Ladies Only - 7 books and stories free download online pdf in Marathi

लेडीज ओन्ली - 7

|| लेडीज ओन्ली ||

(भाग - 7 )


विजयाताई आज सकाळी लवकरच उठल्या. प्रदेशाध्यक्षांनी उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी पक्ष कार्यालयात बोलावलं होतं. सकाळची सगळी कामं त्यांनी पटापट आवरली. राधाबाईही आल्या होत्या. पण त्यांच्याशी गप्पा मारायला आज वेळच नव्हता. विजयाताईंमागे काहीतरी महत्वाचं काम आहे हे राधाबाईंनी ओळखलं. त्याही लगबगीने हात उचलू लागल्या. इतक्यात कुणीतरी दार ठोठावलं. राधाबाई भांडी घासत होत्या. विजयाताईंनी दार उघडलं. अन् दारात...
त्यांचा जीव, त्यांचा प्राण, त्यांचा श्वास, त्यांच जीवन, त्यांचं लेकरू... अश्रवी. विजयाताई काही वेळ भान हरपून दारात उभ्या असलेल्या आपल्या लेकराकडे बघतच राहिल्या. अश्रवीही हसऱ्या ओल्या डोळ्यांनी आईकडे बघत राहिली. दोघींचेही डोळे काठोकाठ भरून आले होते.
"हूज कमींग बाईसायब? " राधाबाईंनी स्वैपाक घरातून विचारलं तेव्हाच त्या आवाजाने दोघीही भानावर आल्या.
" राधाबाई, भाकरीचा तुकडा आणा...ओवाळून टाकायला.. माझं बछडं आलंय...! " विजयाताईंच्या दाटून आलेल्या कंठातून शब्द फुटत नव्हते. राधाबाई एका हातात भाकरीचा तुकडा आणि दुसर्‍या हातात पाण्याचा तांब्या घेऊन आल्या. विजयाताईंनी अश्रवीच्या पायांवर पाणी ओतलं. भाकरीचा तुकडा तीन वेळा ओवाळून बाजूला फेकून दिला. अश्रवीने तांब्यातल्या पाण्याने गुळण्या केल्या. विजयाताईंनी स्वतःच्या साडीच्या पदराने तिचे पाय पुसले. अश्रवीने घराच्या आत पाऊल टाकलं अन् आईला कडकडून मीठी मारली. दोन वर्षांनंतर मायलेकीची भेट होत होती. दोघीही गहिवरून आल्या. त्यांना बघताना राधाबाईंचेही डोळे पाणावले. त्यांनी ते पदराने पुसले.
" आई.... आई... " याहून अधिक अश्रवीला काहीच बोलता येत नव्हतं. या संपूर्ण जगात तिच्यासाठी फक्त तिची आई होती आणि आईसाठी ती..! काळजावर दगड ठेवून दोघींनीही ही दोन वर्षांची ताटातूट सहन केली होती. झाडाची फांदी तोडल्यानंतर जेवढी वेदना फांदीला होते तेवढीच त्या झाडाच्या मुळांनाही होत असते. नजरेआड झालेलं वासरू जेवढं भेदरलेलं असतं त्याहून कितीतरी अधिक त्याची काळजी त्या गायीला अस्वस्थ करत असते. दोघींनीही अस्वस्थतेचं युग काळजावर कोरून घेतलं होतं अगदी तोंडातून ब्र देखील न काढता. आजही त्या दोघी बोलत नव्हत्या. मुकेपणाने सगळा संवाद घडून येत होता. भावना प्रवाहित झाल्या होत्या. त्या डोळ्यांतून खळाखळा वाहू लागल्या होत्या. भळभळत्या जखमांपेक्षा न वाहणाऱ्या मुक्या जखमा जास्त वेदनादायक असतात. पण त्या दोघींनीही त्या वेदनांचे मुकेपण स्वीकारले होते... स्वतःहून त्या वेदनांचे तोंड शिवून टाकले होते. त्यांच्या वेदना आजही बोलत नव्हत्या. वाहत होत्या.. डोळ्यांतून.. स्पर्शांतून...त्या वेदनांचा कोलाहल कुणालाही ऐकू येत नव्हता.. पण दोघींच्याही मनात थैमान घालत होता.. काळजाचं अवघं आकाश व्यापून टाकत होता....!
" आता अशाच गळाभेटीनं पोटं भरणारेत का? टी - काफी - बरेकफास्टचं करायचं काही? " मायलेकीची ती भेट बघून राधाबाईही भारावून गेल्या होत्या. पण मनात उठलेल्या भावनांच्या वावटळीत हरवून गेलेल्या सर्वांनाच भानावर आणण्यासाठी राधाबाई बोलल्या.
