Neera books and stories free download online pdf in Marathi

नीरा.

जानेवारी म्हणजे सुरुवात, सुरुवात म्हणजे जानेवारी. मोसमी वारे, मतलई वारे अशा प्रकारचे कोणतेच वारे जानेवारीत अनुभवायला मिळत नाहीत. जानेवारीत असतात उत्साहाचे वारे! जोष-जल्लोषाचे वारे! नववर्षात नव्याकोऱ्या—किंवा उरल्यासुरल्या—आयुष्याला सर्वांनीच पुन्हा सुरुवात केलेली असते. संकल्पाने मन-मेंदू व्यापलेले असतात, संकल्पांची पूर्ती होण्याची शक्यताही जास्तच असते. हळूहळू भावनांचा गदारोळ मावळला की संकल्प कोलमडून पुन्हा तेच 'गेल्यावर्षीचे अकरा महिने' सुरू होतात. जानेवारीची वैशिष्ट्ये अगण्य आहेत. जानेवारीत तोटे कमीच; परंतू त्यातला एक तोटा दुधात विरजण घालण्यासाठी पुरेसा आहे. तो तोटा म्हणजे 'उन्हाळा.' नारायणाने चटक्यांचे फटके मारायला या महिन्यात विशेष प्रगती केलेली असते. दुपार झाली की मुळचे असणारे उत्साहाचे वारे-निरुत्साहाचे वारे बनतात. दिसेल त्या सावलीत घोळके जमा होतात, रसवंती ओली करण्यासाठी रसवंती गृहात गर्दी जमते, रसवंती गृहातील घुंगरांचा आवाज 'प्यायला' आलेल्यांच्या आवाजाने दबून गेलेला असतो. अशातच कोणी फेरीवाला कष्टकरी उन्हात रापताना दिसल्यावर सर्वांच्याच मनात त्याच्याविषयी सहानुभूतीचा कोपरा तयार होतो. मधेच कधीतरी अनवाणी चालणारी गरीबांची पोरही दिसतात, त्यांची काळजी घेण्यापूरती माणुसकी नाक्यानाक्यावर जिवंत असलेली पाहायला मिळते आणि म्हणूनच जानेवारी तील दुपार थोडीफार सुसह्य होतेच.

२०१५ सालचा उन्हाळाही याला अपवाद नव्हता. शहराच्या मध्यवर्ती भागातून तापलेली एसटी निघालेली होती. उन्हाने टप तापलेला व इंजिन मुळे तळ तापलेला, त्यामुळे आतले थोडेथोडके प्रवासीही तापलेले. उन्हाच्या झळांनी व्यापलेली आजूबाजूची हवा चिरत लालपरी धावत होती. धावत होती हे विशेषण तितकस पर्याप्त नाहीये, तिच्या दुडक्या चालीत ती निघालेली होती. कंडक्टरने दोरी खेचली आणि एसटीने गचका खाल्ला. थांब्यावर उभं राहून तिने उसासा टाकला, तिथेच—प्रवाशांनी तिच्यावर फासलेला—काळीमा आसमंतात फूकून टाकला. कसलीच घाई न करता निवांतपणे प्रवासी वर चढले, सुस्तावले. बऱ्याचजणांनी माणुसकीच्या नात्याने कॉलेजच्या पोरांना टेकवण्यापूरती जागा देऊ केली आणि एसटीने रणशिंग फुंकत मार्गाक्रमण सुरू केलं. एसटीत कुजबुज तर चालू होतीच तशातच एक वरच्या पट्टीतला आवाज घुमायला लागला. 'तिकीट . . . तिकीट . . . '
"ऐ . . . ऐ पोरा . . . " समोरच्या लोखंडी दांडीवर कंडक्टर त्याची तिकीट पंचींग आपटत म्हणाला, "ऐ पोरा अरे कानातल काढ."
त्याने गडबडीत कानातून आधुनिक 'श्रवणयंत्रे' काढली. "बोला काका?"
"अरे मी काय बोलू? तूच बोल."
"म्हणजे?"
"तिकीट बोल तिकीट?"
"एक स्वारगेट."
कंडक्टरने तिकीट काढलं व त्याच्या हातावर टेकवल. त्याने दहा रुपये दिले आणि पुन्हा कानात 'श्रवणयंत्रे' कोंबली.
"काय राव आजकालची पोरं . . . " कंडक्टर सांगत होता. प्रवाशांसोबत गप्पा मारून रस्ता मागे टाकण्याच्या सवयीने त्याला बोलतं केलं. तसे बाजूचे प्रवासीही सावरुन बसले. "मगाशी कानात काटक्या होत्या त्यामुळे मग अख्खी एसटी फिरून माघारी आलो, तरीपण कानात काटक्याच!" प्रवाशांनी माना हलवल्या मागच्या दरवाजा जवळील लोखंडी पाइपला टेकून थांबलेला कंडक्टर बोलतच राहिला. "त्यात पुन्हा काही बोलायची पंचाईत. कोणी काही बोललं की नसता दंगा करायला मोकळे!" या वाक्यावर आणखी माना त्याच्याकडे वळल्या आणि चर्चासत्र सुरू झालं.
"हो—ना." एक मधाळ आवाज म्हणाला, "आधी चोरी पुन्हा मग शिरजोरी."
"जाऊद्या ओ, ही पिढीच असली." एक रागीट आवाज मागच्या खिडकीतून म्हणाला, "साला या पोरांना तमीजच नाही."
"तुमचं पोरगं केवढय?" गर्दीतून लपलेला एक तरुण आवाज घुमल्यावर एसटीत हास्याची लाट आली.
"तुम्ही नका घेऊ काका मनावर." कंडक्टर म्हणाला व त्याने विषय बदलला. "मला हेच कळत नाही की कानात काटक्या घालून ऐकायचं तरी काय?"
"गाणी ऐकायची." शेवटच्या सीट वरून उठलेली तरुणी म्हणाली, "नाहीतरी तुमच हे असलं 'प्रवचन' ऐकण्यापेक्षा ते बरचं म्हणायचं."
कंडक्टरने चमकून त्या आवाजाकडे पाहिलं. भर उन्हाळ्यातही, ओढणीत मुस्कटलेले, दोन परिचयाचे डोळे त्याला दिसले. हसतच तो म्हणाला, "नाहीतरी घरी ऐकावच लागतं म्हणावं!" प्रवाशांमध्ये पुन्हा आनंदी वातावरण निर्माण झालं
"सरका ओ . . . उगाच मस्करी करू नका. आधीच खूप उशीर झाला आहे, त्यात पुन्हा कंटाळा आलाय. आज बारावीचं प्रॅक्टिकल होतं ना त्यामुळे उशिराच कॉलेज आहे."
"आजपण मागच्याच दाराने उतरणार का मग?" कंडक्टर.
"जवळ पडतं म्हणून उतरायच मागच्या दरवाजातून. उगीच पाय तोडत पूढे कोणी जायला सांगितलय? ती म्हणाली."
"बरोबर आहे." तिला दरवाजात उभं करून कंडक्टरने एसटीत नजर फिरवली. "चला शिवाजीनगर, पुढे चला." तो ओरडला. तेव्हाच कोणती स्त्री उभी नाही याची खात्री करून तो सराईतपणे तरुणीच्या जागी बसला. मगाच्या मधाळ आवाजाला मानेनेच ओळख दाखवून त्याने चर्चा पुढे नेली. "काय असतं ओ आजकालच्या गाण्यात ऐकण्यासारखं?"
"नाहीतर काय? उगीचच धांगडधिंगा नुसता." मधाळ आवाज. "विटलोय आपण सगळे या गाण्यांना."
"हंबरडा फोडल्यासारखं बोंबलायचं, नरडं ताणायच, तसं केल की चेहऱ्यावरचे भाव आपोआपच तट्ट ताणले जातात, मग टवळ्या मागे नाचवायच्या आणि त्याला म्हणायचं 'गाणं!' " खिडकीतला रागीट आवाज एसटीत घुमला.
"चला मनपा पुढे चला." कंडक्टर ओरडला. "काय होती ना आपल्या काळातली एकेक गाणी . . . " कंडक्टर थोडासा थांबला. "हा, आठवलं. तुऽऽऽ मेरी जिंदगी है, तुऽऽऽ मेरी हर खुशी है। तुही जन्नत, तुही चाहत, तुही आशकी हैऽऽऽ " पुढच्या माना मागे फिरल्या तेव्हा कंडक्टरला प्रोत्साहन मिळालं. त्याने आवाज हलकासा वाढवला. मधेच त्याने खिडकीच्या बाहेर बघून दोरीवर हात टाकला, गाडी थांबली.
मध्य तिशीतली एक स्त्री एसटीत चढली. पंजाबी ड्रेसची ओढणी हातात धरून तिने कपाळावरचा घाम पुसला, दुसऱ्या हाताने पर्सचे बंद पकडलेले होते. ती शेजारी थांबली तेव्हा गाणं न थांबवता सराईतपणे कंडक्टरने उठून तिला जागा करून दिली. गाणं गुणगुणतच त्याने तिकीट विचारलं.
"स्वारगेट." कंडक्टरने बोटांनीच दहा रुपयांची खुण केली आणि तिकीट तिच्याकडे सोपवलं, तिने दहाची नोट हातात धरली. कंडक्टरने नोट खेचली; मात्र तिने नोट घट्ट पकडली होती.
कंडक्टरने तिच्याकडे पाहिलं. "मिळाल ना तिकीट?"
"हो मिळालं."
चेहरा ओळखीचा वाटला. "मग सोडा ना नोट." त्याने तिला ओळखलं.
तिने विचारलं, "निलेश?"
"होय, मीच आहे." असं म्हणून तो वेगाने एसटीच्या पुढच्या भागात निघून गेला.
तिच्या डोळ्यात मार्दव उगवलं, घशात गहिवर दाटला, मेंदूत अविश्वास प्रकटला. 'साधं बोलला पण नाही? माझ्याशी?' . . .


