Rahashymay Jaga - 1 books and stories free download online pdf in Marathi

रहस्यमय जागा - भाग १

-----------------------------------------------------------

रहस्यमय जागा

( प्रवास / रहस्य / थरारक / रोमांचक )

-------------------------------------------------------------

प्रस्तावना :- " रहस्यमय जागा " कथेचे नाव वाचूनच अनेकांच्या डोळ्यासमोर रहस्यमय जागेवर दडलेला खजिना किंवा भूत वगैरे असे काही येईल. मात्र ही कथा त्यापेक्षा वेगळी आहे. एक तरुण मुलगा त्याच्या खूप वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या आजोबांना शोधण्यास निघतो.एका रहस्यमय जागेकडे.अनेक ठिकाणी शोध घेत त्याच्यासमोर येणाऱ्या अडचणी , आव्हाने या सगळ्यांचे वर्णन , त्या तरुणाचा प्रवास आपल्याला या कथेतून बघायला मिळेल.ही कथा आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो.

( या कथेतील सर्व पात्रे , घटना , स्थळ काल्पनिक आहेत.काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.कथेचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असतील.कथेचे पुन:प्रकाशन , चित्रण करायचे असल्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.)

------------------------------------------------------------

रहस्यमय जागा - भाग 1

आठवण

--------------------------------------------------------

" मला ? का ? " हातातले पुस्तक बाजूला ठेवत प्रशांतने समोर उभ्या असलेल्या विराटला विचारलं.
" ते मला माहित नाही , पण तुझ्या मम्मीने लगेच बोलावले आहे." विराट प्रशांत कडे बघत म्हणाला.
प्रशांतने नाराजीने हातातले पुस्तक बॅग मध्ये ठेवले आणि बॅग पाठीवर लटकवून विराटच्या रुमबाहेर पडला.

" नाही.अभ्यास अजिबात करत नाही.त्याला फक्त बाहेर फिरायला आवडते." प्रशांतची मम्मी समोर सोफ्यावर बसलेल्या विराटच्या मम्मीकडे नाराजीने बघत म्हणाली.
" हो ना , आमचा विराट बघा.नेहमी टॉपला असतो ! अभ्यासात आता बारावीला ही टॉपलाच येईल ! " विराटची मम्मी आपल्या मुलाचे कौतुक करत म्हणाली.मात्र प्रशांतच्या मम्मीला ते काही आवडलेले दिसले नाही.
आतल्या रूममधून येणाऱ्या प्रशांतच्या कानावर दोघांचे बोलणे पडले.मात्र आपण काही ऐकले नाही अशा अविर्भावात तो शांतपणे सोफ्यावर त्याच्या मम्मीशेजारी येऊन बसला.
" काय ? झाला अभ्यास ? " प्रशांतच्या मम्मीने त्याच्याकडे बघत रागाने विचारले.
" नाही ! " प्रशांत शक्य तितक्या शांततेत दुसरीकडे बघत म्हणाला.
" तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे ! उद्या पेपर आहे त्याच काय ? " प्रशांतची मम्मी वैतागत म्हणाली.
" हे चुकीचं आहे बेटा. विराटला बघ , अभ्यास न करता पास होतोय." विराटच्या मम्मीने पुन्हा आपल्या मुलाचे कौतुक केले. प्रशांतच्या मम्मीच्या चेहऱ्यावर नाराजी अजूनच वाढली.
" चला येतो आम्ही." प्रशांतची मम्मी सोफ्यावरून उठत म्हणाली.
" हो हो , या परत घराचे काम पूर्ण झाल्यावर बघायला ! " विराटची मम्मी हसत म्हणाली.प्रशांत आणि त्याची मम्मी काहीही प्रतिक्रिया न देता घराबाहेर पडले.

रस्त्याने चालताना प्रशांत नेहमीप्रमाणे त्याच्या विचारात गुंतलेला होता.त्याची मम्मी अजूनही त्याला अभ्यासावरून बोलणे देत होती.
" बारावीचं वर्ष आहे.काही वाटायला पाहिजे ! "
" मला नाही इंटरेस्ट शिकण्यात ! " प्रशांत रस्त्यावरील दगडाला लाथ मारत बोलला.
" मग ? आयुष्यभर बापाच्या पैशांवर भटकत बसणार ? "
आता मात्र प्रशांत मनातून संतापला.
सारख काय ते अभ्यास ? मला नाही आवडत अभ्यास करायला. प्रशांतच्या मनात चलबिचल सुरूच होती.

प्रशांत एक शांत आणि अंतर्मुख असा अठरा वर्षांचा तरुण मुलगा. त्याला भटकंतीची प्रचंड आवड. नवनवीन ठिकाणी जाणे त्याच्या प्रचंड आवडीचे होते.अभ्यासात त्याला तसूभरही रस नव्हता.ना त्याला त्याच्या वडिलांच्या कापड व्ययसायात काही घेणेदेणे होते.मात्र एकुलता एक असल्याने त्याचे आईवडील त्याला अभ्यासावरून सतत बोलत असत. त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निसर्गाची सफर करायला त्याला आवडायचे , या गोष्टीला त्याचे आईवडील कधीकधी विरोधही दर्शवायचे.
त्याला मित्रही मोजकेच.पण सर्वांपेक्षा त्याचे विराटशी चांगले जमायचे.दोघेही प्रत्येक गोष्टीत सोबतच असायचे.विराट कधीकधी प्रशांतसोबत बाहेर फिरण्यास जायचा , मात्र विराटचे प्रशांतच्या उलटे होते.विराटला फिरण्यापेक्षा अभ्यासात रस होता.अस असूनही दोघांची मैत्री अजूनच घट्ट होत चालली होती.