" अं.. हो हो.. " विजयाताईंनी भिजलेला चष्मा पदराने पुसला. अश्रवीनेही जीन्सच्या खिशातल्या टिश्यू पेपरने पापण्यांवर अडलेले अश्रूंचे थेंब टिपून घेतले.
" हाऊ आर यू राधामावशी? " अश्रवी आपुलकीने विचारपूस करू लागली. राधाबाई मागच्या पाच सहा वर्षांपासून विजयाताईंच्या सोबत होत्या. अश्रवीला स्वतःच्या मुलीसारखं जपायच्या त्या. त्यांचं इंग्रजीचं वेड तिला चांगलंच ठाऊक होतं.
" आयाम फाईन थँक्यू.. " राधाबाईंचं उत्तर.
" अँड युवर किस्ना? "
" ही इज ओके... लीवर इज सडींग इन बॉडी शेड डाकतर.. देअर इज नो रगत इन किसनराव बॉडी.. वन्ली दारू दारू... " राधाबाईंच्या इंग्रजीवर अश्रवी खळखळून हसली.
" ओके ओके.. प्लीज मेक फक्कड टी आॅफ युवर हात... दोन वर्षात तुमच्या हातचा चहा खूप मिस केला.. " अश्रवीने राधामावशींच्या पायांना हात लावून नमस्कार केला. राधाबाईंनी तिच्या गालावरून हात फिरवला. बोटं कडकडा मोडली.
" वाळून गेलंया लेकरू... आता दररोज मह्या हातचं चांगलं चुंगलं खायाचं अन् तबेत सुदरवायची बरका... वन मिन्टात टी आणते.. " राधाबाई स्वैपाक घरात गेल्या.
" बाळा बस ना तू... " विजयाताई मुलीशी बोलू लागल्या इतक्यात त्यांचा मोबाईल खणाणला. बघितला. प्रदेशाध्यक्षांचा होता.
" हॅलो.. हो.. हो...आय अॅम व्हेरी सॉरी... माझी मुलगी आलीय आज परदेशातून... मला नाही येता येणार.. मी उद्या येईन सकाळी.. नक्की.. हो.. हो... सॉरी अगेन..! " आज त्यांना मिटींगसाठी बोलावलं होतं. पण त्यांनी जाणं रद्द केलं.
" कुठं जायचं होतं गं आई? " अश्रवीने विचारलं.
" काही नाही गं.. असंच काम होतं जरा... "
" अगं मग महत्वाचे असेल तर कामच करायचंस ना आधी...! "
" माझ्यासाठी तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही..! "
" अगं पण मी आहेच ना आता इथेच... "
" अगं आजच आलीयेस तू... तुला बघायचंय.. तुझ्याशी बोलायचंय... ते सगळं सोडून मी कशी जाऊ? माझी सगळी कामं, माझं सगळं आयुष्य त्या भाकरीच्या तुकड्यासारखं तुझ्यावरून ओवाळून टाकलंय मी...! " विजयाताईंनी पुन्हा एकदा लेकीच्या तोंडावरून हात फिरवला.
" ओके... तू काही माझं ऐकायची नाहीसच.. "
" नाहीच... बरं मी काय म्हणते.. तू कपडे बदलून घे. फ्रेश हो. मी खायला बनवते काहीतरी... सांग बरं काय खावंसं वाटतंय तुला? "
" खरं सांगू... तुझ्या हातची ज्वारीची गरमागरम भाकरी आणि मिरच्यांचा झणझणीत ठेचा... हे दोन पदार्थ खूप मिस केले मी. तिथं सगळं खायला मिळालं एवढं सोडून.. तू बनव मस्तपैकी.. त्याआधी मी आंघोळ करते फ्रेश... " अश्रवी बोलली.
" तुझे कपडे? एकच बॅग दिसतेय. सगळे यातच आहेत का? " विजयाताईंनी विचारले.
" नाही गं.. आणखी एक बॅग... ओ माय गॉड... " बोलता बोलताच अश्रवीच्या काहीतरी लक्षात आले.
" काय झालं गं? बॅग विसरलीस का कुठे? " विजयाताईंचा काळजीचा प्रश्न.
" अगं बॅग नाही फक्त.... एक पाहूणाही विसरले मी... "
" पाहूणा..? कुठे? "
" दाराशीच... " अश्रवी उठली. दारापर्यंत गेली. दार उघडलं," आय अॅम व्हेरी सॉरी डिअर.. आय कंप्लीटली फरगॉट... " तिने हाताला धरून एका पाहुण्याला घरात आणले.
