Saubhagyavati - 1 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | सौभाग्य व ती! - 1

Featured Books
Categories
Share

सौभाग्य व ती! - 1

१) सौभाग्य व ती !
वैशाख पौर्णिमेची रात्र. दहा वाजत होते. चंद वरवर येत होता. स्वच्छ चांदणं पृथ्वीवर पसरलं होतं. त्या चांदण्यात पृथ्वीवरील सजीव आनंदाने नाहत होते. चित्कारत होते. ती नगरीही चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशाने पूर्ण आनंदली होती. त्या शहरात वतनदारांचा एक मोठा वाडा होता. त्या वाड्यातील लग्नाची घाई संपली होती. वाड्यामध्ये वाजतगाजत आलेली नयन वाड्यातल्या एका खोलीमध्ये सजूनधजून बसली होती. नवीन पैठणी, फुलांचा गजरा लेवून ती पलंगावर बसून तिच्या जीवनसाथीची, सर्वस्वाची, दैवताची वाट पाहात होती. त्या क्षणापर्यंत वीस वर्षे साभाळलेलं, तारुण्याने डबडबलेलं फूल ती त्या रात्री तिच्या दैवताला अर्पण करणार होती. वैवाहिक जीवनातील पहिली रात्र...मधुचंद्र! हनिमून!! किती किती स्वप्नं बघितले होती. तो काळ जरी बालविवाहाचा असला तरी तिचे माहेर सुसंस्कृत असल्यामुळे तिला पदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली होती.
शिक्षणासाठी तिला मोठ्या शहरात जाणे-येणे करावे लागले. गावात तिला फारश्या मैत्रिणी नसल्या तरी वर्गातल्या मैत्रिणीशी तिच्या गप्पा नेहमीच रंगत असत. त्यात एक विषय असे तो म्हणजे भावी जीवनसाथीचा आणि हनिमुनचाही! वास्तविक त्या मुलींना तशा ठिकाणांचा पत्ता नव्हता परंतु कुठे तरी दूर जाऊन चांगली मज्जा करावी. वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या काही रात्री जवळपास दुसरे कुणी नसावे. तिने रोज रात्री त्याची पलंगावर वाट पहावी. त्याने हळूच आत यावं, तिच्या शेजारी बसून तिला हलकेच स्पर्श करावा...तो त्याचा स्पर्श! त्या स्पर्शाने तिला वेडं कराव. एक-एक फुल हारामध्ये ओवण्यासाठी उचलावं तसे त्याने तिला हलकेच स्पर्श करावा. तिने मूक संमती देण्यापूर्वीच त्याची कणखर मिठी तिच्या शरीराभोवती पडावी आणि त्याने तिच्याशी एकरुप व्हावे...दोघांचे अस्तित्व एक व्हावे. साऱ्या चेतना एकत्र याव्यात...
नयन स्वप्नावस्थेत असताना दाराचा 'खाडकन' आवाज झाला. तशी ती दचकली. कुणी तरी जोराने दार ढकलले होते. दार उघडताच वाऱ्याच्या झोकासोबतच एक वेगळाच गंध खोलीत शिरला. तो-तो वास नयनसाठी नवा नव्हता. तो सुवास होता 'मदिरेचा!' संध्याकाळी भाऊंना भेटायला येणारी माणसं, कॉलेजात जाताना-येतांना रस्त्याने, मोटारीत असणाऱ्या अनेक व्यक्ती तशाच वासाने बरबटलेल्या असत. पण मग खोलीमध्ये तो वास कसा? कोण असेल तो? तिचं.. तिचं.. सर्वस्व तर नसेल?...
