Gets bunched up - 8 books and stories free download online pdf in Marathi

दुभंगून जाता जाता... - 8

8

खरंतर कुठंतरी स्थिर व्हावं, चांगली नोकरी मिळावी आणि इतरांसारखं आपलंही घर व्हावं. छान छोटंसं कुटुंब असावं ही स्वप्न पाहण्याचं ते वय होतं. मी लहान होतो तेव्हा शाळेत पालक मिटिंग असायची वर्गातील इतर मुलांचे पालक आलेले पाहून मनाला वाटायचं आपलंही कुणीतरी असायला हवं होतं. आज थोडेफार कमवायला लागलो असलो तरी ते पोरकंपण अजूनही संपल नव्हतं. पैशापेक्षा मानसिक आधार आणि मायेच्या सावलीची खरी गरज असते. याची जाणीव मला त्यावेळी झाली.

ज्यावेळी मी स्टेजवर बक्षीस घ्यायला जायचो त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि त्या समोरच्या गर्दीत मी आई – बाबांचा, आजी – आजोबांचा चेहरा शोधत रहायचो. आज अनेकांचे आई-बाबा आपल्या मुलांचे कौतुक करायला, त्यांचे यश साजरे करायला आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला आलेले असताना माझे आई,बाबा,आजी,आजोबा मात्र या गर्दीत कुठे हरवले असतील असा मनात विचार यायचा.

खरं तर १२ वी ला कला शाखेत प्रथम , बी.ए. मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊनसुद्धा मला शिक्षणाबद्दल आस्था का वाटत नव्हती याचं उत्तर मी आत्ता देऊ शकत नाही पण त्यावेळी मात्र मी देऊ शकलो असतो... कारण मला नेहमी वाटायचं की शिक्षण काही भाकरी देणार नाही. भाकरी मिळविण्यासाठी मला कामचं करावे लागेल. चांगल्या नोकरीसाठी पैसे भरावे लागतात तेवढे पैसे आपल्याजवळ नाहीत... त्यावेळची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दलची माझी आश्वासक दृष्टी संपली होती... आजही परिस्थिती काही वेगळी नाही... पण तरीही शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याचं कारण सर्व प्रश्नांचं उत्तर हे शिक्षण आहे. त्यानंतर काम करत मी शिवाजी विद्यापीठातून एम.ए.केलं...

मी ज्या–ज्या वेळी दिक्षीत सरांकडे नोकरीचा विषय काढायचो त्या-त्या वेळी सर मला म्हणायचे, राजू कितीही अडचण आली तरी शिक्षण सोडायचं नाही. तुला काही अडचण आली, फी भरायची असेल तर मला सांग! आणि हो तू जिथं आता क्लार्क म्हणून काम करतो आहेस तिथंच पुढं काम करत बी.एड कर... दिक्षीत सरांचा हा विचार मला पटला. शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि नोकरीच्या थोड्या मिळणाऱ्या पैशातून बी.एड.चा खर्च भागविण्याचे ठरवून मी शिवराज एज्युकेशन सोसायटी, भडगाव. येथून बी.एड. करण्याचे ठरवले.

खरंतर माझ्या बी.एड करण्याला डी.एड कॉलेजमधील आणि बी.एड मधील अनेक कर्मचाऱ्यांबरोबर प्रशासनाचाही विरोध होता. याचं कारण असं होतं की, मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारामध्ये मी आयुष्यभर तिथे शिपाई आणि कारकून म्हणूनचं राबावे असे अनेकांचे मत होते. जर मी बी.एड. झालो तर मी तिथे जास्त काळ शिपाई आणि कारकून म्हणून काम करू शकणार नाही.याची त्यांना कल्पना होती. मी शिकू नये, पुढे जाऊ नये अशी अनेकांची आतून तीव्र इच्छा होती. त्यामुळे मी बी.एड.करत असताना मला त्रास देण्याची थोडीही संधी माझ्या हितचिंतकांनी सोडली नाही. होय मी त्यांना माझे हितचिंतकच म्हणेन, कारण मी आज जो आहे ते अशाच लोकांमुळे...! या सगळ्या विरोधांमध्येही मला मदत केली ती माझा सहकर्मचारी मित्र नरेंद्र याने. तसेच आतून पडद्यामागून मदत केली ती म्हणजे माझे डी.एड. चे विभाग प्रमुख कुंभार सर यांनी. मी शिकावे, मोठे व्हावे अशी त्यांची खूप तळमळ होती. पण त्यांचे संस्थेपुढे काहीच चालत नव्हते.

खूप वर्षांपासूनचा मी तिथला विद्यार्थी आणि कर्मचारी असूनही माझ्या फी मध्ये कोणतीही सूट दिली नाही. याचं दु:खं तर होतंच पण मी शिक्षण घेतोय हे कारण पुढे करून,त्यांनी प्रत्येक महीन्याचा माझा अर्धा पगार कापला.याचं दु:ख जास्त वाटत होतं. कारण अगोदरच तुटपुंज्या पगार आणि त्यात अर्धा पगार कापल्यानंतर माझ्या हातात येणार होते फक्त चारशे ते पाचशे रुपये. जरी राहणे,जेवण बालगृहात असले तरी बाकीचा शैक्षणिक खर्च तर मलाच करावा लागणार होता. त्यात बी.एड.ची प्रात्याक्षिके, विविध नोट्स, झेरॉक्स, संशोधने, सराव पाठ टाचण, सराव पाठ घेण्यासाठी वेगवेगळ्या गावात जाण्यासाठी लागणारा प्रवासखर्च यामुळे माझी खूप ओढाताण होऊ लागली.