पावसाने रात्री दिलेला तडाखा ओसरला. भास्कराचं तांबड रूप क्षितिजावर दिसायला लागलं. मधूनच काळ्या ढगांनी त्याच्यावर हल्ला चढवला . . . थोड्याच वेळात पुन्हा सोनेरी ऊन पडलं . . . पुन्हा शिरवळ . . . पुन्हा ऊन . . . त्यांचा लपाछपीचा खेळ सुरूच होता. झाडाच्या पानांवरून पाणी ओघळून खालची जमीन आणखी गाळ होऊ लागली. रात्रभर ताटकळलेले पक्षी शिथिल झाले, त्यांचा किलबिलाट सुरु झाला. सुरूवातीला अधूनमधून अवकाळी येऊन जातात आषाढ मात्र येताना नित्यनेमाने पाऊस आणतोच. पावसाची आणि जन्माची सुरेलशी गुंफण आहे. जिथे-जिथे पाणी बरसतं तिथे-तिथे जन्म घेतं. कधी तणाच्या रूपात, कधी पिकाच्या रूपात, कधी डबक्यात बेडकाच्या रूपात जन्माला येतं, तर कधी पाण्यातल्या मासोळीच्या रूपात, झाडांवर बहर येतो तोही पाण्याचाच नवा जन्म! सगळीकडे फक्त जीवनच दिसायला लागतं. इतर ऋतूंमध्ये थोडाफार कडवटपणा असेलही; पण पावसाळ्याच मात्र तसं नाही. याउलट पावसाळा सर्वांना तिष्ठत ठेवतो. चातक उगीचच लोकांच्या नजरेवर आलाय! पावसाची वाट तर प्रत्येकजण त्याच आतुरतेने पाहत असतो.

