Home Minister Part 1 books and stories free download online pdf in Marathi

होम मिनिस्टर (भाग १)

'दार उघड बये दार उघड!!'

"शमी, तो टीव्हीचा आवाज कमी कर आधी.", अरुण पेपर वाचता वाचता ओरडत म्हणाला.

"काय त्या आदेश बांदेकरने बायकांना पैठणीची स्वप्न दाखविली आहे देव जाणे. जिला-तिला होम मिनिस्टरमध्ये जायचय म्हणे" अरुणचे बोलणे सुरूच होते.

इतक्यात स्वयंपाक घरातून शमी बाहेर आली आणि म्हणाली, "काय वाईट आहे त्यात. पैठणी जिंकणे हा एक निव्वळ खेळ नाही तो मान आहे आमचा. आदेश भावोजी तो मान आम्हाला घराघरात जाऊन देत आहेत"

"आणि काय हो, तुम्हाला का इतकी चीड त्यांची. मी फोन करते म्हटलं तर तुम्हाला लगेच महत्वाचं काम येतं ऑफिस मधून. नाही त्या वेळेला असेच पडून असता घरी."

"बस कर हा शमी, आता तू माझ्या कामावर येऊ नकोस." अरुण म्हणाला.

इतक्यात शेजारची मीना बाहेरूनच ओरडत घरात आली.

"अहो, बंटीची आई ऐकलत का!! माझ्या शेजारी आलेली नवीन भाडेकरू नीलिमा तिचा नंबर होम मिनिस्टर मध्ये लागलाय आणि उद्याच येणार आहेत आदेश भावोजी आपल्या सोसायटीमध्ये" मीना आनंदी होत म्हणाली.

"काय बोलतेयस मीना. आदेश भावोजी आणि आपल्या सोसायटीमध्ये. म्हणजे पैठणीचा खेळ आता इथे रंगणार" शमी खुश होत म्हणाली.

"चला, मी निघते. अजून बाकीच्यांना सांगायचे आहे. आदेश भावोजींचे स्वागत करायला जंगी तयारी नको का करायला. नीलिमा जरी भाडेकरू असली तरी आता आपल्या सोसायटीची ती सदस्य आहे. हो की, नाही हो अरुण भावोजी", असे म्हणत मीना तिथून निघून गेली.

अरुणने खाकरत पुन्हा आपले डोके पेपरमध्ये घुसविले.

काही वेळानंतर खेळायला गेलेला बंटी धापा टाकत घरी आला.
"आई, आई. ऐकलस का तू"

"अरे हो काय झालं एवढं ओरडायला" शमी म्हणाली.

"अग, चिनूच्या घरी उद्या होम मिनिस्टर वाले काका येणार आहेत. तो आम्हाला खाली खेळताना सांगत होता. त्याच्या बाबांनी नवीन कपडे सुद्धा आणलेत घरात सगळ्यांना आणि आदेश काकांसाठी खाऊ पण आणला आहे" बंटीने एका दमात सांगून टाकले.

"आई आपल्याकडे कधी येणार ग होम मिनिस्टर वाले काका?"

"ते तू तुझ्या बाबांना विचार. मला नाही बाई माहिती. बरे ते जाऊ देत. अजून काय बोलत होता चिनू?"

"त्याचे आजी-आजोबा पण येणार आहेत दोन दिवसांसाठी. जॉईंट फॅमिली थीम आहे ना." असे म्हणत बंटी पुन्हा खेळायला निघून गेला.

"फॅमिली थीम. अस्स होय. आधी मनीला फोन करते. मेला, काल पूर्ण दिवस कामात गेला. फक्त एक तासच बोलायला मिळालं होतं तिच्याशी. तिला पण आजची ब्रेकिंग न्यूज सांगायला हवी" शमी मनात पुटपुटली.

मग तिने हातात फोन घेऊन मनीचा नंबर डायल केला. मनी म्हणजे मनस्वी शमिकाची छोटी बहीण.