वर्षभराचा अर्धा पगार कापल्याचे दु:ख एवढ्यासाठी वाटत होते की, जरी मी त्याचं कॉलेजवर बी.एड करत नोकरी करत असलो तरी, माझं दिवसभरातील कोणतेही काम अपूर्ण ठेवत नव्हतो. भले मी कॉलेज सुटल्यानंतर रात्री नऊ – दहा वाजेपर्यंत जादा वेळ थांबून मी माझं काम पूर्ण करत होतो. आवक, जावक, मुलांचे दाखले तयार करणे, कागदपत्रांवर शिक्के मारणे, टंकलेखन करणे तसेच वर्गांची साफसफाई करणे ही सर्व कामे इमानेइतबारे करूनही मला ही शिक्षा मिळावी, या गोष्टीचं खूप दु:ख वाटत होते.

मी डॉ.दिक्षीत सरांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते मला म्हणाले, राजू तुझ्या राहण्याची, जेवणाची सोय झाली आहे हेच महत्वाचं आहे. आणि राहिली गोष्ट तुझ्या पगाराची तर एवढे एक वर्ष पगाराची कोणतीही अपेक्षा करू नकोस. जे मिळत आहे त्यामध्ये समाधानी रहा. तुला त्यांनी नोकरी करत पुढं शिक्षण घेण्याची परवानगी दिलेली आहे हीच सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तू कोणतीही अपेक्षा करू नकोस. तुला पैसे हवे असतील तर इथूनपुढे मी देईन.पण कशाचीही चिंता न करता तू अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर...! डॉ. दिक्षीत सरांनी ज्या दोन गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी मला पटल्या.

बी.एड.ला तृतीय क्रमांकाने उत्तीर्णही झालो... आता पुढे काय...? पुन्हा डॉ. दिक्षीत सरांकडे नोकरीसाठी गेलो तर, सर पुन्हा मला म्हणाले... पुढं शिक !... खरं तर बी.एड झाल्यामुळे नाही तर,१२ वी झाल्यापासूनच मी सरांकडे वारंवार नोकरी द्या म्हणून पाठीमागे लागायचो. शिक्षण घेण्याऐवजी नोकरी करण्याची प्रबळ इच्छा माझ्या मनामध्ये बळावण्याची अनेक कारणे होती. बालगृहातले हे बंदिस्त आयुष्य आता मला नको वाटत होते. उंच उडावे, भरारी घ्यावे, स्वतःचे आकाश निर्माण करावे असे मनोमन वाटत होते. नोकरी आणि पगारापेक्षा मला मोकळा श्वास घेण्याची,मुक्त होण्याची तीव्र इच्छा मनातून दाटून आली होती. नोकरी हे एक कारण होतं ...

आणि हेचं कारण संस्थेच्या पत्त्यावर पडले. एक दिवस संचालक राजाराम देसाई सरांनी मला घरी बोलावून घेतले आणि म्हणाले, राजू तू आता मोठा झाला आहेस... तुला पंख फुटले आहेत... आमची इच्छा आहे आता तू भरारी घ्यावीस... तुला दरवाजा उघडा आहे... एवढं बोलून सरांनी दरवाज्याकडे अंगुली निर्देश केला. आजपर्यंत मी बाहेर पडण्याचा विचार करत होतो खरा पण स्वतःचं संस्थेने मला बाहेर पडण्याचा आदेश दिल्यानंतर माझी पायाखालची जमीनच सरकली. बालगृहामध्ये माझा शैक्षणिक पाया मजबूत झाला होता. बालगृहाने मला मायेची ऊब आणि प्रेमाची सावली दिली होती खरी पण बालसंकुल मधला ओलावा मला इथं जाणवत नव्हता.याचं कारण हे बालगृह इथल्या संस्थेच्या संस्थापक, संचालक प्रशासनाने आणि इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोखरून काढलं होतं. संस्थेत प्रचंड भ्रष्टाचार आणि मनमानी माजली होती. या सर्व गोष्टी मी जवळून पाहत होतो. मी आवाज उठवेन याचीही त्यांना भीती होती. मी तिथेच रहावे ही त्यांची इच्छा असली तरी मी त्यांच्या ताटाखालचे मांजर बनून रहावे हीच त्यांची इच्छा होती. मला बोलण्याचा आणि मत मांडण्याचा कोणताही अधिकार नव्हता. अधिकार होता तो फक्त पडेल ते काम करण्याचा आणि जे मिळेल ते खाण्याचा...

सरकारी अनुदानातून मिळणारे धान्य आणि मुलांसाठी मिळणारे तेल,साबण, कपडे कुठल्या कुठे माझ्या डोळ्यासमोर हे कोल्हे गायब करायचे त्यावेळी माझं आतडं तीळ तीळ तुटायचे... गोर-गरीब, अनाथ, निराधार मुलांचा हक्क हिरावून घेणारे आणि तोंडचा घास पळवून नेणारे हे पांढरे ससे या मुलाचं काय आणि कसे भविष्य घडविणार... ? या सगळ्या गोष्टीमुळे आता इथूनपुढे इथे रहायचं नाही ही इच्छासुद्धा तितकीच प्रबळ झाली होती. हे सगळे चालणारे अनैतिक प्रकार उघड्या डोळ्यांनी बघितल्यापासून इथं राहण्याची माझी इच्छाचं मरून गेली होती. इथं राहून मी या मुलांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढू शकत नव्हतो... कारण इथली औलाद ही मेलेल्या मड्याच्या टाळोवरचे लोणी खाणारी होती. हे लोक मला जगू दिले नसते.