agnidivya books and stories free download online pdf in Marathi

अग्निदिव्य - भाग ४

अग्निदिव्य

विशाळगडावर राजांनी राजसदरेवर सरनोबत नेतोजी पालकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. सरनोबत पदाला साजेशी कामगिरी न झाल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले.

राजांना मुजरा न करताच गर्र्कन नेतोजी मागे वळले अन ताडताड चालू लागले. सदरेवरच्या पायऱ्या उतरले अन मागे वळून राजांकडे पाहिलं. राजे अजूनही नेतोजींकडे पाहत होते. डोळ्यांत राग आणि आगतिकता एकत्रच दिसत होती. नेत्र कडा पाण्यानं ओलावल्या होत्या. पण नजर अजूनही तशीच होती. भेदक. यांनतर पुन्हा राजांची भेट होईल न होईल. नेतोजींनी राजांची मूर्ती हृदयात साठवून घेतली. नेतोजींच्या डोळ्यांत किंचित पाणी तरळले.

गहिवरल्या स्वरात नेतोजी म्हणाले,

"राजं... ह्यो शेवटचा मुजरा राजं... "

"आता नेतोजीच्या नावानं पुन्हा मुजरा न्हाई..."

"आता या सवराज्यात नेतोजी पालकर म्हणून पुन्हा पाऊल न्हाई ..."

सदरेवरची सारी मंडळी शांत होती. हे काही घडेल याची कुणी कल्पना वा विचारही केला नव्हता. सुभेदार तानाजी मालुसरे, हे काय विपरीत घडलं म्हणून नेतोजीरावांकडे एक दोन पावलं गेले. तोच त्यांनी हाताने इशारा करत त्यांना थांबवलं.

आपल्या एका शब्दखातर, आपल्यावर असलेल्या विश्वासावर, स्वराज्याप्रति असलेल्या निस्सीम प्रेमाखातर आपले बलिदान द्यायला निघालेल्या नेतोजींकडे राजे अभिमानाने पाहत होते.

नेतोजी काका!

स्वराज्य स्थापने पासून बरोबर असलेले!

अफजल खान प्रसंगी गनिमांची पळताभुई थोडे करणारे!

सिद्दी जौहरचा वेढा फोडण्यासाठी रात्र रात्र जागून जीवाची बाजी लावणारे!

हरेक मोहिमेमध्ये प्रतिशिवाजी म्हणून वावरणारे!

काय काय म्हणून राजे आठवत होते. नेतोजींनी राजांना मुजरा केला. नकळत राजांचा हात हृदयापाशी आला. नेतोजीरावांनी राजांची मूर्ती आपल्या हृदयात साठवून घेतली. त्यांच्या डोळ्यांतून खळकन दोन थेम्ब खाली दगडी पायरीवर पडले.

एक राजांसाठी... अन एक स्वराज्यासाठी...

सदर रिकामी झाली. बराच वेळ राजे एकटेच आसनावर बसले होते. थाळ्यासाठी हुजऱ्या किती वेळा येऊन गेला, त्याकडेही राजांचं लक्ष नव्हतं. स्वराज्यासाठी अजून किती जणांना आहुती द्यावी लागणार आहे. याच विचारात राजे आसनावर बसले. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. राजांनी मोठ्या कष्टाने अश्रू आवरले. तानाजी, येसाजी यांनी नेतोजीरावांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. झाल्या चुकीची राजांकडे आम्ही मनधरणी करू पर असा तडकाफडकी काही चुकीचा निर्णय घेऊ नका. म्हणून नेतोजीरावांना खूप विनवण्या केल्या. पण त्यांनी आपला हेका सोडला नाही.

आपणाकडून आगळीक झाली होती. आणि त्याची भरपाई मावळ्यांच्या जीवाशी आणि खुद्द राजांच्या पराभवात झाली होती. आजपर्यंतच्या मोहिमांमध्ये असा मार, अशी माघार राजांनी कधीही घेतली नव्हती, कधीही पाहिली नव्हती. आपल्याला यायला उशीर झाला खरा पण कोकणातील आदिशाही ठाणं मारून बक्कळ पैसा हाती लागला होता. त्याच्या नादात राजांना कुमक करण्यासाठी उशीर झाला, हे कारण देणं कधीही रास्त नाही. सबब, नेतोजी शांतच राहिले.