जून—१९९९. तिने दप्तर तिसऱ्यांदा उघडून पाहिलं! 'काही राहीलं असेल तर ते शोधण्यात आणखी पाचेक मिनिटे दवडता येतील' हा तिचा मानस! सगळं व्यवस्थित आहे हे पाहून तिने आरशाचा धोसरा काढला. ती मुद्दामच तिच्या हलक्या पिवळसर रंगाच्या पंजाबी ड्रेसकडे निरखत राहिली. कमरेएवढी वेणी पाठीवरून छातीवर घेतली, मान मुरडून मग, पुन्हा छातीवरून पाठीवर टाकली. ओढणी काढून, व्यवस्थित घडी करून, पुन्हा खांद्यावर टाकली. टिकली काढून टिकलीवर हलकेच ओठ टेकवले आणि टिकली पुन्हा दोन भुवयांच्यामधे सारली. झालं, आरशासमोरचा वेळही गेला. वेळ दवडण्याच कारण शोधण्यासाठी ती स्वयंपाकघराकडे वळली; तेवढ्यात एक जरब असणारा आवाज तिला बोलावू लागला.
"आली का बाहेर? का मी येऊ आत?"
"आले—आले." तिने पुढचा धोका ओळखून तत्परतेने दप्तर उचललं आणि बाहेर आली. "आई मी जाऊ?"
"जा."
"खरच जाऊ?"
"तुला आता वेगळ्या भाषेत सांगाव लागेल!" आई ओरडली.
रोहिणीचा आज कॉलेजचा पहिलाच दिवस. 'स. प. महाविद्यालय, पुणे.' रोहिणीच्या वडिलांची बदली तीन महिन्यांपूर्वी—रोहिणीची दहावीची परीक्षा संपली तेव्हाच— पुण्यात झाली. पुण्यातल्या औंध विभागातील पोलीस-लाईन मधे त्यांना छोटेखानी खोली मिळाली होती. बालपण मुंबईत गेलं असल्याने रोहिणीला शहराची भीती वाटत नव्हती; पण अनोळखी शहरात का कोणास ठाऊक एका अनामिक भितीने तिला ग्रासलं होतं.
"आई मला भीती वाटतीये?"
"भीती! कोणाची भीती?"
"तसं नाही, म्हणजे मला एकटीला जायला नको वाटतय." रोहिणी लाडिक बोलात बोलली.
"बर मग?" आई द्रवली नाही. "मग काय करायचं?"
"बाबा येईपर्यंत थांबते. बाबा म्हणाले होते 'आठ वाजेपर्यंत येणार' आणि आताशी तर साडेसात वाजलेत." रोहिणीने डोळ्यात पाणी आणण्याचा प्रयत्न केला—तो निष्फळ ठरला.
"आठ वाजेपर्यंत! तोपर्यंत कॉलेज भरणार नाही का? आणि पहिल्याच दिवशी तू उशिरा जाणार?"
"तू तरी चल ना सोडायला." रोहिणीने वर्मावर बोट ठेवलं.
"ते . . . ते . . . " आईच्या डोळ्यात थोडीशी भीती दाटली!
"बघ, बघ स्वतःपण घाबरतीये आणि मला मात्र एकटीला पाठवतीयेस!"
आईने रोहिणीच्या पाठीवर थापवजा फटका ठेवून दिला. "मी कशाला कोणाला घाबरायचं? घरी कोणी नाही म्हणून मी येऊ शकत नाही कळलं?" रोहिणीने हात धरण्याचा प्रयत्न करू नये म्हणून आईने तीन पायर्‍या चढून उंबऱ्यावर पवित्रा घेतला. "तू जा. यांची वाट बघू नकोस, यांना सांगते मी आल्यावर 'तू गेलीस म्हणून.' काळजी घे."
रोहिणी नाविलाजाने जायला निघाली.
"रोहिणी . . . "
"कायय?" रोहीणीने रागातच विचारलं.
"काळजी घे, मैत्रिणी जरा जपून निवड, आणि कोणी काही बोललं तर . . . "
"तर?"
"तर सांग, 'माझे बाबा पोलिसात आहेत!' "
"आई तू आत जा बरं." रोहिणी वैतागली. "काय तर म्हणे 'माझे बाबा पोलिसात आहेत' जा तू आतमधे."
'बसथांब्यावर बाबांची वाट पाहत बसायच' या विचारानेच रोहिणी बसथांब्याकडे निघाली. पुण्यात आल्यापासून बाबांनी तिला कॉलेज चार-पाच वेळा फिरवून आणलच होतं. कॉलेजला जाताना कधी गाडीवरून, कधी एसटीतून, एकदा तर रोहिणी एसटीतून आणि बाबा गाडीवरून! पावसाची रिपरिप पुन्हा चालू झाली. डोक्यावर ओढणी धरून ती पळतच थांब्यावर पोहोचली. तेवढ्यात एसटीही आली. 'स्वारगेट' रोहिणीने पाटी वाचली. 'असं कितीसं वाईट असणार आहे नवीन शहर? कॉलेजचा प्रवास तर दररोज मलाच करायचाय.' रोहिणीने दुसरा विचार न करता एसटीत पाऊल टाकलं.
"बोला तिकीट?"
"एक टिळक रस्ता."
टिळक रस्ता येईपर्यंत पाऊस बर्‍यापैकी उघडला होता. रोहिणीने उतरून मधला रस्ता पकडला. रस्त्यावरची वर्दळ जोर धरत होती. कॉलेज जवळ यायला लागलं तसं, पाठीला दप्तर अडकवलेले, तुरळक विद्यार्थी दिसायला लागले. तिने खाली मान घालून चालणं सुरुच ठेवलं. 'अकरावी वाणिज्य-अ' डाव्या बाजूच्या इमारतीतील, दुसऱ्या मजल्यावरच्या, चौथ्या वर्गासमोर अडकवलेल्या, हिरव्या रंगाच्या पाटीवरची पांढरी अक्षरे सांगत होती. रोहिणी वर्गात शिरली—काळीज मूठीत धरूनच! तिथे घाबरण्यासारखं काहीच नव्हतं हे पाहून तिचा हिरमोड झाला. मधल्या बाकावरची खिडकीच्या बाजूची जागा रोहिणीने मिळवली. बर्‍याच वेळाने कधीतरी एक मध्यम तब्येतीची, मध्यम उंचीची, थोडीशी सावळी, खांद्यापर्यंत केस असणारी मुलगी बाकाजवळ येऊन उभी राहिली.
"मी बसू का इथे?" तिने रोहिणीला विचारलं.
"बस." रोहिणी म्हणाली. 'कदाचित हीच मैत्रीणही असावी' रोहिणीने विचार केला.
कॉलेज भरलं तस सुटलं. रोहिणी घरी निघाली. वडील घ्यायला येण्याची शक्यता तशी कमीच होती म्हणून ती एकटीच निघाली. कॉलेजच्या गेट जवळच ती स्तब्ध झाली, तिला कोणीतरी हाक मारत होतं, तिने मागे वळून पाहिलं, कोणीतरी मुलगा तिच्या दिशेने हात हलवत धावत येत होता. हे पाहून तिने पुन्हा मागे—म्हणजे पुढे—पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं.
'हा मला आवाज देतोय?' रोहिणीने विचार केला. 'का? कशासाठी? मुळात कोण आहे हा?'
तो मुलगा रोहिणी जवळ येऊन उभा राहिला. उंची रोहिणीपेक्षा दोन बोटे जास्तच होती, व्यवस्थित कापलेले केस, डोळे दिसायला थोडे बटाटे होते, तोंडावर नुकतीच मिशी यायला लागलेली, दाढीचा पत्ता नव्हता. त्या गहूवर्णीय तरुणाने पुन्हा साद घातली. "थांब ना तुझ्यासोबत बोलायचय." मग त्यांने उगीचच धाप लागल्याच नाटक केलं. "मी निलेश."
'बर मग?' रोहिणी मनातच म्हणाली.
"तुझ नाव रोहिणी आहे ना?" रोहिणी धडधडीत नकारार्थी मान हलवून मोकळी झाली! "काय खोटं बोलतीये. मघाशी वर्गात तर नाव रोहिणी सांगितलस." तो म्हणाला.
'तू माझ्या वर्गात आहेस तर!' रोहिणी विचार करत होती; पण बोलली नाही.
"मुकी आहेस? नाही वर्गात तर बोलत होतीस." त्याच्या प्रश्नांची उत्तरे तोच देत होता. "मौन असेल कदाचित, चल निघूया." तो रोहिणीच्या दिशेने निघाला.
रोहिणी तिथेच उभी राहिली, मग ती उलट्या दिशेने निघाली! 'पुणे शहर असं आहे . . . ' ती मनात विचार करत होती. 'पहिल्या दिवशी अनोळखी मुलीला इथली पोरं एकेरी नावाने हाक काय मारतात, सोबत काय चालू लागतात, विचित्रच आहे.' थोडसं चालून गेल्यावर तिने वळून पाहिलं तो निघून गेला होता. रोहिणीने उसासा टाकला आणि ती थांब्याकडे निघाली.
"मला माहिती होतं तुला तिकडेच जायचय." दचकून रोहिणीने मागे पाहिलं तर तो उभा. 'माझे बाबा पोलिसात आहेत' आईचा आवाज तिला ऐकू आला, तिने महत्प्रयासाने ते वाक्य गिळलं आणि थांब्याकडे निघाली.
"मी तर फक्त मैत्री कर म्हणतोय, तू घाबरतेस का बर? घाबरू नकोस. तसा मी अगदीच निरुपद्रवी प्राणी आहे."
'मला तर तू नुसताच प्राणी वाटतोस.' रोहिणी मनातच म्हणाली. रिपरिप चालू झाली, तो शेजारी-शेजारी चालत असल्याने रोहिणीला पळता येत नव्हतं. 'अनोळखी मुलासमोर निर्लज्जासारख कसं पळत सुटायचं?' विचार करत असतानाच तिला पाऊस लागायचा बंद झाला. त्याने दोघांच्या डोक्यावर छत्री धरली होती! आता मात्र जरा जास्तच झालं.
"ए पोरा कोण आहेस तू?" रोहिणी खवळली. "मगाच पासून बघतेय तुझी नाटकी. आता जर माझ्या मागे, माझ्यासोबत आला तर देईन एक ठेऊन! आणि कॉलेजमधे तक्रार पण करेन. माझे बाबा मला घ्यायला आले असतीलच त्यांनी पाहिलं तर तुझ काही खरं नाही." रोहिणीने इथेच थांबायला हवं होतं; पण ती अनावधानाने बोलून गेली. "माझे बाबा पोलिसात आहेत." तो हसायला लागला. "मुर्खा हसतोस काय? खरच आहेत."
तो थांबला आणि ती त्याला शिव्यांची लाखोली वाहतच निघाली. पाऊस जोर धरतच होता.
"ए ऐक ना . . . "
आता मात्र रोहिणीचा संयम सुटला. "काय रे तुझी नाटकी?" ती हात उगारून त्याच्या दिशेने धावली.
"अग थांब-थांब, मी काय म्हणतोय ते तर ऐक." रोहिणी थांबली तसं त्याने पुन्हा तिच्या डोक्यावर छत्री धरली. "मी म्हणतोय कि, तिथे नीरा चांगली मिळते. पावसाळ्यात कोणी पीत नाही; पण पाऊस थांबेपर्यंत तुझी आडोशाला उभं राहण्याची सोय होईल. मी चाललोय नीरा प्यायला तू येत असशील तर चल."
रोहिणीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटल. त्याने दाखवलेल्या पत्राच्या टपरीकडे ती निश्चलपणे पाहत होती.
"नीरा काय असते माहिती आहे का तुला? चल मी पाजतो तुला नीरा—मैत्रीण म्हणून."
रोहिणी विचार करतच होती. 'नीरा?' . . .