पांढराफटक रंग. पिंगट सोनेरी कुरळे केस. अंगावर जीन्स पॅन्ट - टी शर्ट. हातात बॅग. " आई, ही आहे माझी डिअर डिअर फ्रेंड जेनी.. " अश्रवीने ओळख करून दिली. विजयाताई उठून तिच्याजवळ गेल्या. जेनीच्या तोंडावरून हात फिरवला.
" अगं किती बावळट आहेस अश्रू तू.. " त्या रागावल्या," लेकराला तासाभरापासून दारात उभं करून ठेवलंयस... काय वाटलं असेल तिला.. "
" सॉरी म्हटलं ना... आणि आई तू समोर असलीस की सगळं जग विसरून जाते गं मी.. " अश्रवी आईच्या गळ्यात पडली," जेनी, मीट माय लाईफ, माय गॉड, माय एवरीथिंग.. माय डिअर मदर..! " अश्रवीने ओळख करून दिली. जेनीने वाकून विजयाताईंच्या पायाला हात लावून नमस्कार केला.
" अगं बाई... फॉरेनची पोरगी अन् पाया पडते? " विजयाताईंना नवल वाटले.
" अगं आई तिचा फक्त जन्म झालाय तिकडे अन् त्या ब्रिटीशांच्या पोटी म्हणून.. नाहीतर ती शुद्ध भारतीय आहे. महाराष्ट्राची संस्कृती तर तिच्या नसनसांत ठासून भरलीय मी.. या दोन वर्षांत...आणि ती खूप डॅशिंग आहे बरं " जेनीबद्दल ती भरभरून बोलू लागली," मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजात गेले त्या पहिल्याच दिवशी कॉलेजातली काही विकृत मुले माझ्या मागे लागली. रॅगिंग करण्याचा प्रयत्न करू लागली. बघ ना आई... माणुसकीची भावना विश्वात सर्वत्र पसरावी म्हणून संत महात्म्यांनी आयुष्य खर्ची घातलं. माणूसकी वैश्विक झाली की नाही माहित नाही पण अमानुषता वैश्विक आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा माणसांमधली विकृती सगळीकडे सारखीच. ती विकृत पोरं माझ्या अंगावर धावून आली तेव्हा मी पार हादरून गेले होते. पण जेनी अचानक माझ्या समोर येऊन उभी राहिली. एखाद्या ढालीसारखी. त्या नालायक कारट्यांना तिने बदडून काढलं. ज्युडो कराटे.. काय काय येतं तिला. त्या गुंड पोरांना पळवून लावलं तिनं. त्या दिवशी ती माझ्या बाजूने एखाद्या हिरोसारखी येऊन उभी राहिली.. अन् माझा हिरो झाली. त्या दिवशी आमच्यामध्ये मैत्रीचा धागा जुळला. पुढच्या काळात ती मैत्रीची वीण घट्ट घट्ट होत गेली... नाऊ जेनी इज माय सेकंड बेस्ट फ्रेंड.. "
" आणि फर्स्ट? "
" आॅब्वियसली माय मदर...!! "
" हेअर इज हाट हाट टी.. " चहाचा ट्रे घेऊन राधाबाई आल्या," आगं बया बया बया... ही कोन म्हणायची मैद्याची गोणी..? पालीचं पोट का सशाचं पिल्लू? इतकं ढवळं शिपीत? भोऱ्या भावलीवानी? " राधाबाई जेनीकडे डोळे विस्फारून बघत होत्या.
" राधामावशी.. शी इज माय फ्रेंड... जेनी.. ब्रिटिश आहे.. लंडनवाली... " ट्रेमधला चहाचा कप उचलून घेत जेनीनं सांगितलं.
" आगं बाबो... डायरेक फारेन रिटन? इतकं गोरं कातडं जिंदगीत पयलीबार बघायले म्या... काय कलर हे... नायतर आमचा... घासला तर लाल व्हईन.. पर गोरा व्हायचा न्हाई मंजी न्हाईच. " राधाबाईंनी उगीचच जेनीच्या अंगाला हात लावून बघितला," मायौ... आंग म्हणावा का लोण्याचा गोळा ह्यो? " राधाबाईंच्या त्या भोळसट वागण्यावर सगळ्या जणी खळखळून हसल्या. त्यांनी तिघींसाठीचा चहा आणला होता पण आता पिणारे चार झाले. मग विजयाताईंनी चहाला नकार दिला. तिघी गप्पा मारत मारत चहा घेऊ लागल्या.
