Ladies Only - 5 books and stories free download online pdf in Marathi

लेडीज ओन्ली - 5

|| लेडीज ओन्ली ||
(भाग - 5)

या दोन बायांच्या राजकीय वाद संवादाच्या दरम्यानच्या वेळात राधाबाईंची भांडी धुवून घासून पुसून फळीवर लावून झाली होती. आता त्यांनी फरशी पुसण्याकडे आपला मोर्चा वळवला. विजयाताई अजूनही राजकारणाचाच विचार करत बसलेल्या होत्या. आणि एकदमच काहीतरी त्यांच्या लक्षात आलं अन् त्यांनी राधाबाईंशी एका वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात केली, " राधाबाई, तुमचं नावही याच वॉर्डात आहे ना मतदानासाठी?"
"आं? ठाव न्हाई... वारड फिरड कळत न्हाई आमास्नी... " ओलं केलेलं फडकं फरशीवर फिरवत त्या उत्तरल्या.
" अहो मग मतदान कसं करता तुम्ही? "
" कसं मीन्स... असंच खटका दाबून.. "
" आणि कोणाचा खटका दाबायचा ते कसं ठरवता? "
" तेच्यात व्हाट ठरवायचं... जो देंगा नोट उसकोच वोट.. "
" म्हणजे? मतदानासाठी पैसे घेता तुम्ही? "
" हां तो उसमें क्या हय? "
" अहो मतदान करणं हा आपला अधिकार असतो.. आणि तुम्ही तो विकता? "
" मंग.. का खार घालायचा का त्या अधिकाराचा? पिकल.. पिकल..! जसा मद्दान करणं आमचा अधिकार तसाच पैशे घेनंबी..! आहो ताई, यक ष्टोरी टेलते.. मागच्या विलक्षनच्या निडवनूकीच्या टायमाला आमच्या झोपडपट्टीत येकाबी लीडरानं पैशे वाटले न्हाई. मंग काय झालं मद्दान ष्टार्ट.. आठ वाजले.. नऊ वाजले.. धा झाले.. बारा झाले.. मद्दान वन्ली थर्टी... मंग काय गेला मेशेज.. घाम फुटला उमेदयाराला.. गाड्या सुटल्या.. मान्साची धावाधाव सुरू झाली... भर दुपारा दोनला पेट्या आल्या.. पाचपाचशानं वाटप झाली.. तव्हा कुठं मद्दानाला सुर्वात झाली.. पुढल्या टू घंट्यात साठ टकवे मद्दान झालं... ही पावर आसती बाईसाहेब... लोकशाईची अन् नोटशाईची... " काम आवरता आवरता आख्खी मतदान कथा राधाबाईंनी सांगितली. अर्थात विजयाताईंना हा प्रकार आवडला नाहीच. त्या चिडल्या.
" पावर कसली? हा लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे.. पैशांसाठी कोणाही येड्यागबाळ्याला निवडून देऊन आपण आपल्या देशाचं केवढं नुकसान करतोय हे कळत कसं नाही तुम्हाला? " त्या रागावून बोलल्या.
" आम्हाला वन्ली आमचं नुकसान कळतं...आन् बाईसायब, हे नग्रशेवक, आमदार, खाजदार वन्ली वट मांगन्याच्या निमतानंच येत्यात आपल्याकडं.. येकदा निवडून आल्यावर फेसाड बी दावीत न्हाई कोणी...
आन् कोनबी मदरची आवलाद निवडून आली तरी आम्हा गरीबायला व्हाट देनार आसती.. बुढीचे बाल? ज्यो निवडून येतू त्यो आमच्या नावानं देशाचा पैसा लुटीतच राहातो... मंग आम्हाला पाच सालात यकदाच त्येला लुटायचा चानस मिळतू.. कामून सोडावा मंग... आमीबी हानतोत त्येचा खिसा हजार पाचशाला... " राधाबाई त्यांच्या विचारांच्या बाबतीत फार स्पष्ट होत्या.
" अहो पण अशी चुकीची माणसं पुढे भ्रष्टाचार करतात आणि तुमच्या आमच्या विकासासाठी वापरायचा पैसाच गडप करतात... तुम्ही हजार पाचशे रूपये घेऊन आपला बोलण्याचा हक्कच गमावून बसता... "
" आसं का? मंग जे पैशे घेत न्हाईत त्येनी बोलावा की... त्येंची टंग कुठं गाहान पडल्याली आसती... " राधाबाई ना ऐकून घ्यायला तयार होत्या. ना समजून घ्यायला," काय न्हाई वो.. इथून तिथून समदे बेईमान लोकं झालेत.. लाखाचे घोटाळे करणारे आमास्नी पाचशे घेऊ नका असं न्यान देत बोंबलतेत... आरं आमच्या फाटक्या चड्डीकडं बोट दावण्याआधी तू जरा खाली वाकून पाहाय... तुला तर चड्डीच न्हाई..! ज्यो सवता निर्मळ आसंल त्येनं निर्मळपणावर किरतन करावा. तुमाला सांगते बाईसायब, विलक्शेनच्या दिसात मह्या हसबंड्याला फुकटात दारू मिळंती... कामावर न जाता लेबरायची मजुरी निघंती.. सनासुदीसारखे दीस असत्यात ते.. पालिटिक्स हाय ते.. तुमास्नी नाई कळायचं बाईसायब... जसं ह्या खादी खादाडायचं पालिटिक्स आसतंय तसंच आमा गोरगरीबायचं बी आसतंय. ते पाच पाच साल आमच्या पैशावर खेळून आमाला लोळवित्यात अन् आमी इलक्शनच्या एकाच दिसात त्येहला पार धोबीपछाड देतोत... आमचा हिसाब तुमास्नी नाय कळायचा... आता हेच बघा ना... टुमारो जर तुमी मनल्या की पैशे न घेता मला मद्दान करा तर यखादबार करतोन बी आमी.. पर हेच जर ती भुंडकी शारदाबाई म्हनू लागली तर कोन आयकीनार वो? "
" म्हणजे जर मी निवडणूकीला उभी राहिले तर तुम्ही मला मतदान कराल? ते ही पैसे न घेता..? " विजयाताईंना सामान्य मतदाराची मतदान करण्या मागची मानसिकता समजून घ्यायची होती.
" आफकोरस... तुमच्यासारखे लोक उभे ऱ्हायले तर आय कलोज करून तुमालाच वोट देनार पभलिक... " राधाबाईंचं काम आवरलं होतं. कमरेला खोचलेला पदर ढिला करून त्या विजयाताईंसमोर येऊन बसल्या.
" का? मला का मतदान कराल तुम्ही? मी असं कोणतं तुमच्या कल्याणाचं काम केलंय? " विजयाताईंचे प्रश्न संपले नव्हते.
" तसं त आमच्या हिताचं काम त्या लोकायनी बी केलं न्हाई.. ज्येंना आमी आतापातूर मद्दान केलं.. पर कसं आसतं बाईसायब, " राधाबाईंनी चंचीतली तंबाखूची पुडी हातावर ओतली. डबीतला चुना त्यावर लावला. बोटाने तंबाखू मळू लागल्या," उम्मीद पे दुनिया कायम हय आसं म्हणत्यात.. तसं मद्दान बी उम्मीदपेच करत्यात.. ह्यानं काही नाही केलं.. त्यो तरी करील.. अन् जव्हा आपलं कल्यान कोणीच करनार न्हाई आसं पबलिकच्या धेनात येतं तव्हा पब्लिक ज्यो जास्ती पैसा देईल त्येला मद्दान देत असतंय...! "
राधाबाई पब्लिकच्या राज्यशास्त्राचे वास्तववादी सिद्धांत मांडत होत्या. विजयाताईंना ते पटत नव्हतं. पण तरीही त्या ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या.
" अच्छा.. म्हणजे मी लोकहिताची कामं करील अशी उम्मीद आहे म्हणायची तुम्हाला...? "
" भरोसा.. टरस्ट ... तुमच्यावर भरोसा हाय.. "
" का? "
" बिकाज तुम्ही जिंदगानीसंगं झगडा करीत इथरोक आलेल्या हायत... आवघडातली आवघड सिचुशन भोगून इथरोक आलेल्या हायत तुम्ही... तुम्ही गरीबी बघितल्याली हाये.. तुम्ही अन्याव आत्तेचार सहीन केलेल्या हायत... आन् बाईसायब ज्याचे पाय पोळाल्याले आसत्यात त्यो दुसऱ्याला आनवाणी चालू देत नसतोय.. जेचं काळीज डोळ्यातल्या पाण्यात नाहल्यालं आसतंय त्यालाच दुसऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत कळत आसती.. तुमी कशा कशा दुखायला तोंड देलंय ते आमाला ठावं हाय... आमचं दुखणं तुमाला नाय कळायचं तर कोणाला कळणार? ह्यो भरवसा हाय तुमच्यावर. येदना जगल्याला माणूसच दुसऱ्याच्या येदना समजून घेऊ शकतो... आमाला आमचं गाऱ्हाणं आयकीनारा, समजून घेणारा लीडर तुमच्या रूपात पुढं दिसला तर कशाला दुसऱ्या कोणाला मद्दान करतोन वो? " राधाबाईंनी त्यांच्यासारख्या कित्येक गरिबांच्या मनातली भावना बोलून दाखवली.