"चला लास्ट स्टॉप स्वारगेट, स्वारगेट. पिशव्या, पाकिटे, वस्तू तपासा, मागे विसरु नका. तुमच्या वस्तू सांभाळण्याशिवाय एसटी महामंडळाकडे इतरही कामे आहेत. त्यात पुन्हा २०१५ च्या वर्षी बेकारी वाढलीये—त्यामुळे चोरांपासून सावधान. चला स्वारगेट."
एसटी आगारात जाण्यापूर्वीच थांबली होती. ती तिच्या जागेवर तशीच बसून राहिली. बस आगारात थांबली. मागच्या दाराने उतरल्यावर ती थोडीशी गांगारली. दुपारच्या उन्हाच्या झळांनी तिला आणखी दमवलं. ती पटकन पुढच्या दाराजवळ पोहचली. निलेश खाली उतरला तसं तिने त्याच्या दंडाला पकडलं.
"ओळखल नाहीस?"
तिचा हात सोडवत निलेश म्हणाला, "ओळखलय."
"कोण?"
"मोहीनी!"
"असा मारीन ना सगळं एसटी महामंडळ बघायला येईल." ती रागावली.
निलेश हसत म्हणाला, "बोल ना काय म्हणतेस शालिनी?"
"तुला ना . . . जाऊ दे, बोलायचं नसेल तर सांग ना. नाहीतरी तू तसही मघाशी एसटीत चुकीचं वागलेलाच आहेस."
"अगं कोणी उभं नव्हत म्हणून बसलो मी लेडीज सीट वर." निलेशचा मिश्कीलपणा सुरूच होता.
"चल जाते मी." असं म्हणून ती जायला निघाली.
"अगं थांबना रागिनी!" ती चालतच राहिली. "चुकलं-चुकलं रोहिणी म्हणायच होतं मला." निलेश कळवळला.
रोहिणी चालतच राहिली. मधेच तीने मागे वळून पाहिलं—निलेशने पोबारा केला होता. रोहिणी थांबून त्याला शोधू लागली.
"चल इकडे आहे मी." निलेश रोहिणीच्या मागे—म्हणजे पुढे—उभा होता.
"सुधरणार नाही ना?" रोहिणी स्मितहास्यात म्हणाली.
"आणि तू रागावणार नाही ना? चल तूला गरम होत असेल, तू सावलीत बस मी ऑफिस मधे एसटीची माहिती भरून येतो." रोहिणीला सावलीत बसवलं आणि निलेशने जाताना विचारलं. "रस पिणार आहेस का?"
"नाही, नको." रोहिणी.
"तसही कॉलेजच्या पहिल्या दिवशी सुद्धा पिली नव्हतीस; पण हे कॉलेज नाहीये म्हणून पुन्हा एकदा विचारतो. रस पिणार आहेस?"
"ती नीरा होती, हा रस आहे. तरीपण मला नको, तू लवकर ये माघारी. मी वाट बघणार नाही जास्त वेळ."
"आलोच." . . .


वर्षा जायला निघाली की शरद पळतच तिचा पाठलाग करू लागतो. तिला अडविण्याचा प्रयत्नही करतो; परंतू वर्षाच्या हट्टापुढे त्याला नमतं घ्याव लागतं. बर्‍याच दिवसातून मनसोक्त विहार करायला मिळाल्याने भास्कर तेजीतच असतो. सृष्टी थोडीशी स्थिरतेकडे वळते. थोड्या-थोडक्या प्राण्यांचा विणीचा हंगाम याच आसपास उदयास येतो. 'बोचरी थंडी यायला अवकाश आणि पावसाची कीटकीट नाही' म्हणून शरद आल्हाददायक भासतो. शरदातील चांदण सुरेख वाटतं कारण गेल्या चार महिन्यात, काळ्या ढगांमूळे, चांदण पाहायलाच मिळालेल नसतं! रात्रीचा विस्तार वाढत जातो आणि निसर्ग आळशी बनू लागतो. सप्टेंबर—१९९९.

रोहिणी आता प्रवासाला सरावली होती. दररोज पावणेआठची एसटी पकडली की टिळक रस्ता आणि मग कॉलेज. पावसाने उघडीप दिली होतीच परंतु अधूनमधून एखादा-दुसरा झटका देऊन लोकांची तारांबळ उडवण्यात त्याला फार मजा वाटायची. 'त्या' दिवसानंतर पाऊस असो वा नसो रोहिणीने कायम छत्री सोबत न्यायला सुरुवात केली. तसही त्या दिवसानंतर निलेशने तिला कधीच अडवलं नव्हत, ना तिच्यासोबत बोलला होता. निलेश तिच्याच वर्गात शिकतोय याची मात्र तिला खात्री पटली होती. मैत्रिणींचा संघ वाढत गेला तरी घराजवळची मैत्रीण अजून मिळालेली नव्हती.
"बोला तिकीट?"
"एक टिळक रस्ता."
काल रात्री जेवताना अचानक रोहिणीला कॉलेजचा पहिला दिवस आठवला, मागे धावणारा निलेश आठवला, 'नीरा' हे प्रकरण तिला अजूनही उत्सुकता दाखवतच होतं. तिने पटापट मनातले विचार बाजूला सारायला सुरुवात केली. आजपर्यंत तिच्यामागे कोणी अशाप्रकारे धावलेलं नसलं तरी निलेशकडे आकर्षित होणं तिच्या मनाला पटणार नव्हत.
'मुलींकडे संयम असतोच कुठे? जो पहिल्यांदा आयुष्यात आला त्याला शेवट समजण्याची चूक मुली करतातच. संयम बाळगला की पर्याय आपोआप तयार होतात मग योग्य निवड करणं सोप जातं; पण नाहीच. आधी चूक करायची आणि नंतर ती चूक आयुष्यभर भोगायची!'
आईचं कसलसं गुढ ज्ञान रोहिणीच्या मनात नाचत होतं. तर दुसरीकडे मैत्रीणीच्या नात्याने नीरा पाजणारा निलेशही आठवत होता. विचारांना थांबविण्याच्या निष्फळ प्रयत्नातच काल रोहिणीला झोप लागली.
एसटीतही रोहिणीला निलेश आठवू लागला. त्याला टक लावून पाहिल नसल्याने चेहरा अस्पष्टच आठवत होता. मन ताब्यात न राहता सैरभैर धावू लागलं की मनाच्या स्थितीला वातावरणावर सोपवणं ही माणसाची प्रवृत्तीच आहे. 'आजचं वातावरणच तसं आहे' रोहिणी स्वतःशीच म्हणाली. टिळक रस्त्याला उतरून निवांतपणे दप्तर नीट करून रोहिणी कॉलेज कडे निघाली. कॉलेज सुरू झालं आणि संपलही. मैत्रिणींना गेटवरच निरोप दिला आणि रोहिणी निघाली.
तिथेच वाटेत निलेश थांबलेला होता. कदाचित दररोज उभा राहत असावा रोहिणीने कधी लक्षच दिलं नव्हतं. तो तिच्याकडेच पाहतोय हे लक्षात आल्यावर रोहिणीने मानेनेच त्याला 'कायय?' अस विचारलं. त्याने मान नकारार्थी हलवून दुसरीकडे पाहायला सुरुवात केली. रोहिणी दहा पावलेही चालली नसेल तेवढ्यात निलेश तिच्या शेजारून चालायला लागला.
"बोल ना काय म्हणतेस?" निलेशने विचारलं. रोहिणीने कपाळावर हात मारून घेतला, म्हणजे प्रत्यक्षात नाही मनातल्या मनात . . .


