tu jane na - 6 books and stories free download online pdf in Marathi

तू जाने ना - भाग ६

भाग - ६

रिसेप्शनला स्टेजवर दोघांनी एकत्रच जाऊन काव्या आणि पंकजसोबत फोटो काढले... संपूर्ण लग्न समारंभात त्या दोघांची जोडी इतकी छान दिसत होती की फोटोग्राफर ने त्यांच्या कळत नकळतच त्यांचे बरेच फोटो काढले... लग्न निर्विघ्नपणे पार पडलं... सगळे परतीच्या प्रवासाला निघाले... कबिरने सुहानीला विचारून एकच कॅब बुक करून ठेवली होती... कारण त्या दोघांचं रिटर्न तिकीट पण एकाच फ्लाइटचं होतं...

" माझ्यासोबत यायचंय ह्याला माय फूट...😏 इथून निघशील तर येशील ना...! मला त्रास देणारा आता स्वतःचं पोट धरून त्रास सहन करत बसणार...😆 " सुहानी स्वतःचे कपडे बदलताना हा एकच विचार करत होती... तिने तरीही मुद्दामून त्याला निघायचं का हे विचारायला कॉल केला पण तो फोनच उचलत नव्हता... हॉटेलच्या मॅनेजरने रिसेप्शनवरून कॉल करून खाली कॅब आल्याचा निरोप दिला, तशी सुहानी आपली बॅग घेऊन निघाली... " फोन उचलत नाही म्हणजे गेला असेल...🙊😝 " मिश्कील हसतच तिने एकवार त्याच्या रूमवर नजर टाकली आणि बाहेर पडत कॅब मध्ये बसून निघून गेली...

अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर तिला एका unknown नंबरवरून कॉल येत होता... आधीचा कॉल तिने स्वतःहून कट केला... पण पुन्हा आल्यावर तिने तो उचलला तर फोन त्याच हॉटेलमधून आला होता...

" हॅलो सुहानी मॅडम, ते कबीर सर...? " समोरून एक व्यक्ती घाबरत बोलत होती...

" कोण बोलतंय...? आणि काय काम आहे लवकर बोला..." सुहानी कठोर आवाजातच म्हणाली...

" अहो मॅडम, ते सर चक्कर येऊन पडलेत आणि त्यांच्या तोंडातून फेस येतोय... तुम्ही प्लिज इथे आलात तर बरं होईल..."

" काssय...? कसं शक्य आहे हे...? मीss मी तर..." सुहानीला काय बोलावं ते सुचतच नव्हतं... " तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला...? " तिने न राहवून विचारलं...

" ते कबीर सरांच्या मोबाईलवर मिस्ड कॉल होता तुमचाच..." हे वाक्य ऐकताच सुहानी गर्भगळीत झाली... बसल्या जागी होते नव्हते सगळे प्राण शरीरातून निघाले होते... तो पुढे म्हणाला... " मॅडम आम्ही त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय, तुम्ही तिथेच या..." त्या व्यक्तीने फोन कट केला...
सुहानीने एक आवंढा गिळला आणि ड्राइव्हरला गाडी पुन्हा मागे फिरवायला सांगितली... तिचं हृदय एव्हाना रेल्वेच्या गतीने धडधडू लागलं होतं... भीतीने पोटात आलेला गोळा छातीपर्यंत येऊन गोलगोल फिरत होता... आता देवाकडेच ती त्याचे प्राण वाचवण्यासाठी विनवण्या करत होती... करायला गेले एक आणि झालं काहीतरी भलतंच... शीट काय करू...? हे सगळं माझ्यामुळे झालं पण असं कसं होईल...? त्याला तर मी फक्त मोशनचं औषध दिलं होतं, त्यात चक्कर आणि तोंडातून फेस...! बापरे हे सगळं खूप भयंकर झालंय माझ्याकडून... काय गरज होती मला... तो किती चांगला वागला माझ्याशी आज, फ्रेंडशिप पण केली, एकत्र जाऊ म्हणत कॅब पण त्यानेच बुक केली आणि मी मी त्या मैत्रीला तर नाहीच पण माणूसकीला पण नाही जागले... देवा प्लिज एक संधी दे, मी काहीही करायला तयार आहे पण त्याचं काहीच वाईट नको होऊ दे... भीतीपोटी, काळजीपोटी, टेन्शनमुळे ती खूपच अस्वस्थ झाली होती... एव्हाना डोळ्यात रागाची जागा अश्रूंनी घेतली होती...

