Ghost - Part 2 in Marathi Horror Stories by Prathmesh Kate books and stories PDF | भूत - भाग २

भूत - भाग २

दाट काळोख पसरला होता. आज बहुतेक अमावस्या असावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घर होती, पण यावेळी साहाजिकच सगळ्या घरांच्या लाइट्स बंद होत्या. क्वचित एखाद्या घराबाहेर एखादा बल्ब जळताना दिसायचा.
चिडीचूप शांतता पसरलेली होती. मनोहर आपल्याच विचारात मग्न होऊन चालला होता. चहुबाजूंनी पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधाराकडे, भीतीदायक वातावरणाकडे त्याच बिलकुल लक्ष नव्हत. अर्थात, असतं तरी त्याला काही फरक पडला नसता.
मनोहर वाकडे. दिसायला चारचौघांसारखाच. गहूवर्णी चेहरा, मध्यम उंची, किंचीत बेडौल बांधा, नाकी डोळी बरा. व्यक्तिमत्वातही विशेष असं काही नव्हतं. स्वभावही जरा विक्षिप्तच. त्याच्यात इतरांना आवडावी अशी एकच गोष्ट होती. ती म्हणजे त्याच बोलणं. कुठल्याही विषयावर त्याची मते तो इतक्या रोखठोक व तडफदारपणे मांडायचा की समोरचा अवाक् होऊन जायचा. बोलणही नेहमी मुद्देसूद व विषयाला धरून. काही माणसं आपली ' अफाट वक्तृत्वशैली ' दाखवण्यासाठी मूळ विषय सोडून वेगळंच काहीतरी बोलू लागतात, आणि शब्दांच जंजाळ उभं करतात. तसं मनोहरच नव्हतं. समोरच्याच मन न दुखवता बोलायचा. बोलण्याची स्टाइलही इतकी आकर्षक, की समोरचाही आपली हार मान्य करून त्याच ऐकण्यात हरवून जायचा.
मनोहरला त्याच्या कॉलेज मधली एक मुलगी आवडत होती. तिला कशी पटवायची याच विचारात तो होता. तसं त्याला एखादी मुलगी आवडली यात काही नवल नव्हतं. त्याला आतापर्यंत बऱ्याच मुली आवडल्या होत्या, ' फक्त ' मुलींना तो आवडला नव्हता. चुकून कधी एखादीने त्याच्या आकर्षक बोलण्याला भुलून त्याच प्रपोजल अॅक्सेप्ट केलच, तरी थोड्या दिवसात त्याचा विक्षिप्त स्वभाव, आणि तो फक्त बोलायच्या कामाचा आहे, जे बोलतो ते स्वत: त्यालाही सिद्ध करता येत नाही हे तिला लक्षात यायच. मग एक सणसणीत कानाखाली देऊन त्याला सोडून द्यायची. इतक्या थप्पड खाऊन त्याचे गाल व मन दोन्ही निगरगट्ट झाल होत.

हळूहळू आजूबाजूची घरे विरळ होत जाऊन संपली. आता एका बाजूने दाट झाडी आणि दुसरीकडे उंचच उंच वाढलेला दाट उस होता. अचानक ऊसामध्ये जोरात सळसळ झाली. त्या आवाजाने मनोहर दचकला. त्याने त्या दिशेने पाहील. कदाचित एखाद्या पाखरू असेल असा विचार करून तो पुढे चालू लागला. तर त्याच्या प्रत्येक पावलागणिक ऊसात होणारी सळसळही त्याच्या बरोबर पुढे सरकू लागली. मनोहर क्षणभर जागीच थबकला. पुन्हा चालू लागला. परत तेच. आता मात्र तो जरा घाबरला‌.
" आयला, या दामूनानाच्या ऊसात परत वाघ घुसला का काय ? " तो मनाशीच म्हणाला. मग ऊसापासून थोडा दूर झाडीच्या कडेला सरकून चालू लागला. थोडावेळ मघासारखीच शांतता झाली. आता मनोहर थोडा सावधपणे चालत होता. इतक्यात त्याच्या पुढ्यात काहीतरी वजनदार वस्तू पडली. मनोहरने आपल्या हातातील बॅटरीचा झोत त्यावर पाडला. चार पाच फूट अंतरावर एक भलामोठा दगड पडला होता. मनोहर थोडक्यात बचावला होता. ' हा दगड काही सेकंदांनंतर पडला असता तर ? ' विचारानेच त्याच्या मनात धडकी भरली.
' पण हे नक्की चाललंय काय ? ' त्याला प्रश्न पडला. तो मस्तीखोर, बोलबच्चन वैगेरे होता. पण त्याची कुणाशी दुश्मनी नव्हती. कुणी मजा घेतय म्हणाव तर तेवढ्यासाठी यावेळी कोण जागं असेल. पण मग हे सगळं आहे काय ? ' इतक्यात त्याला आठवलं. पाच वर्षांपूर्वी या ऊसात वाघ शिरला होता. त्याने ऊसमालक दामूनानाच्या बायकोला चंद्राबाईला मारल होत. तेव्हा पासून तिचा आत्मा या ऊसापाशी रात्रीच्या वेळी भटकत असतो, असं गावातील लोकांच म्हणण होत.
आणि आता त्याच रस्त्यावर मनोहर उभा होता. मन घट्ट करून मनोहर रस्त्याच्या मधोमध चालत होता. त्या रस्त्यावर रात्री भटकणाऱ्या चंद्रिकाबाईच्या भूताबद्दल शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून, कॉलेज मधील गावातल्याच मुलांकडून, इतर काही ओळखीच्या गावकऱ्यांकडून ऐकलेले किस्से त्याला आठवत होते.


क्रमशः


उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहे.


Rate & Review

uttam parit

uttam parit 2 years ago

Gayatri

Gayatri 3 years ago

Mohan Bhoyar

Mohan Bhoyar 3 years ago

Manali Sawant

Manali Sawant 3 years ago

Dattaraj Sonawale
Share