Mehendichya Panaver - 6 books and stories free download online pdf in Marathi

मेहंदीच्या पानावर (भाग-६)

१५ मार्च
दोन दिवस होऊन गेले, राजचा फोन नाही. मी काय बोलले ते कळाले ना राजला? मी कागद बरोबर दिला ना त्याला? काय गडबडीत, वेंधळेपणाने दुसरेच काही हातात कोंबले त्याच्या फोनच्या प्रत्येक रिंगने वाढलेली उत्सुकता आणि ‘तो’ फोन राजचा नाही हे पाहुन चेहऱ्यावर पसरलेली नाराजी मी नाही लपवु शकत. दिवस-रात्र मी मोबाईलला कवटाळुनच आहे, जणु काही तो नाहीसा झाला तर माझं आयुष्यच संपुन जाईल.

स्टुडीओमध्ये नजर सतत राजलाच शोधत असते. पण तो दिसलाच नाही. मी विचीत्र तर नाही ना वागले? आमच्या मैत्रिचा मी चुकीचा तर नाही ना अर्थ काढला? माझ्या मुर्खपणामुळे थोडेफार का होईना जवळ आलेला राज माझ्यापासुन दुरावणार तर नाही ना??

….. कायमचा??

१७ मार्च
’कित्ती सोप्प असतं गं म्हणणं जाऊ देत ना’ असं अगती आगतीकतेने म्हणाले होते मी आशुला. माझी तर खात्रीच पटत चालली होती की, खरंच मुर्खपणाच केला मी. निदान मित्र म्हणुन का होईना राज माझ्या जवळ होता. माझ्या मनाने मला पुर्णपणे धोका दिलेला होता. साफ चुक होता माझा विचार, माझ्या भावना. राजचा फोन तर सोडाच पण गेले ४ दिवस तो दिसला पण नव्हता आणि मी पुन्हा एकदा

घरात खुप सारा पसारा झाला होता. कुठलीही गोष्ट आवरुन ठेवण्याचा विचारच करत नव्हता. आय-ब्रोज करायची वेळ उलटुन गेलेली होती. आरश्यासमोरही जायला भिती वाटत होती. न जाणो चुकुन समोर एखादं अस्वलच दिसायचे :-।

गेले ४ दिवस मी माझी राहीलेलेच नव्हते. कुठल्याही गोष्टीवर निटपणे विचार करणे केवळ अशक्य झाले होते. डोक्यात इतक्या गोष्टी होत्या विचार करायला की कश्यावर आणि काय विचार करावा ह्यावर विचार करायला सुध्दा विचार करण्याचा विचार मला करवत नव्हता.

काय लिहीते आहे मी.. वेड लागलं आहे मला खरंच.

२१ मार्च
’पटकन आवरुन तयार रहा, मॅन्डी येते आहे तुला पिक-अप करायला’ आशु फोनवर जणु किंचाळतच होती.

’अग पण कश्याला? कुठे जायचे आहे? मी नाही येणार कुठे, कंटाळा आला आहे मला’, मी उडत उडतच उत्तर दिले होते पण त्याआधीच आशुने फोन ठेवुन दिला होता

मी उपकार केल्यासारखेच आवरुन ठेवले. एखाद्या वादळासारखीच मॅन्डी आतमध्ये घुसली आणि मला जवळ जवळ ओढतच घराबाहेर काढले. आणि मी? एखाद्या वाळक्या पानासारखी तिच्यामागे फरफटत गेले होते आणि गाडीत जाऊन बसले.

मॅन्डीने गाडी थांबवली तेंव्हा भानावर आले. स्टुडीओच्याबाहेर आम्ही उभं होतो आणि मॅन्डी मला बोट दाखवुन काही तरी दाखवत होती. तिच्या बोटाकडुन त्या दिशेकडे माझी नजर गेली. दुरवर एक अंधुक आकृती मला दिसत होती… राज? छे.. क्षणभर वाटलं, मला दुसरं काही सुचतच नाही. पण नाही, तो राजच होता… आशुशी काही तरी बोलत होता.