" दुसऱ्या कुणी पैसे दिले तर? " विजयाताईंना अजूनही राधाबाईंचं बोलणं खरं वाटत नव्हतं.
" घेऊ की... ज्यो मनी देईल त्याचे मनीबी घेऊ.. याचे.. त्याचे.. ज्यो ज्यो देईल त्या समद्याकून मनी काढू.. पर मद्दान तेलाच करू ज्यो मनात असंल...! आमी गरीब मान्सं बाईसायब.. अन् अडाणी बी.. लय गिन्यान नसतंय आमाला.. पर बईमानीच्या देवाला इमानदारीचा निवद दावायचा नस्तू इतकं तरी कळंतं आमास्नी... चोराचा खिसा मारण्याला चोरी मानत न्हाईत आमी... " राधाबाई उठल्या.
" मला नाही पटत राधाबाई.. लोकांना भावनिक साद घालून मतांची भीक मागणं.. म्हणजे माझ्या राजकीय लाभासाठी मी भरचौकात बसायचं.. माझ्या जखमा उघड्या करून. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांनी करावी विचारपूस आस्थेवाईकपणे... घालावी फुंकर सहानुभूतीने.. आणि मी तेवढ्या वेळात केविलवाण्या चेहऱ्याने त्यांच्याकडे मागायची मतांची भीक? त्या भीकेच्या पैशांतून मी आणायचा गुलाल... अन् त्या लालभडक गुलालात न्हाऊन साजरा करायचा उत्सव माझ्या विजयाचा? नाही नाही... लोकांची अशी फसवणूक मी करणार नाही.. खरंच राजकारण हा लोकांच्या भावनांशी खेळणारा घाणेरडा धंदा आहे... तो मी नाही करणार... "
" कसंय बाईसायब जरा बारीक इचार केला तर समदे धंदे डरटीच.. आता तुमच्या बुक शेलिंगचंच बघा ना... तुम्ही बुकं इकता.. कंची? न्यानेसरी, दासबोध, तुकाबाबाची गाथा, ययाती, इटीशी इटीशी... पर मला सांगा मारकेटात तितकीच बुकं आवलेबल हायत का? न्हाई.. बजारात हायदोस, रेड यापल, मस्तराम बी हायेच की... पर तुमच्या बुक ष्टालात तुमी ते इकीत न्हाईत.. पर बाजूच्या दुकानात भेटंतच का न्हाई? " राधाबाई काय पटवून द्यायचा प्रयत्न करत होत्या तेच विजयाताईंना कळत नव्हते.
" माझ्या स्टोअरचा अन् राजकारणाचा काय संबंध राधाबाई? " त्यांनी विचारले.
" कसंय बाईसायब, काय इकत घ्याचं हा जसा गिऱ्हायकाचा सवाल तसा काय इकायला बसायचं हा इक्रेत्याचा सवाल झाला. तुमी चांगले पुस्तकं इकता तुमच्याकडं चांगलं गिऱ्हाईक येतं. डरटी पुस्तकं इकणाऱ्याकडं डरटी गिऱ्हाईक जातं. पालिटिक्साचं बी तसंच आसतंय... तुम्ही चांगलं काम केलं तर चांगले लोक येत्यालच की तुमच्या बाजूला... " राधाबाईंनी मुद्दा पटवून दिला.
