Nako chandra tare, fulanche pasare - 2 books and stories free download online pdf in Marathi

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 2

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे....

(2)

चार पाच दिवस सोपान दुसऱ्या कामात व्यस्त होता, त्यामुळे त्याला बबनरावांच्या कामाला हात लावायला वेळ मिळाला नाही. मात्र, जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा सोपानला ते काम हाती घ्यावंच लागलं. सोपानने दोन तीन दिवस मेहनत करून अगदी हुबेहुन तसाच दिसणारा आरसा बनवला. बाकीचे कामगारही वाह वाह करू लागले. आज बबनरावांना फोन करून आरसा पाठवून देतो म्हणून सोपान सांगणार होता. कामगार आरसा ठेवण्यासाठी लाकडी फळ्यांचं एक पॅकिंग बनवत होते. बॉक्स बनवून झाल्यावर सोपानने तो व्यवस्थित असल्याची खात्री केली आणि आरसा आतमध्ये ठेवायला सांगितलं. बॉक्स मध्ये आरसा ठेवला गेला. फोन करण्यासाठी तो आपल्या काउंटरकडे जाऊ लागला, तोच कचकन काहीतरी तडकल्याचा आवाज झाला. त्याने मागे वळून पाहिलं तर आरश्याची उजव्या कोपऱ्यातली काच तडकली होती. काच तुटलेल्या भागाची रेष आरशावर स्पष्ट दिसत होती. उजव्या कोपऱ्यापासून खाली आणि डावीकडे जवळजवळ अर्धा फूट काच तुटली होती. सोपान संतापला,

"अरे मूर्खांनो, लक्ष देऊन काम करता येत नाही का? तीन दिवस फक्त हेच काम करत होतो. आणि तुम्ही एक मिनिटात वाया घालवलं."

"मालक, माफ करा. पण आम्ही काहीच नाही केलं. आरसा आतमध्ये व्यवस्थित ठेवला होता. जसे तुम्ही काऊंटरकडं वळला तसं इकडं काच तडकली बगा."

फोन करण्यासाठी उचललेला रिसीवर खटकन आपटला. आणि डोक्याला हात लावून तसाच विचार तंद्रीत आपल्या खुर्चीवर बराच वेळ बसला होता. दुसऱ्या दिवशी सोपानने तीच काच तुटलेल्या भागापर्यंत कट केली आणि बाजूची लाकडी चौकटही त्याप्रमाणे कमी करून घेतली. दुपारपर्यंत आरसा आणि बाजूची चौकट व्यवस्थित बसवून घेतली. पुन्हा एकदा अगदी हुबेहूब. पण उंचीला फक्त अर्धा फूट कमी. यावेळी मात्र बॉक्सच्या पॅकिंग मध्ये स्वतः सोपानने व्यवस्थित आरसा ठेवला. आरश्याला धक्का लागून फुटू नये म्हणून आजूबाजूला पेपरचे कागद लावून घेतले. बॉक्स व्यवस्थित बंद केला. यावेळी त्याला कसलाही हलगर्जीपणा नको होता. फोन करण्यासाठी तो काऊंटरकडे चालू लागला. पुन्हा एकदा तोच काच तडकल्याचा आवाज! सोपान जागेवरच थांबला. शंकेची पाल मनात चुकचुकू लागली.

"मालक.."

"काय रे? काय झालं?"

"आतली काच तडकली बहुतेक.."

"क्काय?", सोपान अक्षरशः ओरडलाच.
"कसं शक्य आहे? उघड पटकन."