ती सैरावैरा धावत हॉस्पिटलमध्ये पोहचली... रिसेप्शनवर चौकशी करून तिने ऑपरेशन थिएटर गाठलं... हॉटेलच्या मॅनेजर ने तिला ओळखलं... तो घडलेली घटना तिला सांगू लागला...
" मॅडम, बरं झालं तुम्ही आलात..."

" हे सगळं कसं झालं..." ती दम खात खात विचारू लागली....

" कबीर सरांनी कॅब आल्यावर तुम्हाला आणि त्यांना फोन करायला सांगितला होता त्याप्रमाणे मी केलाही पण ते काही फोन उचलत नव्हते... तुम्हाला निरोप देऊन मी आमच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि नेमकं तुम्ही तेव्हा चेक आउट केलं... मी रजिस्टर पाहिल्यावर समजलं की सर अजून गेलेच नाहीत म्हणून मी त्यांना इंटरकॉमवर, त्यांच्या मोबाईल वर बऱ्याचदा कॉल केला पण त्यांनी उचललाच नाही... काहीतरी गडबड वाटली म्हणून हाऊस किपिंग वाल्यांना त्यांच्या रूमवर पाठवलं तर ते दरवाजाच उघडत नव्हते... आमच्याकडे मास्टर key असते म्हणून त्याने दरवाजा उघडला तर ते बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले... त्यांना लगेच आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि त्यांच्या फोन मध्ये तुमचा शेवटचा कॉल आलेला म्हणून त्या नंबरवर कॉल केला..." सुहानी सगळं कान टवकारून ऐकत होती...
तेवढयात डॉक्टर बाहेर आले... सुहानी आणि हॉटेल मॅनेजर लगेच त्यांच्याकडे धावले आणि कबिरची विचारपूस करू लागले...

" हे बघा, मरता मरता वाचलेत... फूड पॉयझनिंग झालं त्यांना... कुठे, कधी आणि काय खाल्लं काही माहितीय का तुम्हाला...? " हे ऐकताच सुहानी पेक्षा मॅनेजरलाच जास्त टेन्शन आलं होतं... कारण लग्नाचं जेवण त्याच्याच हॉटेलचं होतं...

" नाही सर ... काहीच माहिती नाही... " सुहानी लगेच बोलली... मॅनेजरच्या जीवात जीव आला...

" ओके... He is out of danger now...पण पेशंटला सध्या आरामाची प्रचंड गरज आहे... पुढचे चोवीस तास ते आमच्या देखरेखीखाली राहतील... विकनेसही आहे..." डॉक्टर म्हणाले...

" मी भेटू शकते का...?" सुहानीला फक्त त्याला एकदा बघायचं होतं... स्वतःची खात्री करून घ्यायची होती...

" त्यांना जनरल मध्ये शिफ्ट केल्यावर भेटा..." असं बोलून डॉक्टर निघून गेले...

सुहानीने मॅनेजरला सांगून तिचं सामान हॉटेलमध्ये पाठवून दिलं आणि एक रूम बुक करून ठेवायला सांगितली... तिने जे केलं होतं ते आता तिलाच निस्तरायचं होतं... मॅनेजर निघून जाताच ती तिथल्या बाकड्यावर बसली...

कबिरशी झालेल्या पहिल्या भेटीपासून तिला सगळं आठवू लागलं होतं... तिने त्याच्या मुस्काटात लगावलेली ती चपराक आता तिलाच खूप वेदना देत होती... आज त्याच्या जीवावर बेतलं असतं तर मी काय म्हणून त्याच्या घरच्यांना तोंड दाखवलं असतं... त्याची दादी, आई, भाऊ बापरे...! मी थोडा तरी त्याच्या फॅमिलीचा विचार करायला हवा होता...

" तुम्ही पेशंट ला भेटू शकता..." नर्स च्या आवाजाने ती तिच्या विचारचक्रातून बाहेर आली आणि लगेच त्याच्या वॉर्ड मध्ये गेली...