" पण असं माझ्या वेदनांचं आमिष गळाला लावून लोकांची दयामाया मिळवून त्यांना फसवणं...? "
" तुमी कुठं फशिवताय कुणाला? तुमच्या जखमा खोट्या न्हाईत.. तुमच्या येदना खोट्या न्हाईत... बाईसायब तुमच्यावर अन्याव झाला तेला लय टाईम उलटून गेला.. पर आज बी दररोज मिन्टामिन्टाला लय बायाच्या पाठीचं कातडं सोललं जातंया.. शेकंदा शेकंदाला कितीतरी माय मावल्यांच्या छात्या तुडविल्या जात्यात.. कितीतरी पोरीबाळीची जिंदगी नाशविली जाती अन् हे समदं करणारी दुरेधनाची आवलाद तरीबी सोसायटीत ओपन हेड फिरत ऱ्हाती. काही न्याव मिळत न्हाई. अन् पीडल्याला बाईला माणूसच काय कोणता देवबी न्याव देऊ शकत नसतोय.. फकस्त यक आशा आसती बाईची... मव्हं गाऱ्हाणं आयकीनारं कोनतरी आसावा.. जेच्या छातीवर डोकं टेकून ऊर मोकळं होईस्तोवर रडता येईल असं हक्काचं आपलं माणुस आसावा.. बाईच्या काळजातली ठसठस समजून घेणारं कोणी आसावा... अन् हे तुमी करू शकता बाईसायब... नशिबानं वाऱ्यावर सोडल्याला बायांसाठी तुमी इश्वासाचा आधार होवू शकता... मी काय शिकेल बिकेल न्हाई बाई... पर आपल्या जिंदगीचं लोखांड करायचं का सोनं हे जेचं त्येनं ठरिवलं पायजे... जसं जिंदगीचं तसंच राजकारणाचंबी... ह्येच्यात गंगाबी वाहाती अन् तेला खेटून गटारगंगा बी... तुमी कशात बुडी मारायची हा तुमचा सवाल... म्या आता निगते... गप्पगप्पात लय उशीर झाला बघा... " त्यांचं सगळं काम आवरलं होतं. त्या जायला निघाल्या,"येते बाईसायब...आजूक चार घरचं काम आवरायचंया.. उरल्यालं भाषाण उंद्या ठोकते.." आणि त्यांच्या शेवटच्या वाक्यावर दोघी खळखळून हसल्या.
"राधाबाई... खरोखर धन्य आहात तुम्ही.. " असं म्हणत विजयाताईंनी राधाबाईंना हात जोडले. राधाबाई निघून गेल्या.
आज जरा जास्तच उशीर झाला होता. सकाळी अश्रवीच्या फोनमुळे. नंतर शारदाबाई अन् निरोपाला राधाबाई. दहा वाजून गेले होते. खरे तर रोज या वेळेला दुकान उघडून बसलेल्या असतात विजयाताई. आज अजून घरीच होत्या. स्नान - स्वैपाक- नाश्ताही बाकी होत्या. त्यांनी लगबगीने आवरायला सुरूवात केली.
तसं त्यांचं दुकान काही फार लांब नाही. घरापासून पायी चालत गेलो तरी वीस पंचवीस मिनिटांत पोचता येतं. त्या दररोज सकाळी नऊपर्यंत घरची सगळी कामं आटोपून घेतात. साडेनऊ पर्यंत दुकानात पोचणं. साफसफाई करणं आणि मग दिवसभर एकानं दुकाणं गिऱ्हाईक सुरूच असतं. आज मात्र उशीर झालाय. दुकानात पोचायला अकरा - साडे अकराच वाजतील. विजयाताई आवरू लागल्या. डोक्यातलं विचारांचं वादळ मात्र अजूनही शांत झालं नव्हतं. शारदाबाईंनी दाखवलेला राजकारणाचा बीभत्स चेहरा, राधाबाईंनी मांडलेलं दाहक वास्तव आणि त्यांच्या स्वतःच्या राजकारणाच्या बाबतीत असलेल्या सौम्य सोज्वळ संकल्पना असं तिहेरी द्वंद्व त्यांच्या मस्तकात उसळलं होतं. त्यांनी त्या विचारांच्या उधळणाऱ्या वावटळी थोपवण्याचा बराच प्रयत्न केला. पण ते शक्य होत नव्हतं. वारंवार मेंदूवर धडका घेणाऱ्या त्या वैचारिक अस्वस्थतेचं ओझं पेलतच त्यांनी कामं आवरली आणि दुकानाकडे जायला निघाल्या..


© सर्वाधिकार सुरक्षित -
© शिरीष पद्माकर देशमुख ®


{ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ एक योगायोग समजावा...
लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®