पॅकिंग च्या बॉक्स चे समोरचे लाकडी आवरण काढले. समोर ठेवलेले कागद बाजूला केले. अन, पाहतो तर काय! काल जेवढी आणि जिथे काच तडकली होती. तशीच काच वरच्या उजव्या बाजूला तडकली होती. सोपान झटकन मागे सरकला. भीतीचा काटा सर्रकन अंगावरून गेला. त्याचं लक्ष पलीकडे उभा करून ठेवलेल्या त्या जुन्या आरश्याकडे गेले. अगदी तशीच काचेला चिर पडली होती. कालही आणि आजही. आता मात्र सोपान घाबरला. हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे. काय करावे? विचार करू लागला. बबनरावांचा फोन आला तर लवकरात लवकर काम करून दयावे लागेल. आता तोच आरसा देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्याच प्रकारचे नवीन आरशे बनवण्यापेक्षा त्याच आरश्याला वरच्या बाजूने कमी करून जरा स्वच्छ आणि नीटनेटके करून दिल पाहिजे. पंधरा दिवसांवर लग्न आलं होतं. त्या आधी निदान आठवडाभर तरी आधी आरसा बबनरावांच्या घरी पोहोचला पाहिजे.

दुसऱ्या दिवशी सोपानरावांनी जुन्या आरश्याचं काम हाती घेतलं. आरश्याला हात लावतानाही त्याला एक भीती वाटत होती. दुसऱ्या कुणाला तरी काम द्यावं आणि आपण बाजूला राहावं वाटत होतं. पण बबनरावांच काम होतं. काम चांगलं व्हायला पाहिजे म्हणून त्यांनाच करावं लागणार होतं. बाजूची कोरीव लाकडातली चौकट बाजूला केली. प्रत्येक कोण्यामध्ये नागाच्या वाटोळ्यांची नक्षी होती. मधोमध सिंहाच्या तोंडाची नक्षी, जसे काय ते नाग सिंहाला खाऊ पाहतायत. तर प्रत्येक चौकटीच्या मधल्या जागेमध्ये कमळाचे नाजूक कोरीव काम केले होते. आजपर्यंत असे नाजूक सुबक आणि नक्षीदार कोरीवकाम काम सुभानरावांनी कधीही पाहिले नव्हते. हात थरथरत होते. काम करताना एक वेगळेपणा जाणवत होता. एवढ्या वर्षात असा अनुभव कधीही आला नव्हता. उकाडा असला तरी सोपनरावांना मधूनच हवेची थंडगार झुळूक येऊन थडकायची. काहीतरी गूढ रहस्य शोधतो आहोत, काहीतरी अनाहूतपणे शोधतो आहोत. आपण काहीतरी गुन्हा करतोय की काय? असे राहून राहून वाटत होते. चौकट पूर्णपणे निघाल्यावर अर्धा पाऊण इंच जाडीची काच असलेला आरसा अलगद बाहेर आला. उजव्या कोपऱ्यातला तुटलेला त्रिकोणी तुकडा त्यांनी बाजूला केला. आरश्याला एवढी जाडजूड काच ते पहिल्यांदाच पाहत होते. वजनाने सुद्धा भारी होती. मशिनने अर्धा फूट तुटलेल्या भागपर्यंतची काच त्यांनी कट केली. नेहमीपेक्षा त्यांना या वेळी खूप वेळ लागला. एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की, एवढा जुना आरसा असून देखील कुठेही एखादा डाग किंवा पारा निघालेला नव्हता, की कुठे साधी पुसटशी रेषा किंवा ओरखडाही उमटला नव्हता. जुना आहे म्हणायला फक्त बाजूची लाकडी चौकट धुळीने किंवा साफसफाई न केल्यामुळे जरा निरस दिसत होती. कारागिरराकडून जरा रंगरंगोटी आणि कोरीवकाम करवून घेतले. दुसऱ्या दिवशी नको असलेला चौकटीचा भाग त्यांनी कापून व्यवस्थित आरशाच्या काचेमध्ये बसवली आणि पुन्हा एकदा स्वच्छ करून घेतले. आता एकदम नवीन आरश्या सारखं वाटत होतं. सोपानराव खुश झाले पण एक अनामिक भीती त्यांच्या मनात कुठेतरी होती. की या वेळी ही पहिल्यासारखे नको व्हायला! आरसा त्यांनी या वेळीही स्वतः पॅक करून बॉक्स मध्ये ठेवला. आणि थरथरत्या हाताने त्यांनी फोनचा रिसीवर उचलला.