ती त्याच्यासमोर बसून त्याच्याकडे एकटक पाहत होती... तो अजूनही बेशुद्धच होता... तिला त्याची प्रचंड काळजी वाटत होती... स्पेशल वॉर्ड असल्याने ती रात्रभर तिथेच थांबली... तो शुद्धीवर यायची तिने खूप वाट पाहिली... त्या रात्री तिला जेवायची पण इच्छा राहिली नव्हती, सतत त्याचा हसरा, बोलका चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता... त्याच्याच विचारात उपाशीपोटी ती केव्हाची तरी झोपी गेली...

कबिरला सकाळी जाग आली तेव्हा त्याने पहिला चेहरा सुहानीचा पाहिला ... ही इथेच आहे...? हा एकच प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत होता... कसल्याशा आवाजाने अचानक ती दचकून उठली... नर्स त्याच्या हातून सलाईन ची सुई काढत बाटलीला लावत होती... तिने एकवार त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर नजर फिरवली... तसं त्याने स्मितहास्य देतच तिला गुड मॉर्निंग विश केलं... मंद हसू चेहऱ्यावर आणत ती त्याच्याजवळ जाऊन बसली... त्याचा हात हाती घेऊन तिला त्याची माफी मागायची खूप इच्छा झाली पण तो ह्यावर कसा रिऍक्ट करेल ह्या विचारानेच ती शांत बसली...
तिला काहीतरी सांगायचंय, हे तिचे डोळेच बोलत होते... कबीर ने डोळ्यांनीच तिला " काय झालं..? " म्हणून विचारलं पण तिनेही नकारार्थी मान डोलावली...

" कसं वाटतंय तुला आता...? " तिने काळजीपोटी त्याला विचारलं...

थोडासा विकनेस वाटत असल्याने त्याने फक्त ठीक आहे हे उत्तर दिलं... त्याला भूक लागली असावी म्हणून तिने ब्रेकफास्ट मागवला... दोघांनीही थोडं खाऊन घेतलं... काहीवेळाने नर्स ने काही औषधं आणायला सांगितली, तीदेखील सुहानी घेऊन आली... आज संपुर्ण दिवस ती त्याला हवं नको ते सगळं बघत होती... ह्या सगळ्या गडबडीत तिला घरी फोन करायचं लक्षातच राहिलं नव्हतं... तिने राहुलला काहीतरी कारण सांगून दोन दिवसानंतर येईन असं कळवलं...

इथे कबिर घरी न पोहचल्यामुळे रुद्र कॉल वर कॉल करत होता... पण त्याचा मोबाईल लो बॅटरी मुळे बंद झाला होता... कबीर ने सुहानीच्या मोबाईल वरून त्याला दोन तीन दिवस उशिरा येत असल्याचं कळवलं... कारण डॉक्टरांनी स्ट्रिक्टली त्यांना काळजी घेण्यासाठी बजावलं होतं... संध्याकाळी डिस्चार्जच्या सगळ्या फॉर्मलिटीज सुहानी ने पूर्ण केल्या आणि त्याला त्याच हॉटेलवर घेऊन गेली... दोन सिंगल बेड असलेली एकच रूम तिने मॅनेजरला सांगून बुक केली होती... त्याची काळजी घेण्यासाठी ती त्याच्याजवळ चोविस तास असणं गरजेचं होतं... ती त्याच्यासोबत चक्क एकाच रूममध्ये राहणार, ही गोष्ट कबिरला हजबच नव्हती होत... पण त्याच्या नरमलेल्या प्रकृतीपुढे त्याने त्यावेळेस दुर्लक्ष केलं...

कबिरला अजूनही विकनेस वाटत होता... त्याला जास्त खायला पण होत नव्हतं... काहीही खाल्लं तरी मळमळत होतं म्हणून तो ज्युस वरच होता... रात्रीच्या वेळेला सुहानी त्याला जबरदस्ती खिचडी भात वगैरे भरवत असे... रात्री त्याला तहान जरी लागली तरी ती लगेच उठून पाणी देत होती... डोळ्यात तेल घालून ती केलेल्या चुकीची शिक्षा भोगत होती... त्याला पूर्णपणे बरं करायचं, हेच ध्येय तिने निश्चित केलं होतं...

