Prayaschitta - 14 books and stories free download online pdf in Marathi

प्रायश्चित्त - 14

या दोघी जवळ पोहोचल्या तरी केतकीच्या बाबांचे लक्ष नव्हतेच. मग केतकीने हाक मारली. तसा भानावर आला.

“मी याला ओटीमध्ये नेतेय. केतकीला सोडायला आले. कांचन?”

त्याने शाल्मलीकडे पाहीले. “७२ तासांची मुदत संपत आलीय. अजून .....”

“हं.”

“शुद्धीवर यायला हवीय ती ......”

असहायता, डेस्परेशन त्याच्या आवाजात स्पष्ट जाणवत होतं.

‘काय आणि कसा धीर देणार?’

“तुम्ही आत येऊन बोलाल का काही तिच्याशी? कदाचित मी तिच्याकडे नकारात्मक उर्जाच पोहोचवतोय का असं वाटतंय मला.”

शाल्मली ला काय बोलावं कळेचना. पण मग तिने श्रीशला त्याच्याकडे दिलं आणि ती सरळ आत गेली, जाताना केतकी ला म्हणाली “चल तू ही.” केतकी जरा घुटमळली, पण मग तिचा हात घट्ट धरून गेली आत.

श्रीश केतकीच्या बाबाकडे पाहून नेहमीसारखं गोड हसला आणि त्या माणसाच्या ओठांवर कितीतरी दिवसानी स्मित आलं. केवळ संसर्गानं आलेलं स्मित. लहान मुलाच्या निर्व्याज हास्याच्या प्रतिसादाचं स्मित!

शाल्मली आत गेली. केतकीने तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. शाल्मली बेडजवळ गेली. तिने कांचनच्या हातावरून हलकेच हात फिरवला. फिरवत राहिली. मग तिच्या कानाशी जाऊन हळूवार स्वरात म्हणाली , “कांची, बघितलस का कोण आलय? तायडुटली आलीय बघ तुला भेटायला.”

मग केतकीला म्हणाली “मार बरं हाक तिला. “

“कांची, कांची , डोळे उघड , चल घरी जाऊया. “

“तिला काय आवडतं सगळ्यात ते खाऊया म्हण.”

“चल आईस्क्रीम खाऊया. पिझ्झा पण. तुझ्या आवडीचा चीज पिझ्झा!”

मग तिने तिच्या मोकळा हाताने कांचनचा हात हातात घेतला. बोटात बोटं गुंतवली. तिला कांचनने पण बोटं घट्ट केल्याचा भास झाला. “ती जागीय. धरला माझा हात .....”

शाल्मलीने चमकून पाहिले. हात हातात घेऊन पाहिला पण तो नाही हलला.

“केतकी आता परत थोड्या वेळाने डॅड बरोबर आत येऊन असंच बोल, हात हातात घे, घाबरू नकोस. ऐकशील माझं एवढं?”

तिने जोरजोरात हो अशी मान हलवली.

परत एकदा कांचनला हलका स्पर्श करून दोघी बाहेर आल्या. कांचनचा बाबा श्रीशला घेऊन उभा होता. तो लगेच जवळ आला.

“डॅड, कांचीनं हात धरला माझा. खरंच.” प्रचंड आशेने त्याने शाल्मलीकडे पाहीले. “हो म्हणजे केतकीला खात्री वाटतेय तशी. थोड्या वेळाने परत आत जा तुम्ही दोघे. केतकी गप्पा मार कांचन शी. ओके?”

“हो आंटी!”

“तुम्ही परत वर जाताना याल? प्लीज?”

लहान मुलासारखं काकुळतीला येत त्याने विचारलं.

“हो येईन.”

शाल्मली ओटी कडे वळली. श्रीश मागे वळून त्या दोघांकडे हात करत होता.

ओटीतून परत जाताना ती आयसीयु च्या दिशेने वळली. बाहेर कोणीच दिसत नव्हतं या दोघांपैकी.