" लिस्टन जेनाबाई... हितं माय विंग्रजीच समद्यात भारीये.. तवा कायबी लागलं तर मलाच सांगत जावा... बिनधास्त.. ते बी विंग्रजीत.. मंजी तुमची बी अडचण व्हनार न्हाई अन् मपलं बी विंग्रजी सुधरंल.. सुधरंल मंजी काय.. विंग्रज लेडीसंग टाकींग वाकींग मनल्यावर.. म्या बी फिफ्टी परशेंट विंग्रज झालेच मनून समजा... " राधाबाईंची बडबड चालूच होती.
" हो बट.. मला मराठी बोलथा येथं... " जेनी शुद्ध मराठीत एक वाक्य बोलली अन् राधाबाईंचे डोळेच गरगरले.
" या बया... जेनाबाई इन मऱ्हाटी? " त्यांनी दोन्ही हात कानांवर ठेवले.
" येस.. जशं राधाबाई कॅन स्पीक मराठी.. तशं जेनाबाई कॅन टॉक इन मराठी.. शेवटी मराठीच 'अमृतातेही पैजा जिंके ' ना? " जेनीच्या या वाक्यावर राधाबाई चक्कर येऊन पडायच्या तेवढ्या राहिल्या. या इंग्रज पोरीला ज्ञानेश्वरांची ओवी ठाऊक असावी याचं विजयाताईंनाही मनोमन कौतुक वाटलं. त्याही नवलाने जेनीकडे बघू लागला.
" माय मॅजिक... " अश्रवीने जेनीच्या खांद्यावरून गळ्यात हात टाकला," ही सगळी माझी जादू आहे. जेनी केवळ मराठी बोलतेच असं नाही तर तिने ज्ञानोबा तुकोबा वाचलेत. ती ज्ञानेश्वरी दासबोधाचा अभ्यास करतेय... शी इज सिंपली ग्रेट... "
खरंच कौतुकाची गोष्ट होती ही. आजच्या काळात पाश्चात्य संस्कृतीत वाढलेल्या एका मुलीला मराठी भाषेची अन् संत साहित्याची आवड असणं याहून समाधानकारक दृश्य दुसरे कोणते असू शकेल.?
विजयाताईंचा फोन पुन्हा एकदा खणाणला." हं बोला... मी कळवलंय तसं त्यांना... उद्या येईन म्हटलं.. कधी? किती वाजेपर्यंत? ठीक आहे... बघते... जमलं तर.. नक्की नाही सांगत... हो हो.. कळवते फोन करून.. " विजयाताई विचारात पडल्या. काय करावे याचा निर्णय त्यांना घेता येत नव्हता. त्यांच्या मनात चाललेली घालमेल अश्रवीने ओळखली," आई तू जा तुझ्या कामाला.. "
" अगं पण... "
" आई.. आम्ही अशाही खूप थकून गेलो आहोत... अंघोळ करून फ्रेश होऊन नाश्ता करून सन्नाट झोप काढण्याचा विचार आहे आमचा..तू तुझं काम करून ये. तू संध्याकाळी घरी परत आलीस की मस्त गप्पा मारत बसू." अश्रवीने समजावले, " तू एकही दिवस दुकान बंद ठेवत नाहीस.. मला चांगलंच ठाऊक आहे.."
" दुकानचं नाही गं काही... आज असंही मी दुकान बंदच ठेवणार होते. दुसरंच काम होतं. मी उद्या येते म्हटले तर आजच या म्हणताहेत... मुद्दाम मला भेटण्यासाठीच दुपारपर्यंत थांबलेत. आणि आपल्यासाठी वेळ काढणाऱ्यांना असं ताटकळत ठेवणं.... " विजयाताईंचा निर्णय अडखळत होता.
" म्हणूनच म्हणतेय तू जा... "
" येस आई... तुम्ही जा... "
" हॉव बाईसायब... तुमी जावा... मी झक्कास ठेचा भाकर करून खाऊ घालते पोरीस्नी... "
अश्रवी, जेनी, राधाबाई.. तिघीही आग्रह करू लागल्या. विजयाताईंचा पाय उचलत नव्हता. तरीही शेवटी त्या घराबाहेर पडल्या. प्रदेशाध्यक्षा मॅडम खास त्यांना भेटण्यासाठी थांबल्या होत्या. अश्रवी आणि जेनी फ्रेश व्हायला लागल्या. अन् राधाबाई भाकरी थापायला..!!

© सर्वाधिकार सुरक्षित -
© शिरीष पद्माकर देशमुख ®

{ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.
लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®