प्रशांत घरी येऊन जेवण आटोपून आपल्या रूममध्ये गेला आणि नेहमीप्रमाणे लॅपटॉपवर वेगवेगळ्या ठिकाणचे वॉलपेपर आणि लोकेशन सर्च करू लागला.
वॉलपेपर किंवा निसर्गाची सुंदरता टिपलेले फोटो जमवून ठेवण्याचा त्याचा लहानपणापासूनचा छंद.त्याच्या लॅपटॉप मधील सगळी मेमरी तर फक्त या सगळ्यांनीच भरलेली होती.त्याचा मूड खराब असल्यावर निसर्गाची किमया दाखवणारी छायाचित्रे बघून न कळत त्याच्या मनाला शांतता लाभत असे.आजही त्याचा मूड खराब असल्याने तो वॉलपेपर बघत बसला होता.
जवळपास तीन तासांपर्यंत प्रशांत लॅपटॉपवर छायाचित्रे बघण्यात मग्न होता.त्याला वेळेचे काही भानच राहिलेले नव्हते.त्याच्या लपटॉपमधील जवळपास सर्वच छायाचित्रे त्याने पाहिली होती.शेवटचा फोटो पाहून झाल्यावर निसर्गाचे रूप न्याहाळण्यात हरवलेला तो भानावर आला.त्याने लॅपटॉप च्या स्क्रीनवर वेळ पाहिली.संध्याकाळचे पाच वाजून गेले होते.त्याने आपले दोन्ही हात वर करून आळस देत अंग मोकळे केले.लॅपटॉप ठेवण्याचा विचारात असतानाच त्याचे लक्ष एका फोटोकडे गेले.तो त्याच्या आजोबांचा फोटो होता.जवळपास 10 वर्षांपुर्वीचा.आजोबांच्या कडेवर सात-आठ वर्षांचा तो.आजोबांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून प्रशांतच्या चेहऱ्यावर नकळत हास्य पसरले.
त्याचे आजोबा जवळपास 8 वर्षांपूर्वी कौटुंबिक वादामुळे घर सोडून गेलेले होते.ते कुठे गेले , याचा कोणालाही पता नव्हता. प्रशांतच्या आईवडिलांनी त्यांना शोधण्याचा कधी प्रयत्नही केला नाही.प्रशांतला मात्र अधूनमधून त्यांची आठवण येत असे.आज मात्र त्याला आजोबांची नेहमीपेक्षा जास्त आठवण येऊ लागली.लहानपणीचे आजोबांबरोबरचे अनेक प्रसंग त्याच्याडोळ्यासमोर तरळू लागले.दरवाजावर झालेल्या टकटकने तो आठवणीतून बाहेर आला.
" प्रशांत..चहा घ्यायला ये." त्याच्या मम्मीने त्याला चहाचे आमंत्रण दिले.प्रशांत नाराजीने उठला.त्याला परत मम्मी आणि पप्पाचे बोलणे ऐकावे लागणार याची जाणीव होती.लॅपटॉप चार्जिंगला लावून तो रुमबाहेर आला. हॉलमधून त्याच्या मम्मी आणि पप्पांचा बोलण्याचा आवाज येत होता.बहुतेक ते प्रशांत बद्दलच बोलत होते.
प्रशांत शांतपणे हॉलमधील सोफ्यावर येऊन बसला.समोर बसलेल्या त्याच्या आईवडिलांवर त्याने हलकेच नजर टाकली.दोघेही शांत होते.
" प्रशांत.." वडिलांच्या आवाजाने प्रशांतने त्यांच्याकडे पाहिले.
" तुला जर शिकायचे नाही आहे...तर तू करणार तरी काय आहेस आयुष्यात ! " प्रशांतच्या वडिल मोठ्याने मात्र काळजीने बोलत होते.
" फक्त फिरणे म्हणजे आयुष्य नसते बाळा.माणसात जाणे , मित्र बनवणे आणि पोटापाण्यासाठी कमावणे , यासारख्या अजून अनेक गोष्टी असतात आयुष्यात.." प्रशांतचे वडील काळकुतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते.प्रशांत वर मात्र त्याचा काही फरक पडताना दिसत नव्हता.
" पप्पा , मला नाही आवडत अभ्यास ! मला शांतता आणि एकटेपणा यातच सुख वाटते." प्रशांत आपल्या मनातलं बोलला.
" हो का ! मग याचा अर्थ असा तर नाही होत की , तू बाकी काहीच नाही करायचं..तुला एकट्याला राहायला आवडत हे आम्हालाही मान्य आहे. पण भविष्याचा विचार केलाय कधी ? नाही ना ? " प्रशांतची मम्मी काळजीत बोलत होती.चहा पिऊन होईपर्यंत कोणी काहीच बोलले नाही.प्रशांत आपल्या विचारात गढला होता.त्याच्याकडे बघून त्याच्या मम्मीने त्याच्या पप्पांकडे बघत " याचे काही खर नाही " अशा अर्थाने मान हलवली.
" आजोबा कुठे गेले असतील ? " प्रशांतने त्याच्या आईवडिलांना अनपेक्षित प्रश्न विचारला.मम्मी आणि पप्पांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव पसरले.
" आजोबा..! तुला अचानक आजोबा का आठवले ? " त्याच्या पप्पांना काही कळत नव्हते.
" आज त्यांचा जुना फोटो पहिला , म्हणून. " प्रशांतचा आवाज जड झाला होता.हे त्याच्या मम्मीच्या लक्षात आले.पुन्हा शांतता पसरली.
" ते घर का सोडून गेले ? परत का आले नाही ? आता कुठे असतील ? सांगा पप्पा.." प्रशांतने डोळ्यातील पाणी हाताने पुसले.
" ते कुठे गेले हे मला माहित नाही.का गेले ते मी सांगणार नाही ! तू त्यांचा विचार सोडून दिला तर बरं होईल." प्रशांतचे पप्पा उठून निघून गेले.
" मम्मी , सांग ना ! " प्रशांतने आशेने त्याच्या मम्मीकडे पाहिले.
" तू त्यांचा विचार मनात आणू नको ! पेपरचा अभ्यास कर ! " त्याची मम्मी त्याच्या आशेवर पाणी टाकून निघून गेली.प्रशांतला मानातून चिड आली.वाईटही वाटले.डोळे पुसत तो पुन्हा त्याच्या रूममध्ये निघून गेला.आतून रुमचे दार लॉक करून घेतले.


प्रशांतला दचकून जाग आली. आपण कुठं आहोत हे कळायला त्याला बराच वेळ गेला. आपल्या टेबलवर जुना फोटो अल्बम बघत असतानाच त्याला झोप लागली होती. ती आजोबांच्या आठवणीतच.
डोळे किलकिले करत त्याने मान वळवून पाठीमागच्या भिंतीवर लटकवलेल्या घड्याळावर नजर टाकली. आठ वाजयला पाच मिनिटे बाकी होती. आपला झोपाळलेला चेहऱ्यावरून हात फिरवत त्याने समोरच्या अल्बमकडे पाहिले. त्याला आवडलेला आजोबांचा एक जुना फोटो त्याने हळूच अल्बम मधून बाहेर काढला. हाताचे दोन्ही कोपरे टेबलवर ठेऊन दोन्ही हाताने पकडून त्याला निरखून बघत होता. त्यांच्या अंगातील राखाडी कलरचे जॅकेट , जे त्यांच्या प्रचंड आवडीचे होते. हलकी वाढलेली पांढरी दाढी , प्रेमळ भाव असलेले डोळे जणू जिवंत असल्यासारखे भासत होते. चेहऱ्यावरील निर्मळ हास्य त्या फोटोची शान अजून वाढवण्यास पुरेसे होते. कितीतरी वेळ तो फोटो बघत असतानाच त्याला अचानक काहीतरी त्या फोटोमध्ये दिसले. काहितरी मोठी गोष्ट होती लागावे , तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. घाईने खुर्चीतून उठत त्याने तो फोटो आपल्या बॅगमध्ये ठेवून दिला.अल्बम जागेवर ठेऊन तो कपाटातील कप्पे चाळू लागला. एखाद्याने खजिना शोधावं तसा तो त्या ड्रॉवर मध्ये चाचपत होता. त्या ड्रॉवर मध्ये त्याने साचवलेल्या जुन्या नाण्यांचा ढीग होता. जे नाणे वेगळ्या प्रकारचे होते , ते प्रत्येक नाणे तो पुढून मागून अगदी निरखून बघत होता. शेवटी त्याला जे पाहिजे ते मिळालेच. एक जुणे गंज लागलेले नाणे हातात घेताच त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य पसरलं , जसे की त्याने एखाद्या सोन्याच्या नाण्याला त्याने शोधले असावे!


पेपरचा शेवटचा दिवस. प्रशांत आणि विराट कॉलेजवरून परतत होते. दोघेही आपापल्या विचारात गुंग होते.
" तू काय करणार आहेस पुढं ? " विराटच्या प्रश्नावर प्रशांतने त्याच्याकडे पाहिले. त्याने विराटचे बोलणे ऐकले नव्हते.
" हं ? काय ? "
" म्हणलं , तू काय करणार आहेस बारावीनंतर ? "
यावर प्रशांत निरुत्तर. विराटच्या प्रश्नाचे उत्तर त्यालाच माहीत नव्हते.
" मी तर विचार करतोय , मस्त इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावं. म्हणजे पप्पांसारखी आयटी कंपनीत नोकरी लागेल. मग लाईफ सेट ! " विराट बोलत होता , मात्र त्यातील एकही शब्द प्रशांतच्या कानी पडत नव्हता.
" मला वाटतं तू..."
" तू येशील माझ्यासोबत ? प्रशांत मधेच बोलला.
" कुठे ? " विराट गोंधळला. दोघे चालत विराटच्या घरापर्यंत पोहोचले होते.
" ते माहीत नाही ! " प्रशांतच्या वाक्यावर विराटच्या गोंधळात अजून भर पडली. प्रशांत एकदम स्पष्ट बोलणार नाही , हे विराटला माहीत होते. तो कंटाळून घरात निघून जाणार तोच प्रशांतच्या बोलण्याने त्याचे घराकडे वळलेले पाय थांबले.
" आजोबांना शोधायला ! "
" आजोबा ? "
" माझे आजोबा ! "
" पण तुझे आजोबा तर..."
विराट त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.
" काय बोलतोय तू ? डोकं तर ठिकाणावर आहे ना तुझं ? " विराटने त्याच्या डोक्यावर हळूच टपली मारली.
" तू येणार की नाही ते सांग ! " प्रशांत चिडून बोलला.विराटने वैतागत त्याच्याकडे पाहिले.
" एक काम कर , आपण संध्याकाळी त्या मंदिरात भेटू , मग बोलू. " विराट विषय टाळण्याचा प्रयत्न करत म्हणाला. प्रशांत अजून काही बोलणार होता , पण त्याच्या मनातील शब्द ओठांवर उमटले नाहीत. त्याने काहीश्या रागाने घराकडे जाणाऱ्या विराटकडे पाहिले आणि आपल्या घराचा रस्ता धरला.

