The story of Sujit Kshirsagar books and stories free download online pdf in Marathi

सुजित क्षीरसागरची गोष्ट

आज सुजित इंजिनिअर झाला. तो विद्यापीठात तिसरा आला. सगळीकडे त्याचे कौतुक झाले. आईचा उर अभिमानाने भरून आला. त्याच्या लग्नाचा विषय घरी सुरु झाला होता. आईचा लाडका मुलगा असल्याने आई जातीने त्याच्यासाठी मुली पाहात होती. आईने ब-याच मुली पाहिल्या . त्यातली एक पसंत केली. मुलगी एवढी संस्कारी होती की आई जेंव्हा प्रश्न विचारत होती तेंव्हा ती समोरच्या खुर्चिवर बसलीसुद्धा नाही. अगं बस ! म्हणलं तरी तशीच अदबीने उभी राहिली. सर्व प्रश्नांची उत्तरं तीने नम्रपणे दिली. मोठ्या माणसांसमोर उलटं बोलायचं नाही असे संस्कारच होते तिला घरच्यांचे.मुलगी दिसायला कुरूप होती, चेहरा मुरुमाच्या फोडांनि भरला होता तरी आईला शंभर टक्के पसंत पडली.
एक महिन्याने साखरपुडा झाला. देखण्या सुजितने साखरपुड्यातच मुलीला पहिल्यांदा पाहिलं. त्याला धक्काच बसला. आपल्या आईने आपल्या बरोबर असं का केलं हा प्रश्न त्याला पडला. नंतर दोन दिवसांनी सुजितच्या मनात विचार आला - आज पर्यंत आईचा निर्णय कधीच चुकला नाही. बाबा घरात असूनही नसल्यासारखे असतात. आई आपल्यासाठी जे काही करते ते आपल्या हिताचं असतं.
त्याला मावसभावाने जेव्हा विचारलं की तुला मुलगी पसंत आहे का, तेव्हा त्यांनं बिनदिक्कत सांगून टाकलं की हो ! मुलगी पसंत आहे!
दोन महिन्यांनी लग्न झाले. लग्नात सर्व पाहुणे आनंदी होते. आईचा तर आनंद गगनात मावत नव्हता संपूर्ण लग्नात हिरवा शालू घालून वरमाई म्हणून ती मिरवत होती.
देवदेव मध्ये आठ दिवस गेले. त्यानंतर सत्यनारायण झाला. पहिल्या रात्री सुजित वधूचे मुखदर्शन करायला गेला. त्याने दार व कडी आतून लावून घेतली.
झोपायचा मंचक फुलांनी खूप छान सजवला होता. पण त्याची वधू झोपी गेली होती. त्याने तिला दोन तीनदा हाका मारल्या. एकदा स्पर्श करून हलवले. कुठल्याही स्त्रीला एकांतात स्पर्श करायची ही त्याची पहिलीच वेळ होति. पण ती उठली नाही. दिवसभरच्या दगदगीने ती थकली असेल, असा विचार सुजितने केला. तो देखील कपडे बदलून झोपी गेला.
लग्नाला पंधरा दिवस झाले पण अजून त्यांचं मिलन झालं नव्हतं. एक तर ती थकून झोपलेली असे. किंवा जागी असली तर तिची इच्छा नसे. तो तिचा हात धरत असे तर ती झिडकारून टाकत असे. त्याने तिला झोपून अलिंगन दिले तर ती लाथा मारत असे.
सुजित क्षीरसागर वैतागून गेला. ही गोष्ट आईच्या कानावर घालावी असं त्याला वाटलं. पण आई तिच्या सुनेवर एवढी खुश होती की आईचा हिरेमोड करणं त्याच्या जीवावर आलं. म्हणून तो गप्प बसला.
एकदा ती माहेरी गेली. सुजीतला तिची खूप आठवण येऊ लागली. चार दिवसांनी ती परत आली, तेव्हा तिला घ्यायला तो स्टँडवर गेला. एक तास अगोदरच जाऊन तो तिची वाट बघत होता. मी तुला घ्यायला स्टॅंडवर आलो आहे ! स्टॅंडवर आल्यावर मला कॉल कर ! असे त्याने तिला कॉल करून सांगितले. ती येईपर्यंत सुजित तिथल्याच एका मित्राच्या घरी जाऊन तिच्या कॉलची वाट बघत थांबला. पण ती परस्पर रिक्षा करून घरी निघून गेली. त्याने फोन केला तर तिने सांगितले - मी घरी गेले आहे ! तुमचं तुम्ही या !
