Like whose karma - 8 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | जैसे ज्याचे कर्म - 8

जैसे ज्याचे कर्म - 8

जैसे ज्याचे कर्म! (भाग ८)
डॉ. अजय गुंडे यांचे लग्न झाल्यावर सुरवातीला गर्भपाताच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या त्यांच्या पत्नीची तलवार केव्हा म्यान झाली हे तिलाही कळले नाही. हळूहळू तिने सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. सार्वजनिक कामे, महिला मंडळाच्या बैठका- कार्यक्रम या निमित्ताने घराबाहेर पडलेली तिची पावले रात्री उशिरा घरी परतू लागली. रात्री उशिरा घरी परतली तेव्हा छाया झोपलेली असायची आणि सकाळी छाया लवकर उठून शाळा-कॉलेजला जाताना तिची आई झोपलेली असायची. साहजिकच तिचे छायाकडे दुर्लक्ष होऊ लागले. लहान असताना ती रखमाच्या स्वाधीन असायची. रखमाचे ती सारे ऐकायची पण जसजशी ती मोठी होत गेली ती रखमाशी तुटकपणे वागू लागली प्रसंगी तिला खडे बोलही ऐकवू लागली. छायाला सारी सुखे, संपत्ती विनासायास मिळू लागली. आईचे दूर्लक्ष, वडिलांचा लाड आणि हातात खेळणारा पैसा यामुळे तिच्या वागण्यात बिनधास्तपणा अधिक डोकावू लागला. तिचा बदललेला स्वभाव डॉ. अजय यांच्या लक्षात येत होता. परंतु ती त्यांची लाडकी असल्यामुळे ते तिच्याकडे दूर्लक्ष करीत होते. अनेक वेळेस त्यांनी पत्नीसोबत छायाविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु तिने प्रत्येक वेळी हसण्यावारी नेले. त्यादिवशी निशाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा तो विषय छेडताच संतापून ती म्हणाली,
"काय सारखे सारखे एकच एक लावलंय हो. करीत असेल थोडा जास्त खर्च तर बिघडले कुठे? समुद्रातले लोटाभर पाणी गेले तर बिघडले कुठे? कॉलेज, शिकवण्या करतीय ना? आजवर नापास झालीय का? इतरांच्या पोरीचे बघा. श्रीमंतीने वाहवलेल्या अनेक पोरीचे पोट कुणी रिकामे केले? तुम्हीच ना? तशी वेळ छायाने आणली नाही हे का कमी आहे? परवा तिच्याच एका मैत्रिणीचे म्हणजे त्या आगलावेच्या पोरीचे अबॉर्शन तुम्हीच केले ना? दिसायला, वागायला, कशी गरीब गाय आहे हो, पण धंदे, वागणूक पाहिली का? या वयात प्रेग्नन्सी म्हणजे काय ज्योक वाटला...."
"अगं, ती छायाची मैत्रीण होती म्हणूनच काळजी वाटते ग. दोघी दररोज भेटतात. रात्री उशिरापर्यंत त्या सोबत असतात. तिच्यासारखा हिचाही पाय घसरला तर? त्या रात्री निशाचा गर्भपात केल्यानंतर आपण तिघे जेवत असताना छाया नेहमीप्रमाणे बोलत नव्हती. तिने एकदाही नजरेला नजर मिळवली नाही. शिवाय आजकाल छायाचे वागणे, नजरही बदललीय ग. महत्त्वाचे म्हणजे तिचा पोशाख वरचेवर आखूड आणि अधिकाधिक ओपन होत चाललाय. जाता येताना दवाखान्यातील पेशंटस् काय पण आपल्या कर्मचाऱ्यांच्याही नजरा तिला खोलवर बघण्याचा प्रयत्न करीत असतात तर मग कॉलेज, ट्युशन्स आणि मित्रमैत्रिणींमध्ये तिचे वागणे कसे असेल? अशाच मोकळेपणाचा, वागण्याचा गैरफायदा घेणारे भरपूर असतात. त्याच दिवशी मी आगलावे यांच्या याच मुलीला जिवलावे यांच्यासोबत एका हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले आहे..."