"सुभानराव आरसा तयार झालाय बगा. कधी घेऊन येऊ??"

"हॅलो, काका मी निता. बाबा बाहेर गेलेत, या घेऊन लगेच."

"हो बेटा, पोहोचतोच अर्ध्या तासात."

"हो काका...!"

रिसीवर खाली ठेवला. सोपरावांचा चेहरा घामानं डबडबला होता. या वेळी कसलाही आवाज झाला नाही. त्यांना हायसं वाटलं. पण एक वेगळंच विचारचक्र मनात फिरू लागलं.

"राम्या, चल रे गाडी काढ. आरसा पोहोच करू लवकर सुभरावांच्या घरी."

टमटम सुभानरावांच्या बंगल्यापाशी आली. वहिनींची कृपा, बंगल्यावर लाल अक्षरात नाव दिसत होतं. आजूबाजूला हिरवीगार बाग. दरवाज्यासमोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये दोन माणसे आरामात बसतील असा झोपला करकरत होता. कामगारांनी बॉक्स बाहेर काढला. सोपनरावांची धाकधूक वाढली होती. आरश्याला काही होऊ नये. काही अपशकुन होऊ नये. असे वाटत होते. एकदाचा कामगारांनी बॉक्स घरात नेला. समोर भला मोठा हॉल, पन्नास साठ इंची एलसीडी टीव्ही. पंधरा वीस माणसं आरामात बसतील एवढा भला मोठा सोफा, चोवीस तास एसी चालू. बबनरावांच्या बंगल्याचं ऐश्वर्य पाहण्यासारखं होत. आतमध्ये थंडावा होता.

"निता बेटा, आम्ही येतो. सुभानरावांना सांग तेवढं.."

"अहो काका, तो बॉक्स तर उघडून दाखवा."

"अग, आरसा बाहेर काढला तर लावावा लागेल. तू सासरी गेल्यावरच काढ आता."

"नाही काका, मला आता पाहायचं आहे."

निताच्या हट्टासमोर सोपानरावांनी आरसा बॉक्स मधून बाहेर काढायला सांगितला. आरसा पाहताच ती अगदी भारावून गेली. कधी एकदा आरसा आपल्या खोलीत लावतोय आणि मी त्यात माझं सौंदर्य न्याहाळतेय असं झालं होतं. सोपानराव तर आश्चर्यचकितच झाले. कारण, आरसा एकदम उत्तम स्थितीत होता. कुठेही तडा गेलेला नव्हता. नंदाच्या सांगण्यावरून जुना काढून त्या जागी आरसा तिच्या खोलीत लावण्यात आला. सोपानराव दुकानावर निघून गेले. आरसा सहीसलामत पोहोचल्याचं समाधान वाटत होतं. मनात असलेली एक गूढ भीतीही आता मिटली होती. दुकानात आरसा आल्यापासून जी एक गूढ शांतता होती, एक हुरहूर होती. ती आता गायब झाली होती. नेहमीप्रमाणे कामं चालली होती. तरीही त्यांना एक काळजी लागून राहिली होती. न जाणे काही विपरीत घडू नये! कधी कधी माणसाला समोर येणाऱ्या संकटाची पुसटशी चाहूल लागते. मन मानायला तयार नसतं पण विचार मात्र सतत मनात घोळत असतात. आणि जेव्हा एखादी गोष्ट, एखादा विचार मनात खोल रुतून बसतो. तेव्हा त्या दिशेने माणसाची वाटचाल सुरू होते. कधी यशाकडे तर कधी अधोगतिकडे. तर केव्हा केव्हा भविष्यात वाढून ठेवलेल्या संकटांच्या दिशेने.

*****