Gets swayed - 4 books and stories free download online pdf in Marathi

दुभंगून जाता जाता... - 4

4

तसा अभ्यासात पहिल्यापासून मी सर्वसाधारण होतो. परीक्षेमध्ये सर्वसाधारण गुणांनी उत्तीर्ण होण्यापलीकडे विशेष अशी माझी प्रगती नव्हती. पण विविध खेळामध्ये आणि शालेय स्पर्धेमध्ये मात्र मी अव्वल होतो. खेळाच्या सांघिक आणि वैयक्तिक प्रकारामध्ये जिल्हा आणि राज्यस्तरावर शाळेला विजेतेपद मिळवून देण्यामध्ये माझा मोठा वाटा होता. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्येही मी चमकलो होतो.

शालेय परीक्षांचे दिवस होते. मी नववीच्या वर्गाची अंतिम परीक्षा देणार होतो. वर्ष संपत आलं की खूप रुखरुख लागून रहायची. शैक्षणिक वर्ष संपायला नको असे वाटायचे. याचं कारण असं होतं की, आम्हां मुलांचे बालसंकुल मध्ये राहून शिकण्याचे एक ठराविक वय होते. ते ठराविक वय संपल्यानंतर आम्हांला बालसंकुल सोडावे लागायचे. साधारण १० वी पर्यंत आम्ही बालसंकुलमध्ये राहून शिक्षण घेऊ शकत असे. त्यानंतर आम्हांला जवळचे नातेवाईक – पालकांकडे सोपविण्यात यायचे. ज्यांचे कुणीच नाही त्यांना मात्र हे सगळं आव्हानात्मक असायचे आणि त्यापैकीच मीही एक होतो. कारण मी पुन्हा आता आजी – आजोबांकडे जाणं अशक्य होतं. मला माझी वाट शोधणे गरजेचे होते. त्यामुळे या गोष्टीची मला सतत चिंता लागून राहिलेली असायची.

एकदाची नववीची परीक्षा संपली. निकाल हाती आला. साधारण अभ्यास असल्यामुळे निकालही साधारणच असणार हे ठरलेले होते. आमचे वर्गशिक्षक नाडकर्णी सर आणि इतर शिक्षक माझा निकाल पाहून खूपच नाराज झाले. विशेषतः जाधव सर माझा हा निकाल पाहून खूप दु:खी झाले. त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले.

राजू,तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. तुला मन लावून अभ्यास करायला हवं. तुझी मेहनत खूपच कमी आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. पुढचा शैक्षणिक खर्च तुला परवडण्यासारखा नाही. जे काही मिळवायचं आहे ते तुला गुणवत्तेच्या आधारावरच मिळवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींची तुला जाणीव असणे गरजेचे आहे. आजी – आजोबांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. सरांचं बोलणं थांबलं तसं मला काय बोलायचं तेच कळेनासे झाले.

सर मला माफ करा. मी इथूनपुढे मन लावून अभ्यास करेन...

राजू, आता दहावीचं महत्वाचं वर्ष सुरु होईल. बोर्डाच्या परीक्षेचं हे वर्ष. सुरुवातीपासूनच अभ्यासाचं नियोजन कर. दहावीचं हे शेवटचं वर्ष यासाठी महत्वाचं आहे की, दहावीनंतर तुला तुझं नवं आकाश शोधायचं आहे. बाहेरचं जग खूप व्यवहारी आणि मतलबी आहे असा माझा अनुभव आहे. या व्यवहारी आणि मतलबी जगात आपल्याला टिकायचं असेल तर आपल्या पंखात उंच भरारी घेण्याचं आणि संकटाचा सामना करण्याचं बळ असायला हवं. आताच्या घडीला तू जर चांगली मेहनत घेतलीस तर उद्याचं तुझं भविष्य हे उज्वल असेल यात तिळमात्र शंका नाही.

सर जे बोलत होते, इतक्या आपुलकीने सांगत होते तो प्रत्येक शब्द मी मनात साठवून ठेवत होतो. खरं होतं मला बाहेरच्या जगाची कल्पना नव्हती. ज्यावेळी मी बालसंकुलमधून बाहेर पडलो त्यावेळी मला बाहेरच्या कठोर आणि व्यवहारी जगाची आणि संवेदना हरवलेल्या लोकांची चांगलीच ओळख झाली.

बाहेरच्या जगाच्या कटू सत्याची दाहकता मला सरांच्या बोलण्यातून जाणवली.

आजवर आपली खूप अवहेलना झालेली आहे. नशिबाला येताना फक्त अनाथपण येत नाही तर त्याबरोबर येतो समाजाचा तिरस्कार, अपमानास्पद वागणूक आणि भेदभाव हे सगळ पुसायचं असेल आणि समाजामध्ये ताट मानेन आणि स्वाभिमानानं जगायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही,याची जाणीव खोलवर मनात रुजली होती.

जोमाने आणि नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली. पण आयुष्यचं पूर्ण खाचखळग्यांनी आणि संघर्षानी भरलेलं असेल तर नियतीच्या पुढे कुणाचं काय चालणार आहे. आजकाल अवनी माझ्याशी खूपच जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत होती. मी अनेकवेळा तिला टाळण्याचा प्रयत्न करत असायचो पण माझं तिला टाळणं तिच्या नजरेतून सुटायचं नाही.

काय रे राजू काय झालं ? का टाळतोयस तू मला... हां तू समजतोस इतकीही मी वाईट नाही.