मुक्कामाच्या ठिकाणी येताच नेतोजीरावांनी बिछान्यावर अंग टाकून दिलं. खोलीचे दरवाजे बंद करून घेतले ते थळ्यालाही उघडले नाहीत. मध्यरात्री कधीतरी नाईक त्यांना भेटून गेले. राजांचा निरोप मिळताच नेतोजीराव सुन्न झाले. ठरलेली मसलत आता कोणत्याही परिस्थितीत तडीस न्यायला पाहिजे, त्याशिवाय गत्यंतरच नाही. नाहीतरी आता कुडतोजीरावांना सारनोबती दिली होती. स्वराज्यात आपलं स्थानही आता उरलं नव्हतं.

पलंगावर पहुडलेले नेतोजीराव एक एक प्रसंग आठवू पाहत होते. डोळ्यांवरची झोप कधीच उडाली होती. राहून राहून पुनः पुन्हा मागच्या गोष्टी भरभर डोळ्यांसमोरून फिरू लागल्या.

'राजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये मी सॊबत असायचो. प्रतापगडाच्या रणसंग्रामात अफजखानाच्या सैन्याची उडवलेली दाणादाण! त्यानंतर सात आठ महिने आदिशहाचे प्रदेश, किल्ले जिंकण्याची अविरत मोहीम. जौहरचा वेढा मोडून काढण्याचा प्रयत्न. शाहिस्तेखानावर टाकलेला छापा. बुर्हाणपूरची लूट! आणि पुरंदरचा तह! काय काय म्हणून आठवू!'

'ज्या ज्या किल्ल्यावर, प्रदेशावर मोहीम निघायची. तो तो किल्ला, प्रदेश स्वराज्यात सामील झालाच म्हणून समजा.! हार कधी नाहीच. पराजय कधी नाहीच. प्रत्येक मोहिमेमध्ये राजांची सावली बनून त्यांच्या बरोबर राहायचो. त्यांची प्रतिकृतीच जणू! माझा पराक्रम, लढाईतलं कसब, रणनीती पाहून स्वराजातील लोकंच काय तर मोगल, आदिलशाही सुद्धा आम्हाला प्रतिशिवाजी म्हणून ओळखू लागली होती! स्वराज्याचे दुसरे सेनापती! सरनौबत नेतोजी पालकर!'

हात पाठीमागे बांधून आपल्याच विचारांच्या तंद्रीत नेतोजी खोलीमध्ये येरझाऱ्या घालत होते.

रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात बहिर्जी हातात मिणमिणता कंदील घेऊन राजांच्या वाड्यातून बाहेर पडला. ते थेट नेतोजींच्या मुक्कामाचं ठिकाण गाठलं. एकजण वर्दी देण्यासाठी पुढे जाऊ लागला तोच बहिर्जीने त्याला थांबवलं. नेतोजींच्या खोलीच्या दाराजवळ जाऊन कानोसा घेतला. दारावर हलकेच थाप दिली. आतून काहीच हालचाल जाणवली नाही. पुन्हा दारावर थाप मारून बहिर्जीने साद घातली.

"नेतोजीराव... राजांचा सांगावा घिऊन आलुयं..."

दारामागचा ओळखीचा आवाज आणि राजांचा सांगावा! आत्ता...! या वक्ताला...! नेतोजींच्या मनात चलबिचल होऊ लागली. आता कुणाशीच बोलायची इच्छा नव्हती पण बाहेर नाईक येऊ थांबल्यात म्हटल्यावर त्यांनी पुढे होऊन हळूच दार किलकिले केले. आत येत बहिर्जीने पटकन दार कोयंडा लावून बंद केले. नेतोजीराव पलंगावर जाऊन बसले.

"बोला... नाईक, अजून काय वाढून ठेवलंय आमच्यासमोर...?"

"नेतोजीराव... वाईट वाटून घेऊन नका... वेळ वाईट आहे दुसरं काय...!"

"हम्म...", नेतोजींनी सुस्कारा सोडला.