तिच्यातला हा बदल कबीरलाही जाणवत होता... ती त्याची इतकी का काळजी घेतेय..? हा पण प्रश्न त्याला भेडसवायचा... हळूहळू त्याची तब्येत सुधारत होती... दोघांमध्ये आता साधारण बातचीत होत होती... त्यांच्यामधली दरी आता भरून निघत होती... ती तिची सगळी महत्वाची कामं सोडून, माणुसकी खातीर आपल्यासाठी इथे थांबलीय, हे बघून त्यालाही बरं वाटत होतं... त्यानेही बदला घेणं वैगरे सगळं मनातून काढून टाकलं होतं... दोघेही तसे स्वभावाने चांगले होते पण त्यांच्यामध्ये परिस्थितीच अशी निर्माण व्हायची की त्याला ते दोघेही काहीच करू शकत नव्हते... दोनाचे चार दिवस झाले, घरच्यांना दोघेही खोटी कारणं सांगून दिवस मारून नेत होते... आता त्यांना एकमेकांशी गप्पा करायला पण आवडू लागलं होतं... आता रोज रात्री जेवण झाल्यावर ते दोघेही खाली गार्डन मध्ये शतपावली घेत होते... बोलता बोलता त्याने त्यादिवशी घडलेला प्रकार सुहानीला सांगितला...

" बघना त्यादिवशी निघता निघता अचानक पोटात कळ आली, एक दोनदा वॉशरूमला गेलो... बाहेर येऊन जरा बेडवर बसलो तर पोटात मळमळायला लागलं, जीव घाबरा घुबरा झाला... मी तुला कॉल करायला फोन हातात घेतलाच होता की डोळ्यासमोर अंधारी आली तसा तिथेच कोसळलो... आणि सकाळी डोळे उघडले तेव्हा तुला पाहिलं... तू नसतीस तर काय झालं असतं माझं देवजाणे... थँक्स सुहानी... माझी इतकी काळजी घेतलीस, तुझी सगळी महत्वाची कामं सोडून तू माझ्यासाठी इथे थांबलीस... नाहीतर आजच्या युगात एवढं कोण कोणासाठी करतंय... " तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला...

पण ती मात्र त्याला नजरच मिळवू शकत नव्हती... थँक्स मला कसलं...? तुला कळेल ना हे कशामुळे झालं तर तू तर माझा जीवच घेशील... तुला कसं सांगू ते सगळं, माझी हिंमतच नाही होतंय...मनातले विचार सैरावैरा पळत होते... त्या थंडगार वातावरणातही तिला दरदरून घाम फुटला होता... कबिरने तिचे दोन्ही हात हातात घेतले, तशी ती दचकली...

" तुझे आभार मानावेत तेवढे कमी आहेत... खरंतर तुझ्यामुळे मला वेळेचं मोल कळलं... आज मी दिलेला शब्द आणि वेळ पाळत असल्याने इतक्या वरच्या पातळीवर येऊन पोहचलोय... माझ्या मधल्या कमी असलेल्या गोष्टी तू मला तेव्हा दाखवून नसत्या दिल्यास तर कदाचित मी इथपर्यंत पोहचलोच नसतो... आपली मैत्री अशीच राहील हीच एक अपेक्षा... तुझी काही हरकत नाहीए ना...! " तो तिच्या डोळ्यात क्षणोक्षणी हरवून जात होता आणि त्याच्या बोलण्यातून ती...

मनावर एक दडपण होतं, पण त्याहीपेक्षा त्याच्याबद्दल वाटणारे एक वेगळेच भाव तिला त्याच्या आणखीन जवळ घेऊन जात होते... त्याच्या गायकीवर ती केव्हाच फिदा झाली होती... पण आता त्याचं बोलणं, वागणं, हसणं, दिसणं सगळं सगळं तिला आवडायला लागलं होतं... तिच्या डोळ्यातच त्याच्याशी मैत्री निभावण्याची एक इच्छा, एक ओढ होती... ह्या आधी तिला असं कधीच झालं नव्हतं... इतके दिवस तिलाही माहीत नव्हतं की आपल्याकडे एक हृदयही आहे जे कबिरमुळे धडधडायला लागलंय...