"डॉ. अजय गुंडे कोणत्या जमान्यात आहात? हॉटेलमध्ये जाणे, धिंगामस्ती करणे ही आजकाल सर्वमान्य अशी बाब आहे..."
"अग, ते हॉटेल साधे नाही. पंचतारांकित आहे! तिथे जाणारे कुणी फक्त चहा प्यायला जात नाहीत. एक -दोन वेळा आपली छायाही जिवलावेच्या मुलासोबत दिसली. मंत्री जिवलावेचा मुलगा काही धुतल्या तांदळासारखा असणार नाही. खाण तशी माती असणार. त्याने त्या निशाप्रमाणे आपल्या छायाला फसवू नये म्हणजे मिळवले. बरे, कॉलेज संपल्यानंतर ती कुठे जाते? तिचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत ही चौकशी तू केलीस का?..."
"मी का? तुम्ही कुणी नाही आहात का तिचे? दवाखाना आणि ते गर्भपात याशिवाय दुसरीकडे लक्ष असते का तुमचे?..."
"मला म्हणतेस? ती कामे करतो म्हणून हा राजेशाही थाट दिसतोय. पैसा हातात खुळखुळतो म्हणून तुझे शानशोक चालतात..."
"काय तर म्हणे शानशोक? पैसा मिळविण्यासाठी बायकांच्या गर्भाशयाची पिशवी साफ करायला कुणी सांगितले?"
"माझ्याकडे सुरूवातीला गर्भपातासाठी येणाऱ्यांमध्ये आधीची जास्त मुले आहेत म्हणून गर्भ नको, बलात्कारातून राहिलेला गर्भ नको, एखाद्या विधवेस राहिलेले मूल नको अशी कारणे असत, काही वर्षांपासून मुलगी नको म्हणून गर्भपात करायचा हे एक नवीनच फॅड निघाले आहे. शिवाय आजकाल कुमारी माता नको म्हणून गर्भ पाडण्यासाठी मुली सर्रास येताहेत. त्यामागे मुलींच्या वागण्यातील मोकळेपणा आणि हे.. हे पोषाख कारणीभूत आहेत. अगोदर मुलींना नको तेवढे स्वातंत्र्य द्यायचे आणि तिचा पाय कळत नकळत, जाणते अजाणतेपणी घसरला की मग दवाखाना गाठायचा असे वातावरण आहे म्हणूनच भीती वाटतेय गं..."
"काहीही होणार नाही. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. टेंशन घेऊ नका आणि पुन्हा हा विषय काढू नका. मला तेवढीच कामे नाहीत. बाहेरची बरीच कामे आहेत..." असे म्हणत पत्नीने तो विषय संपवला...
डॉ. अजय गुंडे यांच्या दवाखान्यात चालणारे प्रकार सर्वत्र समजलेच होते. गर्भलिंग निदान, गर्भपात या प्रकारातून गुंडेंनी कोट्यावधीची माया जमविली हे जरी खरे असले तरी त्यांना सातत्याने त्रासही होत असे. कधी कोणता अधिकारी, कधी कुणी! प्रत्येक वेळी आलेल्या व्यक्तीचे, टीमचे हात दाबावेच लागायचे. अनेक वेळा प्रकरण पैसे देऊनही दबत नसे अशावेळी कधी जिवलावेंची तर कधी इतर पुढाऱ्यांची मदत घेवून प्रकरण निस्तरावे लागे. कालांतराने डॉ. गुंडे सराईताप्रमाणे प्रत्येक वेळ निभावून नेत. शिवाय जिवलावे एकदा त्यांना म्हणाले,
"कसे आहे, डॉक्टर, फार मोठ्ठे लचांड असेल तरच आमच्याकडे येत जा. अहो, कितीही मोठा अधिकारी आला आणि त्याला तुकडा फेकला की झाले. मित्र म्हणून आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी आहोत, तुमचेच आहोत. पण अगदी नाईलाज झाला तरच हाक द्या. जिवाचे रान करून तुम्हाला मदत करू पण असे छोटे छोटे प्रकरण घेत रहा मिटवून. शिवाय लहानसहान केसमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत हे कुणाला समजले तर आमचे रेप्युटेशन खराब होईल हो. विरोधकांनी एखादे प्रकरण उचलले, लावून धरले तर आमचे राजकीय जीवन संपेल हो. काय समजते ना?"