" पेपर कसा गेला ? " प्रशांतच्या मम्मीने ताटातील पावभाजी संपवणाऱ्या प्रशांतला विचारले. प्रशांतने काही उत्तर दिले नाही. त्याच्या शांततेत मम्मीला उत्तर मिळाले.
टीव्हीवर कोण्या एका डोंगरातील जागेचे फुटेज दाखवण्यात येत होते. प्रशांत ते पाहत लक्ष देऊन ऐकू लागला.
" असं सांगितलं जात , की या ठिकाणी फार मोठा खजिना आहे. काही लोकं अस सुध्दा सांगतात , की या ठिकाणी कोणी वयस्कर माणूस राहतो , जो गेल्या कित्येक वर्षांपासून खजिना शोधतोय. "
त्या माहिती देणाऱ्या अँकरचा एक एक शब्द प्रशांत लक्षपूर्वक ऐकत होता.
" काय मग ? कसा गेला पेपर ? " प्रशांतचे पप्पा खुर्ची सरकवत त्यावर बसले. प्रशांतचे टीव्हीवरील लक्ष विचलित झाले.
" जाऊद्या , त्याला विचारण्यात काही अर्थ नाही. " प्रशांतची मम्मी पप्पांना जेवण वाढत बोलली.
प्रशांत जेवण संपवत टेबलवरून उठला. हात धुवून तो थेट स्टोर रूमच्या दिशेने पळाला.

स्टोर रूमचे दार उघडून तो आत शिरला. धुळीमुळे मोठ्याने शिंकत त्याने लाईट्स चालू केल्या. संपूर्ण रूमवर नजर टाकताना त्याला जुन्या तुटल्या फुटलेल्या वस्तू सोडून काहीच दिसले नाही. काहीवेळ तसाच उभा राहत तो काहीतरी विचारात पडला.
रूमच्या उजव्या बाजूला पडलेल्या एका मोडक्या टेबलकडे तो वळला.
सगळ्या बाजूने तो टेबल मोडकळीस आलेला होता. एकदा कशाने तरी प्रहार केला असता , तर त्याचे तुकडे झाल्याशिवाय राहिले नसते. टेबलाच्या वरच्या भागावर मधूनच मोठा तडा गेला होता. टेबलवर उजव्या बाजूच्या एका कोपऱ्यात त्याला पेनाने काहीतरी लिहिलेले दिसले.
' सुदर्शन जोशी 'आणि त्याखाली एक सही , जिच्याखाली तारीखही होती. ' ८-६-२००७ '
नाव वाचून प्रशांतने त्यावरून हात फिरवत धूळ साफ केली. तो त्याच्या आजोबांचा टेबल होता. ह्याच टेबलवर बसून त्यांनी कितीतरी पुस्तके लिहिली होती. कोणत्याही वस्तूंवर तारीख आणि नाव लिहिण्याचा त्यांचा छंद. त्यांच्या जवळजवळ प्रत्येक वस्तूंवर तारीख हमखास असायचीच. ती पुस्तके असो व इतर कोणत्याही वस्तू असो. हा टेबल त्याचेच एक उदाहरण.

प्रशांतने त्या टेबलचा ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न केला , पण ते सहज उघडले गेले नाही. त्याने अजून जोर लावत ते उघडले.आत मध्ये त्याला जे हवं होतं ते , त्याच्या आजोबांच्या डायऱ्या एकावर एक ठेवलेल्या होत्या. त्याने हळूच त्या डायऱ्या बाहेर काढल्या. ते ड्रॉवर पुन्हा बंद करून त्याने बाकीचे ड्रॉवर्स चाळायला सुरुवात केली. पण त्यात काही जुने नाणे सोडले तर अजून काही मिळाले नाही. घाईघाईने लाइट्स बंद करत प्रशांत त्या रुमबाहेर पडला. आपल्या रूममध्ये शिरायच्या आधी त्याने एकदा हॉलमध्ये पाहिले. मम्मी पप्पांचे जेवण चालू आहे , हे पाहून तो लगेच आपल्या रूममध्ये शिरला. दार लॉक करून त्याने त्या डायऱ्या आपल्या टेबलवर आपटल्या. पटकन खुर्चीत बसत त्याने सर्वात वरची डायरी हातात घेतली. डायरीवर वरच्या उजव्या कोपऱ्यात ६ लिहिलेला होता. तो डायरी नंबर होता. प्रशांतने लगेच बाकीच्या डायऱ्यावर नंबर पाहायला सुरुवात केली. एकूण आठ डायऱ्यांपैकी पहिल्या नंबरची डायरी सर्वात शेवटी होती.
त्या डायरीच्या कव्हर पेजवर त्याच्या अजोबांचे नाव आणि त्यावेळचा पुण्यातील जुना पत्ता सुरेख अक्षरात लिहिलेला होता. प्रशांतने डायरी उघडली. पहिल्याच पानावर सुरुवातीला त्याला अनेक देवांची नावे लिहिलेली दिसून आली. प्रशांतने पुन्हा पान पलटले. त्या पानावर चार दिवसांची तारीख आणि काही नोंदी होत्या.
पहिली नोंद -

' १ जानेवारी २००४
आज माझा ५४ वा वाढदिवस...चला बरं झालं आयुष्य एक वर्षाने कमी झालं.. '

पहिली नोंद वाचून प्रशांतला धक्का बसल्यासारखे झाले. त्याच्या आजोबांनी शब्दांमध्ये मांडलेले दुःख त्याला जाणवत होते. पण का ? का आजोबा एवढे दुःखी होते ? कसलं दुःख होत त्यांना ? आपलं वय झाल्यामुळे त्यांनी असं लिहिलंय का ? प्रशांतला पुढच्या नोंदी वाचेनाश्या झाल्या.त्याच्या मनात अनेक प्रश्न उठले होते. ज्यांची उत्तरे या डायऱ्यांमधून मिळणार होती. त्याने आता एकेक पान पालटून वाचायला सुरूवात केली , पण त्यात रोजच्या जीवनात घडलेल्या गमतीझमती , काही इतर सामान्य नोंदी सोडल्या तर विशेष असे काहीच नव्हते. ती डायरी अर्ध्यातच बंद करून प्रशांतने ८ नंबर असलेली डायरी हातात घेतली. ती उघडणार तोच तो मधेच थांबला. काहीतरी विचार करत त्याने थेट डायरीचे शेवटचे पान उघडले. शेवटची काही पाने कोरी होती. बरीचशी पाने पलटल्यावर एक पानावर सुंदर अक्षरात त्याला काहीतरी लिहिलेलं दिसलं. तो हळूहळू ते वाचू लागला.

' १२ जून २०११
आज शेवटी ठरवलचं. या नरकातून मुक्त व्हायचं. आज माझ्या मुलाने कळसचं गाठला. आपल्या बायकोच्या म्हणण्यावरून तो इतक्या वर्षांपासून असलेलं नातं सुद्धा विसरला. शेवटी आज वैतागून मी निघालोय ' रहस्यमय ' जागेकडे. जिथे मी फार आधीच जायला पाहिजे होतं.

२००२२१२१

- सुदर्शन जोशी. '

पानावरचा मजकूर वाचून प्रशांत काही वेळ स्तब्ध झाला. नरक ? आजोबांना नरक म्हणजे काय म्हणायचंय ? प्रशांतचं डोकं थोडावेळ सुन्न झालं. आपल्या आईवडिलांच्या त्रासामुळे आपले आजोबा घर सोडून गेले , याच्या जाणिवेने त्याला प्रचंड दुःख झाले. पुन्हा एकदा त्याने पानावरुन नजर फिरवली. शेवटी लिहिलेल्या नंबर पाहून त्याला काही कळेनासे झाले. हा कसला नंबर ? आणि ती रहस्यमय जागा कोणती ? विचार करतचं त्याने मागची पाने पालटली. मात्र त्यावर काही विशेष नव्हते. प्रत्येक तारखेपुढे लहानग्या प्रशांत सोबतचे अनेक गमतीदार किस्से दिसत होते. आपल्या मुला किंवा सुनेसंबंधी एक शब्दही त्यांनी लिहिलेला दिसत नव्हता.
काही सापडत नाही म्हणून प्रशांतने डायरी बंद केली. आपले डोके दोन्ही हातात धरून त्याने डोळे मिटून घेतले.
नेमकं काय झालं असेल ? ती रहस्यमय जागा कुठे असेल ? तिथे काय असेल ? आजोबा तिथेच का गेले असतील ?
विचार करता करता त्याने सर्व डायऱ्या उचलून आपल्या बॅगमध्ये ठेवून दिल्या. खिशातील जुने नाणे त्याने आपल्या ड्रॉवर मध्ये ठेवले आणि घराबाहेर पडला.