"दमलीयेस का?" निलेशने विचारलं तेव्हा रोहिणी भानावर आली.
"नाही."
"मग शून्यात का बघत होतीस?" निलेश.
"विचार करत होते."
"ते तर कुणीही सांगेल. तू तर सांग कि कसला विचार करत होतीस?"
"असंच." रोहिणी विषय टाळत होती.
"असंच! कसचं?" निलेशची उत्सुकता ताणली गेली.
"जाऊ दे, दे सोडून." रोहिणी थोड्याशा वरच्या पट्टीत म्हणाली.
"बर बोलं. काय म्हणतेस?" निलेशने अंतर सोडून बसत विचारलं.
"काय म्हणणार? तुच उगवलास दशकानंतर, मग म्हणलं तुझ काय चाललय पहावं."
"माझं? माझं निवांत. तुझच सांग, इथे कशी आलीस? इथेच राहतेस का?"
"हो रहायला इथेच आहे, हत्ती-गणपती चौकाच्या बाजूला."
"हत्ती-गणपती चौक तर मागेच राहिला." निलेश म्हणाला.
"ते माहितीये मला."
"मग स्वारगेटच तिकीट का काढलस?"
"सांगू का?" रोहिणीने हळू आवाजात विचारलं.
"नको सांगूस! निलेश घाईघाईत म्हणाला. "तू हत्ती-गणपतीपासून सांगायला पुन्हा सुरुवात कर."
"तुला वाटतय तसं काही नाहीये." रोहिणी स्मितहास्यात म्हणाली. "चुकूनच स्वारगेट म्हणाले मी. परत अलीकडचं तिकीट मागणार होते; पण तुच पुढे पळून गेलास."
"बरबर ठिक आहे. तरीपण मला एक शंका आहे—स्वारगेटच तिकीट काढलं असलं तरी तू अलीकडे उतरू शकली असतीस की!" निलेशचा युक्तिवाद योग्यच होता.
"तर रहायला मी हत्ती-गणपती चौकात." रोहिणीने विषय बदलला. "गणेशखिंड कॉलेज आहे ना तिथे बारावीला शिकवते." निलेशच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटून आलं. "बारावीच्या कामासाठी दुसऱ्या कॉलेजमधे प्रतिनिधी म्हणून गेले होते, त्यामुळे येताना एसटीने आले माघारी."
"घ्यायला नाही आले कोणी?"
"कोण येणार घ्यायला?" रोहिणीने निलेशला विचारलं. तसं निलेशने शर्टच वरचं बटन बोटात पकडलं. रोहिणीने नकळतपणे मंगळसूत्राला स्पर्श केला. "नवरा? यांना दुसऱ्या कॉलेजवर जायचं होतं. दररोज सोबतच येतो आम्ही त्यामुळे एसटीने प्रवास करण्याची वेळच येत नाही." निलेशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. "ते पण शिक्षकच आहेत—बारावीचे."
"बरोबर." निलेश हसत-हसत म्हणाला, "जमलच की! दोघांचे विचार जुळत असतील मग, नाहीका?"
"तुझपण लग्न झाल असेलच की?" तीच्या प्रश्नावर निलेशने होकारार्थी मान हलवली. "मग तुमचे विचार जुळत नाहीत का?"
"नाही ना, ती कंडक्टर नाहीये!" निलेश म्हणाला, "केव्हाच झालय लग्न. दोन मुलं आहेत, मुलगा नववीत मुलगी पाचवीत."
"रोहिणी सांगू लागली. माझी मुलगी सुद्धा सहावीत शिकते, एकटीच आहे."
"बर मग लवकर जायचय का घरी?"
रोहिणी वैतागली. "तसं नाही रे मुर्खा—एकटीच आहे म्हणजे एकुलती एक आहे!"
"मुर्खा?"
"सॉरी-सॉरी चुकून झालं." रोहिणीने डोळे किलकिले करून माफी मागितली.
"चल रोहिणी निघतो मी आता. तूलापण उशीर होत असेल नाहीका?"
डाव्या मनगटाला उलटं बांधलेलं घड्याळ रोहिणीने पाहिलं. आताशी तर दोन वाजलेत, अजून वेळ आहे माझ्याकडे. लेकीची शाळा साडेपाचला सुटणार आहे तोपर्यंत मी रिकामीच आहे; मात्र जर तुला उशीर होत असेल तर जाते मी. मांडीवरची पर्स रोहिणीने खांद्याला अडकवली."
"थांब जरा तुझ्याकडे वेळ आहे तर मी बघतो काय होतय ते." निलेशने रोहिणीला अडवलं.
"म्हणजे?"
"तू बस, मी आलोच पंधरा-वीस मिनिटात." निलेश उभा राहिला.
"कुठे चाललायेस?" रोहिणी.
"आलोच मी, तू बसून राहा." निलेश पुन्हा एकदा गायब झाला . . .


थंडी तशी बरीच. कोणासाठी सुसह्य, कोणासाठी असह्य. बहुतेक वेळा एकलकोंड्यांसाठी असह्य! थंडीत मनही दुहेरीच असतं, अगदी निसर्गासारख, सकाळी गारठलेल आणि दुपारी आळसावलेलं. थंडी बरेच दिवस रेंगाळत राहते. कधीकधी वाटतं थंडी जीवनभर हटणारच नाही. नोव्हेंबर—१९९९. थंडी प्रितीचा ऋतू. जादू व्हावी तसं थंडी आली की साथीदाराचा सहवास हवाहवासा वाटतो.

कॉलेजमधे मधल्या सुट्टीची घंटा वाजली तशी मैदानात गर्दी दिसायला लागली. कॉलेजच्या मैदानातील कोपऱ्यावर पडलेल्या कोवळ्या उन्हात गप्पांचे फड रंगले, काही टोळ्या चहाच्या टपरीकडे वळाल्या, कुठेतरी मैदानावर उगीचच माकडासारखी उड्या मारणारी पोरं दिसू लागली. डबा तसाच अर्धवट ठेवून रोहिणी खाली मैत्रिणीसोबत उन्हात उभी राहिली. मैत्रिणीच्या-मित्राने-मैत्रिणीचं लक्ष वेधून घेतलं आणि रोहिणी एकटी पडली.
रोहिणीने 'कायय?' असं विचारल्याच उत्तर देण्यासाठी निलेश तिला चिकटला तो कायमचाच. रोहिणीने नंतर त्याला झिडकारण्याचा उपद्व्याप केलाच नाही. 'दमून-दमून बसेल गप.' अशी तिची समजूत; जी निलेशने साफ चुकीची ठरवली. कॉलेज ते बसथांबा निलेशची मक्तेदारी असली तरी कॉलेजमधे त्याचा त्रास कमी होता.
"मुलींनो हाताची घडी तोंडावर बोट." रोहिणीने हाताची घडी सोडली. "मौन असेल." आज निलेश कॉलेजमधेही रोहिणीमागे लकडा लावतच होता. "थंडी वाजतीये? चल चहा पाजतो." त्याच्याकडे रोहिणीने खाऊ का गिळू या नजरेने बघितल. "नाही, नको. मुलीने चहाच्या टपरीवर चहा पिणे गुन्हा आहे हे विसरलोच होतो. बाकी मग काय चाललंय?" निलेशने हवापाण्याच्या गप्पा मारायला सुरुवात केली.
"तू सुधरणार आहेस का नाही?" रोहिणीच निलेशला हे पहिलच वाक्य. पहिल्या दिवशी रोहिणी जे बरळली ते संतापात, आज मात्र ती विचारपूर्वक बोलत होती. "तू डोक्यात कमी आहेस का रे? काय नाव तुझं?"
"निलेश."
"हा तेच ते निलेश का काय. तुला सांगितलेलं कळत नाही का?"
"तू तर काही सांगितलंच नाहीस." निलेश म्हणाला.
"तुझ्यासोबत बोलणच चुकीच आहे."
"चुकत जायचं मग कधीकधी! बरं वाटतं दुसऱ्यांना तुम्ही चुकल्यावर."
रोहिणी शांतच राहिली. निलेशच सतावण तिला आवडत नव्हतं; परंतू अगदीच आवडत नव्हतं असही नाही. या दिवसापासून रोहिणीने मौन तोडल ते कायमचंच. कॉलेज मधून घरी जाताना दररोज निलेशसोबत बोलणं होऊ लागलं, निदान मैत्रीची सुरुवात तरी झाली. असचं रोहिणी एके दिवशी घरी निघाली होती, निलेश दररोजच्या जागी तिची वाट पाहत उभा होता, दोघांची पावले संगनमताने पडायला लागली.
"नीरा पाजतोस?"
"काय?" निलेश आश्चर्यचकित.
"नाही म्हणजे मला माहिती नाहीये नीरा काय असते? काही वाईट तर नाहीये ना? वाईट असेल तर मी बोललेलं विसरून जा."
"नीरा—वाईट? होऊच शकत नाही. साध्या सरबतासारखी, ऊसाच्या रसासारखी; पण तिची चव वेगळी असते."
"चव वेगळी असणारच ना." रोहिणी म्हणाली, "चव वेगळी नसती तर तिला वेगळं नाव का दिलं असतं?"
"बरोबर आहे." निलेशने प्रतिसाद दिला. "पण मी तुला नीरा पाजू शकत नाही."
"का महाग असते का?" रोहिणीचा बालसुलभ प्रश्न.
"नाही, अजिबात नाही." निलेश म्हणाला, "मात्र पहिल्या दिवशी नको म्हणालीस म्हणून तुला नाही पाजणार."
"मी देते पैसे!"
"तरीपण नाही! एकदा गेलेली संधी गेलीच."
"मला तेव्हा नीरा काय आहे हे माहीत नव्हतं—म्हणजे आताही माहिती नाहीये—आणि तेव्हा तुझ्यावर विश्वास नव्हता. मला नीरा हे प्रकरण जाणून घ्यायचय." रोहिणी विनवणीच्या स्वरात म्हणाली.
निलेशने टपरीकडे बोट दाखवलं. "तिथे जायचं फक्त दोनच शब्द बोलायचे 'एक नीरा' त्याने दिल ते प्यायच आणि माघारी यायचं."
"राहू दे. मला नाही प्यायची नीरा." रोहिणी रागावली.
"मी पण तेच म्हणतोय, राहु दे नको पिऊ!"
रागावलेली रोहिणी नंतर फारसं काही बोललीच नाही. त्यानंतरही बरेच दिवस कॉलेज सुटलं की अधूनमधून ती नीराची आठवण काढतच होती आणि निलेश त्याच्या हट्टाला धरूनच होता. 'नीरा पिणे' ही गोष्ट रोहीणीसाठी फार अवघड नव्हती; मात्र तिला एकटीला किंवा दुसऱ्या कोणासोबतही नीरा प्यायची नव्हती. याचं कारण? खुद्द रोहीणीलाच माहिती नव्हतं . . .


