Ek hota raja - 5 books and stories free download online pdf in Marathi

एक होता राजा…. (भाग ५)

संध्याकाळी मंगेश, राजेशला जबरदस्ती घेऊन गेला. राजेशला लवकर निघायचे नव्हते. ८ वाजता बरोबर पोहोचले दोघे त्या टपरीवर.… तिघे अगदी कॉलेजमध्ये असल्या पासून या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबत आणि टाईमपास करत. चाळीपासून जवळच होती टपरी. निलम तर आधीच आलेली.
" काय रे राजा… कालपासून call करते आहे तुला, एकदाही उचलला नाहीस…. " राजेश गप्पच. निलम मंगेशकडे पाहू लागली. मंगेशला समजलं ते. त्यानेच विषय सुरु केला.
" निलम, मला काहीतरी बोलायचे आहे.",
"हं… बोलं.",
"मला माहित नाही, हि योग्य वेळ आहे का नाही बोलायची… ",
"हा… काही असेल ते आत्ताचं बोलून घे हा…. कारण लग्न झाल्यावर मी भेटणार नाही." निलम हसत म्हणाली.
"म्हणजे… " मंगेश बोलला.
"अरे, लग्नानंतर direct… दुबई.",
"म्हणजे… तिकडेच राहणार का तू ? ",
"हो.",
"आणि जॉब ? ",
"आमची branch आहे ना तिकडे, दुबईला… मग तिकडेच जॉब करणार. Transfer करून घेणार मी." मंगेश… राजेशकडे पाहू लागला. राजेश शांतच होता.
"अरे पण या राजाला काय झालं आहे… बोलत का नाही." ,
"तेच सांगायचे होते.",
"मंगेश प्लीज…नको." राजेश खूप वेळाने बोलला.
"गप्प बसं राजा… बोलू दे… निलम." मंगेश निलमकडे पाहत बोलला."तुला वाटत नाही. तुझा निर्णय चुकला आहे ते.… जोडीदार निवडण्याचा.",
"what do you mean… ",
"तुला खरंच… त्याच्याशी लग्न करावेसे वाटते कि… घरच्यांसाठी लग्न करते आहेस… ?",
"मला अजूनही कळत नाही… तूला काय सांगायचे आहे ते.… ",
"एवढीही बनाव करू नकोस निलम, जसं काही तुला कळतच नाही… मी राजेशबद्दल बोलतो आहे." तेव्हा निलमच्या चेहऱ्याचे expression बदलले. "त्याचं प्रेम होतं तुझ्यावर, ते माहित होतं ना तुला… तरी तू… ",
" अरे… पण… घरी कसं सांगू मी हे… आणि आता काही होऊ शकत नाही. " निलम बोलली. मंगेशकडे बोलण्यासारखे काहीचं नव्हतं. सगळेच शांत झाले. निलम राजेशकडे पाहत होती.
" राजेश… अरे पण आपण मित्र तर राहू शकतो ना… बोल ना काहीतरी.… बोलत का नाहीस माझ्याबरोबर. ",
"तुझ्यापासून दूर रहायची सवय व्हावी म्हणून… " राजेश शांतपणे बोलला." मला वाटते आपण पुन्हा नको भेटायला. call पण नको करूस. तुला आणि तुझ्या घरी चालायचे ते… तुझ्या जोडीदाराला आपली Friendship कळणार नाही, may be… ",
"म्हणजे Friendship पण नको का तुला. " निलम रागात बोलली.
"तसं नाही… पण सवय झाली आहे तुझी… जरा वेळ लागेल ना, लग्नानंतर अश्या भेटी होणार नाहीत पुन्हा. म्हणून बोललो…. चल Bye… निघतो मी, आई वाट बघत असेल. " म्हणत राजेश निघाला. निलम गाडीत जाऊन बसली. मंगेश सुद्धा निघाला. निलमने मंगेश समोर गाडी थांबवली आणि बोलली.
"मी घेतलेले कोणतेच निर्णय चुकलेले नाहीत… हा निर्णयसुद्धा…" गाडी start केली… गेली निघून.