प्रशांत गणपतीच्या मंदिराबाहेर असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर बसून विराटच्या प्रतीक्षेत होता. नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्याकडे एकटक असणारी त्याची नजर त्याने आजूबाजूला वळवली. दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला कोणी नव्हतेच. मंदिरात स्पीकरवर लावलेल्या भक्तीगीतांनी त्याच्या मनात एक वेगळाच आनंद मिळत होता. आणि त्यात आजूबाजूला कोणी नसल्यामुळे असणारी शांतता , त्याला अजूनच समाधान देणारी होती. हळूच त्याने आपला हात खिश्याकडे नेत त्यातून जुने नाणे बाहेर काढत समोर धरून ते न्याहाळू लागला.
१ पैशांचे ते नाणे आजच्या काळात फार दुर्मिळच. हे तेच नाणे जे त्याच्या आजोबांनी लहानपणी त्याच्या एका वाढदिवसाला दिलेले होते. जे त्याने आजपर्यंत सांभाळून ठेवले होते.
" बोल रे.." मागून विराटने येऊन त्याच्या डोक्यात टपली मारली. आणि त्याच्याशेजारी बसला. प्रशांतने नाण्यावरची नजर त्याच्याकडे वळवली.
" बोल , काय येड्यासारखा बोलत होता मघाशी ? " विराट बोलला. प्रशांतने ते नाणे खिशात ठेवले. विराटकडे पाहून तो बोलू लागला.
" माझे आजोबा काही वर्षांपूर्वी घर सोडून गेले होते. ते कुठे गेले आहेत माहीत नाही. "
" आणि तू त्यांना शोधायचं म्हणतोय ? हॅ ! " विराट उपहासाने बोलला.
" ते कुठे असतील , तेही मला माहित नाही , पण मी काहीही करून त्यांना शोधेणचं ! " प्रशांत आत्मविश्वास दाखवत बोलला.
" अरे पण कसं शोधाणार तू त्यांना ? " विराट आता वैतागला.
" ते मला माहित आहे , कसं ते. जिकडे जावं लागेल तिकडे जाईल , पण जोपर्यंत आजोबांना शोधणार नाही , तोपर्यंत पुन्हा घरी येणार नाही ! " प्रशांत पुन्हा आत्मविश्वासाने बोलला. विराटला हा अति आत्मविश्वास वाटला.
" आणि मला त्यासाठी तुझी मदत हवी आहे. " प्रशांतने मोठ्या आशेने विराटकडे पाहिले.
" पण मी.." विराट विचारात पडला.
" तुला फक्त माझ्या सोबत चलायचे आहे , हे सगळं मी एकटा नाही करू शकत. "
" नेहमी तर एकटा राहायला आवडतं ! मग आता जा की एकटा ! " विराट त्याला डिवचत म्हणाला. यावर प्रशांत काही बोलला नाही.
" तुला वाटत का हे एक दोन दिवसांचा काम आहे ? अरे कितीतरी महिने लागतील...आणि तरीही आपल्या हाती काही लागलं नाही मग ? "
" कितीही दिवस लागू दे ! आणि मला विश्वास आहे की आजोबा भेटतीलचं ! "
" पण जर तुझे आजोबा या जगात नसतील तर ! " विराट सावधपणे हळूच बोलला. प्रशांतला याचा राग आला.
" तू काहीही बोलू नकोस ! आजोबा आहेत , माझं मन मला सांगतंय. " प्रशांत दुखावलेल्या स्वरात बोलला.त्याला पाहून विराटलाही थोडे दुःख झाले.
" पण माझी मम्मी मला जाऊ देणार नाही. जर तिने परवानगी दिली तरचं मी येईन. " विराट प्रशांतच्या गळ्यात हात टाकत बोलला.
" उद्या मम्मीला विचारतो , मग बघू. "
" कुठं चाललोय ते सांगू नको. " प्रशांत त्याला सूचना दिल्यासारखा बोलला.
" मग काय सांगू ? "
" खोटं ! "
" पण काय ? " विराट हातवारे करत बोलला.
" सांग की फिरायला चाललो. " प्रशांत विचार करत बोलला.
" कुठे ? "
" शिमला ! "
" काय ? शिमला ? " विराट मोठ्याने ओरडलाचं. काहीवेळ तोही विचारात पडला.
" ते काय सांगायचं सांग , पण तू माझ्या सोबत आलाच पाहिजे ! " प्रशांत नदीचे पाणी ओंजळीत घेत बोलला.
" आता यावचं लगेलं असं वाटतंय ! " विराट उठून उभा राहिला. प्रशांत तोंडावर पाणी मारत स्वतःशीच हसला.
विराट राजी झाल्याने त्याला आनंद झाला होता.
" चल , दर्शन घेऊन निघुया. " विराट मंदिराकडे नजर टाकत बोलला. दोघेही मंदिराच्या दिशेने चालते झाले.

" काय बोलतोय तू विराट ? आताच बारावी झालीये आणि तू फिरायला जायचं म्हणतोय ! " विराटच्या मम्मी त्याच्यावर ओरडली.
" मग काय झालं ? थोडे दिवस जाऊदे की फिरायला. " विराट मम्मीला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
" काय बावळटपणा आहे ! " त्याच्या मम्मीने डोक्याला हात लावला.
" त्या प्रशांत सोबत राहून भरकटू नको ! तू अभ्यासाकडे आणि करिअरकडे लक्ष दे ! " मम्मी हॉलमधील पसारा आवरत बोलणे देत होती.
" अगं फक्त दहा पंधरा दिवसांची तर गोष्ट आहे , अस पण सुट्टीमध्ये काय करणार मी ? " विराटचे प्रयत्न चालूच होते.
" तू उगाच शहाणपणा करू नको !.. अरे जवळ असते तरी पाठवलं नसतं , तू तर थेट शिमला ? "
" प्रशांतची इच्छा आहे जायची. त्याला सोबत म्हणून मी चाललो आहे , तू उगाच वाद घालू नको मम्मी , जाऊदे मला ! " विराट आता चिडून बोलला.
" मी तुला जाऊ देणार नाही विराट ! " मम्मी मोठ्याने ओरडली तसा विराट अजूनच चिडला. आवाज ऐकून त्याचे पप्पा बाहेर आले.
" काय झालं ? " पप्पांनी विराटकडे पाहत विचारलं.
" सांगा जरा समजावून याला ! " मम्मी वैतागाने बोलली.
" पप्पा , मी थोडे दिवस प्रशांत सोबत शिमलाला चाललो आहे. पण मम्मी नाही म्हणतेय. " विराट नाराजीने सोफ्यावर बसला. त्याचे पप्पा त्याच्याशेजारी बसले. आता पप्पा काय बोलणार याकडे त्याचे लक्ष होते.
" अरे फिरायला जायचं आहे तर बिनधास्त जा ! " पप्पांनी हसत त्याच्या मांडीवर हात मारला. पप्पांनी परवानगी देताच विराटच्या चेहऱ्यावर मोठे हास्य पसरले.
" येस ! " जणू काही मोठी स्पर्धा जिंकल्यासारखा तो ओरडला.
" अरे हेच तर वय आहे , फिरायचं आणि मजा करायचं ! " पप्पा विराटकडे पाहून बोलले. मम्मी तोंड वाकडं करत किचनमध्ये निघून गेली.
" जा ! जितकी मजा करायची तेवढी तरुण वयातचं करून घ्या ! " पप्पा असं बोलताच विराटला अजूनच उत्साह चढला. तो आनंदाने उठत आपल्या रूममध्ये गेला. त्याने पटकन प्रशांतला फोन लावून त्याबद्दल सांगून टाकले.
प्रशांतने अजून त्याच्या मम्मी पप्पाला याबद्दल काही सांगितले नव्हते. काहीतरी खोटं सांगून जायचं म्हणलं तर त्याच्या मनाला पटत नव्हतं ; पण दुसरा पर्याय नव्हता. आजोबांचे नाव काढताच त्याचे मम्मी पप्पा वाकडे तोंड करत असत. त्यात आजोबांना शोधायला चाललो असं सांगितलं तर काय होईल याचा प्रशांतला अंदाज आला होता. खूप विचार करून त्याने शेवटी खरं सांगण्याचं ठरवलं. काहीही झालं तरी आजोबांना शोधायला जायचंच असा त्याचा निर्धार होता.