इतके दिवस ना तिने फोन पाहिला होता, ना एकही मेसेज... संपूर्ण दिवस तो आणि ती गप्पा करण्यातच घालवत होते... त्यांच्या गप्पांमध्ये कामाच्या चर्चा खूप असायच्या... त्याची गाण्याची आवड, त्याचं करिअर त्याने कशाप्रकारे सुरू केलं, मग रिऍलिटी शॉ कसा जिंकला, त्यानंतरचा प्रवास आणि बरंच काही... हळूहळू त्यांच्या बोलण्यातूनच त्यांना एकमेकांच्या परिवाराशी ओळख होऊ लागली होती... कबीर त्याच्या घरच्या एकेकाचं वर्णनच इतकं सूंदर रित्या करायचा की तिला आता त्या सगळ्यांना भेटायची ओढ निर्माण झाली होती... आपलंही कुटुंब कबिरच्या कुटूंबासारखं हवं होतं असं तिला बऱ्याचदा त्याच्या बोलण्यातून वाटायचं...
तिने ही राहुल, आजी आणि आई असा तिचा छोटा असलेला परिवार काही शब्दातच वर्णिला होता... आईची खालावत चाललेली स्थितीही तिने त्याला सांगितली होती... तिच्या बाबतीत जे काही कबीरने ऐकलं ते ऐकून तर त्याला तिचा आदरच वाटत होता... तिच्या स्ट्रगल पुढे त्याचं स्ट्रगल त्याला शुल्लक वाटत होतं... दुसऱ्या दिवशी ते घरी जायला निघणार होते... आज त्यांचा उटी मधला शेवटचा दिवस होता... सकाळी दोघही तिथल्या जवळच्या एका स्पॉट ला फिरायला गेले होते... गरमागरम मक्याचं कणीस खात त्यांनी तिथल्या निलगिरी पर्वताच्या उंचच उंच रंगांना, त्या हिरवळीला, तिथल्या नद्यांना डोळ्यात साठवून घेतलं... सुहानी हे सगळं बघताना खूपच आनंदी दिसत होती आणि तिचा आनंद बघून कबीरही आतल्याआत खूश होत होता... ह्या चार दिवसांत मनाने तो सुहानीच्या खूपच जवळ गेला होता... कदाचित तीही होती पण एका दडपणाखाली...

दुपारी बाहेरच लंच करून ते हॉटेलवर परतले... असच टीव्ही बघता बघता कबिरचा डोळा लागला... तो झोपलेला पाहून तिने टीव्ही बंद केला व ती सोफ्यावर बसून न्यूज पेपर वाचत बसली... तेवढ्यात तिच्या मोबाईलवर रितूचा कॉल आला... रिंगच्या आवाजाने कबीर थोडा वळवळला आणि कुस बदलून पुन्हा झोपला... सुहानीने त्याच्याकडे पाहून तिचा फोन लगेच सायलेंट मोड वर टाकला आणि चोर पावलांनी बाल्कनीत जाऊन कॉल उचलला...

" हां बोल गं..? कशाला कॉल केलायस...?" सुहानी खूपच हळू आवाजात बोलत होती...

" तू आहेस कुठे आणि इतक्या हळू आवाजात का बोलतेयस...?" रितू च्या प्रश्नाने सुहानीने स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारून घेतली...

" तू बोल ना, काही अर्जंट असेल तर बोल... " सुहानी घाईघाईत बोलत होती...

" मॅडम तू काय खोटं सांगितलंस आम्हाला, आणि कुठे आहेस आता... ?? तू तुझ्या क्रेडिट कार्ड ने उटीच्या सिटी हॉस्पिटलमध्ये पेमेंट केलंस असं तुझ्या बिल स्टेटमेंटमध्ये दाखवतंय... तू खरखर सांग कुठे आहेस आणि काय झालंय...? तू ठीक आहेस ना?? मग हे हॉस्पिटलंच पेमेंट कसं काय...? मला टेन्शन होतंय तू सांग लवकर नाहीतर हे जे काय आहे ते मी राहुलला सांगेन ...! " रितू तिला जवळजवळ धमकीचं देत म्हणाली...

" अगं शांत हो... सांगते सगळं... कबीर माहितीय का , सिंगर कबीर कपूर त्याच्यासोबत आहे मी... " सुहानीला आता सांगण्याशिवाय पर्यायच नव्हता...

" काय...?? त्याच्यासोबत काय करतेस...? आणि तू त्याला कधी भेटलीस...? काय बोलतेयस मला काही समजतच नाहीए..." रितू प्रश्नांचा भडिमार करत होती... कबीरचं नाव ऐकून तर ती चार फूट वरच उडाली...