शमी : हॅलो मनी, अग मी ताई बोलतेय.
मनी : बोल ना ताई.
शमी : काय करतेयेस? बिझी आहेस का?
मनी : नाही ग ताई. आताच डी मार्ट वरून सामान घेऊन आली घरी. तेवढ्यात तुझा फोन आला. बोल ना.
शमी : अग मनी उद्या आमच्या सोसायटीत आदेश भावोजी येत आहेत. होम मिनिस्टर वाले.
मनी : काय बोलतेयस ताई. आपल्या घरी येतायत का? तू आता बोलतेयेस मला. मी शॉपिंग पण नाही केली काही. आता मी उद्या काय घालू. शी बाई नवीन साडी पण नाही माझ्याकडे. तू पण ताई आधी तरी सांगायचं. पण ते सगळं जाऊदेत तू बोलत होतीस की जिजूंना हे सगळं आवडत नाही आणि आता बरे तयार झाले.
शमी : मनी अग श्वास तर घे बोलताना. माझे मेलं नशीब कुठे की, आदेश भावोजी माझ्या घरी येतील आणि तुझे भावोजी इतके हौशी असते तर पैठणी कधीच घरी आली असती. असो, अग आमच्या सोसायटीत एक नवीन फॅमिली आली आहे राहायला. त्यांच्याकडे येणार आहेत.
मनी : (थोड्या उदास आवाजात) अच्छा. कोण ग ही नवीन फॅमिली. मी ओळखते का त्यांना.
शमी : नाही ग. हल्लीच आले आहेत राहायला सोसायटीमध्ये. त्या साठे काकू राहायच्या ना त्या खोलीत.
मनी : हा काय. ताई तुला माहीत आहे ती आमच्या शेजारची....
असे बोलता बोलता दोन तास दोघी फोन वर बोलत होत्या. तेवढ्यात वॉचमन तातडीच्या मीटिंगचे लेटर घेऊन घरी आला. शमीने घाईतच फोन ठेवला.

आदेश बांदेकर सोसायटीत येणार यासाठी काय काय तयारी करावी लागेल ह्या संबंधी ही तातडीची मिटिंग घेतली जाणार होती. त्यामध्ये शक्यतो नवरा-बायको दोघांनी यावे असे सांगण्यात आले होते.

ठरल्याप्रमाणे मिटिंग सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये सुरू झाली. सोसायटीच्या मिटींगला न येणारी डोकी सुद्धा आज मीटिंगमध्ये हजर होती. आज अगदी गप्पांना ओघ आला होता. नुसता किलकिलाट.

तेवढ्यात सोसायटीचे सेक्रेटरी सबनीस आले आणि जसे वर्गात सर आल्यावर जशी शांतता होते अगदी तशी शांतता झाली. मग नीलिमा पोटे आणि अनिल पोटे हे नवरा-बायको समोर उभे होते त्यांच्या बाजूला सबनीस उभे होते.

सबनीसांनी बोलायला सुरुवात केली, "तर जमलेल्या सोसायटीच्या रहिवाश्यांनो आज आपल्या सोसायटीसाठी अगदी आनंदाचा दिवस आहे. आपल्या सोसायटीत नवीनच आलेले भाडेकरू मिस्टर आणि मिसेस पोटे यांचा नंबर झी मराठी ह्या वाहिनीवरील होम मिनिस्टर प्रोग्रॅम मध्ये लागला आहे. तसेच त्या प्रोग्रामच्या भागाची शूटिंग उद्या होणार आहे. त्यामुळे आदेश बांदेकर यांचे स्वागत करण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपली सोसायटी म्हणजे एक कुटूंब आहे. म्हणून पोटे कुटूंबियांच्या आनंदात आपण सहभागी होऊन आपल्या कॉलनीत आपल्या सोसायटीचे नाव उज्वल करू अशी मी तुम्हा सर्वांकडून आशा बाळगतो"

"मी घेईन जबाबदारी सगळी. पोटे काका-काकू तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही घरचं सांभाळा. सोसायटीत स्वागताची सगळी सोय आम्ही करू. काय पंटर लोक करू न आपण सगळी तयारी?" सोसायटीची इव्हेंट क्वीन समीरा म्हणाली.

