वळवून झोपली. नाइलाजाने अजयलाही झोपेची आराधना करावी लागली. त्याच रात्री नव्हे तर नंतरही आशाने अजयला जवळ येऊ दिले नाही. तो समजवण्याचा प्रयत्न करीत असतानाच ती त्याच्यापासून दूर जायची. पती-पत्नी एकाच खोलीत राहायचे, झोपायचे परंतु एकमेकांशी संबंध नसल्याप्रमाणे. दोघांमधील संबंध दुरावल्यामुळे साहजिकच दोघांमधले बोलणे, हसणे, रुसवे, फुगणे, वादविवाद, टिंगलटवाळी हे सारे बंद झाले.....
लग्नापूर्वी आणि लग्नानंतर भविष्य थोतांड आहे असे म्हणणारा अजय आशाच्या सहवासात स्वतःच्या नकळत भविष्याच्या छायेत गेला. हळूहळू त्याचाही भविष्यावर विश्वास बसला. तो भविष्याच्या एवढा आहारी गेला की, वर्तमानपत्र येताच त्यातील दैनिक भविष्य पाहण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ होऊ लागली, प्रसंगी वादही होऊ लागले. वर्तमानपत्रात येणाऱ्या भविष्याचा उपयोग अजय स्वतःच्या फायद्यासाठी करु लागला. वर्तमानपत्रात 'नवीन वस्तूंची खरेदी नको. नवीन कार्याचा शुभारंभ नको' असे छापून आलय म्हणून तो नवीन वस्तूंची खरेदी काही दिवसांसाठी टाळू लागला. एकदा त्याची मेहुणी पुण्याहून येणार होती. ती त्यांच्याकडे तीन-चार तासच थांबणार होती. दुपारी आल्याबरोबर तिने तसे ठामपणे सांगून टाकले. दुपारचे जेवण झाल्यानंतर आशाने अजयला आत बोलावले आणि म्हणाली,
"अहो, निशा आपल्याकडे खूप दिवसांनी आली आहे, तिला साडी घ्यावी म्हणतेय...." आशा बोलत असताना अजयच्या डोक्यात एक विचार शिरला,
'ही बहिणीला साडी घेणार म्हणजे हजार रुपयांची तर नक्कीच घेणार शिवाय निशाच्या पोराला ड्रेस वगैरे सारे मिळून पंधराशे रुपयाला टोपी बसणार....' त्याला तसे शांत पाहून आशा म्हणाली,
"काय झाले? का बोलत ? माझ्या बहिणीला साडी घ्यायची म्हटलं की तुमच्या कपाळावर आठ्या.."
"तसे नाही ग. साडी घ्यायला माझी ना नाही परंतु मी आजच्या भविष्याचा विचार करतोय..."
"क...क...काय आहे आजचे भविष्य? कामाच्या गडबडीत माझे वाचणेही झाले नाही हो..."
"मला वाटलेच तू भविष्य वाचले नसणार म्हणून! अग, आजच्या भविष्यात लिहलय की, आज कोणतीही खरेदी करू नका. स्वतःसाठी किंवा नातलगासाठी साधा बिस्कीटचा पुडाही घेऊ नका. बघ बुवा, निशा खूप दिवसांनी आली आहे. आता पुन्हा केव्हा येईल काही सांगता येत नाही. तेव्हा तिला एखादी चांगली साडी...."
"नको. नको. खरेदीचे नाव नको."
"बघ हं. असे कर, तिला दोनशे आणि बाळाला पन्नास रुपये दे."
"तसेच करते. पण दोनशेच का? तिला चारशे आणि बाळाला दोनशे रुपये देते."
"बरे. दोघांमध्ये पाचशे रुपये दे...."असे म्हणून पडत्या फळाची आज्ञा याप्रमाणे अजयने आशाजवळ पाचशे रुपये दिले. किमान आपले पाचशे रुपये वाचले या आनंदात तो बैठकीत आला. तेव्हा आशा निशाला म्हणत होती,
"निशे, खरे तर तुला चांगली साडी घेणार होते..."
"अग ताई, कशाला खर्च करतेस..."
"खर्चाचे जाऊ दे ग. परंतु आजचा दिवस खरेदीसाठी चांगला नाही. असे भविष्य..."
"ताई, तुझे भविष्याचे वेड अजूनही गेले नाही तर." निशा म्हणाली.
"ते जाऊ दे ग. हे पाचशे रुपये ठेव. पुण्यात गेल्यानंतर चांगली साडी घे."
"चांगली साडी पाचशात? बघते बाई, भविष्याच्या उदरात कोणती साडी आहे ते?" निशा म्हणत असताना सारेच हसू लागले.
निशाला बसमध्ये बसवून आशा-अजय परतले. सोफ्यावर टेकताच आशाने वर्तमानपत्र उचलताच अजयने कपाळावर हात मारून घेतला. भविष्याचे पान लपवून ठेवायला तो विसरला होता. वर्तमानपत्रात आलेले भविष्य आशाने वाचले आणि दुसऱ्याच क्षणी सुरु झाला अजयवर शाब्दिक जोरदार हल्ला.......