"ए-ए-हऽ राऽ म... " कुणी तरी व्यक्ती ओरडत आत आली. तशी भयभीत हरिणीप्रमाणे उडी मारत नयन पलंगाच्या दुसऱ्या बाजूस गेली. तिने पाहिलं समोर तोच होता..तिचे दैवत...सदाशिव! त्यापूर्वी तिने सदाशिवला लग्नात हार घालतानाच पाहिलं होतं. परंतु ते राजबिंड रुप त्याच क्षणी तिच्या हृदयी विराजमान झाले होते. त्या रुपाशी तिने नेहमीच आत्मिक संवाद साधला होता. त्यावेळी खोलीत प्रवेश केलेला तो-तो-तोच होता...सदाशिव! पण त्याचे ते रूप? सदाशिवसोबत लग्नानंतर तिने पहिला प्रवास केला होता. त्या स्पर्शाने ती कावरीबावरी झाली असताना तिने त्याच्या शरीरापासून येणारा गंधही अनुभवला होता. या दोन्ही गोष्टी..तो स्पर्श, तो सुवास मनामध्ये जन्मोजन्मीचा ठेवा म्हणून जतन करून ठेवलेला असताना तो कुठे लुप्त झाला? सदाशिव जवळ येऊ लागला. त्याची चाल आणि नजर वेगळीच भाषा बोलत होती. सावजाचा वेध घेत नयन जवळ सरकत सदाशिव म्हणाला, "पळून कुठे जाणार? चल, ये..."
सदाशिवला प्यालेल्या अवस्थेत बघून तिला प्रचंड धक्का बसला. तिचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. स्वप्नाने आकार घेण्यापूर्वीच जणू तिची झोपमोड झाली. तो जवळ येत असताना तिने विचारले,
"हे काय ? तुम्ही..."
"हो. मी प्यालोय. तुला काय करायचं? मी तुझा नवरा. बरोबर? तुझा मालक... मी काहीही करीन तुला..."
"नाऽही. जवळ येवू नका. तुमची बायको..."
"मी कुठे नाकारतो? बरे झाले, तुला मी तुझा नवरा असल्याचे आठवले आता बायकोप्रमाणे वाग. मी म्हणेन तसे..." असे म्हणत तो नयनकडे सरकला.
"थांबा. पुढे येऊ नका. माझ्याशी असं वागू नका..." नयन विनवणी करीत असतानाही तो पुढे सरकत असलेला पाहून नयन पुन्हा ओरडली,
"थांबा. पाऊल पुढे टाकू नका. माझ्या अंगाला हात लावू नका."
"काऽय? तुझ्या... माझ्या लग्नाच्या बायकोला हात लावू नको. मग काय तुझ्या बापाच्या अंगाला हात लावू? तुझ्या शरीरावर माझा अधिकार आहे. या शरीराचा भोग घेणे हा माझा हक्क तू कसा हिरावू शकतेस?..." असे विचारत सदाशिव नयनवर तुटून पडला. खाटकाने शेळीच्या अंगावरील कातडी ओढून काढावी त्याप्रमाणे त्याने तिच्या शरीरावरची वस्त्रे ओरबाडून काढली...
नयनने पाहिलेले पहिल्या रात्रीचे स्वप्न अशारीतीने दुभंगले... तडकले. त्या नाजूक संबंधात तशी वेदनामयी भेग निर्माण झाली....कधीच न मिळून येणारी...
दुसरीकडे सदाशिव मात्र स्वतःचा हक्क चोख बजावत प्रचंड समाधानी होता मात्र त्याच्या प्रत्येक कृतीमुळे ती क्षणोक्षणी दुःखाच्या, वेदेनेच्या डोंगराखाली दबली जात होती. काही क्षण राक्षसीवृत्तीने संभोग करून, नयनला हजारो दंश करून सदाशिव बाजूला झाला आणि चक्क घोरू लागला. तळमणाऱ्या... शारीरिक इजेपेक्षाही मानसिक धक्क्याने दुःखी झालेल्या नयनला त्या अवस्थेतही कुठेतरी वाचलले आठवले की संभोग म्हणजे कार्यरत असणाऱ्यांना समान मिळणारा आनंद! आनंदाने विभोर करणारे क्षण म्हणजे संभोग परंतु त्यावेळी जे घडले...त्यामुळे तिचे सर्वस्व अक्षरशः लुबाडले गेले. तिचे स्वप्न तसे दुभंगवणाऱ्या त्या प्रसंगास संभोग कसा म्हणावा? तिला त्यात काय मिळालं? फक्त दुःख आणि विषारी दंश, कदाचित तिच्या दुःखामध्ये त्याला त्याचं सुख गवसलं असावं. तो समाधानात घोरत असताना ती मात्र वेदनांमुळे तळमळत होती. किती स्वप्न उराशी बाळगून तिने त्या वाड्यामध्ये... त्या खोलीमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिच्या हृदयात बसलेला
राजकुमार वेगळा असा राजबिंडा राजकुमार होता. तो तिला सापडला होता... लग्नात एकमेकांना हार घालताना...
