Ashmand books and stories free download online pdf in Marathi

अष्मांड - भाग ४

घरी गेल्या गेल्या महादुने बायकोच्या हातात तो गोफ ठेवला आणि घडलेली हकीकत सांगितली. ते ऐकून आश्चर्याने तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. पण तिला हि गोष्ट आवडली नाही. देवीच्या मंदिरातला दागिना असा उचलून आणायला नको होता असं तिला वाटत होतं. उगाच देवीचा कोप वैगेरे व्हायचा. पण महादुने आपल्या देवभोळ्या पत्नीकडे दुर्लक्ष करत तो हिरा आणि गोफ घरातच ठेवला. पुढे आठवडाभराने शहरात जाऊन त्याने दोन्ही सोन्याचे गोफ सराफाकडे विकून टाकले. एकदम एवढं सोनं पाहून कुणाला शंका येऊ नये म्हणून त्याने प्रत्येक गोफेचे ३-४ तुकडे केले. आणि प्रत्येक तुकडा वेगळ्या सराफाला विकला. हिरा विकणं मात्र जरा जिकीरीचंच होतं. "एवढा मौल्यवान हिरा तुझ्याकडे कुठून आला?" या प्रश्नाचं कोणतंही समाधानकारक उत्तर त्याच्याकडे नव्हते. म्हणून त्याने तो हिरा घरातच छुप्या खणात ठेउन दिला.

महादूची सामान्य परिस्थिती अचानक कशी सुधारली? याचंच सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. महादूकडं आता एक मोठा वाडा होता, दोन नव्या होड्या होत्या. शिवाय त्याने आता गाई-म्हशींचं दूध विक्रीचा जोडधंदा देखील सुरु केला होता. त्यासाठी खास कामगार ठेवले होते गोठ्यावर. कसबसं पोट भरणारा महादू आता लोकांना व्याजावर पैसे उसने देत होता. लोकांमध्ये त्याच्या बद्दलची कुजबुज वाढतच चालली होती. आणि त्याचबरोबर गावातला त्याचा रुबाब आणि मान ही वाढत होता.

महादुकडे आता बक्कळ पैसा होता, पण हाव माणसाला गप्प बसू देईल तर शप्पथ. रोज रात्री महादू छुप्या खणातून तो हिरा काढायचा आणि त्याच्याकडे टक लावून बघत बसायचा. हा हिरा विकला तर किती पैसे मिळतील याचं गणित तो मनातच मांडायचा प्रयत्न करायचा. कधी आकडा चार अंकी असायचा कधी पाच तर कधी सहा. अन याहीपेक्षा जास्त किंमत असेल तर........ या विचारानेच तो भारावून जायचा. हिऱ्यामधलं त्याला काही कळत होतं असं नव्हतं. किंबहुना त्याने प्रत्यक्षात पाहिलेला तो एकमात्र हिरा होता. पण काही गोष्टीच अश्या असतात कि त्यांच्याकडे पाहताक्षणीच तुम्हाला जाणवतं कि आपण काहीतरी वेगळं आणि अद्भुत पाहतो आहे. तो हिराही तसाच होता. हिऱ्याच्या किमतीबद्दल त्याला कल्पना नव्हती पण तो आपल्याला गडगंज श्रीमंत करेल याची पूर्ण खात्री होती.

पण श्रीमंत व्हायचं असेल तर हिरा नुसता खणात ठेऊन उपयोग नव्हता त्याला बाहेर काढावंच लागणार होतं. नाहीतर खणात हिरा ठेवला काय नि काच ठेवली काय एकूण एकच.

हिरा विकायचं महादूने पक्कं केलं आणि इथेच त्याचे ग्रह फिरले. ज्या सराफाला त्याने हिरा दाखवला त्याने हातात घेतल्या घेतल्याच ओळखलं कि याची किंमत भल्या भल्यांना फेडणं शक्य नाही. थोडीशी निळसर छटा असलेला एक अतिशय दुर्मिळ प्रकारचा हिरा होता तो. हिऱ्याची किंमत काढण्यासाठी मुंबईहून तज्ञ बोलवावा लागेल असं सांगताच हिरा आपल्या कब्ज्यात घेऊन महादूने घर गाठलं. पण तो जाताच त्या सराफानं पोलिसात हि खबर कळवली. एकतर हा हुबेहूब दिसणारा नकली हिरा असावा किंवा या माणसाने कुठूनतरी हा चोरला असावा. कारण असला हिरा यांच्याकडं असणं शक्यच नव्हतं. सराफाचं ठाम मत होतं.

दुप्पट वेगाने पळणाऱ्या महदूच्या नशिबाला अचानक ब्रेक लागला. पोलीस चौकशी सुरु झाली आणि महादुला सगळं सत्य कथन करावं लागलं. हिरा पोलिसांच्या हवाली झाला. गावात पंच बसले. सोन्याच्या सरींची तर केव्हाच विल्हेवाट लागली होती. आणि हिरा आता सरकारदरबारी जमा झाला होता. झालं गेलं गंगेला मिळालं आता त्यावर उहापोह करून काही भागणार नाही. म्हणून सभा तहकूब झाली. आणि महादू सहीसलामत सुटला.


'एका कोळ्याला डोडोमा बेटावर सोन्याच्या सरी सापडल्या' ही बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. आणि जस जशी ती बातमी गावच्या सीमा ओलांडून दूर जाऊ लागली तसतशी ती बदलत गेली. सोन्याच्या सरींची बातमी सोन्याच्या खजिन्यात रूपांतरित झाली.


वेगवेगळ्या गावातून लोक बेटावर येऊ लागले. मंदिराभोवती नजर टाकून आपल्यालाही काही मिळते का ते पाहू लागले. पण प्रत्येकाच्या पदरी निराशाच पडत होती. लोक खजिन्याची कथा रंगवून रंगवून सांगू लागले.

"शेकडो वर्षांपूर्वी तिथल्या राजाने आपला सोन्या-चांदीने आणि हिरे जवाहिरांनी भरलेला खजिना त्या बेटावर खोल जमिनीत लपवला आणि त्यावर मंदिर बांधले." घरोघरी अशा कथा रंगू लागल्या. बाया बापड्या आणि लहान मुलांनी हि कथा आणखीनच उचलून धरली. आणि एकमेकांच्या तोंडून हीच कथा फिरून परत सावडीत आली. सगळ्या स्थरातून या कथेला एकप्रकारे मान्यताच मिळाली होती.

जवळच्याच गावातल्या एका चोरांच्या टोळी पर्यंत ही खबर पोहोचायला फार वेळ नाही लागला. सोन्याचा खजिना ऐकताच त्यांचे डोळे चमकले. 'सावडीतल्या एका कोळ्याला सोनं सापडलं' एवढं कारणही त्यांना खजिन्याची सत्यता पटवायला पुरेसं होतं. त्याच रात्री बेटावर धाड घालायचा बेत त्यांनी आखला.

क्रमश: