Mehendichya Panaver - 3 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | मेहंदीच्या पानावर (भाग-३)

मेहंदीच्या पानावर (भाग-३)

१५ फेब्रुवारी

रात्रभर अखंड वाहीलेल्या आश्रुंनी भिजलेली उशी सकाळी गार पडली होती. सकाळी अंथरूणातुन उठायचाच कंटाळा आला होता.. उशी उराशी कवटाळुन खुप वेळ लोळत पडले. पण शेवटी मी थांबल्याने क्षण थोडे नं थांबणार होते? पटापट आवरुन खाली आले. पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या MH-01 नंबराच्या आलीशान गाडीने माझे लक्ष वेधुन घेतले. महाराष्ट्राची गाडी? इकडे?? उत्सुकतेने रजिस्टर चाळला आणि आश्चर्याचा धक्काच जणु बसायचा बाकी होता. ‘राज’ च्या नावावर दोन रुम्स बुक्ड पाहुन मी थक्कच झाले. शेरसिंगला विचारले तसे त्याने बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या एका इसमाकडे बोट दाखवले. मी थोडी धावतचं.. थोडी भरभर चालत बाहेर पोहोचले आणि राजला तिथे बघुन अक्षरशः थिजुन गेले.

आयुष्य काय खेळ खेळत होते माझ्याबरोबर? ज्याला विसरण्यासाठी मी इतक्या दुर निघुन आले तोच पुन्हा माझ्या आयुष्यात डोकावला होता. याला काय म्हणायचे? निव्वळ योगायोग?, एक आयुष्याने केलेली एक क्रुर थट्टा? की आयुष्यात येणाऱ्या एका सुखद सुखाची चाहुल?

काहीही असो, मला त्याच्या समोर जाणं भाग होतं आणि मी गेले. मला पाहुन तो चकीतच झाला. मस्त हसला मला बघीतल्यावर. कालच रात्री आला. तो आणि ‘निधी मेहता’ दोघं निघाले होते काश्मीरला, पण तिकडे काहीतरी भानगड झाली म्हणुन दिल्लीपासुनच रस्ता बदलला आणि इकडे आले. असो.. मनातल्या मनात एका विचाराने मी खुप खुश होते.. ‘राज’ ने दोन रुम्स घेतल्या होत्या.. वेगवेगळ्या त्याच्यासाठी आणि निधीसाठी.

का कुणास ठाऊक, पण त्याने माझी आणि निधीची ओळख करुन दिली नाही. निधी दिसायला तशी छानच आहे.. हो माझ्यापेक्षाही छान, राजला शोभुन दिसते.. पण स्वभावाने मात्र आज्जीब्बात आवडत नाही मला ती..

राजशी बोलावेसे खुप वाटत होते, पण काय आणि कसं बोलणार? कोणं म्हणुन बोलणार?

संध्याकाळी दिसले होते दोघं..बाहेर जाताना.. निधीचे अगदी राजचा हात हातात धरुन, खांद्यावर डोके ठेवुन चालणं..लाडे-लाडे बोलणं फारचं वाटलं मला… वाटलं जाऊन सांगावं तिला.. ‘ए बये..जरा लांबुन, नवरा नाही झाला तुझा तो अजुन’. पण ..

रात्री परतायला पण खुप उशीर झाला असावा त्यांना. मी खुप वेळ वाट बघत थांबले होते. पार्किंग मध्ये कुठल्याही गाडीचा आवाज आला तरी धावत जाऊन खिडकीतुन खाली बघत होते.. उगाचच.. खुर्चीत बसल्या बसल्याच कधीतरी डोळा लागला रात्री


१६ फेब्रुवारी
मनं आनंदी असलं की सारंच कसं छान वाटतं नाही? पांघरूणावर उतरलेली सोनेरी किरणं, निळं आकाश, लाल-पिवळ्या फुलांवर चमकणारे दवबिंदुंचे थेंब. सकाळ एकदम प्रसन्न होती. आज खुप दिवसांनी स्वतःला निट आवरावेसे वाटत होते.. आज खुप दिवसांनी स्वतःलाच आरश्यात परत परत पहायची इच्छा होत होती. कित्ती दिवस झाले होते, मी स्वतःला निट्सं आरश्यात पाहीलचं नव्हतं. एकदा विचार आला मनात विचारावं आरश्याला, ‘आरश्या आरश्या सांग, सर्वात सुंदर कोणं?’ पण मग उगाचच वाटलं .. आरसा ‘निधी मेहता’ म्हणाला तर!!!