" त्यासाठी आधी गप्प बस... सगळं सांगते... मध्ये काहीच विचारायचं नाही, समजलं... एक्च्युली ...." सुहानीने उटीत आल्यापासून जे जे घडलं ते सगळं रितूला सांगितलं... " आता माझ्या कर्माची फळ मलाच भोगावी लागणार ना... म्हणून मी थांबलेय... उद्या निघतेय..." सुहानीने दीर्घ श्वास घेतला...

" अरे बापरे... हे काहीतरीच झालं गं... ठीक आहे तू उद्या ये मग आल्यावर बोलू... पण आत्ता बरा आहे ना तो..." रितू
" हो... एकदम ठणठणीत झालाय... चल..." आतून ग्लास पडल्याचा आवाज येताच सुहानी दचकली...

तिने पटकन आत जाऊन पाहिलं तर कबीर पाणी प्यायला उठला होता... ह्याने काही ऐकलं तर नसेल ना, असं उगाच तिला वाटून गेलं... तिने त्याला बेडवर शांत बसायला सांगितलं आणि हलकीच स्माईल देत स्वतःहून त्याला पाणी दिलं... थोडीशी बाचकतच ती पुन्हा खुर्चीवर येऊन बसली... तो ही पाणी पिऊन पुन्हा बेडवर कलांडला पण आता मात्र त्याचा डोळा लागतंच नव्हता...

कारण जे काही त्याने ऐकलं होतं ते अतिशय विचित्र होतं...
वेडी बाई कुठली...? मला मारून टाकलं असतं हिने... आतातर हिच्यासोबत इथे राहायची पण भीती वाटतेय मला... ही खरंच चेटकीण तर नसेल ना...? असं जीवावर बेतून कोण बदला घेतं काय...? हिने असं का केलं असं विचारायची पण सोय नाही... एकतर मी पूर्णपणे अजून रिकव्हर पण नाही झालोय... हिला जाब विचारला तर मला विषच देऊन मारायची... नको नको... मैत्री केलीय ना, त्याच झोन मध्ये तिला ठेवूया... एकदा सांगितलं पण नाही मला... हम्मम पोलिसांना कळलं असतं तर तिच्यावर आलं असतं ना, मग करिअरची वाट लागली असती... तेव्हाच माझी काळजी घेतेय, आत्ता कुठे सगळं ध्यानात येतंय... एकदा मुंबईला जाऊदे सोडणारच नाही हिला... माझ्यासोबत एवढा मोठा गेम...?? 🤕" त्याला आताच तिथून पळून जावंसं वाटत होतं पण तो हतबल होता...

" कबीर ... कबीर... " सुहानीने त्याला हाक मारत त्याच्या खांद्यावर हात ठेवला... तसा तो दचकून उठला...

" अरे काय झालं इतका घामाघूम का झालायस...? बरं नाही वाटत आहे का तुला...? काय होतंय...? " ती त्याच्या कपाळावर हात ठेवून त्याचं टेम्परेचर चेक करू लागली...
तिचा निरागस चेहरा पाहून क्षणभर त्याला वाटलं " झालं असेल चुकून कदाचित..."

" कबीर कॉफी घेणार का , तुला बरं वाटेल...!! " ती विचारत होती पण तो त्याच्याच विचारात गुंतला होता...

" अं... " ...कॉफीत काही दिलं तर टाकून...?? " नाही नाही..." डोळे गच्च मिटून तो नकारार्थी मान हलवत होता...

तो असा का वागतोय हे तिला कळायलाच मार्ग नव्हता... ती त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्याला म्हणाली...

" कबीर ... काही त्रास होतोय का ...? एखादं वाईट स्वप्न पाहिलंस का...? इकडे बघ... हे बघ मी आहे ना, नको घाबरुस... " तिला आता त्याची खूपच काळजी वाटत होती...

तिचा तो स्पर्श आश्वासक होता पण तरीही आता त्याला तिच्यावर विश्वासच बसत नव्हता... त्याने कॉफी तर घेतलीच नाही, ना त्या रात्री तो जेवायला मागत होता... अचानक तिच्यावरचा त्याचा विश्वासच उडून गेला होता... तो नाही जेवला म्हणून तीही न जेवताच झोपून गेली... इथे मात्र कबिरचा रात्रभर डोळा लागला नव्हता... तो एकटक तिच्याकडेच बघत होता... शंकेची पाल मनात चुकचुकली की काय सत्य काय खोटं हे माणसाला समजतच नसतं किंवा तो समजूनही न समजल्याचा आव आणत असतो...