घरी आई समोर मात्र ती अत्यंत नम्र वागत असे. आई समोर असताना त्याच्याशी पण चांगली वागत असे. पण एकांतात तिच्या कपाळावर आठ्या येत असत. सारखं चाकचुक चालू असे. तसेच तिच्या माहेरचे म्हणजे वेगळा अध्याय होता. तिचा भाऊ त्याला बोलता बोलता उलट बोलत असे. व तिचे आई-वडील देखील वारंवार त्याचा अपमान करत असत. घरी गेला तर त्याला शिळी चपाती खाऊ घालत असत. घरातली हलकी कामे त्याला करायला सांगतात. पण जर आई सुजित बरोबर असेल तर मात्र त्याला खूप मानाने वागवत.
लग्नाला तीन महिने झाले. आईला घरात मूल हवं होतं. आईला आपल्या मुलाचं मुल मांडीवर खेळवायचे होतं. आई सारखं विचारू लागली. तेव्हा मात्र तिचं वागणं बदललं. ती सुजीतला जवळ येऊ देऊ लागली. पण ती त्या उत्कटक्षणी देखील पूर्ण विवस्त्र कधीच झालि नाही. कार्यभाग उरकण्यापुरतच ती त्याच्या जवळ आली.
सुजीतला वाटे आई खुश आहे ना , मग जाऊ दे ! उगाच कशाला आईच्या सुखाला गालबोट लावायचं.
तीन-चार महिने गेले.सुजित च्या बायकोला गर्भ राहिला.आईला आकाश ठेंगणं झालं. ती सुजित वर आणि सुनेवर खुश होती. सुनेला कुठे ठेवू आणि कुठे नको असं आईला झालं. आपण बाप होणार म्हणून सुजित पण आनंदुन गेला.
तिकडे ज्या केमिकल कंपनीत सुजित कामाला होता, तिथे पण त्याचे प्रमोशन झाले. एवढ्या लवकर प्रमोशन मिळण्याचे कारण सुजित ची चांगली वागणूक हे होते. एक तर तो नेहमी आपलं काम भलं आणि आपण भलं अशा विचारांचा होता. सकाळी दहा म्हणजे दहा वाजता सुजित कंपनीत हजर असे. कंपनीचे मालक जे स्वतः इंजिनीयर होते, ते वारंवार कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम व आदेश लागू करत असत. सुजित ते नियम काटेकोर पाळत असे. उगाच बंडखोरी करणे त्याच्या स्वभावातच नव्हते. त्यामुळे तो मालकांच्या नजरेत चांगला ठरला होता. अल्पावधीतच त्याच्यावर जास्त जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या व त्याला जास्तीचे अधिकारही देण्यात आले.
सुजीतला पहिला मुलगा झाला व त्यानंतर तीन वर्षांनी मुलगी झाली. बाप झाल्यापासून सुजित खूप खुश राहत असे. मुलांच्या गरजा पुरवणे त्यांना काही कमी पडू न देणे यातच तो गुंग झाला. संध्याकाळी जेव्हा तो कामावरून येत असे, तेव्हा त्याची चिमुकली पोरं त्याला येऊन बिलगत. तेंव्हा त्याला भरून पावल्यासारखे वाटत असे. पण बायको कडून त्याला मानसिक समाधान सुख असं कधी मिळालंच नाही.
एकदा त्याने शेवटी वैतागून आईच्या कानावर हे सगळं घातलं. पण आई त्यालाच समजवायला लागली. तिला हे सगळं पहिल्यापासून माहित होतं हा धक्कादायक शोध त्याला लागला. त्याला खूप वाइट वाटलं. आईचा राग आला. पण तीन चार दिवसांत तो ते विसरून गेला. त्याचं आईवर खूप प्रेम होतं.
सुजित क्षीरसागर चाळीस वर्षांचा झाला. मुलं बऱ्यापैकी मोठी झाली. कंपनीत आता तो बर्‍याच वरच्या हुद्यावर पोचला होता. अगदी मालकांच्या परस्पर निर्णय घेण्याचे अधिकारही त्याला होते.