अजय-आशामध्ये दुरावा निर्माण होऊन महिना झाला परंतु एकदाही तिने त्याला जवळ येऊ दिले नाही. आशा त्या भविष्यामुळे परेशान होती तर अजय तिच्या वागण्यामुळे दुःखी होता. अजय दुसरे लग्न करणार आणि 'ते' भविष्य खरे होणार यावर आशा ठाम होती. नव्हे तिने तसा तपास करायला सुरुवात केली. प्रथम तिच्या दृष्टीस पडली ती अजयची सेक्रेटरी! आशाच्या मनात विचार यायचा की, कार्यालयीन मध्यंतरात सारे कर्मचारी जेवायला गेले असणार, अशा वेळी कार्यालयात अजय आणि त्याची सेक्रेटरी दोघेच असणार. तशा एकांतात त्या दोघांमध्ये 'ते' सबंधं निश्चितच येत असणार या शंकेने तिने अनेक वेळा कार्यालयात फोन केला. पलिकडून अजयचा आवाज येताच आशा स्वतःचा आवाज बदलून म्हणे,"हॅलो, मिस कल्पनाला बोलावता का?"
"सॉरी! ती लंचला गेली आहे. अर्ध्या तासात येईल. एनी मेसेज?"
"नो. थँक्स!"असे म्हणून आशा फोन ठेवून देत असे.
अजयला नेहमीच दोन-तीन दिवस दौऱ्यावर जावे लागे. तो नक्कीच सेक्रेटरीला सोबत घेऊन गेला असणार या विचाराने तिने एकदा त्याच्या ऑफिसात फोन लावला.
"हॅलो, अजयसाहेब, आहेत का?"
"नाहीत. ते दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांनंतर भेटतील?"
"आपण कोण बोलता?"
"मी त्यांची सेक्रेटरी मिस कल्पना!"
"ओके."
त्यादिवशी प्रकृती ठीक नसल्यामुळे अजय घरीच होता. साडेदहा- अकराची वेळ असेल. तो वर्तमानपत्र वाचत असताना आवाज आला, 'पोस्टमॅन'. ते ऐकून अजय बाहेर आला. पोस्टमॅनकडून आलेले रजिस्टर्ड पत्र घेतले. पत्र पाठवणाराचे नाव पाहून तो मनात म्हणाला,'भविष्याच्या उदरात काय दडलय ते पाहू या.' घरात येऊन सोफ्यावर बसून त्याने लिफाफा फोडला. काही क्षणातच त्याने ते पत्र वाचले आणि त्याला कमालीचा आनंद झाला. त्याने आशाला आवाज दिला. ती बाहेर येताच तिच्या हातात पत्र देत तिला म्हणाला, "वाच." पत्रात लिहिले होते,
श्री अजय आणि सौ. आशा,
उभयतांना अनेक शुभाशीर्वाद. पत्र पाठवयाचे कारण म्हणजे तुम्ही पाठवलेल्या दोघांच्याही पत्रिका पाहिल्या. प्रथम तुम्हा दोघांचेही अभिनंदन! आजच्या विज्ञानयुगात कुणी भविष्यशास्त्राकडे विशेष गांभीर्याने पाहात नाही. भविष्य सारेच वाचतात आणि तत्क्षणी विसरूनही जातात. अशा काळात आपण उभयता भविष्य वाचता, त्यावर गाढ विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागता हे वाचून खूप आनंद झाला.आम्ही वर्तमानपत्र, मासिकात जे भविष्य लिहितो ते त्या त्या राशीच्या सर्व लोकांसाठी असते. वृषभ राशीचे लाखो माणसे असतील त्यामुळे वृषभ राशीसाठी जे लिहिले आहे, ते सर्वांनाच लागू पडेलच असे नाही. तो एक अंदाज असतो. अनेकांना त्याचा लाभही होतो तसाच तोटाही!
एक स्पष्टीकरण असे आहे की, जे भविष्य वाचून तुमच्या संसारात जो गोंधळ उडालाय ना त्यात थोडासा मुद्रण दोषही आहे. त्या भविष्यात 'द्विभार्या' योग असे जे छापल्या गेलेय ते तसे नसून आगामी वर्षी 'संततीयोग' असे आहे. मुद्रणदोषामुळे तुमच्या सुखी संसाराला जे ग्रहण लागले त्यासाठी मी आणि प्रकाशक क्षमाप्रार्थी आहोत.
तुम्ही पाठवलेल्या जन्मपत्रिकांचा सखोल अभ्यास करून मी हे ठामपणे सांगतो की, तुमच्या संसारात कुण्याही तशा तिसऱ्या व्यक्तीचे आगमन मुळीच होणार नाही. अजय-आशाचा संसार अनेक तप चालणार आहे. उभयतांचा भरपूर उत्कर्ष होणार आहे. अनेक मानसन्मान लाभणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे वर्तमानपत्रातील मुद्रणदोषामुळे तुम्ही न वाचलेला 'संततीयोग' आगामी वर्षी तुम्हाला लाभणार आहे. या वर्षाच्याशेवटी जन्माला येणारा तुमचा मुलगा सुदृढ, बलवान, कीर्तीवान असणार आहे. तथास्तू !'
पत्र वाचून होताच डबडबलेल्या डोळ्यांंनी आशा म्हणाली, "अजय, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला मनस्ताप तर झालाच परंतु तुमचे हक्काचे सुखही तुम्हाला मिळाले नाही. मला क्षमा करा."
नागेश सू. शेवाळकर
थेरगाव, पुणे
९४२३१३९०७१