जिवलावेंचे म्हणणे डॉ. गुंडेनाही पटले. ते संबंधितांकडे नियमित हप्ता पाठवू लागले. त्यामुळे त्यांच्या दवाखान्याकडे कुणी ढुंकूनही पहात नव्हते. डॉ. अजयनी समोरील व्यक्तिची सामाजिक, आर्थिक स्थिती लक्षात घेवून फी आकारण्यास सुरुवात केली... नव्हे लुबाडायला सुरवात केली. इकडे लुटायचे आणि तेच तिकडे वाटायचे असे तंत्र त्यांनी सर्रास वापरायला सुरवात केली. त्या दिवशी निशाला घेऊन आगलावे आले. त्यांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा नेहमीप्रमाणे डॉ. गुंडे यांनी निशाचा गर्भपात केला परंतु त्यादिवशीपासून ते प्रचंड अस्वस्थ होते, निराश झाले होते. त्यांना एक अनामिक भीती भेडसावत होती की, छाया निशाची मैत्रीण आहे. दोघी सोबतच असतात. शिवाय तो प्रशांत या दोघींचाही मित्र आहे. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी निशाला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने बिनदिक्कतपणे प्रशांत जिवलावे याचे नाव घेतले होते परंतु छाया आणि प्रशांत यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना तिने मोठ्या खुबीने टाळले परंतु तिचे बोलके डोळे बरेच काही सांगत होते. त्यामुळे डॉ. अजय अधिक चिंताक्रांत झाले होते.
निशाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांची गोष्ट. निशाच्या तब्येतीची चौकशी करायची म्हणून डॉ. अजय यांनी छायापासून तिचा क्रमांक घेतला आणि स्वतःच्या खोलीत जाऊन निशाला फोन लावला. फोन निशाने उचलताच तिच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांनी विचारले,
"निशाबेटी, तू मला माझ्या छायासारखी. मला एक गोष्ट खरी खरी सांगशील का?"
"विचारा ना काका..." निशाने साशंकतेने विचारले.
"बाळा, तू त्यादिवशी सांगितले की, तुझे आणि त्या प्रशांतचे संबंध आहेत म्हणून. अनेकदा मी छायालाही प्रशांतसोबत पाहिले आहे. तेव्हा छायालाही त्याने फसवले..."
"काका, आजकाल हे फसवणे नसते तर सारे काही संमतीने होत असते. मला नक्की माहिती नाही पण तुम्ही मला छायाप्रमाणे मुलगी समजता म्हणून सांगते की, मला खात्री आहे की, त्या दोघांमध्ये ते संबंध असावेत. आजकाल हे प्रकार सर्वत्र सर्रास आणि बिनधास्तपणे चालतात. शिवाय तुम्ही असल्यावर छायाला कशाची भीती असणार? काका, बहुतेक प्रशांतचा फोन येतोय. ठेवते..." असे म्हणत निशाने फोन ठेवला तसे अजय पलंगावर धाडकन बसले. मनाशीच म्हणाले,
'एवढे सारे होऊनही, ज्याच्यामुळे गर्भपाताची पाळी आली त्या प्रशांतला पुन्हा बोलायला, भेटायला ही निशा उतावीळ झालीय. खरे आहे तिचे, सब चलता है। याचा अर्थ ज्या मार्गाने निशा गेलीय आणि अजूनही जातेय त्याच मार्गावर माझी छायाही जातेय म्हणायची..." असे पुटपुटत डॉ. गुंडे यांनी पलंगावर अंग टाकून दिले आणि डोळे मिटून ते पडून राहिले...
००००