त्याबरोबर सनील, अमेय, विनू, राजू आणि बाकी सगळे चिल्लर पार्टी सगळे एकादमात हो म्हणाले.

मग सबनीस बोलू लागले, "तर आपल्या सोसायटीमधली ही तरुण मुले सगळी जबाबदारी घेतायत म्हणजे प्रश्न मिटला. उद्या कोणाला त्यांना सहकार्य करायचे असेल ते विनातक्रार करू शकता. सनी बेटा तो पुष्पगुच्छ दे पाहू."
असे म्हणत त्यांनी पोटे कुटूंबियांचा सत्कार केला.

आज जवळजवळ सगळ्याच रहिवाश्यांनी सुट्टी घेतली होती. सगळ्यांना आदेश भावोजींबरोबर एक फोटो हवाच होता. त्याचबरोबर टीव्हीवर फुकट दिसायला मिळणार ते वेगळं.
काहींच्या घरी अगदी भरभरून पाहुणे आले होते. त्यांनाही आदेश भावोजींना एकदा प्रत्यक्षात पहायचे होते.
तरुण मंडळी स्वागताची जोरदार तयारी करीत होते. त्यांची समोरच्या देवदर्शन सोसायटीसोबत नेहमी टशन असायची. त्यामुळे आज होम मिनिस्टरमुळे आपली सोसायटी जास्त फॉर्म मध्ये कशी येईल याकडे त्यांचे लक्ष होते. समीराच्या आदेशानुसार सगळे काम व्यवस्थित चालले होते. सनील आणि विनूने रात्री पत्रक पण छापली होती आणि हळूच कॉलनीमध्ये ते ती चिटकवून आले होते.

मिनाला सकाळपासून डझनभर फोन येऊन गेले होते. तेवढे डझनभर तिने ही केले होते म्हणा.
पोटेंच्या घरी तर भरती लागली होती माणसांची. जॉईन फॅमिली थीम असल्यामुळे होते नव्हते ते सगळे नातेवाईक घरी आले होते. नीलिमाला तर श्वास घ्यायला ही फुरसत नव्हती.

"तरी मी म्हणत होते जॉईन फॅमिली थीमच्या वेळेला फोन नको करूयात. लागला तर नसता उपद्व्याप व्हायचा. आता बघितलंत ना. अगदी साधं टेकायलाही जागा नाही आणि रेवाला काय गरज होती. कल्याणच्या फॅमिलीला बोलवायची. आई-बाबा, रवी भावोजींची फॅमिली आणि रेवाची फॅमिली होती ना. हीच तर आपली जॉईंट फॅमिली आहे. आता कल्याणच्या काकांच्या फॅमिलीला बोलवल्यामुळे बाकी सगळे आपोआप आले. सुलभा काकू माहीत आहेत ना कशा आहेत. दुसऱ्याचं धुपून खाणाऱ्या आहेत त्या.
वैताग आलाय मला. रेवाला काही बोलायची ही सोय नाही मग सासूबाई फुगून बसतात. लाडकी लेक ना ती त्यांची. जलकुटी मेली. तिचा नंबर नाही ना लागला होम मिनिस्टर मध्ये याचे चांगले पांग फेडले हिने." नीलिमा तिच्या नवऱ्याला म्हणाली.

"निलू रेवाबद्दल काही बोललीस तर माझ्याशिवाय वाईट कोणी नाही. लाडकी आहेच मूळी ती. तुलाच मार मिरवायचे होते ना. तिचा नंबर आधी लागेल म्हणून तू तिच्या आधी फोन केलास आणि आता तुझा नंबर लागलाय तर खुश व्हायचे सोडून दूषणं देत बसली आहेस रेवाला" असे बोलून अनिल बाहेर निघून गेला.

क्रमश:

(ही कथा आवडल्यास तिला शेअर जरूर करा. धन्यवाद.)

@preetisawantdalvi