स्वारगेट भेसूर दिसत होतं. डांबरी रस्त्यामुळे तापलेल्या हवेच्या लहरींकडे बघत रोहिणी निवांत बसलेली होती. हवेच्या गरम झळांमुळे समोरचा देखावा हलत होता. तिथले —प्रवाशांचे, विक्रेत्यांचे, यंत्रांचे—आवाज एकाएकी थोडेसे मंदावले होते. रोहिणीने पुन्हा घड्याळात पाहिलं ०२:२५. आता वाट पाहणं थोडंस जड जायला लागलं. 'उठून निलेशला शोधावं' असा विचारही तिच्या मनात आला. 'अजून थांबूया पाच मिनिटे' ती स्वतःशीच म्हणाली. पाच मिनिटे पूर्ण होण्याच्या आधीच निलेश तिच्याशेजारी उभा राहिला.
"चल." रोहिणीने आवाजाच्या दिशेने पाहिलं. मगाची कंडक्टरची कपडे बाजूला सारून निलेश रंगीत कपड्यात तिच्यासमोर उभा होता. साधी पॅन्ट आणि अबोली रंगाचा शर्ट.
"कुठे जायचय?"
"योगायोग. निव्वळ योगायोग."
"काय योगायोग? कशाचा योगायोग?" रोहिणी म्हणाली, "मी काय विचारतेय तू काय सांगतोय?"
"शर्टकडे पाहत होतीस ना? अबोली—तुझा आवडता रंग." निलेश या कानापासून त्या कानापर्यंत स्मितहास्य करत म्हणाला, "निव्वळ योगायोग आहे."
"ध्यानात पण नव्हतं माझ्या, चांगला आहे शर्ट. आता कुठे जायचं?"
"नाश्ता, जेवण करूया. मला भूक लागलीये तू पण उपाशीच असशील."
"तुझं काम?"
"ते बघतो मी." निलेश म्हणाला, "बर्‍याच दिवसांनी भेटलीस तर विचार केला बोलावं थोडावेळ काढून."
"मला नाहीये भूक." सावली सोडून जायचं ही कल्पना रोहिणीला फारशी रुचली नाही.
"तरीही चल, मी जेवण करतो, तू बघत बस!"
"बोलण्याची पद्धत नाही जमली तुला अजून. घरीपण असंच बोलतो का?" रोहिणीने हसतच विचारलं.
"ती बोलूच देत नाही." निलेश म्हणाला, "घरीतर फक्त ऐकावं लागतं!"
पर्स खांद्याला अडकवली आणि ती निलेशसोबत निघाली. त्याच्या चालण्याच्या वेगाला वेग मिळवला आणि रोहिणीने त्याला विचारलं, "निलेश इथे शहरात कधी आलास? म्हणजे गावावरून कधी आलास?"
"तेव्हा गेलो होतो त्यानंतर लगेच आलो दोन वर्षात माघारी. कामाला लागलो, छोटी-मोठी कामे करत स्थावर झालो, लग्न झाल्यावर तर मग इथलाच झालो."
"माघारी आल्यावर मला भेटायला आला नाहीस?"
"आलो होतो; पण तू भेटली नाहीस." निलेश म्हणाला, "असली वाक्ये बोलून तूला गंडवणार नाही! तुला भेटायला आलो नाही कारण, तुला काय सांगायचं हाच प्रश्न होता."
"तूला मला काहीच सांगायचं नव्हतं का?" रोहिणीने अगतिकतेने विचारलं.
"सोडना, भूतकाळाच काय घेऊन बसलीस? वर्तमानाच बोल." निलेश म्हणाला, "बोल ना तूला काय खायचय?"
"हॉटेलमधे गेल्यावर ठरवूया."
दोघेही शांतपणे चालत राहिले. तोच बोलता झाला. "काय म्हणतय आयुष्य? बालपणातील सुखाचे दिवस जीवाला घोर लावतात का नाही? आणि आता आयुष्याबद्दलच्या काय कल्पना आहेत?" रोहिणी निलेशच्या थोडसं मागून चालू लागली, अगदी अवघडल्यासारखी. "तोंडाला ओढणी बांध म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही."
"आं?" तिने बेसावध प्रतिसाद दिला.
"तोंडाला बांधून घे म्हणजे कोणी ओळखणार नाही."
"नाही असु दे." रोहिणी म्हणाली, "तुझ्या प्रश्नाचा विचार करत होते. फार काही बदललेल नाही आयुष्य, फक्त आनंदाची वारंवारता थोडी कमी झालीये, मुलगी मोठी होतीये त्याचही थोडं टेन्शन येतं अधूनमधून, बाकी मग काय महागाई वैगरे आहेच."
"मी स्वप्नांविषयी बोलतोय, ध्येयाविषयी बोलतोय. पगाराविषयी नाही, लेकरांविषयी नाही."
"स्वप्न कधी थांबतात का? पण हल्ली स्वप्ने सुद्धा कुटुंबाशीच संलग्न असतात." रोहिणीने सुस्कारा सोडला. "ते जाऊदे, तू सांग तुझ्या मनासारख आयुष्य तुला मिळाल का नाही?"
"माझ्या मनासारख आयुष्य मिळालं असतं तर आपली भेट दररोज झाली असती!"
"म्हणजे?"
"म्हणजे, हॉटेल आलं!" हॉटेलच्या पायर्‍या झटपट चढून निलेश आत गेला, रिकाम्या टेबल वर रोहिणीची वाट बघत बसला. रोहिणी स्थिरावली, कपाळावरचा घाम टिपत तिने थोडसं पाणी पिलं, दोन्ही हातात ओढणी धरली आणि ओढणीनेच स्वतःला वारा घालायला सुरुवात केली.
"उकडतय ना फार?"
निलेशने होकारार्थी मान हलवली. "तोंड धुवून यायचं असेल तर ये." त्याने मेनूकार्डमधे बघता-बघताच बेसिनकडे बोट दाखवलं.
"थांब जरा, जाते थोड्यावेळाने."
बेसिन दाखवण्यासाठी उचललेल्या हातानेच निलेशने 'ओके' दर्शवलं. थोड्यावेळाने दोघेही थोडेसे सावरून बसले. वेटर आला.
"ऑर्डर?" वेटरने विचारलं . . .