साखरपुड्याचा दिवस आला. रविवारचं होता. त्यामुळे ऑफिसचे कारण नव्हतेच. आईने सांगितलं म्हणून राजेश तयार झाला. मंगेश होता सोबतच. गिरगावला साखरपुडा होता… साखरपुडा काय, लग्नच होतं ते जणू काही… एवढा खर्च केला होता. श्रीमंती दिसूनच येत होती त्यांची. मंगेशचे डोळे दिपून गेले. निलम तर किती छान दिसत होती आज. गुलाबी रंगाची साडी… त्यावर गळ्यात, हातात दागिने. उजळून दिसत होती अगदी. त्यांची जोडी तर द्रुष्ट काढण्यासारखी होती. राजेश त्यांच्याकडेच पाहत होता कधीचा. मोठे मोठे पाहुणे आलेले समारंभाला. त्यात हेच दोघे साधे वाटत होते. म्हणून सगळ्यात शेवटच्या रांगेत बसले होते. हळूहळू एक-एक जण त्या जोडप्याचे अभिनंदन करत होते. राजेशला तिथे पुढे जायची इच्छ्या नव्हती.… मंगेशला हिंमत होत नव्हती पुढे जाऊन तिचे अभिनंदन करण्याची. थोडावेळ दोघे बसले आणि मागच्या मागे निघून गेले. छान सोहळा झाला. रात्रसुद्धा झाली होती. रात्रीचे १० वाजलेले. तिथून गिरगाव चौपाटी जवळच होती.
" चल… जरा बसू चौपाटीवर… " राजेश मंगेशला बोलला.
" अबे… वाजले बघ किती… पुन्हा घरी जायला उशीर होणार… आणि आता चौपाटीवर कोणी नसेल.",
"तू जा… मी जातो चौपाटीवर…" राजेश निघाला. मंगेश मागोमाग.…. बसले थोडावेळ… मंगेशने इतरत्र नजर फिरवली.कोणी कोणीच नव्हतं. राजेश समुद्राकडे पाहत होता. मंगेशला बोलायचे होते राजेश बरोबर.
" राजा… मला बोलायचे होते.… तुझ्याशी.",
"हं… बोल.",
"तू का सांगितलं नाहीस तिला कधी मनातलं… " राजेश हसला फक्त.
"बोल ना हसतोस काय ?",
"काही नाही रे… असंच हसायला आलं… " राजेश, मंगेशकडे न पाहताच म्हणाला.


" हा जानेवारी महिना आहे ना… मार्चमध्ये लग्न आहे बोलली ना ती. ",
"हो… मग.",
"नाही रे… असचं… आणि लगेचच दुबईला जाणार ना निलम.…. हम्म, यावर्षी रंगपंचमीला नसेल ना ती… ",
"काय बोलतो आहेस तू… " मंगेश राजेशकडे पाहत म्हणाला.
" दरवर्षी असेत ना ती… चाळीत येऊन रंगपंचमी खेळायची.… पुन्हा गुढीपाडवा, त्यादिवशी आपण जायचो त्यांच्याकडे… गुढीला पाया पडण्यासाठी…. नंतर १ मे, मुद्दाम कूठेतरी फिरायला जायचो आपण…तेव्हा पण नसेल ती,… जून,जुलै मध्ये येणाऱ्या पावसात नसेल ती, मग… गोविंदाला "हंडया" बघायचा हट्ट करायला नसेल ती… यावर्षी गणपतीमध्ये चाळीतल्या सार्वजनिक आरतीला नसेल ती… मला गरब्याला सुद्धा कोणीतरी नवीन जोडीदार बघावा लागेल ना… ती तर नसेलच यावर्षी कोणत्याच सणांमध्ये…. " आणि राजेश हसायला लागला. थंडीचे दिवस होते. त्यात समुद्रकिनारा… थंड, बोचरा वारा… राजेशचे ते बोलणे ऐकून मंगेशच्या अंगावर शहारा उठला… कसं सहज बोलून गेला तो.

"राजेश…. तू तिला आधीच का सांगितलं नाहीस हे… ",
"कसं सांगू मंगेश तिला… सांग मला, कसं सांगू… , बघितलंसं न आता… किती खर्च केला त्यांनी साखरपुड्याला, त्यात मी कूठे बसतो सांग… ती manager आहे आणि मी साधा चाकरमानी… तिचं सगळं काम मोठ्या माणसाबरोबर असते… त्या लोकांना काय सांगणार होती ती, माझा नवरा साधा जॉब करतो… कसं जमणार होतं आमचं.… निलमचं घर बघितलंस ना, लग्न करून तिला का चाळीत आणलं असतं का मी… साधा TV नाही माझ्याकडे… तिच्या नवऱ्याचा पगार माहित आहे तुला, १.५ लाख… माझा किती, १५,०००… फरक, १.३५ लाख… निलमने गेल्या महिन्यात ६००० ची फक्त shopping केली.… आपल्या खोलीचे भाडे ८०००… त्यात घरातलं राशन, वस्तूसाठी पैसे, आपल्या प्रवासाचा खर्च… त्या अनाथ मुलांसाठी करतो तो खर्च… एवढं सगळं करून १५,००० मधले उरतात ते फक्त ३००० रुपये हातात. त्यातून बँकेत टाकतो पैसे… कस सांभाळणार होतो निलमला मी आणि बोलतोस तिला आधी का विचारलं नाहीस ते… कसं सांगू रे… इकडे ऑफिस मधून सुटलो कि पहिला विचार येतो… बस वेळेवर मिळेल का, वेळेवर भेटली तर नेहमीची ट्रेन मिळेल… ती चुकली कि पाऊण तास थांबा… मग घरी पोहोचायला उशीर, आई तशीच राहते मग न जेवता… निलमला तिच्या गेल्या वाढदिवसाला वडिलांनी कार गिफ्ट दिली… शिवाय कंपनीची कार आहेच… मला जमणार होतं का ते…" राजेश थांबला बोलायचा. मंगेशला भरून आलं होतं. दोघेही समुद्राच्या येणाऱ्या - जाणाऱ्या लाटांकडे बघत होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश:

Share

NEW REALESED