मग रुममधे डोकावली. बरेच डॉक्टर्स, नर्स, दिसले. मनात उगाचच धाकधूक झाली तिच्या. तेवढ्यात केतकी आली तिच्याजवळ, पाठोपाठ तिचा बाबा.

“कांचन शुद्धीवर आली. मगाशी केतकीला भास नव्हता झाला. खरच जागी होत होती ती. माझाही हात धरला. डॉक्टर तपासताहेत आता.”किती नि काय सांगू असं झालं होतं त्याला.

शाल्मलीने मग आनंद व्यक्त केला मनापासून.

तो परत आत गेला. केतकी तिचा हात धरून थांबली. मग त्या दोघी बाहेर येऊन थांबल्या.

डॉक्टरांचा ताफा बाहेर पडला. मग या दोघी आत गेल्या. कांचन ने डोळे उघडले होते. डोळ्यात ओळखही होती. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण शब्द बाहेर पडत नव्हते. तिचा बाबा मात्र तिच्यापासून एक मिनिटही दूर जाणार नव्हता आता. केतकीला पाहिल्यावर कांचनच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. त्यावरून तिचा मेंदू, स्मरणशक्ती काही प्रमाणात तरी काम करतेय हे कळत होतं. केतकीने हात हातात घेताच तायडी असा अस्पष्ट उच्चार तिच्या तोंडातून बाहेर पडला आणि केतकी आणि तिचा बाबा खाडकन उभेच राहीले.

दोघांनी एकमेकांकडे आणि मग शाल्मलीकडे पाहीले.

मग कांचनची नजर शाल्मलीकडे आणि तिच्या कडेवरच्या श्रीश कडे गेली . बा....अ ती म्हणाली.

केतकी पटकन पुढे होऊन म्हणाली श्रीश , त्याचं नाव श्रीश. कांचन च्या नजरेत ओळख नव्हती अर्थातच.

मग तिची नजर बाबाकडे गेली. डा....डा ती कसंबसं बोलली. तिचा डॅड नुसता पाहत राहिला .. मग जवळ गेला, “कांची.... बाळा माझ्या.....” असं म्हणून तिचा हात हातात घेऊन बसला.

त्या तिघांना त्यांच्या त्या आनंदी कोषात सोडून शाल्मली वर निघाली रुमकडे.

वर आल्या आल्याच फोन आला घरून. बाबाना घरी आणलं होतं. आई , वहिनी, अमेय अनुज निघत होते हॉस्पिटल मधे यायला. तिलाही बरं वाटलं सगळे भेटतील म्हणून.

मग संध्याकाळ त्यातच गेली. सगळे आल्यावर ती श्रीशला आई वहिनीच्या ताब्यात देऊन, अमेय अनुजला योग्य त्या सूचना देऊन सॅम ला भेटायला गेली.

सॅम चक्क लगेच भेटला. मग म्हणाला थांब जरा पुढचं श्येड्यूल बघू, नसेल काही फार तर बाहेर जाऊ, मला कंटाळा आलाय या वातावरणाचा. आणि तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचय.

शाल्मली म्हणाली मलापण.

सॅम ची नेहमीप्रमाणे एक भुवई वर गेली आणि शाल्मली खळखळून हसली.

त्याने चटकन वर पाहिलं. किती दिवसांनी अशी दिलखुलास हसली आपली ही जीवाभावाची मैत्रिण!

सॅमने पाहिलं तर नव्हत्या काही अपॉईंटमेंट्स. मग निघाले दोघं. वहिनीला सांगितलं तिने तसं. जवळच्याच कॉफी शॉपमधे गेले.