मॅन्डी मला हाताला धरुन त्या दिशेने गेली, राजच्या बर्‍़याच जवळ गेल्यावर म्हणाली, ’आsssशु.. आम्ही कॅन्टीनमध्ये जात आहोत’

राजने मागे वळुन पाहीले. त्याच्या चेहर्‍यावर गोड हास्य होते आणि मी मात्र तेरा दिवसांचे सुतक पाळुन आल्यासारखी विस्कटलेली होते. मी तशीच मॅन्डीच्या मागे मागे कॅन्टीनमध्ये गेले. मला काय चालु आहे, काहीच्च कळतं नव्हते. मी कॅन्टीनमध्ये बसे पर्यंत मॅन्डीने कॉफी मागवली होती. मॅन्डी सारखी मागे वळुन वळुन बघत होती. कश्यासाठी? ह्याचे उत्तर मला काही क्षणातच मिळाले, कारण आशु राजला घेउन आमच्याच दिशेने येत होती.

राज येताच मॅन्डी उठुन उभी राहीली आणि त्याला ग्रीट केले, मी मात्र अजुनही मठ्ठासारखी बसुन राहीले होते. काय चालले आहे, खरंच काही कळत नव्हते मला.

राज खुर्ची ओढुन माझ्याशेजारीच बसला आणि इकडे तिकडे बघुन म्हणाला, ’हे सॉरी यार, थोडं कामासाठी बाहेर गावी गेलो होतो, जमलंच नाही बघ फोन करायला. आज आहे वेळ संध्याकाळी?

मॅन्डीने मला हाताने ढोसले तेंव्हा राज पुन्हा तेच विचारत होता. शेवटी मॅन्डीच म्हणाली, “हो आहे ती संध्याकाळी”

’गुड.. मग आपण..’कॅफे रियाटो’ मध्ये भेटुयात? ८.३० ला? थोडं लांब आहे, पण गर्दी कमी असते.’ राज माझ्याकडे बघत विचारत होता.

’चालेल’ मॅन्डीने माझ्यावतीने सांगुन टाकले होते. राज लगेच निघुन पण गेला. पण मी अजुनही तश्शीच उध्वस्त बसले होते.

’एssss बधीर.. आशुने गदागदा हलवले, अगं काय हे? तो तुला विचारतो आहे आणि तु काय अशी ढीम्म?’

कॅलीडोस्कोप कसा असतो ना? क्षणाक्षणाला आकार वेगळे, रंग वेगळा त्याचा अर्थ वेगळा. माझं आयुष्य तस्संच झालं आहे. आत्ता डायरी लिहीताना सगळ्या गोष्टी निट डोळ्यासमोर आल्या आणि आज संध्याकाळी राजला भेटायचं आहे ह्याची जाणीव झाली.

पुन्हा एकदा नविन आशा. एकदा वाटतं होतं जाऊच नये. निदान अपेक्षाभंगाचे दुःख तरी होणार नाही, मग वाटलं. राज वर खुप चिडावं, ओरडावं, मारावं आणि त्याला जवळ ओढुन घट्ट मिठीमध्ये समावुन घ्यावं. घड्याळाचा काटा पुढे पुढे चालला आहे आणि मला आवरायला खुप वेळ लागणार आहे.. खुsssप वेळ.. मला आज सर्वात सुंदर दिसायचं आहे, निधीपेक्षाही सुंदर. मी राजला अनुरुप दिसले पाहीजे, वाटले पाहीजे, राजची गर्लफ्रेंड असावी तर अश्शी.. बायको असावी तर अश्शीच.. नकळत लाजुन तळहाताने चेहरा झाकुन घेतला होता.

मन तर केंव्हाच कॅफे मध्ये पोहोचले होते, शरीराने तिथे पोहोचायला फक्त तिन तास उरले होते.. फक्त तिन तास..

२२ मार्च
अह्हा.. आणि ओह नो!!

’कॅफे रियाटो’, एकद्दम छान. मंद दिवे, समोर पसरलेल्या छोट्या छोट्या टेकड्या आणि त्यावरुन येणारा मंद वारा सुखावणारा होता. आकाश्यातील निळाईच्या पार्श्वभुमीवर कॅफेमधील दुधाळ दिवे, बेज रंगाचे इंटेरीयर, टेबलावर फुलांची सजावट आणि मंद संगीत व्वाह, मस्तच होते. मी अगदी मुलाखतीला चालल्यासारखी बिचकत, दबकतच आत गेले.