कसा बसा प्रवास करत दोघेही आपापल्या घरी पोहचले... त्याला एअरपोर्टवरून निरोप देताना सुहानीला भरून आलं होतं... गेला आठवडा ती खूप साऱ्या नवीन आठवणी मनात साठवत जगली होती... ते दिवस, ते क्षण तिच्यासाठी मोलाचे होते... तिच्या आयुष्यात तिने अजून एक विश्वासू मित्र जोडला होता... कबिरचा जेवढा राग ती करत होती, त्यापेक्षा दुपट्टीने तिला तो आवडू लागला होता... त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती कितीतरी वेळ तशीच उभी राहून त्याला बघत होती पण त्याने मात्र एकदाही मागे वळून पाहिलंच नव्हतं... तो निघून गेला...

तिचा मूड भलताच फ्रेश झाला होता... सगळं मोकळं मोकळं वाटत होतं... कबिरच्या आठवणीने ती मनातल्या मनात फुलत होती... पण कबीर मात्र आता तिच्याबद्दल उलटसुलट विचार करू लागला होता... पोलीस स्टेशनला जाऊन तिची कंप्लेन्ट करू का ...? पण त्याला पुरावा काय आहे ना आता...? क्षणभर असेच काही विचार त्याच्या मनात येऊन गेले...

त्याने सर्वात अगोदर घर गाठलं... आईला भेटून तो त्याच्या खोलीत निघून गेला... अंकल रोहनशी बोलू का...? अंकल रोहन त्याला गेले दोन दिवस सतत कॉल करत होते पण आपण खोटं बोलतोय हे त्यांना तेव्हा लगेच कळलं असतं म्हणून तो कोणाचाच फोन तेव्हा घेत नव्हता... आणि आत्ता तिच्याबद्दल कसं काय सांगायचं त्यांना, त्यामुळे त्याला तेही उचित नव्हतं वाटत...

तितक्यात मयंकचा कॉल आला... कबिरने इतके दिवस काय केलं आणि काय झालं ते सगळं त्याला सांगितलं...

" काय रे... खूप डेंजर आहे ती... " मयंक पण हे ऐकुन दोन मिनिटं थक्क झाला...

" मला असं वाटतंय हिच्या नादीचं नको लागायला..." कबीर म्हणाला...

" अरे, इतक्यात कसा काय हार मानू शकतोस तू...? तिला अद्दल घडवायलाच हवी... तुझी आता तिच्याशी मैत्री झालीय ह्याचाच तू फायदा घेऊन तिला धडा शिकव... कबीर कपूर काय चीज आहे ना, हे तिलाही कळू देत... " मयंकने त्याला भडकवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला होता आणि तो फळालाही आला होता... मयंकशी बोलून झाल्यावर तो खूप विचार करू लागला... इर्षेपोटी तो आता कोणतं पाऊल उचलणार होता ते त्यालाच माहीत होतं...

सुहानी मात्र घरी आल्यापासून थोडी व्यस्तच झाली होती... आराम करायची इच्छा असूनही ती घरी न थांबता ऑफिसला गेली... तिला सर्वात अगोदर गाठलं ते रितूने...

" हाय, कसा झाला दौरा...?" रितूने गंमतीने विचारलं...

" खूपच छान, अनबिलिवेबल..." सुहानीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकत होतं...

" हम्म... ते तर हा चेहराच सांगतोय... मस्त फ्रेश वाटतेयस... बाय द वे, राहुलशी काही बोलणं झालं का...?" रितू काहीतरी विचार करत म्हणाली...

" नाही गं... घरी बॅग ठेऊन थेट इकडे आले... थांब त्याला इकडेच बोलावून घेते..." ती ऑफिसच्या इंटरकॉमवरून फोन लावतच होती की तिला रितूने थांबवलं...

" तो अजून आला नाहीए ऑफिसला... आज बाहेरच्या काही मिटींग्स आहेत त्याच्या..." रितू

" ओके... ठीक आहे येईल तेव्हा बोलेन त्याच्याशी... बाकी बोल..." सुहानी

" बाकी काय तूच सांग... काय केलंस एवढे दिवस मग...? " घडलेलं सगळं रितू पुन्हा जाणून घेत होती आणि सुहानीही तिला सगळं सांगत होती त्यावर मात्र तिला एकच शंका येत होती...