'कुर्यात सदा मंगलम...' भटजींनी शेवटचे मंगलाष्टक म्हटलं आणि उपस्थितांनी अक्षता वधुवराच्या दिशेने फेकल्या. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच गजरात नयनने नवरदेवाला हार घातला. त्यावेळी तिने एक कटाक्ष सदाशिवकडे टाकला आणि ती हर्षोल्लीसीत झाली कारण तिचा पती म्हणजे सौंदर्याचा... मदनाचा पुतळा होता. नवरदेवाच्या पोशाखात समोर असलेले ते राजबिंडे रूप नयनच्या मनावर आणि हृदयावर कायमचे कोरले गेले. जीवन आणि स्वप्न सार्थक झाल्याच्या हर्षोन्मादात ती दिवसभर होमहवन आणि इतर कार्यक्रमास सामोरी गेली. प्रसंगोपात सदाच्या होणाऱ्या स्पर्शामध्ये ती स्वतःलाच विसरत होती.
मांडवामध्ये नयनकडील जमलेल्या मंडळीमध्ये तिचे काका- काकू, आत्या- मामा, मावशी-काका अशा नात्यांमधली मंडळी जमली असल्यामुळे साहजिकच हास्याचे फवारे उडत होते. तिच्या वयाची अनेक नातलग मुलं-मुलीही तिच्याभोवती कोंडाळे करून सतत नयनला हसविण्याचा प्रयत्न करीत होती. त्या सर्वांमध्ये होता बाळू.. तिचा आतेभाऊ! एक चालता बोलता विनोद! परंतु त्या दिवशी तो उदास होता. नयन जाणार ह्या कल्पनेनेच तो हिरमुसला होता. दोघेही एकाच वयाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते दृढ झाले होते. आता यापुढे घरामध्ये नयन नसणार या जाणिवेने तो उदास झाला होता. सर्वांमध्ये असूनही बाळू कसा एकटाच वाटत होता.
लग्नविधीचे एकेक कार्यक्रम आटोपत होते. लन समारंभातली विशेष पंगत म्हणजे विहीण पंगत! शाळेतल्या राष्ट्रगीताप्रमाणे महत्त्वाची नि अनिवार्य! या विशेष पंगतीला संगिताचीही साथ असे. नयनची विहीण पंगत बसली. या पंगतीमध्ये नवरा-नवरीने एकमेकांना घास भरवताना काव्यात्मक नाव घेणे हा सोपस्कारही पार पडला. ती पंगत ऐन रंगात येताच सर्वांना तोंडी लावण्यासाठी, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणण्यासाठी आणि जेवणारांचे हात थांबविण्यासाठीचे विशेष प्रयोजन म्हणजे... विहीण म्हणणे...
'निघाले आज तिकडच्या घरी... ' स्वतःला जणू लता मंगेशकर समजून एका वऱ्हाडणीने विहीण म्हणावयास सुरुवात केली आणि सकाळपासून खदखदणारा मांडव क्षणात गदगद् झाला. मांडवातील प्रत्येकाचे डोळे पाणावले. काहीचे डोळे पाझरले तर अनेकांनी पराकोटीचे प्रयत्न करून पाणी डोळ्यातच जिरवले. त्यामुळे काय झाले तर प्रत्येकाचेच जेवण अर्धवट झाले आणि विहीण पंगतीची आणि लग्नविधींची सांगता झाली. पाठोपाठ सामान आणि वऱ्हाडी बसमध्ये जाऊन बसू लागले. नयनने रडतरडत माहेरच्यांचा निरोप घेतला. आईचा निरोप घेताना तिला प्रचंड भडभडून आलं. दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. काही क्षणानंतर नयनच्या मामांनी पुढाकार घेतला. नयनला बळेबळेच आईपासून दूर करीत मोटारीत बसविले. वाहक जणू त्याच क्षणाची वाट पाहत होता. बससमोर वाजत असलेला बँड हळूहळू पुढे सरकत होता. ज्या बाजूने नयन बसली होती त्या बाजूने सारे नातेवाईक मोटारीसोबत पुढे सरकत होते.... शेवटी गावाची वेस आली... लक्ष्मणरेषा आली... बँडवाले बाजूला होताच बसचा वेग वाढला. साश्रू नयनला हलणारे हात दिसत होते. तिचे हुंदके वाढले तसा वातावरणातला अंधारही!
त्या अंधारात एका वेगळ्याच स्पर्शने ती भारावून जात होती, स्वतःला विसरत होती. तो हवाहवासा, वेडा करणारा स्पर्श होता तिच्या सर्वस्वाचा....दैवताचा नि तिच्या राजकुमाराचा! त्या स्पर्शामुळे ती सारे जग विसरत होती. तो प्रवास संपूच नाही असे तिला वाटत होते. किती फरक असतो ना, ज्यांनी तरुण होईपर्यंत सांभाळलं, स्वतःचा क्षण न क्षण आणि घासातला घास दिला तोअनेक वर्षांचा सहवास, त्या आठवणी त्या स्पर्शाने काही क्षणातच विरळ व्हाव्यात? का? का? त्या स्पर्शाच्या ओढीने तिने तिची मान त्या मजबूत खांद्यावर टेकवली आणि डोळे मिटले...
एकच गडबड झाली. मोटारीतले दिवे लागले तशी गोंधळलेल्या अवस्थेत नयन उठली. तिचे सासर आले. तिचे घर, तिचे सर्वस्व, तिची रंगभूमी आली. रंगभूमी? होय. रंगभूमीच नाही का? तिच्या जीवनातला नंतरचा 'अंक' त्या सासर नावाच्या रंगमंचावर सुरू होणार होता. शेवटी जीवन म्हणजे काय? एक नाटकच ना? वेगवेगळ्या व्यासपीठावर, त्या घरात वावरणारी सारी मंडळी म्हणजे कलाकारच ना! नवीन नाटकाच्या प्रवेशाच्या वेळी जसं नारळ फोडतात तसेच या जिवंत रंगभूमीवर प्रवेश घेताना उंबरठ्यावरचे माप ओलांडावे लागते. या मागचा उद्देश तो काय असावा? मापाला लाथाडणं म्हणजे तोपर्यंतच्या आळसाला, स्वच्छंदी जीवनाला दूर सारून चूल आणि मुल हे नवीन, परंपरागत सूत्र स्वीकारणे तर नाही ना? माप लाथाडणे म्हणजे तोपर्यंतची सारी नाती बाजूला करीत नवीन नाती स्वीकारणे तर नाही ना? नयनला असे विचार करायला वेळ तरी कुठे होता? पतीशेजारी अवघडून बसलेली नयन लक्ष्मीपूजन आटोपत होती.
"आक्शी लक्ष्मी हाय रे सद्या..." सासूच्या पाया पडत असताना ती म्हणाली...
"सदा.... ये सदा...सुनबाई..." कुणीतरी खोलीचे दार बडवत होते. नयनने डोळे उघडून आजूबाजूला पाहिले. खिडकीच्या फटीतून बाहेर फटफटलेले दिसत होते. म्हणजे नयन चक्क रात्रभर जागी होती. वेदनेने तळमळत होती. तिने बाजूला पाहिलं... सदा...तिचा पती स्वत.चा हक्क वसूल करून शेजारी घोरत होता... तिची पहिली रात्र...तिच्यासाठी काळरात्र ठरली होती. त्या रात्री तिच्या स्वप्नांवर तिच्याच पतीने घाला घातला होता...
"ये सुनबाई, अग, उठतेस ना?" पुन्हा सासुचा आवाज आला तशी नयन पलंगाच्या खाली उतरली. कपडे, केस व्यवस्थित करून ती सौभाग्यवती पतीच्या निद्रीत साक्षीने आणि सतीच्या चालीने खोलीबाहेर पडली...
००००