agnidivya - 2 books and stories free download online pdf in Marathi

अग्निदिव्य - भाग २

मध्यरात्र उलटून गेली होती. कृष्णा नदीकिनारी मराठ्यांची छावणी थंडीने कुडकुडत होती. गस्तीवाले पथक ठिकठिकाणी शेकोट्या करून ऊब मिळवत होतं. राजांच्या डेऱ्यातील समया अजूनही तेवत होत्या. दोन घटकांच्या समयानंतर नेतोजीराव राजांच्या डेऱ्यातुन बाहेर पडले. पावलं जड झाली होती. तरीही झपझप पावलं टाकत नेतोजी आपल्या डेऱ्यात निघुन गेले.

राजांनी सकाळच्या पहिल्या प्रहरात सर्व सरदारांशी चर्चा करून दोन आघाड्यांवर विजापुरकरांच्या प्रदेशात धुमाकूळ घालत पन्हाळ्याकडे कूच करायचं निश्चित केलं. नेतोजीराव चार पाच हजारांच्या आसपास सैन्य घेऊन एक दिशेने तर उर्वरित दोन हजार राजांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करू लागले.

*****

"खण.. खण.. "
"धडाम.. धुडूम.. "
"हाना.. मारा... "
"काटो... मारो... "
"जय भवानी.. "
"हर हर महादेव... "
"छोडना नहीं आज इन मरहट्टों को ..."

मराठे पूर्ण ताकतीनिशी गडावरून येणाऱ्या आदिलशाही हशमांना तोंड देत होते. पण शत्रू सैन्य संख्येनं भारी होतं. शिवाय, गडावरून बंदुकींचा अविरत मारा चालू होता. तोफा धडाडत होत्या. बाणांचा वर्षाव चालू होता.

तरीही एक शिलेदार मावळ्यांना प्रोत्साहन देत होता. 'हर हर महादेव.. जय भवानी... ', म्हणत शत्रूंवर घणाघाती वार करत होता. भरदार शरीरयष्टी, पल्लेदार मिशा, कानावरचे जाडसर कल्ले, एकमेकांना जुळलेलेच जणू. लालेलाल झालेले मोठाले डोळे, डोक्यावर तांबड्या लाल रंगाचा फेटा, कानात सोनेरी रंगांची गोलाकार बाळी, डाव्या मनगटात सोन्याचा कडा अन हातात ही भली मोठी काळ्या रंगाची ढाल. अन तीन साडे तीन फूट लांब अशी तलवार. तलवार रक्तानं लालेलाल झाली होती. घामानं पूर्ण चेहरा भिजून गेला होता. समोर येणारा सपासप कापत, तो सरदार पुढे सरकत होता. गनिमांच्या रक्तानं अन जागोजागी झालेल्या जखमांनी त्याचा अंगरखा माखून गेला होता. पलीकडच्या बाजूला त्याच्या सारखाच एक उंचापुरा सरदार, त्याच्या मावळ्यांसह गनिमांवर तुटून पडला होता. दोन्ही हातात दोन तलवारी गरगर फिरवत तो एकेकाला धडाधड जमिनीवर लोळवत होता. शत्रू सैन्य मारले जात होते. पण त्यांची संख्या काही कमी होत नव्हती वा ते हटायलाही तयार नव्हते. गडावरून बंदुकीचे बार उडत होते, तोफ गोळे सुटत होते, मावळे धारातीर्थी पडत होते.

त्या धांदलीतही एक मावळा वाट काढत त्या सरदारापाशी येऊन मोठं मोठ्याने ओरडून लागला,

"सुभेदाssssर. सुभेदाssssर... राजांनी बलिवलंय ..."

सुभेदार त्याच्या अंगावर जात ओरडले, "काय रं??????? काय झालं?"

"राजांनी बलिवलंय... लगीच...", तो मावळा.

सुभेदारांनी घोडा फिरवला अन त्या मावळ्या पाठोपाठ दौडू लागले.

सूर्य माथ्यावरून ढळू लागला होता. उन्हं कलू लागली होती. थोड्याच अंतरावर घोड्यावर विराजम राजे अन त्यांच्या बरोबर असलेले दोन तीनशे मावळा दृष्टीपथात पडले. तांबूस काळ्या रंगाच्या घोड्यावर राजे विराजमान झालेले. डोक्यावर शिरस्त्राण, पूर्ण शरीर झाकून जाईल असे चिलखती छातवान, दोन्ही हातात दांडपट्टा, अशा परिपूर्ण लढाईच्या वेशात राजे घोड्यावर होते. पाणीदार बोलके डोळे, धारदार नाक, अन चेहऱ्याला साजेशा धनुष्याकृती मिशा राजांचा रुबाबदारपणा दाखवत होते.

सुभेदारांनी जवळ येताच घोड्यावरून उडी मारली अन राजांना लवून मुजरा केला. त्यांना बघताच राजांनी आपली उजवी भुवई किंचित वर उचलली.

अन आपल्या करारी आवाजात म्हणाले, "काय झालं तानाजीराव ?? गड सर होईल कि नाही आज?"

"राजं.. गनीम लय हाय. आपण फकस्त दिड दोन हजार. निभाव लागणं कठीण. काल रातीच डाव साधला असता तर आता पातूर गडाव अस्तु आपण. आता सरनौबत येस्तोवर अवघड हाय."

"एवढा वेळ नाहीये आपल्याकडे तानाजी... अन त्यांची आशा सोडा आता. यायचं असतं तर दिवस उगवायच्या आधीच आले असते. आणि येसाजी कुठे आहेत?"

"महादरवाजाच्या दिशेला.."

"लगोलग बोलावून घ्या त्यांना. आणि तुम्हीही तुमच्या तुकडीला घेऊन माघारी फिरा. हकनाक मावळ्यांचा जीव आम्ही धोक्यात नाही घालू शकत."

"जी राजं..."

तानाजीने पुन्हा घोड्यावर मांड ठोकली अन लढाईच्या दिशेने दौडू लागले. उरले सुरले मावळे अन राजे त्यांच्या पालखीसह विशाळगडाकडे दौडू लागले.

क्रमशः