टुरिस्ट सिझन जवळ येत चालला आहे आणि बाजारात सहजच एक फेरफटका मारला तर त्याची जागोजागी प्रचीती येऊ लागते.

मनं नको असतानाही राजचाच विचार करत असते. कामात असुनही त्याची चाहुल लागते का हे पहाण्यासाठी मनाचा एक कोपरा सतत मग्न असतो हे आता माझ्या लक्षात येऊ लागले आहे.


१७ फेब्रुवारी
आजची सकाळ माझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली. सकाळी राज ऑफीस मध्ये आला होता. म्हणाला, एक रुम ‘चेक-आऊट’ करायची आहे. म्हणलं का? तर डोळे मिचकावत म्हणाला..’निधी माझ्या रुम मध्ये शिफ्ट करत आहे’. इतके डोक सटकलं होतं ना, ती असती समोर तर कदाचीत काहीतरी नक्कीच बोलुन गेले असते, पण मग तोच म्हणाला, निधीचे २-३ गाणी रेकॉर्डींगच्या डेट्स प्रि-पोन झाल्या आहेत, तिला जावं लागते आहे. मी मात्र आहे अजुन ७-८ दिवस इथेच. इतका आनंद झाला होता ना. वाटलं उठावं आणि त्याला कडकडुन मिठी मारावी. पण तो इतक्या जवळ असुनही खुप दुर होता.

आय ट्राईड माय बेस्ट टु स्टे ए़क्स्प्रेशनलेस, पण मला माहीत आहे, माझ्या चेहऱयाने मला नक्कीच धोका दिला असणार.

गोपाळकाकांनी आज गार्डन मध्ये छान दिव्यांच्या माळा लावल्या आणि मध्ये एक छोटासा खड्डा खणुन काही लाकडं रचुन ठेवली, संध्याकाळच्या गुलाबी थंडीत शेकोटी पेटवण्यासाठी. त्याचा वापर मीच लग्गेच सुरु केला. संध्याकाळी त्या गरम-उबदार शेकोटीने बोचरी थंडी कमी केली होती. मी शेजारीच खुर्ची टाकुन बसले होते आणि अनपेक्षीतपणे राज माझ्याइथेच येउन बसला.

‘हाय..’
‘हॅल्लो..’
….
‘अचानक इकडे कशी? रेकॉर्डींग सोडुन दिलेस की काय?’
‘बस्स.. अस्सच .. काही तरी बदल’
‘हो.. पण कुणालाही नं सांगता अचानक निघुन आलीस..’
‘:-)’
‘निधी पोहोचली?’
‘हो.. मगाश्शीच फोन येऊन गेला..’
……………..
‘बदललीस तु खुप..’
‘मी?’ (ह्याला काय माहीत मी आधी कशी होते?)
‘टेंन्शन घेतेस का कश्याचे खुप?’
‘नाही रे.. काही काय?.. आय एम कुssssल, पण तुला का असं वाटलं मी बदलले..’
‘सहजच.. वजन कमी केलेस की काय?’
‘झालं.. थोडा फरक पडतोच ना..हवेचा..’
‘हम्म.. पण आता अजुन नको कमी होऊ देउस,, आहे ते छान आहे..’
‘:-)’ (मला ना.. खरं तर काय बोलायचं तेच सुचत नव्हते. मुर्खासारखे उगाच हातातल्या पुस्तकात डोकं खुपसत होते.. पण त्याने खुप बोलावं आणि आपण ऐकत रहावं अस्सं वाटत होतं)
‘केस पण काही तरी बदललेस तु!..’
‘हो.. थोडे स्ट्रेट केलेत..’ (त्याचे निरीक्षण ऐकुन मन खुप सुखावत होतं.)
……………………………………..


