Ek hota raja - 7 books and stories free download online pdf in Marathi

एक होता राजा…. (भाग ७)

लग्नाचा दिवस, खूप मोठा सोहळा… केवढा मोठ्ठा हॉल… सगळी मोठी माणसं, पुरुष मंडळी सुटा-बुटात तर बायका-मुली… भरजरी साड्या आणि महागातले ड्रेसेस मध्ये, श्रीमंती तर डोळे दिपवणारी. निलम त्या लग्नाच्या साडीत, दागिन्यात राणी दिसत होती अगदी. तिचा होणारा नवरा, स्वप्निल… त्याने सुद्धा राजा सारखा पेहराव केला होता. भव्य-दिव्य लग्न अगदी… अर्थात त्या दोघांच्या परिस्तिथीला साजेशा असा. या सर्व लवाजम्यात, मंगेश एका कोपऱ्यात उभा राहून ते सर्व पाहत होता. त्याला माहित होतं, कि हा सोहळा मोठा असणार, मोठी नावाजलेली माणसं येणार म्हणून त्याने एक सूट भाड्याने घेतला होता, एका दिवसासाठी. तरीसुद्धा त्याला अवघडलेलं वाटतं होतं. सरतेशेवटी, गिफ्ट्स आणि फोटोशेसन ची वेळ आली. सगळे एका मागोमग एक असे, त्या जोडीला स्टेजवर जाऊन गिफ्ट देत होते, फोटो काढत होते. मंगेश गेला स्टेजवर… निलमला किती आनंद झाला. " अभिनंदन निलम… " मंगेशने दोघांचे आभिनंदन केलं." राजा…. राजा नाही आला. " निलमचा प्रश्न… नकारार्थी मान हलवली मंगेशने… "थांबा सर… एक फोटो… " फोटोग्राफरने मंगेशला थांबवलं. हातानेच 'नको' अशी खूण केली आणि मंगेश स्टेजवरून खाली उतरला. तसाच बाहेर निघाला. जाता जाता वळून बघितलं एकदा… सोहळा खूप छान आहे… राजा-राणीचा जोडा… तसाच पेहराव आहे अगदी दोघांचा. निलम एखादी राणीचं दिसते आहे आज… फक्त तिचा राजा वेगळा आहे… मंगेशच्या मनात विचार चमकून गेला…. आणि घरी निघाला तो.


निलम लग्न झाल्यानंतर एका आठवड्याने दुबईला गेली राहायला. आठवड्यात तिची सगळी कामं पूर्ण करून घेतली तिने. स्वतःची बदली करून घेतली तिथे. इकडच्या सामानाची आवराआवर करून घेतली. तिच्या मित्र-मैत्रीणीना, नातेवाईक… सगळ्यांना भेटून आली. आणि बरंच काही… एक-दोनदा , मंगेश,राजेश आणि त्याची आई… यांना भेटायचा विचार तिच्या मनात आला होता, पण गेली नाही.दररोज राजेशला एक call करावा असं वाटे, पण तेही जमलं नाही तिला. शेवटी त्याचा विचार करत करत निलम दुबईला गेली कायमची… आणि आपला राजा.… तो राहिला इथेच, त्याच्या आईसोबत, सोबतीला मंगेश होताच… राजा-राणीची कहाणी अपूर्ण राहिली.
---------------X------------------------X-------------------------X----------------------X------------------


त्या दिवशी, खूप पाऊस होता… मुसळधार अगदी. समोरचं काय दिसेल तर शप्पथ… निलम कशीबशी गाडी चालवत होती…. शिवाय, या रस्त्यांची तिला सवय राहिली नव्हती आता. airport वरून थेट ती घरी निघाली होती. तब्बल १५ वर्षांनी निलम पुन्हा भारतात येत होती,ऑफिसच्या कामानिमित्त. पहिली, २ दिवस दिल्लीला होती. त्यानंतर मुंबईला येत होती. इतक्या वर्षांनी तिला रस्ते कसे लक्षात असणार ना… १५ वर्षात खूप बदल होते मुंबईत. रस्ते, नवीन इमारती… खूप बदललेलं होतं, त्यात पावसाचे दिवस. त्यामुळे अजून त्रास होतं होता निलमला गाडी चालवताना. निलमचे मम्मी-पप्पा तिथेच राहत होते अजून. त्याच सोसायटी मध्ये. निलमचे काम होते मुंबईला आणि मम्मी-पप्पांना भेटण्यासाठी मुंबईला आली होती.