नाही अवनी तसं काही नाही पण... माझे मित्र आपल्या नात्याबद्दल उलट-सुलट चर्चा करत असतात. ते मला नाही आवडत. तू जी मला मदत करतेस, माझ्यासाठी दुपारच्या जेवणाचा डबा आणतेस याबद्दलही त्यांना शंका वाटते. ते मला टोमणे मारतात, नेहमी चिडवत असतात.

ठीक आहे ना... काही प्रोब्लेम नाही. तू नको काळजी करू. आणि हो मी तुला मदत करते ती एक सहानुभूती म्हणून नव्हे तर, तू एक माझा चांगला मित्र आहेस म्हणून. तुझे विचार, तुझी धडपड, तुझे कष्ट आणि सगळ्यात वेगळेपण म्हणजे तुझ्यात असलेली नम्रता, प्रामाणिकपणा हे सगळे तुझे गुण मला आवडतात म्हणून मी तुला मदत करते. तुझ्याशी मैत्री करायला, बोलायला मला आवडते म्हणून मी तुझ्याशी बोलण्याचा, तुझ्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करते.

आपण एक चांगले मित्र आहोत... आणि मित्रांनी एकत्र बोललं,बसलं तरी काय बिघडणार आहे...? आणि हो लोकांचा विचार नको करू. लोक आपल्या नात्याला काहीही बोलतील पण मी आहे ना तुझ्यासोबत...

आपल्या मैत्रीच्या नात्याबद्दल मी माझ्या आई – बाबांनाही सांगितले आहे. तू घाबरू नकोस... आणि हो तुला सांगायचं विसरले मी, उद्याच माझा वाढदिवस आहे. माझ्या घरी मी आपल्या सर्व मित्रांसाठी पार्टी देणार आहे.

अवनी घाई घाईने निघून गेली. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. एवढ्यात राकेश आला.

काय रे राजू कसली चिंता करतोयस...? काय झालं असं तोंड पाडून बसायला...?

आणि तुझी लाडकी मैत्रीण अवनी कुठे आहे...?

मैत्री करणं गुन्हा आहे का...? तुमच्या मनात पाप आहे त्याला मी तरी काय करणार.

राजू, तुझ्यावर माझा विश्वास आहे पण तुमची ही जवळीकता, दोघांचं असं इतरांपेक्षा वेगळं राहणं, कुणाच्यात न मिसळण आणि विशेषता स्वतःच्याच विश्वात रममाण होणं. हे सगळं निदर्शनास यायला वेळ लागत नाही. हे बघ मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा आणि पुढच्या वर्गात असल्याने एक मित्र या नात्याने तुला सांगत आहे... हे या वयातलं एकमेकांबद्दलचं आकर्षण आहे. हे तू कितीही लपविण्याचा प्रयत्न केलास तरी ते तुझ्याही मनाला माहीत आहे.

ती खूप श्रीमंत कुटुंबातली लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी आहे. तिचे बाबा बाबाराव इंगळे मोठे राजकारणी आहेत. त्यांची एक मोठी गुंडांची फौजच या शहराच्या राजकारणात काम करते. सत्तेसाठी लोकांचे जीव घ्यायलाही हे लोक मागेपुढे पाहत नाहीत. तुझ्या आणि अवनीच्या नात्याबद्दल कुणी काही उलटंसुलट सांगितलं तर विचार कर तिचा बाबा एकुलत्या एक मुलीसाठी तुझी काय अवस्था करेल...?

राकेश सांगत होता ते बरोबर होतं. अवनीला एकदाच स्पष्ट सांगून टाकलेलं बर असा मी विचार केला... दुसऱ्या दिवशी तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्र तिच्या घरी गेलो.

आंम्ही सर्व मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या. खूपच मोठ्याने तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तिला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. संपूर्ण घर रोषणाईने सजले होते. विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. नोकर – चाकर पाहुण्यांच्या सेवेसाठी इकडून – तिकडे धावत होते. हे सगळं पाहिल्यानंतर मी स्वतःमध्ये डोकावून पाहू लागलो. विचार करू लागलो...

आजवर आपला एकही वाढदिवस कुणीही साजरा केला नाही. आपलंच नशीब इतकं फुटकं कसं असावं... याबद्दल मी विचार करू लागलो... नशिबाला दोष देऊ लागलो. आम्ही बालसंकुल मधून आलेली सर्व मुले जेवणासाठी पंक्तीत बसलो. तेवढ्यात तिथे एक नोकर आला आणि म्हणू लागला...

तुम्हांला इथं कोण बोलवलं...? आणि इथं जेवायला बसायला कोण सांगितलं... ? चला उठा इथून... तुम्हांला आम्ही वेगळ्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. चला तिकडे...

या प्रसंगाने आता हळू हळू बाहेरच्या जगाचा अनुभव यायला सुरुवात झाली होती. या घटनेचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. हे पांढरपेशे लोक गरीबाबद्दल खोटी सहानुभूती दाखविणारे आणि आपण खूपच दानशूर आहोत हे मिरवणारे, यांचा खरा चेहरा आज मला समजला होता.

अवनीच्या वाढदिवसादिवशी जी आम्हांला अपमानास्पद वागणूक मिळाली, त्याबद्दल मी अवनीशी बोललो. पण तिने ती गोष्ट इतकी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे तिची विचारधारा आणि मानसिकता मला समजली. तिथून पुढे पुन्हा मी तिच्याशी कधीच बोललो नाही ना ती कधी बोलण्यासाठी माझ्याकडे आली.