parvad - 15 books and stories free download online pdf in Marathi

परवड भाग १५

भाग १५

अशी नाटके करण्यात मुळातच पटाईत असलेल्या सुनंदाने आपल्या आवाजाची पट्टी अशी काही वाढवली होती की वसंता रडणे थांबवून एकदम चिडीचूप बसला.

त्याला आता वाटायला लागले की आपलीच चूक झालीये !

तो निपचित पडून विचार करू लागला....

तसंही नियतीने आपल्याला जन्माला घालूनच खूप मोठी चूक केल्याची भावना त्याच्या मनात वाढू लागलेली होती.

"आपण या जन्मात तरी कुणाचे काही वाईट केलेले नाही;पण नक्कीच आपल्या पूर्वजन्मात आपल्या हातून काही तरी महापातक घडलेलं असणार आहे त्याचे फळ म्हणूनच आपल्या आयुष्यात एकापाठोपाठ एक अशा विचित्र गोष्टी घडत आहेत.माझ्या बरोबर माझ्या वडिलांनाही खूप काही भोगावे लागते आहे.त्यांनी नेहमी माझ्या हितासाठीच निर्णय घेतले;पण नियतीने टाकलेला प्रत्येक फासा बापलेकांच्या गळ्यातला फास होऊन जीवन अधिकच अवघड करतो आहे हे मात्र खरं आहे...."
वसंताचे रडणे,घरातल्या सामानाची वाताहत आणि सुनंदाचे अनपेक्षित आकांडतांडव ऐकून अरविंदाचे डोके सुन्न झाले होते....

आपल्या घरात नक्की काय घडते आहे ते त्याला समजेना!
“.
वसंतावर सावत्र मुलगा असूनही जीवापाड प्रेम करणारी,त्याला वेळेवर खाऊपिऊ घालणारी आपली प्रिय सुनंदा अचानक अशी का बोलतेय? नक्कीच वसंता दिवसभर तिला त्रास देत असणार! खरं तर लग्न झाल्यापासून एकदाही तिने वसंताबद्दल काही तक्रार केलेली नव्हती.मला त्रास होऊ नये म्हणून कदाचित ती एकटीच सगळ निस्तरत होती!

चेहऱ्यावर हास्य ठेवून ती संसार करते आहे; किती सोशिक आहे सुनंदा!
आपला दुर्दैवी अंध मुलगा वसंता शांत आणि समझदार आहे असे तो मोठ्या कौतुकाने लोकांना सांगायचा;पण त्याने त्याचा घोर अपेक्षाभंग केला होता!गुणवंता आणि शालूच्या बाबतीतसुद्धा आपण फक्त वसंताची बाजू खरी मानली.नक्कीच तिथेही वसंताची चूक असेल!"

त्याला आता आपल्या प्रिय पत्नीबद्दल अपार करुणा वाटू लागली....
किती सहन केलं असेल एकट्या सुनंदाने,बिचारी!
गुणवंताची बायकोही त्यावेळी वसंताबद्दल काहीबाही बोलत होती; पण आपण लक्ष दिले नव्हते, ती सांगत होती तेही खरे असले पाहिजे!

प्रचंड अपेक्षाभंग झाल्याने डोके दोन्ही हातात गच्च पकडून अरविंदा बधिरपणे विचार करत होता. सुनंदा पुन्हा एकदा कडाडली...

पुन्हा सांगते 'आजपासून या आंधळ्याला मी सांभाळणार नाही, सोडून या कुठंही! माझ्यासमोर ह्याच तोंड दिसायला नको! तो जोपर्यंतया या घरात आहे तोपर्यंत मी या घरात येणार नाही!

सुनंदा हे फक्त बोललीच नाही तर तिने राहूलचा हात पकडला आणि तरातरा घराबाहेर पडली.
अरविंदासमोर मोठे धर्मसंकट उभे राहीले. एका बाजूला असाहाय्य आंधळा मुलगा तर दुसरीकडे त्याची लाडकी बायको होती.

तो सुन्न झाला होता नियतीने त्याचा डाव पुन्हा बिघडवला होता!
वसंता एका कोपऱ्यात बसून थरथरत होता.आपली नवी आई आपला दुस्वास करते हे त्याला आता अंगवळणी पडले होते, त्याने आजपर्यंत याबद्दल तोंडातून एक शब्द काढला नव्हता:पण ती एवढ्या टोकाला जाईल याची त्याला कल्पना नव्हती.
पुढे काय होणार या विचाराने तो घाबरून गेला होता..........

सुनंदा राहुलला घेउन तरातरा घराबाहेर पडली.तिचा तो त्राटीकेचा अवतार बघून अरविंदाला तिला आडवायचे धैर्य झाले नाही.

तो आपले डोके दोन्ही हातात गच्च दाबून सुनंदा गेलेल्या दिशेकडे वेड्यासारखा बघत राहीला.वसंता अजूनही कोपऱ्यात थरथरत उभा होता.दोघेही एकमेकांशी एकही शब्द न बोलता बसून राहिले.
त्या दिवशी कुणालाही जेवणाची आठवण झाली नाही.

इकडे वसंता मूकपणे अश्रू ढाळत होता, तर एका बाजूला अरविंदा आतल्या आत रडत होता.
माझ्या बाबतीतच हे का घडतंय? मी असा काय गुन्हा केलाय की पुन्हा पुन्हा नियती माझ्यासमोर एकामागोमाग एक संकटे उभी करते आहे? मी मांडलेला प्रत्येक डाव का उधळला जातोय? का? का?”
अरविंदाच्या डोक्यात प्रश्नांची वादळे उठत होती.त्याच्या कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळण्याची अजिबात शक्यता नसतानाही तो एकामागून एक प्रश्न स्वत:ला विचारत होता.अख्खी रात्र तो तळमळत राहिला...
सकाळ होताच अरविंदाने ठरवले सुनंदाला घरी आणायला जायचे!

कसेही करून तिची समजूत काढायची!

वेळ आली तर वसंताला बाहेर घालवायचं...

आता सुनंदाकडून मिळत असलेल्या शरीरसुखाला चटावलेल्या अरविंदांच्या आत दडलेल्या कामातुर नराने त्याच्यातल्या प्रेमळ पित्याला हरवलं होतं...

(क्रमश:)

©प्रल्हाद दुधाळ, पुणे 9423012020.