मग सॅम म्हणाला लेडीज फर्स्ट. तिने मग शंतनू बरोबरचं संभाषण सांगितलं. “मला तुझा हा निर्णय गैरव्यवहारी वाटतो शाम. प्रायश्चित्त म्हणून तू बरंच काही करू शकली असतीस. त्याला कोर्टात खेचून त्याची बदनामी करू शकली असतीस. किंवा आणखी काही. यात तर मला तुझाच सगळीकडून पराभव दिसतो गं.”

“नाही सॅम. तसं मी करते तर ती शिक्षा ठरती. तो जो आता थोडा का होईना माणसात येऊ पहातोय तो परत स्वत:च्या कोषात गेला असता. काय केस लढणार होते मी? तो तर सगळ्यालाच तयार आहे. घटस्फोटाला, पैसे द्यायला. पैसे द्यायला तर तो तेव्हाही तयार होता जेव्हा मी घर सोडून बाहेर पडले. आता त्याला कुठेतरी आतून, आपण चुकतोय ही खरी जाणीव होतेय. मी खरंखुरं प्रेम केलय रे शंतनू वर. आणि ज्याच्यावर आपण खरं प्रेम करतो त्याचा ऱ्हास नाही पाहवत. तो कुठेतरी मला माझाही ऱ्हास वाटतो.

आता माझ्या प्रेमात ममत्व, आकर्षण नाही उरलं त्याच्याविषयी, ते शून्य झालं. त्याच्या देखण्या रुपाचा माझ्यावर काडीमात्र परिणाम नाही झाला जेव्हा परवा इतक्या दिवसांनी त्याला भेटले. आश्चर्य म्हणजे त्याच्याही वागण्यात तसं आकर्षण कुठेच नाही जाणवलं मला.

पण त्यानं माणूस म्हणून वर यावं असं अजूनही मला वाटतं. पहिली पायरी असते स्वत:ला नीट ओळखण्याची. सुदैवाने तो ती चढलाय आता. यावेळी जर मी पैसे घेऊन मानसिक कुबड्या दिल्या त्याला तर तो चांगला माणूस बनता बनता राहिल आहे तसाच.”

“शाम, हा आदर्शवाद बोलायला बराय गं. पण प्रत्यक्षात तू स्वत:चं आणि पर्यायाने श्रीशचं समृध्दीभरलं आयुष्य नाकारते आहेस. पैशाला किती महत्व आहे हे मी नकोय सांगायला तुला. बरं शंतनूकडून पैसे घेणं न्यायानेही बरोबरच होतं ना?”

“सॅम, अरे आत्ता कुठे मी नोकरी करायला लागून वर्ष ही व्हायचय. मी आर्थिक प्रगती करेन अरे चांगली. श्रीशला जे जे गरजेचं आहे सगळं पुरवेन. महत्वाच्या क्षणी काही कमी पडतंय असं वाटलं तर तुझ्याकडे हक्काने लोन मागेन. देशील ना?”

“शाम, तुला माहीत आहे ते.”

“मग झालं तर. माझं झालं बोलून. अब तेरी बारी कालिया......”

सॅम तिच्या त्या नाटकी टोनवर दिलखुलास हसला.

मग एकदम सिरीयस झाला. वॉलेट मधून एक फोटो काढला आणि तिच्यासमोर ठेवला.

शाल्मली ने फोटो उचलून पाहीला. एका गोऱ्या मुलीचा फोटो होता. निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची भलती गोड मुलगी. आश्चर्याने हसून तिने समीरकडे पाहिलं.

“अरे लबाडा, इतके दिवस लपवून ठेवलस. कितीदा तुला लग्नाबद्दल विचारलं तर राजे गप्प ते असे गोड गुलाबी चेहेऱ्यात निळ्या डोळ्यात अडकले होते होय?”

समीर अजूनही सिरियसच होता.

“काय झालय समीर? “

“शाम, ही ‘मी’. “

“मी??”

