Like whose karma - 9 books and stories free download online pdf in Marathi

जैसे ज्याचे कर्म - 9

जैसे ज्याचे कर्म! (भाग ९)
असेच दिवस जात होते. केवळ डॉ. गुंडे यांच्या शहरातच नव्हे तर राज्यातील अनेक शहरातील दवाखान्यांमधून 'नको असलेले मुलीचे गर्भ' काढून टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले होते. नवविवाहित तरुणीला गर्भ राहताच अनेक कुटुंबातून 'गर्भलिंगनिदान' करण्याचा प्रकार वाढत होता. या चाचणीतून गर्भाशयात नुकताच फुलू लागलेला गर्भ मुलीचा आहे असे समोर येताच तो गर्भ पाडून टाकण्याकडेही अनेक कुटुंबीयांचा कल वाढत होता. विशेष म्हणजे 'तसा' आग्रह धरण्यात ती तरुणीच पुढे असायची. दिवसेंदिवस गर्भलिंगनिदान आणि गर्भपात ह्या प्रक्रिया वाढत असल्याने आणि सामाजिक संघटना, महिला संघटना यांचा दबाव वाढत असल्यामुळे शासनाने स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली होती. योगायोगाने त्याच काळात जिवलावे हे आरोग्य मंत्री झाले होते. आणि त्यांच्याच पुढाकारातून ही मोहीम राबविली जावू लागली. ठिकठिकाणच्या दवाखान्यात धाडी पडू लागल्या. दवाखाने सील होऊ लागले परंतु डॉ. गुंडे यांच्यावर तशी कोणतीही कारवाई झाली नाही कदाचित जिवलावेंमुळेच डॉ. अजय गुंडेंच्या दवाखान्याकडे सारेच कानाडोळा करीत असत.
'येथे गर्भलिंगनिदान केले जात नाही. गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे.' अशा आशयाच्या पाट्या, इतर म्हणी, चित्रे, दवाखान्यात रंगवून डॉ. गुंडे यांनी बाजी मारली. याशिवाय वर्तमानपत्र, मासिक यात लेख लिहून, विविध माध्यमांना मुलाखती देऊन, ठिकाठिकाणी भाषणे देत डॉ. गुंडे यांनी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात शासकीय मोहीमेस भरपूर सहकार्य केले होते. जिथे जिथे ते या मोहिमेसंदर्भात जे करता येईल ते सारे करून डॉ. गुंडेनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आणि दुसरीकडे स्वतःच्या दवाखान्यात गर्भलिंगनिदान आणि गर्भपात या गोष्टी सर्रासपणे केल्या जात होत्या. ते म्हणतात ना, 'दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे' अशी परिस्थिती डॉ. अजय गुंडे यांची झाली होती. त्या दिवशी आरोग्यमंत्री जिवलावे यांच्या सचिवांचा डॉ. गुंडेंना फोन आला. ते म्हणाले,
"डॉ. गुंडे, नमस्कार! स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात जनजागृती व्हावी म्हणून शासन एक उच्चस्तरीय समिती नेमण्याच्या विचारात असून आरोग्यमंत्र्यांसह इतर काही मंत्री, गणमान्य व्यक्ती, अधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश असेल. या समितीच्या कार्यवाहक पदी तुमच्या नावाची शिफारस आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होताच आपणास रितसर कळविले जाईल..."
डॉ. गुंडे विचारात दंग असताना कुणी तरी त्यांच्या शयनकक्षाचे दार जोरजोराने वाजवत होते. पाठोपाठ पत्नीचा आवाज आला, "अहो.. अहो काय झाले? दार का लावले? आज ओपीडी नाही का? प्रकृती बरी नाही का? असे काय करता?..." परंतु अजयने तिकडे पूर्ण दुर्लक्ष केले. अचानक त्यांना छायाची आठवण झाली. ते पुन्हा विचार करू लागले...
'का... का केलेस बाळे तू असे? असा कसा तुझा पाय घसरला म्हणावा? अशी मोहात कशी पडलीस तू? नाही. नाही. छाया, तू असे करुच शकत नाहीस. असे तर नसेल झाले ना की, गेल्या काही दिवसांपासून विशेषतः निशाची शस्त्रक्रिया केल्यापासून मला तुझी शंका येत होती, सारखे तेच तेच विचार येत होते म्हणून सकाळी शस्त्रक्रिया केलेल्या मुलीचा चेहरा तुझाच... माझ्याच छायाचा असल्याचे मला जाणवले नाही ना? तसे असेल तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. पण नाही. माझे डोळे मला धोका देऊ शकत नाही. समजा मला तसा भास झाला असला तरीही त्या नर्सनेही छायाला ओळखले होतेच की. ती...ती छायाच होती... माझी छायाच होती. का... का.. असे का केलेस ग छायाराणी? नाही तुझे तरी काय चुकले म्हणा? आम्हीच तुझ्यावर योग्य संस्कार करू शकलो नाही. पैशाच्या हव्यासापायी नको ते करीत राहिलो. म्हणतात ना या जन्मात केलेल्या पापांची शिक्षा याच जन्मी भोगावी लागते. मी जी जी कुकर्मे केली त्याची सजा भोगावीच लागणार. समाजात तोंड काढायलाही जागा उरणार नाही. गर्भपाताचे दुष्कृत्य करताना हरामाचा पैसा कमाविण्याचे पाप मी केले. पण पोरी, तू एवढी हुशार आणि तू अशी वागलीस? काही महिन्यांपूर्वी तुझ्या मैत्रीणीचा गर्भपात मी करावा अशी तू गळ घातलीस. तेव्हाच मी का सावध झालो नाही? परवा निशाचाही गर्भपात मी केला. म्हणजे तुझ्या दुसऱ्या मैत्रिणीचा मी गर्भपात केला आणि त्यावेळी माझे डोळे खाडकन उघडले. असल्या मैत्रिणींसोबत राहून तशीच वेळ तुझ्यावरही येऊ शकते हा विचार माझ्या मनात विजेप्रमाणे माझ्या डोक्यात शिरला. पण तेव्हा खूप वेळ झाला होता. सकाळी तुला तशा अवस्थेत पाहिले आणि माझे सर्वस्व हरवले असल्याची जाणीव मला बेचैन करीत आहे. आता सारे संपले गं छाया बेटी, सारे सपंले. ही बातमी समाजात पसरेल. मीडीया या गोष्टीचे रवंथ करेल. सामजिक संघटना, महिला संघटना मोर्चा काढतील. सर्वत्र छीः छीः होईल. कदाचित हे प्रकरण वरच्या पातळीवर चर्चिल्या जाईल. आपला दवाखाना सील केला जाईल. काही संघटना मोडतोड करून माझ्या तोंडाला काळे फासतील, चपलांचा हार घालून माझी गाढवावरून धिंड काढतील. निषेधांचे मोर्चे निघतील. निषेध सभा घेतल्या जातील. आता मी काय करू? कुठे जाऊ? जिवलावेंना फोन लावू? नको. आत्ता ते गडबडीत असतील. आता ते सहकार्यही करणार नाहीत, माझी मदतही करणार नाहीत. माझी मदत करून ते स्वतःची खुर्ची आणि राजकीय जीवन का धोक्यात आणतील? तेच काय आता कुणीही माझ्या मदतीला येणार नाही. माझ्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये केवढा विरोधाभास आहे. एक हजार कळ्या खुडणारा मी स्त्रीभ्रुण हत्येच्या विरोधात बोलूच कसा शकतो? त्याविषयावर विविध माध्यमातून मी जनजागृती कशी करु शकतो? याच विषयावर नेमलेल्या समितीत मी कसा काय राहू शकतो? तो हक्क मला कुणी दिला? 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' अशी माझी अवस्था नाही का? बाहेर कुठे कळाले असेल का? नक्कीच समजले नसेल. कसे कळेल? आजवर कधी समजले का? मग आजच कसे समजेल? नेहमीप्रमाणे गणपत 'त्याची' विल्हेवाट लावायला गेला आहे. तो नाही कुणाला समजू देणार? खूप हुशार आणि चलाख आहे गणपत! या कानाचे त्या कानाला कधी कळू देत नाही. त्याने आजवर शेकडो अभ्रकांची 'व्यवस्था' लावलीय पण कुणाला काही कळू दिले नाही आणि आजही कुणाला कळणार नाही. पण म्हणतात ना घर फिरले की, घराचे वासेही फिरतात.' आज सकाळपासूनच मला कसे वेगळे वाटते आहे. पण छाया, अशी कशी वागू शकते? काल संध्याकाळीच तर तिने ...' मनात बडबड करणाचा डॉ. अजय गुंडे याना तो प्रसंग आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला....
त्यादिवशी नेहमीप्रमाणे डॉ. गुंडे एक महत्त्वाची बैठक संपवून दवाखान्यात अर्थात घरी परतत होते. त्यादिवशी त्यांनी चालकाला सुट्टी दिली होती त्यामुळे ते स्वतः कार चालवत होते. एका सिग्नलला त्यांची कार थांबली होती. त्यांचे लक्ष रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्या मोठ्या हॉटेलकडे गेले. ते हॉटेल जसे महागडे होते तसेच ते इतर धंद्यासाठीही प्रसिद्ध होते. हॉटेलच्या वरच्या बाजूला बार आणि लॉज होती. मंत्री आगलावे शहरात असले म्हणजे त्याच लॉजवर उतरत असत. त्यांच्या बैठकाही त्याच हॉटेलमध्ये होत असत. अशा बैठकांना अनेकदा डॉ. गुंडेही उपस्थित असायचे त्यामुळे गुंडे त्या हॉटेलला आणि तिथे चालणाऱ्या अनैतिक व्यवसायाला चांगले ओळखून होते. ते तसे विचारात गुंतलेले असताना त्यांना एक तरुण जोडपे त्या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसले. त्या जोडप्याला पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून छायाची जवळची मैत्रीण निशा होती. तिच्यासोबत असणारा मुलगा दुसरा-तिसरा कुणी नसून प्रशांत जिवलावे होता. याचा अर्थ एवढा मोठा प्रसंग घडूनही निशा पुन्हा त्याच वाटेने जात होती आणि तिच्या साथीला पुन्हा प्रशांतच होता.
'हे दोघे इथे कशाला आले असावेत? दोघे बाहेर पडताना किती सलगीने बाहेर पडत होते. या ठिकाणी हे दोघे पुन्हा आले होते म्हणजे त्यांनी झालेल्या घटनेतून कोणताही धडा घेतला नव्हता. दोघेही विशेषतः निशा काहीच शिकली नव्हती...' डॉ. गुंडे तशा विचारात असताना सिग्नल सुरू झाले आणि डॉ. गुंडे यांनी तो विचार आत दाबून कार पुढे घेतली...
००००