"आता, सावध होऊन ऐका. राजं म्हणलं, कि आता ज्ये झालं त्ये झालं... इचार करण्यात काय हशील न्हाई... आता असंच फुडं चालू द्या..."

"मतलब...?"

"म्हंजी, आपलं आधी जे ठरलं हाय त्ये तसंच फुडं ठरल्या परमानं होऊ द्या... आई भवानी तुमच्या पाठीशी आहेच. शिवाय, तुम्हाला लागेल ती मदत..."

"ठीक...", बहिर्जीला मधेच तोडत नेताजी पलंगावरून उठले. "हा वक्त एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं...!"

गवाक्षातून आकशातलं चांदणं पाहणाऱ्या नेतोजींकडे पाहत बहिर्जी म्हणाला,

"वकुत कदी काय करायला लावल, काय भरोसा न्हाई..."

जवळ जात नेतोजींच्या खांद्यावर हात ठेवत बहिर्जी म्हणाला,

"सावध असा... येतो म्या...", बहिर्जीचा कातर स्वर नेतोजींच्या कानी पडला. ते मागे वळले. डोळे अश्रूंनी डबडबले होते. आवेगाने त्यांनी बहिर्जीला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतील अश्रू एकमेकांच्या खांद्यावर ओघळू लागले. न जाणे पुन्हा भेट होईल न होईल!

पहाटेचा गार वारा तलावाच्या आजूबाजूला हात पाय पसरत होता. पूर्वेकडून तांबडा नारंगी प्रकाश फाकू लागला. हळूहळू धुक्याची चादर लुप्त होऊ लागली. सूर्याची किरणे धीम्या गतीने गडाच्या तटा बुरुजांवर पडू लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाचा चौघडा आसमंतात घुमू लागला. कोकीळ पक्ष्याचं मंजुळ आरव आणि मधूनच मोराचं म्याऊ म्याऊ...!

पहाटेचा कोंबडा आरवायच्या आधीच बहिर्जी पुन्हा नेतोजीरावांना भेटून गेला. नेसरीच्या खिंडी पल्याड आदिलशाही सरदार रुस्तुमेजमा ठाण मांडून बसला होता. न जाणे मराठे इकडूनही आदिलशाही मुलखावर आक्रमण करतील! बहिर्जीने आधीच खबर त्याच्यापर्यंत पोहोचेल अशी तजवीज करून ठेवली होती. शिवाय, नेतोजींसोबत त्यांचा एक स्वारही पाठवून दिला. गडाचे दरवाजे उघडताच तोफेचा बार उडाला. कोकण दरवाजा मार्गे नेतोजीरावांनी त्यांच्या सात आठ विश्वासू सवंगड्यांसह गड सोडला. स्वराज्यासाठी खेळला जाणारा हा डाव नेतोजीरावांसाठी मात्र एक अग्निदिव्यच होते!

***

इतिहासातील काही गोष्टी काळानुरूप गडप होत जातात. ज्याची उत्तरं फक्त इतिहासालाच माहिती असतात. आपण फक्त तर्क आणि अनुमान लावू शकतो. जसं जसं काळ पुढे सरकत जातो तसे इतिहास त्याची गुपिते हळू हळू आपल्यासमोर उघड करत जातो.


नेतोजींना पन्हाळ्याच्या पायथ्याशी राजांना येऊन मिळायला उशीर का झाला?


एक तर नेतोजींनी यायला उशीर का केला? कि मुद्दाम केला?


राजांना याची कल्पना होती का?


आपल्याकडे खूपच कमी शिबंदी आहे. तरीही त्यांनी फक्त दिड दोन हजार मावळ्यांनिशी गडावर कशी काय चढाई केली?


शेवटी माघार घ्यावी तर लागली. शिवाय, पाच सातशे मावळा कामी आला.नक्की खरंच.. एवढे मावळे कामी आले का?


कि राजांनी फक्त मिर्जा राजांना हि बातमी कळण्यासाठी आवई उठवली?


नेताजींची खरंच स्वराज्यातून हकालपट्टी झाली का?


की मिर्झाराजेंच्या आक्रमणापासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी, शिवरायांनी काही वेगळीच खेळी खेळली?


|| जय शिवराय ||