डिसेंबर—१९९९. डिसेंबर येतो तो नवलाई घेऊनच. थंडी बोचरी झालेली असते. अशातच नवीन सुरुवातीचं, आनंदाच, उत्साहाचं वेड हरेकालाच लागतं. चुकांवर पांघरूण घालून पुन्हा नव्याने ध्येयाचा आराखडा आखायचा तर डिसेंबर सारखा महिना नाही.

सकाळी मोठ्या कष्टाने उठून, आवरून, रोहिणी बसथांब्याकडे निघाली. अंगातला स्वेटर कुचकामी ठरत होता. दोन्ही हात स्वेटरच्या खिशात घालूनच रोहिणी एसटीत चढली. लोखंडी दांडे थंडगार पडलेले असल्यामुळे खिशातले हात न काढताच ती सावरून बसली. कॉलेजला न जाण्याची खूप कारणे तिच्या मेंदूत धिंगाणा घालत होती, तिला साखरझोपेत खेचत होती. काॅलेजला जाण्यासाठी मात्र एकच कारण—निलेशची भेट. गेल्या पाच दिवसांपासून निलेश कॉलेजला आला नव्हता. काॅलेज मधलं वार्षिक स्नेहसंमेलन सुरू झालं आणि निलेश फरार! पाच दिवस अधिक दोन दिवस सुट्टीचे, सात दिवस ती निलेशसोबत बोललेली नव्हती. हल्ली निलेशसोबतची मैत्री—निदान रोहिणीसाठी तरी—मैत्रीच्या पुढचा प्रवास करत होती. बोलणं फक्त बसथांब्यावर मर्यादित न राहता वर्गातही सुरू झालं, मैदानावरही, कधीकधी वेळेच भान सुटू लागलं, रोहिणीला तक्रार नव्हतीच. हळूहळू प्रितीचं गुरुत्वाकर्षण तिला खेचायला लागलं होतं; पण भीड रेटत नव्हती.
'निलेशच्या मनात काय असेल? जर माझ्या हलगर्जीपणामुळे त्याने मैत्री तोडली तर? त्यापेक्षा त्याच्याकडून येणाऱ्या प्रश्नाची वाट पहावी? हेच योग्य आहे. परंतू जर तो सुद्धा माझ्यासारखाच विचार करत असेल तर?'
जर आणि तर या दोन शब्दांनी रोहिणीला भूतकाळात व भविष्यात रममाण करून तिचा वर्तमान खराब केलेला होता. एसटीच्या बाहेर धुकं दाटलं होतं अगदी तसंच धुकं तिच्या मनातही दाटलं होतं. समोरचा मार्ग तिला आकळता येत नव्हता. निलेशच्या विचारातून उसंत मिळाली की कुटुंबाचे विचार भेडसवायचे.
आजही निलेश आला नव्हता. तिचं लक्ष वर्गात नव्हतच. जमेल तितक्या नाना प्रकारच्या शंका-कुशंका तिचं मन काढायला लागलं. 'मधल्या सुट्टीत घरी निघून जायचं' रोहिणीने ठरवून टाकलं. अनामिक भीतीने मनात घर केलं होतं. ठरवल्याप्रमाणे तिने मधल्या सुट्टीत दप्तर उचललं, स्वेटर दप्तरात टाकला आणि निघाली, शिक्षकांकडे आजारी असल्याचा अर्ज दिला आणि मैदानावर आली, ती गेट जवळून वळाली तोच निलेशने तिचा हात धरला.
"निलेश तू इथे? गणवेष कुठय? दप्तर कुठय?" आनंद दाबण्यात रोहिणीला अपयश आलं.
"चल सांगतो सगळं." रोहिणीच्या एकाही प्रश्नाच उत्तर न देता निलेशने तिला सोबत चालायला लावलं. कॉलेज मागील मैदानावर येऊन निलेश थांबला.
"रोहिणी मला तुला काहीतरी सांगायचय."
"सांग ना." रोहिणीच्या मनात गुदगुल्या व्हायला सुरुवात झाली. इतका वेळ संकुचित होऊन निलेश मागे मुकाट्याने चालणारी रोहिणी थोडीशी सावरून उभी राहिली. "काय सांगायचय म्हणतोस?" हा क्षण इतका लवकर येईल असं तिला वाटलं नव्हतं.
"मी गावाला चाललोय." निलेशच्या आवाजात गंभीरता आली. "आजच."
निराशा व आश्चर्य दोन्ही भावनांनी रोहिणीला अस्फुट प्रतिसाद द्यायला भाग पाडलं. "काय? का?"
"तुला मी कधीच सांगितले नाही की मी इथे मोठ्या भावाकडे राहतोय आणि माझे आई-वडील गावाला असतात. सांगितलय का?"
"नाही." रोहिणी म्हणाली, "पण त्याचा इथे काय संबंध?"
"गेल्या आठवड्यात वडिलांना विहिरीतून मोटर काढताना विजेचा झटका बसला होता." निलेशने सांगितलं. "त्यामुळे मी गावाला गेलो होतो, वडिलांची तब्येत सुधारली म्हणून कालच माघारी आलो. आज पुन्हा माघारी चाललोय."
"का?"
रोहिणीला अनपेक्षित घटना घडली. निलेशने तिचा डावा हात धरुन तिला जवळ खेचलं, अगदी जवळ आणि तिला मिठी मारली! रोहिणी स्तब्ध झाली. थोड्यावेळाने रोहिणीला अचानक उजव्या खांद्यावर पाण्याचा स्पर्श जाणवला, तिने निलेशला पकडलं. तेव्हा निलेशची तिच्याभोवतीची पकड आणखी मजबूत झाली . . .
थोड्यावेळाने त्याने तिला दुर सारलं. "वडील गेल्याचा निरोप आला तासाभरापूर्वी. म्हणलं जाताना तुला भेटून जावं."
"पर . . . " तिने थरथरत्या आवाजात स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला. "परत कधी?"
"माहिती नाही."
"परत येशील?"
"माहिती नाही."
त्याने तिचा हात पकडला आणि स्थानकाकडे निघाला. रोहिणीची पावले जड झाली. 'काय झालय? काय होतय?' याची मीमांसा करण्यात ती गुंतली होती. कोणीच काहीच बोललं नाही. थांब्यावर तिच्याशेजारी उभ असतानाही निलेशने तिचा हात घट्ट दाबुन धरला होता. थोड्याच वेळात एसटी आली.
"काळजी घे." निलेशने रोहिणीच्या हातावरची पकड ढिली केली.
त्याच्याकडे न पाहताच रोहिणी एसटीत चढली. गाडीने वेग पकडला तसं तिला आयुष्य धावतं वाटू लागलं. घरी येऊन तिने गणवेश हातात धरला. गणवेशाच्या उजव्या खांद्यावर आसवांचा ओलावा अजूनही तसाच होता, त्यात थोडीशी आसवे आणखी मिसळली गेली . . .


जेवताना रोहिणी एक शब्दही बोलली नाही म्हणून निलेश सुद्धा शांतच राहिला. बील देण्यात हो-नाही करत शेवटी त्याने पुढाकार घेतला आणि मग दोघेही बाहेर आले.
"जायचं असेल ना तुला?" निलेशने विचारलं.
"साडेतीन झालेत, निघायला हवं; पण त्याआधी कॉलेजवर जायचं का? इथेच तर आहे."
"इमारतीशिवाय तिथे काहीच राहिलेल नाहीये. आठवणींच म्हणत असशील तर तुलाच आठवणी सापडतील." निलेश.
"नाही रे. हल्ली मलापण वेळ मिळत नाही घर सोडायला. जवळजवळ तीनेक वर्षांनी मला कॉलेजची इमारत पाहायला मिळेल. चल ना जाऊया." रोहिणीच्या हट्टापुढे निलेशचा नाविलाज झाला.
"तीनेक वर्षे? मी तर सात-आठ वर्षांनी इमारतीकडे फिरकत असेन." निलेश अजुनही संभ्रमातच होता. "उन्हाचा त्रास होत असेल तुला, त्यापेक्षा इथूनच पकड एसटी आणि जा घरी."
"होऊ दे मला त्रास. तुला त्रास होत असेल तर तू जाऊ शकतोस." असं म्हणून रोहिणी चालत पुढे गेली मग थांबली. निलेश तसाच उभा होता. "चल ना, प्लीज!" ती म्हणाली आणि हसतच दोघांची पावले कॉलेजकडे वळाली.
"पुढचं शिक्षण घेतलस तू?" रोहिणीने विचारलं.
"बारावी केली पूर्ण टेबल खालून."
"म्हणजे?" अर्थ विचारला आणि नंतर लगेच तीच्या लक्षात आलं. "अच्छा टेबल खालून!"
"हो! मग वशिला लावून लागलो कंपनीत नोकरीला, शेवटी लग्नाचं लक्षात घेऊन भावाने एसटी महामंडळात चिकटवून टाकलं तेव्हा कुठे लग्न झालं. मी नवरा झालो आणि कंडक्टर सुद्धा. तुझं सांग शिक्षिका कशी झालीस?"
"बारावीनंतर पुढे शिकत राहिले. थर्ड इअर ला होते तेव्हाच यांची आणि माझी भेट झाली."
"यांची?"
निलेशला समजण्यासाठी रोहिणीने पुन्हा गळ्यातलं मंगळसूत्र पकडलं. "यांच्यासोबत भेट झाली, पुढे दोघेही शिक्षकच झालो, मग लग्नही केलं—खरंतर मी लग्नानंतर शिक्षिका झाले."
रस्ता तुडवायचा असल्याने दोघांनी शांततेत चालायला सुरुवात केली. बराच वेळ सरला.
"ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचय, माफी मागायचीये." निलेश म्हणाला.
"कसली?" रोहिणीने उत्सुकतेने विचारलं.
"मी म्हणतोय भूतकाळ सोडून दे आणि मीच पुन्हा भूतकाळात शिरतोय. तुला कदाचित राग येईल, मी जे सांगतोय ते मूर्खपणाचही वाटेल; पण तू राग मानू नकोस. कित्येक वर्षे स्वतःवरचा संताप मी दाबत आलोय, तुला एकदाची ही गोष्ट सांगून माफी मागायचीच आहे, मगच माझी अपराधीपणाची भावना बोथट होईल. तसपण . . . "
"आता सांगणार आहेस का नाही?" रोहिणीने वैतागून विचारल.
"चालत रहा. अशी रस्त्याच्या मधे थांबू नकोस!" निलेश आजूबाजूला पाहत म्हणाला, "मी मनाची तयारी करून सांगेन हळूहळू." दोघेही पुन्हा चालू लागले. "मला माफी यासाठी मागायचीये कि, मी पुन्हा तुला भेटायला आलोच नाही."
"तू माफी मागायलाच पाहिजे!" रोहिणी ठामपणे म्हणाली.
"मला बोलू देणार आहेस?"
"सॉरी-सॉरी, तू सांग मी शांत राहते."
"मला भीती वाटत होती. कारण, मी माघारी आलो असतो तर निश्चितच मी तुला सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला असता. इथेच तर अडचण होती. ज्यावेळी माझाच ठावठीकाणा नव्हता त्यावेळी मी तुला काय विचारणार होतो? तू निश्चितच नाही म्हणाली नसतीस." त्याने रोहिणीच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले. "म्हणूनच मी आलो नाही. माझ्या आयुष्याची धूळधाण उडालेली होती तशी तुझ्या आयुष्याची उडायला नको या विचाराने मला बांधून ठेवलं, माफ कर."
"सोडना भूतकाळातलं-भूतकाळातच आणि तसही आता आयुष्य खूप सुंदर चाललेलं असताना ऊगीचच आयुष्यात नसणाऱ्या गोष्टींवर काय रडायचं?"
"बरोबर आहे." बराच वेळाने त्यानेच सांगितलं, "घे आलं 'तुझं' काॅलेज! काय आहे इथे बघण्यासारख?"
" 'माझं' काॅलेज?"
" 'आपलं' कॉलेज! सांग काय आहे इथे बघण्यासारखं?"
"आत जायचं?" रोहिणीची उत्सुकता.
"ये जाऊन मी थांबतो बाहेरच!" शेवटी तिने आत जाण्याचा विचार झटकला. थोडावेळ रेंगाळून दोघेही माघारी निघाले. "चल तूला एसटीत सोडतो आणि मी कामावर जातो."
"ऐक ना निलेश." रोहिणी म्हणाली, "बायकोला—मुलांना भेटवणार नाहीस का?"
"मी 'तुझ्या नवऱ्याला भेटायचय' असे म्हणालो का? समज जरी मी तुला घरी नेलं, तर बायकोला काय सांगणार?"
"ते ही खरंच आहे. मग नंबर तरी दे."
"आयुष्याचे रस्ते वेगळे झालेले आहेत—मॅडम. इथून पुढे पुन्हा भेट होणार नाही, व्हायलाही नको! राग मानू नकोस परंतु आता माझ्याआधी, तुझ्याआधी, मला कुटुंबाचा विचार करावा लागतो." निलेशने साफ नकार दिला.
"नुसता नंबर मागितला." रोहिणी म्हणाली, "तर कुटुंबाला मधे आणतोस? तुझ्या डोक्यात अजूनही डाळ शिजतच आहे वाटतं! चोराच्या मनात चांदणे म्हणतात ना तेच खरं!"
रोहिणीच्या हसण्याच्या आवाजाने निलेशला गप्प केलं. चालता-चालता तिने अचानक निलेशच्या खांद्याला पकडल.
"काय?" त्याने तिचा हात झटकला.
"नीरा पाजतोस?" तिने टपरीकडे बोट दाखवून विचारलं.
निलेश हसायला लागला. "निश्चितच . . . नाही!" रोहिणी रागात काही बोलणार तेवढ्यात निलेश म्हणाला, "मस्करी करत होतो. चल पाजतो!"
"दोन नीरा." निलेशने सांगितल.
नीरावाला-नीरा ग्लासात भरताना रोहिणीच संपूर्ण लक्ष नीरावाल्याकडे होतं. निलेशने तिला दिलेला ग्लास तिने अधीरतेने हातात घेतला.
"फार बदललाय तू." रोहिणी.
"का बरं?"
"आज चक्क नीरा पाजतोएस!"
"नीरा तर तुला पहिल्याच दिवशी पाजणार होतो; पण तूच 'आदर्शवादी' निघालीस! त्यात माझा काय दोष?" रोहिणीने ग्लास तोंडाला लावला. "कशीये नीरा?" निलेशने विचारलं.
"मस्त, खूप छान." रोहिणी.
"बदल तर होतच राहतात." निलेश सांगत होता. "मी बदललोय, तशी तूही—चांगल्या अर्थाने—बदललीस, हे शहरही बदललंय . . . "
"ओ तत्त्वज्ञानी, प्या आणि पिऊ द्या!" दोघांनीही नीरा संपवली.
" . . . अगदी हा नीरावालाही बदलला, त्याची टपरी सुद्धा बदलली!" निलेशने मगाचच घोडं पुढे दामटलं. "फक्त बदलली नाही नीरा, बदलली नाही नीराची चव. हो ना?"
"मला नाही माहिती." रोहिणीच्या डोळ्यांत पाण्याची छटा उमटली.
"माहिती नाही? का बरं? चव कळत नाही का?"
रोहिणीने संपलेला ग्लास दोन्ही हातात धरून हात गुडघ्यावर टेकवले आणि हलक्या आवाजात सांगितलं. "खरंच माहिती नाही कारण, मी कधी नीरा पिलेच नाही रे . . . "


—समाप्त.


[ ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील पात्रे, स्थळ, काळ, वेळ अथवा इतर कोणत्याही गोष्टीचा वास्तवाशी काहीएक संबंध नाही. असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग आहे. सोबतच कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, संघटना किंवा धर्माला दुखावण्यासाठी हे लेखन करण्यात आलेले नाही. असे आढळल्यास आधीच क्षमा मागतो. क्षमस्व—आपलाच रंगारी. ]