“हो हिचं नाव मी, ॲज इन ‘Mie’”

“माझ्याच युनिव्हर्सिटीत होती शिकायला. आम्ही कधी एकमेकात गुंतत गेलो कळलच नाही. सगळं मस्त होतं गं सुरू. शिक्षण, प्रेम, सगळच. पण मग शिक्षण संपलं, तिथे घ्यायचा तेवढा अनुभवही घेतला. पहिल्यापासूनच तिला माहित होतं मी भारतात परतणार. आम्ही तो विचार वेळ आल्यावर करू असं ठरवलं होतं.

पण मी परत यायला निघालो तेव्हा तिने माझ्याबरोबर यायला नकार दिला. खूप वाईट वाटलं मला. कारण लग्न नसलं झालं तरी नवरा बायकोसारखेच राहत होतो आम्ही. माझ्या मनात ती बायकोच आहे माझी. मग मी इथे येऊन जम बसवला. वर्षभरात छान सेटल झालो. पण तिची आठवण गेली नाही मनातून. मग सगळं लक्ष कामावरच केंद्रित केलं.

मागच्या आठवड्यात तिचा फोन आला. म्हणाली मला यायचय तिकडे. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. पण नाहीच रुळले तिकडे तर, अशी भीती वाटतेय तिला. आपल्या नात्यात काहीच खोट नव्हती. पण आता तिकडे येऊन नाही जमलं तर सुंदर नातं विस्कटेल आपलं. असं म्हणतेय.

मला काही सुचत नाही शाम? काय करू? ये असं म्हणायला हजारदा फोन उचलला पण दर वेळी वाटलं, एकदा कसेबसे सावरलो, परत गेली सोडून तर येईल सावरता? कळत नाही काहीच मला.”

“सॅम, अरे, एक वर्ष तिने आपल्या मनातल्या असुक्षिततेमुळे गमावलं. आणि आता तीच असुरक्षितता तू मधे आणतो आहेस. प्रेमात खूप मोठी शक्ती आहे. तिला सांग म्हणावं ये लगेच. आणखी नको वेळ घालवूस. तिला सगळं मानवेल असं वातावरण तयार कर. कामाचं बघ मुख्य. बिझी झाली की लगेच रुळेल.

वेळ नको दवडूस. अगदीच नाही जमलं इथे तिला, तर तिच्याबरोबर परत जायची तयारी ठेव. तिने दाखवलीय ना तयारी इथे येण्याची , मग?”

“आई बाबा?”

“येतील की ते ही बरोबर तुमच्या . नाहीतर इथे दादा वहिनी आहेतच की तुझे.

त्यांना फोटो दाखव. प्रेमात पडतील सुनेच्या.”

सॅम हसला मग.

“अजूनही तू तीच शाम आणि मी तोच सॅम आहोत हे बघून बरं वाटलं. परवाची रडकी शाम बघून घाबरलोच होतो मी.”

तिने एक जोराचा फटका लगावला त्याच्या हातावर.

“पोरं होऊ देत सॅम्या तुला. मग बघु काय करतोस. शिंक आली तरी कसा हैराण होतोस ते बघायला मुद्दाम भरपूर आईस्क्रीम खाऊ घालणार मी त्याला. तुझ्यावर गेलं तर दुसऱ्या मिनिटाला शिंका सुरू.”

दोघंही भरपूर हसली मग.

“थॅंक्स शाम. तुझ्या तोंडून खातरजमा करायची होती. आज रात्रीच फोन करतो मी ला.”

“लग्नात नाव बदल बाबा पण ,ए मी अशी कशी हाक मारणार अरे”

मग परत हसली दोघं. मग मात्र घाईने उठली आणि हॉस्पिटलला परतली. गाडीतून उतरताना शाल्मली म्हणाली “सॅम, फार गोड आहे रे मी, आनंदात ठेवशील तू तिला. ॲम सो हॅपी फॉर यू!”

सॅम फक्त हसला. या मैत्रिणीच्या जजमेंटवर त्याला स्वत:पेक्षाही जास्त विश्वास होता.