सकाळच्या मनाला प्रसन्न करणाऱ्या वातावरणात प्रशांत एका गार्डनमध्ये फेऱ्या मारत होता. आजूबाजूला असलेल्या सुंदर मनमोहक फुलांवरून त्याची नजर हटण्यास तयार नव्हती. त्या फुलांचे फोटो काढण्याचा मोह त्याला आवरला नाही. खिशातून मोबाईल काढून त्याने जवळपास दहा फोटो क्लिक केले.
मोबाईल खिशात ठेवत तो समोर असणाऱ्या रिकाम्या बाकड्यावर जाऊन बसला. आपल्या डाव्या खिशातून त्याने एक पॉकेट डायरी बाहेर काढली. त्याची दोन तीन पाने पालटून एका पानावरुन नजर फिरवली. पुन्हा पुढची दोन पाने पालटून जे लिहिलेले होते ते वाचले. लगेच डायरी बंद करत त्याने आजूबाजूला नजर फिरवली. डाव्या बाजूला गार्डनला लावलेल्या तारेच्या जाळीतून त्याला काहीतरी दिसले. लगेच उठून तो गार्डन बाहेर आला.डायरी हातातचं होती. पटापट पावले टाकत तो गार्डनच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला वळला.
तिथे एक चहाचे दुकान गर्दीने भरले होते. काही जण बाकड्यावर चहाचा आस्वाद घेत होते , तर काही उभे राहून. त्याच्याशेजारीच एक रद्दीचे दुकान होते. प्रशांतची नजर त्या दुकानावरचं होती. घाईघाईने त्या रद्दीच्या दुकानजवळ येऊन थांबला. आतमध्ये जुन्या वर्तमानपत्र , पुस्तक , मासिक यांचा खच दिसत होता. एक वयोवृद्ध व्यक्ती वरच्या कोपऱ्यात लावलेल्या देवाच्या फोटोला अगरबत्ती ओवाळत काहीतरी मंत्र पुटपुटत होते. त्यांचा धार्मिक नित्यक्रम पूर्ण होईपर्यंत प्रशांत फक्त त्यांच्या कडे बघत उभा होता.
त्या वृद्ध व्यक्तीची वाढलेली पांढरी दाढी आणि मिशी पाहून प्रशांतला त्याच्या आजोबांची आठवण झाली. म्हातारपणाची जाणीव करून देणाऱ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या.
अगरबत्ती देवासमोर लावत त्यांनी प्रशांतकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तो मात्र त्यांचा चेहऱ्याकडे बघतच होता.
" बाळा , काय पाहिजे ? " त्यांनी दुकानातल्या छोट्या बाकड्यावर बसत विचारले.
प्रशांत थोडा पुढं येऊन उभा राहिला. त्याने हातातली डायरी उघडली. त्यात काहीतरी शोधू लागला. ती वृद्ध व्यक्ती त्याच्याकडे गोंधळलेल्या चेहऱ्याने बघतच होती.
" तुम्ही पंडित काका ? " प्रशांतने डायरीत वाचत विचारलं.
" हा ! "
" काका , मला तुमच्याकडून मदत हवी आहे " प्रशांत विनंतीच्या सुरात बोलला.
" कसली मदत ? "
" आपण सुदर्शन जोशी यांना ओळखत होतात ना ? "
पंडित काका काहीतरी आठवू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकी अस्वस्थता पसरली.
" पण तू कोण ? आणि त्यांच्याबद्दल का विचारतोय ? " पंडित काकांनी अस्वस्थपणे विचारले.
" मी त्यांचा नातू , प्रशांत ! " प्रशांतने आपली ओळख करून देताच पंडित काका अजून अस्वस्थ झाले.
" त्यांचा नातू ? "
" हो "
पंडित काका हळूच उठले. उजव्या बाजूला ठेवलेली पाण्याची बाटली उघडून त्यांनी दोन घोट पिले. बाटली ठेऊन ते पुन्हा अस्वस्थपणे बाकड्यावर बसले. हळूच त्यांनी प्रशांतकडे पाहिले. प्रशांत मोठ्या आशेने त्यांच्याकडेच बघत होता. इशारा करत त्यांनी त्याला आपल्या जवळ बोलावले.
" बस.."
प्रशांत त्यांच्याजवळ बसला. काकांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला.
" तू खरंच जोशींचा नातू आहेस ? "
" हो "
" तुला माझ्याकडून काय मदत पाहिजे ? "
" तुम्हाला तर माहीतच असेल , माझे आजोबा काही वर्षांपूर्वी कुठेतरी निघून गेले ते.." प्रशांत काहीसा दुखणे बोलला.
" हा..फार विचित्र आहे तुझे आजोबा ! " काका प्रशांतच्या पाठीवरचा हात मागे घेत बोलले. यावर प्रशांत गोंधळला. काका नेमकं काय सांगतात याची उत्सुकताही त्याला होती.
" असं अचानकपणे न सांगता निघून जातं का कोणी ? " काकांचा आवाज आता जड झाला होता.
" तुम्ही दोघे फार जुने मित्र होता ? "
" खूप जुने आणि जवळचे मित्र होतो आम्ही ! अगदी भावसारखे ! " आजोबांच्या आठवणीने काकांचे मन भरून आले होते. त्यांना बघून प्रशांतला वाईट वाटले.
" पण तुला काय मदत हवीये ? "
" मला आजोबांना शोधायचं आहे , त्यासाठी तुम्ही मला मदत केली तर त्यांना शोधणं अजून सोपं होईल " प्रशांत बोलला.
" शोधायचं ? म्हणजे ? "
" आजोबा कुठं गेले मला माहित नाही , घरी कोणाला विचारलं तर सांगत नाहीत..मला त्यांची खुप आठवण येते. " प्रशांत जड आवाजात बोलला.
" त्यामुळे मी आता काहीही करून त्यांना शोधणार आहे ! " प्रशांत बोलला.
" हे काय बोलतोय बाळा ! तुझ्या आजोबांना शोधणं काय सोपं आहे ? "
" काका , तुम्हाला माहीत आहे का ते कुठे गेले ? "
" माहीत असतं तर कधीच त्याच्याकडे गेलो असतो ! साला अचानक गायब झाला ! " काका काहीश्या रागाने आणि निराशेने बोलले. काहीवेळ दोघेही शांत होते.
" माझे मम्मी पप्पा त्यांना त्रास द्यायचे का ? " प्रशांतने विचारले. यावर काका चमकले.
" न..नाही बाळा.." काका गोंधळलेल्या आवाजात बोलले.
" काका , तुम्हाला जे माहीत आहे ते सांगा. माझ्यापासून लपवू नका प्लिज ! " प्रशांत विनंती करत बोलला.
" तुला हे सगळं सांगणं बरोबर नाही.." काका टाळण्याचा प्रयत्न करत होते. पण प्रशांत त्यांना बोलतं केल्याशिवाय शांत बसणार नव्हता.
" तुम्हाला नाही वाटत का माझे आजोबा परत यावे ? तुम्हाला त्यांना भेटायची इच्छा आहे ना ?...तुम्ही जर आता मला सांगितले नाही , तर मी आजोबांना कसा शोधणार काका ? " प्रशांत त्यांना बोलतं करण्यासाठी भावनेचा आधार घेत म्हणाला. काका पुन्हा अस्वस्थ झाले.
" तुझे आजोबा परत भेटले , तर मी आनंदाने मरणाला सामोरे जाईल. जीवनात तीच एक शेवटची इच्छा राहिली आहे ! " काका डोळे पुसत बोलले. काका आणि आजोबांची मैत्री किती घट्ट असेल , याचा अंदाज त्यांच्या बोलण्यातून येत होता. काका शांत होईपर्यंत प्रशांत काही बोलला नाही.
" तुझ्या आईवडिलांनी त्यांना खुप त्रास दिलाय ! शेवटी म्हातारं माणूस कसं सहन होईल ? रोज आपलं दुःख कमी करण्यासाठी यायचा माझ्याकडे..बोलता बोलता सगळं दुःख विसरून जायचा..आम्हा दोघा आधार नसलेल्या जीवांना आमच्या मैत्रीचाचं एक आधार होता !...रोज इथं बसून रद्दीतली पुस्तकं वाचता वाचता वेळेचं भान राहायचं नाही त्याला !..एक दिवस जेवढी मिळतील तेवढी पुस्तकं घेऊन गेला. तो कायमचाचं !...जाताना एक पत्र इथं सोडून गेला. तीच एक आठवण ! " काका डोळे भरून येताच बोलायचे थांबले. प्रशांतला आपल्या आईवडिलांचा राग येत होता. ते असं वागू शकतात यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.सोबतच आजोबा आणि पंडित काकांचे वाईटही वाटत होते.
" ते पत्र ? " त्या पत्रात काहीतरी सापडेल अशी प्रशांतला धूसर आशा होती.
" जपून ठेवलंय अजून ! " काका उठून दुकानाच्या एका कोपऱ्यात असलेल्या लाकडी टेबलजवळ गेले. त्याचे ड्रॉवर उघडून त्यातून त्यांनी त्या पत्राच्या कागदासोबत अजून एक कागद आणि पेन घेतले. बाकड्यावर बसत त्यांनी ते पत्र प्रशांत समोर धरले. प्रशांतने उत्सुकतेने ते पत्र हातात घेतले.
" हे काय ? " प्रशांतने काकांच्या हातातल्या कागदाकडे बघत विचारले.
" तुझ्या आजोबांनी पत्रात काहीतरी कोडं लिहून ठेवलंय , ते या सोडवण्याचा प्रयत्न करता करता इतकी वर्षे गेली , पण याचा अर्थ काही उलगडला नाही ! " काकांनी तो कागद प्रशांतकडे सोपवला. पूर्ण कागदावर काही आकडे लिहून खाडाखोड दिसत होती.
" ओ काका , या चहा घ्यायलाss " बाहेरून एका माणसाने काकांना आवाज दिला.
" तू पत्र वाच बाळा , मी आलोच. " काका उठून बाहेर गेले.
प्रशांतने तो कागद बाजूला ठेवत पत्र उघडून वाचायला सुरुवात केली.

' प्रिय मित्रास सप्रेम नमस्कार ,
माझ्या मित्रा राघव , मला आशा आहे , की हे पत्र तुला सापडलेचं असेल. तुला प्रश्न पडलाच असेल , की मी आज असं अचानक पत्र कसकाय..पण विषय तसा आहे , की पत्र लिहीणेच योग्य वाटले.
तुला धक्का बसेल , पण मी हे सगळं सोडून चाललोय. घर , पैसा , तुझ्या सारखा मौल्यवान मित्र आणि लेखन क्षेत्रात कमावलेले नाव सुद्धा !
कारण सांगायची तुला काही गरज वाटत नाही. गेल्या काही दिवसांपासून सुनेकडून छळ होतोय , तो आता मला सहन होईनासा झालाय ! कारण तिला वीट आहे माझ्या या पुस्तकांचा आणि लिखाणाचा ! रोजरोज सुनेचे आणि मुलाचे विनाकारण बोलणे ऐकून माझे कान थकले आहेत आता !
मी कुठं चाललोय हे मी सांगू इच्छित नाही , पण तू इतका जवळचा मित्र आहे म्हणून तुला या पत्रात सांगतोय. तू इतर कोणाला सांगणार नाहीस अशी अपेक्षा आहे.
मी चाललोय रहस्यमय जागेवर. जिथे मी उरलेले आयुष्य सुखाने जगेल , यात शंका नाही.

२००२२१२१

- सुदर्शन जोशी
१३-०८-२०११ '

पत्र वाचून प्रशांतच्या डोळ्यात नकळत अश्रू जमा झाले.
डोळे पुसत त्याने पत्रात दिलेला नंबर पुन्हा वाचला. तसा तो चमकला. त्याला काहीतरी आठवले. त्याने पटकन आपली पॉकेट डायरी बाहेर काढत ती उघडून त्यात काहीतरी पाहिले.
पत्रात लिहिलेला आणि आजोबांच्या डायरीतील शेवटच्या पानावर असणारा नंबर एकच होता. म्हणजे या नंबर मध्ये नक्कीच काहीतरी रहस्य होतं. पण हा नंबर नेमके काय असू शकते ? ठिकाणाचे नाव ?
प्रशांतने तो आकडेमोड असलेला कागद पुन्हा हातात घेतला. काकांनी त्यावर बराच आकड्यांचा खेळ केलेला दिसत होता. प्रशांतला ते काही समजले नाही. त्याने तो कागद पुन्हा बाजूला ठेवला. तो पुन्हा पुन्हा तो नंबर वाचू लागला. नेमकं तो नंबर काय सांगतो , हे त्याला कळत नव्हते. तो डोकं हातात धरून विचारात गढला.
" बाळा ! " काकांच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला.
" काय झालं ? " त्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून काकांनी विचारलं.
" या नंबरचा विचार करतोय ! " प्रशांतने तो आकडेमोड केलेला कागद हातात घेतला.
" हे काय आहे काका ? " प्रशांतने गोंधळलेल्या स्वरात विचारलं. त्याच्या गोंधलेल्या चेहऱ्याकडे बघून पंडित काका स्वतःशीच हसले. प्रशांत शेजारी बसत त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या हाताच्या स्पर्शात मायेची ऊब होती. प्रशांतला त्यांच्या स्पर्शाने एक वेगळीच जाणीव झाली.
" मी एकेकाळी गणिताचा प्राध्यापक होतो ! त्यामुळेच ही अशी आकड्यांचा खेळ करायची सवय आहे मला.." पंडित काका हसत बोलले. त्यांना हसताना बघून प्रशांतच्या चेहऱ्यावर सुद्धा एक मोठं हास्य पसरलं.
" सुदर्शन ला ही माहीत होतं हे , म्हणून मला वाटलं की हे आकडे म्हणजे त्याने सोडलेलं माझ्यासाठी एक कोडं असेल...आता वाटत की हे फक्त त्याने मला येड्यात काढण्यासाठी लिहिलं असेल.." काका गमतीने म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य अजूनचं वाढलं.
" हे नक्कीच गमतीसाठी लिहिलेलं नसेल ! " प्रशांत गंभीर होत बोलला. काकांना काही कळलं नाही.
" म्हणजे ? "
" आजोबांनी हाच नंबर त्यांच्या पर्सनल डायरी मधेही लिहिलेला आहे. शेवटच्या पानावर ! " प्रशांत बोलताच काका चमकले. त्या नंबर मध्ये काहीतरी गूढ आहे , याची त्यांना पुन्हा खात्री वाटू लागली.
" पण काय रहस्य असेल ? "
" काय असेल ते मी शोधूनच राहील ! त्या नंबर वरूनच मी आजोबांपर्यंत पोहोचू शकतो ! " प्रशांत आत्मविश्वास दाखवत बोलला.
" काका , तुमच्याकडे अजून काही आहे , जे मला आजोबांपर्यंत पोहोचवू शकते ? आजोबांच्या बोलण्यातून कधी त्या रहस्यमय जागेचा उल्लेख आला होता ? "
प्रशांत अधीरतेने बोलला.
" नाही असं काही बोलला नाही सुदर्शन.." काका आठवत बोलले.
" अरे हा..ते पुस्तक ! " काकांना अचानक काहीतरी आठवले. ते पटकन उठून पुस्तकांच्या रद्दीकडे गेले. एकावर एक रचून ठेवलेली पुस्तकांमधील वरची पुस्तके बाजूला करत त्यांनी थेट खालच्या पुस्तकांमधून एक एक पुस्तक उचलून त्यावरचे नाव वाचायला सुरू केले. प्रशांत उठून त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. उत्सुकतेने आणि काहीश्या गांभीर्याने तो काकांकडे बघत होता.
फाटक्या पुस्तकांच्या ढिगात एक नवंकोरं पुस्तक काकांच्या हाती लागलं. जे पाहिजे ते सापडल्यावर काकांच्या चेहऱ्यावर हलकं हास्य उमटलं. त्यांनी उठून मागे उभ्या प्रशांतकडे पाहिलं.
" यात नक्की काहीतरी सापडेल ! " हातातले पुस्तक त्यांनी प्रशांतसमोर धरले. प्रशांतने उत्सुकतेने ते हातात घेतले.
' आठवणीतला स्वर्गीय प्रवास...लेखक - सुदर्शन जोशी '
मुखपपृष्ठावर रेखाटलेल्या आकर्षक निसर्गचित्राच्या वर असलेले नाव वाचून प्रशांतच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य पसरले.
" तुझ्या आजोबांनी हे फार पूर्वी लिहिलं होतं. कदाचित तुझ्याजन्मानंतर ते प्रवासाला गेले होते तेव्हा.." काका जे आठवत होते ते सगळं प्रशांतला सांगत होते.
" मला त्यानी त्याची सगळी पुस्तकं वाचायला दिलेली..पण मी फक्त एक आठवण म्हणून जपून ठेवली आहेत..काही वाचली तीही आणि जी वाचली नाहीत तीही ! " काका बोलत होते. मात्र प्रशांतचं त्यांच्या बोलण्यापेक्षा पुस्तकाकडे जास्त लक्ष होतं. कधी ते पुस्तक उघडून वाचतो असं त्याला झालं होतं. याआधी त्याने आजोबांचं एकही पुस्तक पाहिलं किंवा वाचलेलं नव्हतं. आजोबांच्या प्रेमापोटी त्याला ते पुस्तक वाचण्याची खुप इच्छा होत होती. दुसरं म्हणजे या पुस्तकातचं आजोबा कुठं आहेत याचा पुरावा मिळण्याची शक्यता होती. त्या ' रहस्यमय ' जागेबद्दल काहीतरी असेलचं याची त्याला खात्री वाटत होती.
" ही अजून काही पुस्तके.." काकांनी त्याच्या आजोबांची सगळी पुस्तके काढत त्याच्यासमोर धरली. त्याने ती हातात दोन्ही हाताने पकडत हळूच बाकड्यावर ठेवली.
" ही आता मी काही ही वाचू शकणार नाही..त्यापेक्षा तुच घेऊन जा बाळा.." काका बोलले.
" तुम्हाला वाटतं यात त्या रहस्यमय जागे बद्दल काही असेल ? " प्रशांतने प्रश्न केला.
" रहस्यकथा लिहिण्यात तुझ्या आजोबांना फार रस होता..या प्रवास वर्णनात देखील अनेक रहस्य असतील बघ.." काका गमतीने मात्र काहीसे दुःखी होत बोलले.
" आता तुझ्या आजोबांना शोधण्याची जबाबदारी तुझी आहे बाळा.." काकांनी आशेने त्याच्याकडे पाहत त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.
" पण सध्या माझ्याकडे ही पुस्तकं आणि तो नंबर सोडून काहीच नाही काका.." प्रशांत काहीसा निराश होत बोलला.
" काका मी तूमच्याकडे या आशेने आलो होतो की , तुम्हाला आजोबा बद्दल सगळं काही माहित असेल..अजोबा आणि तुम्ही जवळचे मित्र होतात , तरी अजोबांनी तुम्हाला काही संगितले नाही.." प्रशांत निराश मनाने बोलला. यावर काका काही बोलले नाहीत.
" मी जेवढं सांगू शकतो , तेवढं सांगितलं बाळा ! आता यावरूनच तुला माझ्या मित्राला शोधायचं आहे ! तू त्यात नक्की यशस्वी होशील ! " काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत धीर देण्याचा प्रयत्न केला.
" हो , मी त्यांना शोधेणचं ! मी नक्कीच तुमच्या मित्राला तुमच्यजवळ घेऊन येईल. " प्रशांत आत्मविश्वासाने बोलला. त्याच्या दृढ आत्मविश्वासाचे काकांना कौतुक वाटले. त्याच्यावर विश्वास वाटू लागला. आपल्या मित्राची नक्की पुन्हा भेट होईल याची त्यांना खात्री आणि विश्वास होता.
प्रशांत आपल्या आजोबांची सर्व पुस्तके नीट जमा केली. काकांनी दिलेल्या पिशवीत त्याने सर्व पुस्तके भरली. सोबत ते पत्रही घेतले. सर्व घेऊन तो जाण्यास निघाला.
" काका , येतो मी. पुढच्या वेळेस आजोबांना घेऊनचं येईल ! " प्रशांत त्यांच्याकडे पाहून हसत बोलला.
" माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत ! " काकांचा आशीर्वाद घेऊन तो निघाला.
" थांब बाळा ! " काकांनी त्याला थांबवले. प्रशांतने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले.
" पण तुला माझ्याबद्दल कसं माहीत ? " काकांनी प्रश्न केला. प्रशांतला लक्षात आले , तो याबद्दल सांगायचं विसरलाच होता.
" हा..मला तुमच्याबद्दल अजोबांच्या डायरीतून कळाले. तुमच्या दुकानाचा पत्ता त्यात होता. " प्रशांतने स्पष्ट केले.
" तुमच्या मैत्रीबद्दलही खुप काही लिहिलं आहे आजोबांनी.."
पंडित काका आपल्या मित्राच्या आठवणीने पुन्हा दुःखी झाले.
" आपण जी मदत केली त्यासाठी धन्यवाद काका !...येतो. प्रशांतने त्यांचे आभार मानत जाण्यास निघाला. काकांनी कसंतरी हसत त्याच्याकडे पाहिले. प्रशांतमुळे त्यांना आपल्या मित्राला पुन्हा भेटण्याची आशा निर्माण झाली होती. प्रशांतला काकांमध्ये जणू आपल्या आजोबांचे प्रेम , आपुलकी जाणवली होती. जितका तो इतक्या दिवसात कोणाशी सहजपणे बोलला नसेल , तेवढं तो पंडित काकांशी बोलला होता. त्यांचा निरोप घेण्याची त्याची इच्छा होत नव्हती. तरी जड मनाने तो तिथून निघाला. जाताना त्याने एकदा वळून त्यांच्याकडे पाहिले. एक समाधानी स्मित चेहऱ्यावर घेऊन तो निघाला.

" अरे बोल काहीतरी ! " प्रशांतची मम्मी त्याच्यावर ओरडत होती. प्रशांत अबोलपणे खाली पडलेली पुस्तके उचलत होता.
" कोणी दिली ही पुस्तके तुला ? "
प्रशांत काहीही न बोलता खाली पडलेली पुस्तके पिशवीत भरून ती घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेला. जे त्याला नको होतं तेच घडलं होतं. चुकून त्याच्या हातातून पिशवी खाली पडली आणि त्याच्यातुन बाहेर पडलेली पुस्तके मम्मीने पाहिली. त्यावर अजोबांचे नाव बघून मम्मीचा संताप झाला असावा. म्हणूनच ती प्रश्न विचारत प्रशांतच्या मागे पडली होती.
दार आतून लॉक करून त्याने सर्व पुस्तके बाहेर काढून टेबलवर मांडली. इतकी सारी पुस्तके आजोबांनी स्वतः लिहिली आहेत , यावर प्रशांतचा विश्वास बसत नव्हता. त्याने सर्व पुस्तके व्यवस्थितपणे टेबलवर मांडली. एकएक पुस्तकाचं निरीक्षण करत प्रशांत खुर्चीत बसला. एकूण ३० पुस्तके होती ती. सर्व पुस्तके मुखपृष्ठवरील चित्रांमुळे आकर्षक वाटत होती. यातली बरीचशी पुस्तके मर्डर माईस्ट्री या विषयावर कादंबऱ्या होत्या. तर काही इतर वेगळ्या विषयांवरील रहस्यमय कथा दिसत होत्या. या सगळ्यातून वेगळी भासणारी तीन पुस्तके त्याने बाजूला काढली. एक पुस्तक म्हणजे काकांनी सगक्यात पहिले दाखवलेलं प्रवास वर्णनाचे. दुसरे पुस्तक होते ते आकडेमोडी वर असणारी एक गूढकथा. ही कादंबरी जणू पंडित काकांसाठी लिहिली असावी , असे प्रशांतला वाटून गेले. तिसरे पुस्तक हे अजूनच वेगळे होते. ' खजिना स्वप्नातला..' अशा शिर्षकाचे ते पुस्तक एक कादंबरीच होती. त्याचे मुखपृष्ठ म्हणजे एक गुहेचा खरोखरचा फोटो असावा असे होते. इतर पुस्तकांपेक्षा हे पुस्तक फारचं वेगळे भासत होते.
प्रशांतने ती तीन पुस्तके बाजूला काढत बाकीची पुस्तके आपल्या बॅगमध्ये ठेवली.
पॉकेट डायरी आणि एक पेन घेऊन तो पुन्हा खुर्चीत बसला. प्रवास वर्णनाचे पुस्तक हातात घेत त्याने वाचायला सुरुवात केली.
अनुक्रमणिका चाळत असतानाच एके ठिकाणी तो चमकला. त्या पुस्तकात जे तो शोधत होता , ते त्याला सापडलं. घाईघाईत त्याने ते पान नंबर उघडले.
' रहस्यमय जागा - एक अद्भुत स्वर्ग ! ' या शीर्षकाखाली बाकीचा मजकुर होता.
अधीर होत प्रशांत वाचू लागला.

' तो दिवस मी कधी विसरणार नाही , ज्या दिवशी मी या जागेवर पहिल्यांदा गेलो. ' रोहा ' या गावात असताना मला त्या जागेबद्दल माहीत झाले. आणि मग जराही उशीर न करता त्या स्वर्गासरख्या जागेची अनुभूती घेतली. त्या जागेबद्दल मी कोणालाही सांगू इच्छित नाही. त्यामागचे कारणही सांगणे योग्य नाही. पण मी हे एवढ्यासाठीच लिहीत आहे , कारण मला तुमच्यासोबत माझा आनंद साजरा करायचा आहे. आणि मलाही वाटतं की कोणीतरी या जागेत येऊन माझ्यासारखं तृप्त व्हावं ! माणूस ज्या सुख , पैसा या सगळ्याकडे धावत असतो , ते या जागेत आहे !
तो माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला आणि समाधानकारक दिवस होता. तारीख होती - १२/१२/२००२. '

शेवटची तारीख वाचून प्रशांत थबकला. त्याने पटकन बाजूला पडलेलं काकांनी दिलेलं पत्र उघडलं.
त्या पत्रात दिलेला नंबर म्हणजे या तारखेतील अंक उलटे लिहिलेले होते. म्हणजेच १२/१२/२००२ चे २००२२१२१ !
ही एक तारीख असू शकते याचा विचार प्रशांतने केलाच नव्हता. नाही पंडित काकांनी !
प्रशांतने पत्र बंद करत पुन्हा पुस्तकात पाहिलं. रोहा या गावाचा त्यात उल्लेख होता. जे गाव मुंबई पासून बरेच लांब होते. त्याबद्दल प्रशांतने ऐकलेले होते. त्या गावाच्या आजूबाजूला फक्त जंगलच होते. त्यामुळे तिकडे कोणी जात नाही , अस इतर लोकं म्हणत असतं. आता काहीही करून तिकडे जायचेच असा प्रशांतने निर्धार केला. घाईघाईत त्याने ती पुस्तके बॅग मध्ये टाकली. इतर दोन पुस्तके त्याने न उघडता तशीच ठेवली.
पॉकेट डायरी आणि पेन आणि लॅपटॉप घेऊन तो आपल्या बेडवर बसला.यावर त्याने रोहा या गावाची माहिती शोधायला चालू केली. एक एक करत त्याने सगळी माहिती आपल्या डायरीमध्ये उतरवली.
त्या गावात जाणे सोपे नाही , हे त्याच्या लक्षात आले होते , पण आता तो मागे हटणार नव्हता. आता तो प्रत्येक आव्हान पेलायला तयार होता.

" काय ? तू पागल झाला आहे का ? " प्रशांतची मम्मी मोठ्याने ओरडली. प्रशांत शांतपणे सोफ्यावर बसून होता.
" तुला काही कळतं का प्रशांत ! " प्रशांतचे पप्पा त्याच्यासमोर उभे राहून मोठ्याने ओरडले.
" मी जाणार म्हणजे जाणार !...मला थांबवू नका ! " प्रशांत काहीसा ओरडत बोलला.
" अरे प्रशांत , तुला माहीत तरी आहे का तुझे अजोबा कुठे आहेत ते ? जिवंत आहेत का..." मम्मीने रागाने थरथरत कापत होती.
" जिवंत आहेत ! मी त्यांना शोधून काढीन ! " प्रशांत अजून मोठ्याने ओरडला.
" जा निघ ! कुठं सापडतील तुला तुझे आजोबा ? आं ? " पप्पा प्रचंड संतापले. मम्मीला तर प्रशांतला एखादी ठेऊन द्यावी असं वाटतं होतं. पण तिने स्वतःला सावरलं.
" अरे तुला काय माहिती तुझे अजोबा कसे होते ? ते नसते तर , आपलं कधीच कल्याण झालं असतं ! " मम्मीची आता जीभ घसरत चालली होती.
" त्या म्हताऱ्यामुळेच तुला बाहेर असं जनावरासारखं भटकायची सवय लागली ! डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता ! " मम्मी रागाने बडबडतचं होती. आता मात्र प्रशांतला ते सहन होत नव्हते. त्याने रागाने हाताची मूठ आवळली.
" जाऊदे शर्वरी , सोड , त्याला तरफडायचयं तर तरफडू दे ! " पप्पा मम्मीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले.
" जाऊदे त्याला त्या म्हताऱ्याजवळ ! "
" पप्पा ! तुम्ही काहीही बोलू नका ! मला माहीत आहे , तुम्ही त्यांना त्रास दिला , म्हणून ते घर सोडून गेले ! " प्रशांत सोफ्यावरून उठत रागाने बोलला.
" आम्ही त्रास दिला ? अरे , तुझ्या आजोबांनी आम्हाला हैराण करून सोडलं होतं , त्या लिखानामुळं ! तुला अभ्यासापासून लांब ठेऊन त्यांनी पार वाट लावली असती तुझी ! "
" मम्मी , आता जर तू आजोबांबद्दल अजून एक शब्द बोलली तर बघ ! " प्रशांतचा आता ताबा सुटला.
" काय करशील ? तुला तर.." मम्मी त्याला मारायला त्याच्याकडे धावली. पप्पांनी लगेच मम्मीचा उचललेला हात पकडला.
" शांत बस ! जाऊदे त्याला.." पप्पा उचललेला हात खाली घेत मम्मीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले.
प्रशांत रागाने आपल्या रूममध्ये निघून गेला.
आपण प्रशांतला मारायला हात उचलला , याचे मम्मीला फार वाईट वाटले. प्रशांत आपल्या हट्टासमोर शांत बसणार नव्हता. पण तो जे काय करतोय ते चुकीचं करतोय अशी भावना मम्मीच्या मनात उमटत होती. शेवटी प्रशांतच्या जिद्दीपुढे हात टेकण्याशिवाय मम्मी आणि पप्पा दोघांसमोर काही पर्याय नव्हता.

दुसरा दिवस. प्रशांत निघण्यासाठी तयार झाला होता. पुस्तकांनी भरलेली एक बॅग आणि इतर समान असलेली अजून एक बॅग घेऊन तो आपल्या रुमबाहेर पडला.
हॉलमध्ये मम्मी पप्पा चहा पिताना आपल्याच विचारात मग्न होते.
" चला , येतो मी. " प्रशांतने दोघांकडे नजर फिरवली.
मम्मीने रागाने त्याच्याकडे पाहिले. तिला काहीतरी बोलायचे होते , पण तिने ते टाळले. पप्पानी त्याचाकडे पाहिले सुद्धा नाही.
प्रशांतने पाठीवर एक बॅग लटकवत दुसरी बॅग हातात घेतली आणि बाहेरचा रस्ता धरला.

चालत चालत तो गणपतीच्या मंदिरापाशी पोहोचला. तेथे विराट कारमध्ये बसून पहिल्यापासून त्याची वाट पाहत होता. विराटने प्रशांतला पाहिले. तो काहीसा नाराज दिसत होता , यावरून विराटला अंदाज आला की घरी काय घडले असेल.
दोन्ही बॅग मागच्या सीटवर ठेवत प्रशांत शांतपणे त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसला.
" मी सांगितलं ते सगळं आणलं ना ? " प्रशांतने प्रश्न केला.
" हो मग..सगळं घेऊन आलोय.." विराट उत्साहाने बोलला.
" नकाशा निट पाहिला का ? "
" हो..जरा अवघड जागी आहे ते गाव ! " विराट संकोचित होत बोलला.
" मग ? "
" नाही..जायला अवघड रस्ता आहे म्हणून थोडं.." विराटच्या मनात भीती दिसत होती.
" अवघड आहे म्हणून हार मानायची नाही विराट ! आजोबांना शोधण्यासाठी त्याचाही सामना करू ! " प्रशांत दृढ निश्चयाने बोलला.
" हम्म " विराटने विश्वास दाखवत मान हलवली.
" ठीक आहे चल , करू सुरुवात या शोधमोहिमेची ! " एखादी लढाई जिंकण्यासाठी जायचं आहे अशा अविर्भावात विराट बोलला. प्रशांतने त्याला हळूच हसत प्रोत्साहन दिले. विराटने गाडी चालू केली.
आजोबा मी येतोय ! प्रशांतने मनातल्या मनात आजोबांना साद घातली. जणू त्याचे आजोबा त्याच्याकडे हसून पाहत असावे असा त्याला काहीवेळ भास झाला.
विराट आणि प्रशांत निघाले होते एका अद्भुत आणि आवहनात्मक अशा प्रवासाला. जो त्यांना घेऊन जाणार होता , प्रशांतच्या आजोबांकडे - एका रहस्यमय जागेकडे !

*********************************
क्रमश..