मी त्याला शोधतच आत मध्ये गेले आणि कोपर्‍यातील एका टेबलावर मला तो माझ्याकडेच पहात असलेला दिसला. पहिल्यांदा मी त्याला ओळखलेच नाही. मीच काय, कदाचीत कोणीच ओळखले नसते. अगदीच साध्या कपड्यात होता तो. पण त्याच्या चेहर्‍यावरील चार्म मात्र अगद्दी तस्साच. कदाचीत त्याला माझ्याबरोबर कोणी ओळखु नये म्हणुनही असेल.

मी टेबलापाशी पोहोचताच तो स्वतः उठुन उभा राहीला, माझ्यासाठी खुर्ची मागे केली. मला अगदी आकाश ठेंगणं वाटत होते. अगद्दी तस्साच आहे राज, त्याच्याबरोबर राहीलं की आपणं अगदी कोण खुप्प मोठ्ठ असल्यासारखे वाटते. खुप मान आणि आदर देतो तो बरोबरच्या व्यक्तीला. माझ्यासाठी त्याच्या वागण्यात मला जरा जास्तच ग्रेस जाणवली.

पहिली काही मिनीटं शांततेतच गेली. काय बोलावं काहीच सुचेना. मनामध्ये सारखा विचार येत होता, ’अगं तु बोलावले आहेस ना त्याला इथे काही तरी बोलायला? मग मठ्ठ बोलं ना काही तरी, वाट बघतो आहे तो तु बोलण्याची..’ पण शब्दच फुटत नव्हते तोंडातुन.

मग शेवटी तोच म्हणाला, ’काय ऑर्डर करु?’
मी : ’अं.. नको.. काहीच नको?’

काही क्षण डोळ्याच्या भुवया उंचावुन तो माझ्याकडे बघत राहीला. मी शक्यतो त्याच्या नजरेला नजर देण्याचे टाळत होते.

’चार ग्रिल्ड सॅंडविचेस, दोन चॉकलेट मफिन्स, एक व्हेज सलाड आणि दोन स्ट्रॉंग कॉफी’, राजने स्वतःच माझी आणि त्याची ऑर्डर देऊन टाकली आणि मग माझ्याकडे पहात म्हणाला.. ’सॉल्लीड भुक लागली आहे, पहिले काही तरी खाऊ आणि मग बोलु.. ओके?’
मी आपली ओके म्हणुन मान डोलावली. खाण्याचा तर काहीच मुड नव्हता कारण पोटामध्ये कावळे नाही तर बटरफ्लाईज होते.

काय झालं होतं मला? लेह च्या ट्रिपच्या वेळेस कित्ती मोकळी झाले होते मी त्याच्याबरोबर. कित्ती गप्पा मारल्या होत्या आम्ही! हे असेच बसुन राहीले तर काही खरं नाही आज. समोर राज असुनही माझ्या मात्र माझ्या मनाशीच गप्पा चालु होत्या.

परत काही क्षण शांततेत. ही शांतता खरं तर मलाच फार असह्य होत होती. राज कंटाळत तर नसेल ना? पण काय करु? काय बोलु.. शब्दच फुटत नव्हते काही.

थोड्याच वेळात आम्ही.. अं.. राजने मागवलेले पदार्थ आले. राज खात होता, मी मात्र केवळ खाली मान घालुन कॉफीच्या कपाशी चाळा करत होते.

कदाचीत ह्या काळात राज काही बोललाही असेल माझ्याशी मी मात्र एकीकडे हो.. नाही शब्द आलटुन पालटुन वापरत होते तर दुसरीकडे मनामध्ये अजुनही काय आणि कसं बोलायचे ह्याच्या वाक्यांची जुळवाजुळव करत होते.

थोड्यावेळाने राजने विचारलं.. ’चलं निघायचं?’
मी भानावर येऊन इकडे तिकडे बघीतले. समोरचे खाणं केंव्हाच संपलं होतं. वेटरने टेबल साफ करुन बिल आणुन ठेवलं होतं..
’अं.. हो.. निघुयात.. नाही.. नको..’ काहीतरी मेज्जर लोचा झाला होता माझा..
’एक काम करु, इथुन बाहेर पडु.. बाहेर बोलु.. चल, तुला बाहेर मोकळं बरं वाटेल’ राज उठुन उभा राहीला.

जड पावलांनी मी सुध्दा उठले आणि बाहेर पडले.

[क्रमशः]