‘बिझी?’ (बहुतेक माझ्या पुस्तक वाचण्याला कंटाळुन म्हणाला)
‘नाही.. मी आपलं अस्संच..’ मी ओशाळुनच म्हणाले..
‘ग्रेट .. चल मला सिमला दाखव. इतके महीने इथे राहीलीस.. चल उठ..’ मला हाताला धरुन उठवत तो म्हणाला..तो स्पर्श.. एक क्षणाचा..अंगावर हजारो रोमांच उमटवुन गेला. त्याच्या त्या मजबुत हातांच्या पकडीत मी एखाद्या बाहुलीसारखी उचलले गेले.
‘थोडं थांब.. मी चेंज तरी करुन येते..’
‘छे.. चेंज कसलं करतीस .. तु इतकी क्युट असताना, कुठलाही वेगळा ड्रेस काय कामाचा..’

खुप मस्त संध्याकाळ गेली ती.. मी जाणीवपुर्वक त्याला गर्दीची ठिकाणं टाळुन लांब पॉईंट्स वर न्हेलं. नुकत्याच मावळलेल्या सुर्याच्या लाल छटा आकाशात सर्वत्र विखुरल्या होत्या. कदाचीत राजच्या सहवासाने माझ्याही चेहऱ्यावर अश्शीच लाली उमटली असेल .. मी शक्य तेवढी राजशी नजरा-नजर टाळली.


१८ फेब्रुवारी
रिसॉर्ट मध्ये आज सकाळी पुणे-मुंबईच्या १०-१२ जणांचा एक ग्रुप दाखलं झाला आज रात्रं थांबुन ते सर्व उद्या बाईक्स वरुन लेह-लडाखला जाणार आहेत. ‘वॉव, कित्ती मज्जा असेल नाही?’ मी असा विचार करतच होते आणि तेवढ्यात राजने येऊन सहजच विचारले, “इथले तसेही पाहुन झाले आहे माझे.. या ग्रुप बरोबर लेह-लडाखला जायला खुप मज्जा येईल.. जायचं? येणार माझ्याबरोबर?”

आयुष्य किती घड्याळ्याच्या दोलकाप्रमाणे हिंदकाळत असते नाही? निराशेच्या गर्तेत कोसळलेले माझे आयुष्य गेल्या काही दिवसात अचानक-पणे उत्तुंग आकाशात भरारी मारतं आहेत.

लिहीता लिहिताच पॅकींग चालु आहे, एका लाईफ़-टाईम सहलीसाठी, एका लाईफ-टाईम सहवासासाठी..

२१ फेब्रुवारी
लेह-लडाख, सौदर्य काय वर्णावे त्याचे? स्वच्छ निळं आकाश, निळसर हिरव्या पाण्याचे नितळ तलाव, लालसर-पिवळ्या रंगाचे उंचच उंच पर्वत आणि तश्शीच माती. बाईक्स च्या प्रवासात अंगावर उडणाऱ्या त्या पिवळसर मातीने सर्व अंग माखुन गेले होते. राज तर एक नंबरचा माकड दिसत होता.. सो क्युट..

फ्रेश होऊन आल्यावर राजने विचारले -“गेला का रंग सगळा मातीचा?”, मला तर म्हणावेसे वाटत होते की “वेड्या तो रंग तर केंव्हाच गेला, पण मनावर चढलेला तुझा रंग जातंच नाहीये ..”

Rate & Review

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 4 months ago

Pradnya

Pradnya 2 years ago

Lina Gholve

Lina Gholve 2 years ago

Sachin

Sachin 3 years ago

Rutvika Patil

Rutvika Patil 3 years ago