" मला एक कळत नाहीए की जर तू त्याला मोशनचं औषध दिलस तर त्याच्या शरीरात पोयझन कस काय पसरलं...? " रितू विचार करत म्हणाली...

" ते मलाही अजून कळलेलं नाहीए... आणि त्यादिवशी तरी मला कबिरच्या जीवापेक्षा काहीच महत्वाचं वाटत नव्हतं..." बोलताना तिला त्यावेळची परिस्थिती दिसू लागली आणि आपसूकच तिचे डोळे पाणावले...

" हे , तू रडतेयस...? " गेल्या काही वर्षात तिने सुहानीच्या डोळ्यात रागाव्यतिरिक्त काहीच नव्हतं पाहिलं... आईच्या तब्येतीमुळे तीही खचत जात होती... तिने तिला जवळ घेत शांत केलं...

आज कबिरमुळे ती हळवी झाली होती... पण तिच्या मनातले हे भाव दयेपोटी होते की त्याच्यावरील प्रेमापोटी हे तिलाही कळत नव्हतं... तिने त्याच वेळी पर्समधील ती बाटली फेकून द्यायला म्हणून काढली... रितूचं त्या बाटलीकडे लक्ष जाताच तिने तिच्या हातून ती काढून घेतली... तिने ती निरखून पाहताच तिच्या एक गोष्ट लक्षात की त्यावरची तारीख एका महिन्यापूर्वीच expire झाली होती... कदाचित त्यामुळेच कबिरला ते भोगावं लागलं असावं... सुहानीने स्वतःच्या हट्टापायी केलेला तो प्लॅन तिला कळून चुकला होता... तिला जेव्हा हे रितूने दाखवलं तेव्हा पुन्हा एकदा तिला धक्का बसला, ती धाडकन खुर्चीवर बसली...

" ह्याची expiry डेट निघून गेलीय, हे माझ्या लक्षात कसं आलं नाही... इतकी मूर्ख आहे मी स्वतःच्या अहंकारासाठी त्याचा जीव धोक्यात टाकला... नाही यार मला त्याला सगळं सांगून त्याची माफी मागायला हवी..." सुहानीने त्याला फोन लावायला घेतला...

तोच रितू तिला थांबवत म्हणाली... " थांब तू असं काहीही करणार नाहीयेस... वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल... आत्ता कुठे तुमची मैत्री झालीय, नंतर वेळ काळ बघूनही हे सगळं सांगता येईल... आत्ताच जर हे सांगितलंस तर तो पुन्हा तुझ्याबद्दल नकारात्मक विचार करेल आणि त्यामुळे फक्त गैरसमज वाढतील..." रितू तिला नीट समजावत होती...

" हो, हे मलाही माहितीय... म्हणून तर मी तिथे असताना त्याला नाही सांगू शकले... पण त्याला इतर कुठून कळलं तर...? " सुहानीला एक ना अनेक प्रश्न सतावत होते...

" अगं, कोण सांगणार... ही गोष्ट फक्त आपल्या दोघींशिवाय कोणालाही माहीत नाहीए आणि आपण सांगायचीही नाही... सध्यातरी झालं ते विसरून जा, त्यातच तुझं भलं आहे..." रितू

" हम्मम..." ती विचारातच होती...

" बाय द वे, पुढच्या काही चित्रपटांसाठी आपण त्याला गायक म्हणून बुक केलं तर...? मागे जे झालं ते आपण तिथेच ठेवू, सध्या ही इज द मोस्ट लिडिंग सिंगर... सो... तुझ्याशी ह्याबद्दल केव्हापासून बोलायचं होतं पण आत्ता तुमची मैत्री झालीच आहे तर तुझ्या सांगण्याने तो आपल्याला डेट्स पण देईल... बघ विचार कर..." रितू तिथून जातच होती की तेवढयात सुहानी म्हणाली...

" विचार काय करायचा त्यात, अग्रीमेंट रेडी कर...☺️" सुहानीने घेतलेला निर्णय ऐकून रितूलाही आनंद झाला... ती तिथून हसतच निघून गेली...

क्रमशः----------◆