"काय वैताग आहे या पावसाचा… " निलम घरात येत म्हणाली. "ये… ये…" तिच्या पप्पांनी तिचं स्वागत केलं. "आणि काय झालं एवढं… पाऊसच तर आहे ना… " पप्पा हसत म्हणाले. " अहो… तिथे कुठे असतो पाऊस… म्हणून तिला त्रास झाला असेल… " निलमची मम्मी म्हणाली. " ते जाऊ दे… तू कशी आहेस… किती वर्षांनी बघते आहे तुला… " घट्ट मिठी मारली आईने तिला. निलमला बरं वाटलं…
" काय चाललंय माय-लेकीच…. मी सुद्धा आहे इथे… शिवाय ४ वर्षापूर्वी तर गेलेलो ना तिला भेटायला.… मग तेव्हा तर भेटली होतीस ना… ","तरी पण… ","ok बाबा… भेटा तुम्ही… पण तिला पहिलं फ्रेश तर होऊ दे… ","हा मम्मी… पहिली फ्रेश होते… खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्यासोबत…. " निलम आत गेली फ्रेश होण्यासाठी…. आणि तिची आई, तिच्या आवडीचं जेवण बनवायला किचनमध्ये गेली. थोड्यावेळाने त्यांच्या गप्पा रंगल्या, जेवणाच्या टेबलावर… मस्तपैकी जेवण झालं. झोपायची वेळ झाली. निलमला झोप येत नव्हती. ती जागीच होती. बाहेर पाऊस सुरु होता. शेवटी बाल्कनीत येऊन उभी राहिली. मम्मी शेजारी कधी येऊन उभी राहिली ते कळलचं नाही.
"काय निलम…. झोप येत नाही का…. ",
"हम्म… तशी झोप कमीच झाली आहे माझी… तिथे असताना सुद्धा उशिराच झोपते मी.… कामच चालू असते ना…. ",
"कशाला एवढं काम करायचं आणि कोणासाठी…. " निलम फक्त पावसाकडे पाहत होती.
" किती वर्षांनी बघते आहे पाऊस मी… १५ वर्ष झाली ना… " ,
"हो… तिथे गेल्यापासून असा पाऊस कधी बघितलाच नसशील ना… आता आलीस तेव्हा किती वैतागून पावसाबद्दल बोलत होतीस…. तेव्हा लग्नाआधी…. किती भिजायचीस पावसात…. ",
"नको मम्मी…. पुन्हा त्या आठवणी नको…. झोपते मी आता… तू पण जाऊन झोप आता… " निलम झटपट तिच्या बेडरूम मध्ये गेली झोपायला.


पण झोप तर आली पाहिजे ना… तशीच तळमळत होती बेडवर निलम. शेवटी उठली पुन्हा आणि खिडकीजवळ आली. पाऊस तसाच कोसळत होता. इतक्या वर्षांनी बघत होती ना ती पाऊस.…. नकळत भूतकाळात गेली ती. काय वेड्यासारखी भिजायची ना पावसात… या सोसायटीमध्ये तर फार कमी भिजली असेन,राजाच्या चाळीत तर मुद्दाम भिजायला जायची… राजाची आई, मस्त भजी बनवायच्या… त्याची चव अजून रेंगाळते जीभेवर… कधी पावसात गरमा-गरम चहा व्हायचा त्या टपरीवर, निदान २ कप तरी… किती छान ना…. पावसात भिजत भिजत चहा पीत बसायचो… आम्ही तिघेच…मी,मंगेश आणि राजेश…अचानक निलमच्या डोक्यात राजेशचा विचार आला.… राजा… कसा असेल ना तो… त्या टपरीवरची भेट शेवटची… मंगेश लग्नाला तरी आलेला, राजेशला तर त्या दिवसापासून पाहिलंचं नाही मी… किती मनात होतं त्याच्याशी बोलावं एकदातरी…हिंमत झाली नाही कधी… सांगायचं होतं मनातलं, ते सुद्धा राहून गेलं… गालावर काही पडलं तिच्या, गालावून हात फिरवला तिने… पाण्याचा थेंब… पावसाचं पाणी होतं का ते… नाही… तिच्या डोळ्यातूनच येत होतं पाणी… तेही कळलं नाही तिला… तशीच उभी राहिली पावसाकडे पाहत… आज काही झोप येणार नव्हती तिला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: