Saubhagyavati - 3 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 3

३) सौभाग्य व ती !
बाळंतपणासाठी माहेरी आलेली नयन स्वयंपाकघरात चुलीपुढे बसी होती. तिची आई भाकरी करीत होती. चुलीतल्या जाळावर तवा गरम होत होता. तापलेल्या तव्यावर भाकरी भाजल्या जात होत्या. घरात कुणी नाही, तवा तापलाय तेव्हा आपणही... या विचारात ती आईला म्हणाली, "आई... ए.. आई..."
"काय ग? काय खावे वाटते तुला? काही करू का?"
"तसे नाही..."
"नैने, तुला माहेरी येवून अजून चार तासही झाले नाहीत तर तुला त्यांची आठवण... थकलीस का? जरा पडतेस का? भाकरी झाली की मी बोलावते तुला."
"आई, कसं सांगू तुला?..." असे म्हणणाऱ्या नयनच्या डोळ्यातले पाणी पाहून आईने भाकरी थापवायचं थांबवलं आणि किंचित पुढे सरकत वेगळ्याच शंकंने विचारले,
"का ग सासू फार..."
"नाही. देवाशिवाय त्यांचे लक्ष कुणीकडेच नसते.
"मग जावईबापू त्रास देतात का?"
"हो... रोजच रात्री..."
"नैने, अग तू आई होणारेस. आता गंमत..."
"आई, गंमत नाही गं..." असे म्हणत नयनने स्वतःचे हात पुढे केले. गोऱ्यापान शरीरावर जळाल्याचे अनेक काळसर गोल टिकले पाहून आईने भीतीने थरथरत विचारले,
"हे-हे काय?"
"हेच ते तुझ्या जावयाचं प्रेम. जळत्या सिगारेटने..."
"नाऽही..." असं म्हणत आईने डोळे मिटले. नयनने रडतरडत सारा त्रास आणि प्रभा प्रकरणही सांगितले.
"हे बघ, तुला होणारा त्रास दिसतोच आहे पण बाईचा जन्मच मुळी अशा भोगांसाठी आहे. परंतु... ते... त्यांचे संबंध बाहेर असतीलही पण प्रत्यक्ष मामीसोबत संबंध...शि शी...कल्पना करवत नाही..." तव्यावरची भाकरी करपून काळीभोर झाली. तिचा वास साऱ्या घरात पसरला. तो वास त्या दोन जीवाच्या आईस सहन झाला नाही. ती बाहेर आली. काही वेळाने नयनचे वडील... भाऊ बाहेरून आले. ते जेवत असताना आई-भाऊंचा संवाद शेजारच्या खोलीत लोळणाऱ्या नयनने ऐकला...
"मी काय म्हणते?"
"हो. बोला. ऐकतोय." भाऊ म्हणाले.
"अहो, नैनीकडे बघा..."आई म्हणाली..
"आता तिच्याकडे काय पाहायचे? वतनदारांच्या घरी दिलंय. शिवाय तुम्हाला आजी म्हणून मिरवायची..."
"अहो, जावई त्रास देतात म्हणे. सिगारेटचे चटके..."
"तुला नैनीचा स्वभाव माहिती नाही का? अति राग आणि भीक माग. हीच बोलत असेल..."
"अहो, प्रत्यक्ष नात्याने मामी असलेल्या बाईसोबत..."
"चूऽप! हीच मुर्ख आहे. पराचा कावळा करत असेल. काही झाले तरी मामीशी संबंध..." भाऊ बोलत असताना धुणे धुऊन नयनची काकी आणि बहिणी परतल्या...
नयन आल्याचे समजताच बहिणी धावतच तिच्याकडे आल्या. आई-भाऊंपुरता तो विषय तिथेच संपला. नंतर 'चटका' प्रकरणी भाऊंनी नयनकडे साधी चौकशीही केली नाही. आईने काकीनांही सांगितले परंतु तिनेही नयनलाच दोषी ठरवलं. अण्णा व भाऊ दोघेही आपापल्याच व्यापात दंग असत. एकत्रित कुटुंबाच्या शेतीचा कारभार अण्णांकडे तर इतर कामे भाऊंकडे! तालुक्यात कुणाकडे नसेल एवढी जमीन त्यांच्याकडे होती परंतु अण्णा-भाऊंचे विशेष लक्ष नसल्यामुळे आणि उधळपट्टीमुळे बरीचशी जमीन विकली गेली होती. त्यातून आलेल्या रक्कमेतून दोन बहिणींचे लग्न तसेच नयनचेही लग्न पार पाडले असे दोघे भाऊ अभिमानाने सांगत. आगावू कामांच्या उलाढालीत आणि हातचे सोडून भलत्याच नादी लागण्याच्या स्वभावामुळे बराच पैसा उधळला गेला...
बाळू हा नयनचा आतेभाऊ! अण्णा व भाऊंच्या बहिणीचा मुलगा. बाळू तीन वर्षाचा असताना त्याचे आई-वडील एका अपघातामध्ये वारले. मात्र त्यांच्यासोबत असणारा बाळू बचावला. बाळूला त्याच्या वडिलांकडचे जवळचे कुणीच नव्हतं. अण्णा-भाऊंनी बाळूला घरी आणलं. त्याला वाढवलं, शिकवलं. बाळूच्या गावी त्याची चार-पाच एकर शेती होती. ती शेती विकून अण्णांनी स्वतःच्या शेतीशेजारी दोन एकरचा एक तुकडा घेतला. बाळूला शिक्षणासाठी शहरात ठेवले. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत अण्णा-भाऊंच्या बहिणी, भाचे, बाळूसोबत शहरात शिकणारी दोन्ही भावांची मुले एकत्र जमत. त्यावेळी गावाकडील वाडा कसा भरून जात असे. सुट्ट्या संपताच धम्माल करणारी मंडळी निघून जाताच वाडा कसा रिता रिता वाटे. तसे ते गाव फार मोठे नव्हते. परंतु गाव तसे निरक्षर! गावात अण्णा आणि भाऊ दोघेच साक्षर म्हणता येईल इतपत शिकलेले. सरपंच, पोलीस पाटील, इतर पंचमंडळी तशी नावापुरतीच. गावचा सारा कारभार अण्णांच्या हातात आणि त्यांच्याच मनावर. गावातील लहान मोठ्या घरातील सोयरीक जमविणे, तंटे मिटविणे ही कामेही अण्णांच्या मनावर. शक्यतो गावातील भांडणे गावातच मिटविल्या जात. खरेदी-विक्रीचा व्यवहार जमविण्यामध्ये अण्णांचा हातखंडा. अशा कामांमधून अण्णांची कमाईही भरपूर असे. अडल्या-नडल्यांची आर्थिक गरज भागविताना सवाई-दिढीची कमाईही होतच असे. महत्त्वाचे म्हणजे दोघेही भाऊ व्यसनांपासून दूर होते. हे सारे उत्पन्नाचे स्त्रोत असूनही घरामध्ये बरकत नव्हती. जी लग्ने अण्णा-भाऊंच्या काळामध्ये झाली. त्या प्रत्येकेवळी शेताची लांबी एक्कर-दोन एक्कराने कमीच होत गेली. नवीन जायदाद जोडणं दोघांनाही जमले नाही. घरामध्ये खाण्यापिण्याची हौस दांडगी होती. रोज गोडधोड तळण झाल्याशिवाय स्वयंपाकाला पूर्णत्व लाभायचे नाही. जेवायच्या वेळी गावातला असो की परगावचा असो, बैठकीत असलेल्या व्यक्ती जेवल्या नाहीत असा एकही दिवस जात नसे. सुट्ट्यांमध्ये जमणाऱ्या कंपनीचा हिशोब पाहिला तर दोन्ही वेळेचा मिळून शंभर माणसांचा चारीठाव स्वयंपाक आणि इतर दिवशी दहा ते पंधरा माणसांचा मिष्टान्न स्वयंपाक करताना आई-काकींचा जीव मेटाकुटीला येई. परंतु स्त्रियांचा जन्मच मुळी या कामांसाठी झालेला अशा पठडीत, संस्कारात वाढलेल्या त्या दोघी निमूटपणे स्वतःवर पडलेला भार नेटाने वाहत, न थकता... नदीप्रमाणे! जिला फक्त सागराकडे जाणं एवढेच ध्येय माहिती असल्याप्रमाणे! हे सारे पार पाडताना कधी दोघींचा वाद, शाब्दिक चकमक झाल्याचं कुणी ऐकलं नाही, बहिणींच्या पलिकडले अनोखे प्रेम दोघींमध्ये निर्माण झाले होते. बाळू चार वर्षांचा झाला आणि काकी घरात आली. तेंव्हापासून त्यांच्यावर सारी जबाबदारी पडली. दोन वर्षानंतर नयनची आई काकींना साथ द्यायला आली. दोघींनी मिळून एकत्र संसाराचा रथ ओढायला सुरू केला तो नयन स्वतः आई होत असतानाही त्यांच्या खांद्यावर होता. त्यानंतर बरीच लग्ने झाली तशी बाळंतपणेही झाली.
कित्येकवेळा पहिली बाळंतीण सव्वा महिन्याची होत नाही तोच दुसरी कुणी बाई बाळंतीण होई. त्या दोघी, त्यांच्या नणंदा यांचे बाळंतपण करताना आई-काकींनी एकमेकींना सांभाळलं. जणू एका वृक्षाखाली दुसरा वृक्ष जोपासताना नंतर कोणत्या वृक्षाचे कोणतं खोड आहे हे ओळखूही येऊ नये याप्रमाणे!
गावचा कारभार करण्यामध्ये अण्णा मग्न तर भाऊ अतिशय सात्विक! सकाळी दोन-अडीच तास पूजा झाल्यावर त्यांचा दिवस सुरू होई. गावातील धार्मिक वातावरण भाऊंनी उत्तमपणे जोपासलं होतं. बाहेरगावचा कीर्तनकार आला नाही असा महिनाही जात नसे. नयन सहा वर्षांची असताना कार्तिकी एकादशीला सुरू झालेला भजनांचा दोन मंडळांमधला मुकाबला तब्बल पाच दिवस चालला होता. तसे सात्विक, धार्मिक वातावरण टिकविताना, सप्ताहाची-कार्यक्रमाची सांगता करताना प्रत्येक वेळी गावातून निधी-धान्य स्वरूपातील मदत मिळेलच ही शाश्वती नसे, जेंव्हा मिळे तीही अत्यंत कमी असे त्यामुळे कार्यक्रमाची सांगता करताना जो भंडारा होई त्याचा भार भाऊंनाच सोसावा लागे. असा तो एकत्रित संसाराचा गाडा बराचसा थकल्याप्रमाणे झाला होता. शरीराने, मनाने आणि धनानेही! कारण पूर्वीसारखी शेती आणि उत्पन्न राहिले नव्हते. खाणारी तोंडे वाढली होती. शहरात शिकणाऱ्या मुलांना धान्य आणि पैसेही द्यावे लागत. त्यांच्याही गरजा दिवसेंदिवस वाढतच होत्या. गावात वातावरण पूर्वीसारखे राहिले नव्हते. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले होते. पूर्वी येणारी माणसे सल्ल्यासाठी वा उसनवारीसाठी येत नव्हती, त्यांची मुले कर्ती झाली होती. घरातले व्यवहार मुलांच्या हातात गेल्यामुळे गावचे राजकारण आणि सत्ता स्वतःच्या मुठीत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. साहजिकच अण्णांच्या कुटुंबांकडे पाहताना अण्णा भाऊंचा पाणउतारा होण्याचे प्रसंग वाढत होते. त्यामुळे आपोआपच अण्णांची सार्वजनिक आणि भाऊंची धार्मिक कामे जवळपास थांबली होती. बैठकीतली वर्दळही थंडावली होती. अण्णांचा गढीवरचा वाडा म्हणजे गावची शान होता. पिढ्यानपिढ्या त्या वाड्यापुढे शिपायांप्रमाणे उभे असलेले बुरूज ढासळू लागले होते, त्या मातीने गावातील घरे बांधली आणि सारवल्या जावू लागली...
ज्याची सारे वाट पाहत होते तो दिवस उजाडला. नयन बाळंत झाली. कन्यारत्न झाले. अण्णा-भाऊ, आई-काकी यांची ती पहिलीच नात. सर्वांना खूप आनंद झाला. थकत चालेल्या वतनदारी थाटाला नवजीवन लाभले. त्याच आनंदात बारसे ठरले. सारे पाहुणे आले. वतनदाराच्या पहिल्याच नातीच्या बारशाचा थाट एकदम राजेशाही! जमलेल्या प्रत्येकास सपत्नीक आहेर झाला. बारशाच्या दिवशी सकाळी सदाशिव प्रभासोबत पोहचला. सर्वांना आनंद झाला परंतु नयनच्या तळपायाची आग मस्तकात शिरली. प्रभा थोडावेळ नयनशेजारी बसली. परंतु नयनचा मूड ओळखून ती इतर बायकांमध्ये मिसळली. सदाशिवने नयनकडे, मुलीकडे ढुंकूनही पाहिले नाही. जेवणे होताच 'काम आहे' असे सांगून मुलीचे नाव ठेवण्यापूर्वीच दोघेही नयनशी न बोलताच निघून गेले. अनेकांच्या ती गोष्ट लक्षात आली परंतु क्षणभरच. नंतर सारे विसरून हास्यकल्लोळात मंडळी दंग झाली. सायंकाळी बारशाची वेळ झाली. मुलीचे नाव ठेवायला आत्या असते परंतु नयनला नणंदच नव्हती. त्यामुळे पाठीवर पडणार्या थापट्यांच्या गर्दीत कमात्याने पाळण्यातील मुलीचे नाव ठेवले... संजीवनी!
बारशानंतरचे काही दिवस नयन फारच उदास होती. शेवटी तिने सासरी परतण्याचे ठरविले. तेव्हा आई म्हणाली,
"नयन, अग, तू कोवळी बाळंतीण. सव्वा महिन्यात..."
"आई, मला ह्यांचे लक्षण ठीक दिसत नाही. मला जावं..."
"अग पण..."
"तू मध्ये पडू नकोस. मला जावू दे."
शेवटी नयनच्या मनाप्रमाणे झालं. अण्णा, भाऊंना वेळ नव्हताच. बाळूला सोबतीला देवून नयनची बोळवण केली. नयन, संजीवनी, बाळू सारे स्टॅंडकडे निघाले. वेशीपर्यंत आई, काकू आल्या. पदराने डोळे पुसत त्यांनी नयनला निरोप दिला. ते दोघे नजरेआड होईपर्यंत दोघीही तिथेच थांबल्या...
'नैने, सांभाळून घे. हे सारे चालायचेच. 'ठेविले अनंते तैसेची राहावे...' अशी वडिलांच्या विचारांची शिदोरी घेवून ती सती रोजच्या मरणाला सामोरी जाण्यासाठी सासर नावाच्या सरणावर आरूढ होण्यासाठी निघाली...
००००