Aaiche majhya jivnatil astitva kuthe harvle - 5 books and stories free download online pdf in Marathi

आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 5

भाग ५
आता मी माझ्या आयुष्याकडेे वळते.माझ्या जीवनात असेे काय घडले,माझी आई माझ्यापासुन का दुर गेली,असे बरेच प्रश्न तुमच्या मनात येत असतील.
लहानपणापासून आम्ही एका छोट्याशा गावात राहत होतो.सर्व काही सुखरुप चालले होते.वडिलांचा धंदा अगदी जोमात होता.आईची तबियेत अतिशय चांगली होती.आई सर्व काम अतिशय जोमाने करत होती.सर्वांची काळजी ती घ्यायची. कोणाला काय हवे नको ते सर्व ती बघायची. तिच्याशिवाय घर जसे अपुर्ण होते.अगदी शांतपणे सर्वांचे काम करायची.माझी परिक्षा असताना मला एकही काम करु द्यायची नाही.लहानपणापासून तिने अगदी प्रेमाने मला वाढवले होते.आता ती नाही तर सर्व काम स्वतः करावे लागतात.आता काम, नोकरी,अभ्यास या सर्वांचा कंटाळा आला आहे.त्यामुळे लगातार आयुष्यात अपयश पाहुन पुर्णपणे मी खचली आहे.तेव्हा मला समजले,जर आई नाही तर जीवनात काहीही नाही.तीच आपल्याला यश प्राप्त करुन देण्यात मदत करुन देते.आपल्याला लहाणाचे मोठे करते, कुठे ठोकर लागली की सांभाळते.अजुन काय बोलु तिच्याबद्दल?
आमचे छोटेसे गाव असल्यामुळे तिथे विभिन्न प्राणी निघायचे.जीवनाच्या वाटेवर चालताना काटे तर येतात आणि त्याने इतका त्रास होतो की,ते आयुष्यभर आपण विसरु शकत नाही.तसेच काहीसे माझ्या आयुष्यातही घडले.माझ्या पायाखालुन जमीन सरकली.त्या रात्री असे घडले की ज्याचा मी विचारही करु शकले नव्हते.असा भयानक प्रसंग कोणाच्याच आयुष्यात न येवो.माझी आई त्या रात्री झोपेतुन ऊठुन मागच्या अंगणात गेली, तेव्हा पत्रांवरुन एक मोठा साप माझ्या आईच्या अंगावर पडला.माझी आई थोडक्यात वाचली.आईचे मन अतिशय नाजूक होते.आधीच तिने खुप काही सहन केले होते.त्यामुळे तिला खुप मोठा धक्का बसला.ती अतिशय घाबरली होती.लवकरात लवकर दोन तीन जणांना बोलावून त्या सापाला बाहेर काढण्यात आले.त्या सापाने कोणाला हानी पोहचवली नाही,पण त्याने आम्हा सर्वांच्या जीवनाला एक वेगळे वळण दिले होते.तेव्हा मी तर लहान होते.तेव्हा काय घडले,कसे घडले हे तर मला ज्ञात नव्हते,पण हे मात्र माहित होते की,या गोष्टीने मला माझ्या आईपासून हिरावुन घेतले होते.तेव्हापासुन माझ्या आईने स्वतःची दुनिया विसरून एक नवीन दुनिया बनवायला सुरुवात केली होती.थोडक्यात ती स्वतःला विसरत चालली होती.ती स्वतःचे आणि मी माझ्या आईचे अस्तित्व गमावत होते.तिची मानसिक स्थिती खालावत चालली होती.ती स्वतःशीच बडबडु लागली होती.म्हणजेच लोकांच्या भाषेत ती पागल झाली होती आणि लोकं तिला नेहमी त्याच नजरेने पाहु लागली होती.तेव्हापासुन माझी आई माझ्यापासून दूर झाली होती,ती फक्त शरिराने मा‌झ्यासोबत होती आणि त्या क्षणापासून तिचे माझ्यावरचे प्रेम नाहिसे होत चालले होते.आमचे हळूहळू नवीन बनवलेले घर तुटत चालले होते,कारण एक घर तेव्हा संपूर्ण बनते जेव्हा त्या घरातील लक्ष्मी सुखरुप असते.
वाटले नव्हते, माझ्या आईला इतक्या संकटांना सामोरे जावे लागणार.देवही कशी कशी परिक्षा घेत असतो,सरळ आयुष्य न जगता जीवनाला एक वेगळ्याच दिशेने घेऊन जात असतो आणि त्यातही चांगल्या माणसांच्या झोलीत असे दुःख टाकत असतो.आई स्वतःशीच बडबडु लागल्यामुळे सर्व लोक तिच्यावर हसु लागले.मदत करायला तर एकही समोर येत नव्हते,पण तमाशा बघण्यातच त्यांना मजा यायची.या जगात वाईटच लोक जास्त असतात आणि चांगले लोक फार कमी असतात.तेव्हापासून आम्हाला कधी आईच्या हातचे जेवण खायला मिळाले नाही.आई फक्त अंथरुणावर पडून राहायची.ना मनमोकळेपणाने कोणाशी बोलायची,ना आधीसारखी चंचल वागायची,आधीची माझी आई जणू कुठे हरवली होती.घरातील सर्वांच्या चेहऱ्यावरील हसु जणू गायब झाले होते.मनात फक्त एकच प्रश्न होता,माझी आई बरी होईल का नाही,बरी होईल तर कधी होईल?आमच्या संसाराचा गाळा परत कधी मार्गी लागेल.पण जे होणार होते ते झालेच,आईची तबीयेत अजून जास्त बिघडू लागली होती.काय करावे काहीच सुचेना.फक्त एकच भिती होती माझ्या आईला काही झाले तर आम्ही सर्वजण कसे जगणार?आधारस्तंभ म्हणून ओळख देणारी माझी आई माझ्यापासून दूर तर नाही जाणार?
विशाल ह्रदय असलेली माझी आई खरंच जीवनाचा सार बदलुन गेली.