सुजित च्या हाताखाली अनेक पुरुष-स्त्रिया, मुले-मुली कामाला होते. स्त्रियांशी-मुलींशी बोलताना सुजित ची नजर कधीच वेडीवाकडी गेली नाही. मग इतर प्रकार तर लांबच राहिले. जसे हाताखालच्या स्त्रियांना सूचक दोन अर्थी बोलणे, अनावश्यक स्पर्श करणे असले घाणेरडे प्रकार तर त्याच्या मनात देखील येत नसत. त्यामुळे हाताखालच्या स्त्रिया त्याचा खूप आदर करत असत.
तेवीस वर्षांची शिवानि कनिष्ठ क्लार्क म्हणून कंपनीत रूजु झाली. शिवानी हि जरी सावळ्या उजळ रंगाची होती, तरी तिची फिगर छान होती. पुरुषांना रिझवण्याच्या अनेक कलांमध्ये ती पारंगत होती. जो कोणी पुरुष तिच्या संपर्कात येई, त्याच्यावर ती नजरेचे बाण टाकायची मादक हास्य करायची केसांची मोहक हालचाल करायची स्त्रैण आवाजात बोलायची असं करून ती त्याला घायाळ करूनच पाठवायची. थोड्याच दिवसात अनेक भ्रमर तिच्याभोवती घुटमळु लागले. कंपनी जॉईन करण्यापूर्वी पण तिचे अनेक दीवाने होते. सगळेजण तिच्यासाठी वेडे झाले होते. मग कोणी तिचा मोबाईल रिचार्ज करत असे, कोणी तिला ड्रेस शॉपिंग करून देत असे, कोणी तिला सॅंडल भेट देत असे. सकाळी तिला बाईक वर कंपनीत आणून सोडायची ड्युटी एकाने घेतली होती तर दुसरा एक जण तिला संध्याकाळी घरी घेऊन जायला येत असे. अशी किंवदन्ति होती की तिच्या अंगावरची एक ही गोष्ट तिने स्वतः विकत घेतलेली नाही. सगळं तिला भेट म्हणून मिळालेलं आहे. हे सर्व मजनू तिच्याशी दोन मिनिटे बोलून देखील खुश होत होते. एकालाही तिला हात लावायला मिळालं नव्हतं.
पण कंपनीत सर्वांच्या पहिला तिला सुजितने पाहिले होते. तेव्हा ती त्याच्या ऑफिस मध्ये इंटरव्यूसाठी आली होती. त्याच्यासमोर बसतानाच तिने मानेला झटका देऊन केस वर उडवले. सुजित तिच्याकडे पहातच राहिला.मग सुजित ने तिला काही प्रश्न विचारले. दहा मिनिटाचा इंटरव्यू अर्धा तास चालला. ती अपाँइटमेंट लेटर घेऊनच बाहेर पडली.
सुजित क्षिरसागर तिच्यासाठी वेडा झाला. त्याच्या तरुणपणी कॉलेजमध्ये कितीतरी मुली होत्या. पण कोणाचं त्याला विशेष आकर्षण वाटलं नव्हतं. त्यानंतरही कंपनीमध्ये अनेक स्त्रिया त्याच्या संपर्कात आल्या होत्या. पण त्यांच्याबद्दल त्याला कधीच आकर्षन वाटलं नाही. पण शिवानीला भेटल्यावर तो बेभान झाला.
तसे शिवानी साठी अनेक जण पागल झाले होते पण सुजित सर एवढं कोणीच वेडं झालं नव्हतं हे शिवानीला देखील जाणवलं. सुजित सर दिसायला देखणे हंँडसम होते. कंपनीत सर्वोच्च पदावर होते. म्हणजे मालकानंतर सुजितसरच असं सगळेजण बोलत. आणि विशेष म्हणजे ते खुप सज्जन होते. त्यांच्याबद्दल सर्व स्त्रिया खूप चांगलं बोलत. त्यामुळे तिला सुजितसर खूप आवडले.
बघता बघता त्या दोघांची मैत्री झाली. ती सुजित सरांच्या केबिनमध्ये येऊन अर्धा अर्धा तास बसू लागली. काही दिवसांनी ते दोघे एकत्र कॅन्टीनला जाऊ लागले. तिथे तास तास गप्पा मारत बसू लागले.
शिवानीचे दिलेले काम पूर्ण होत नव्हते. तिच्या वरिष्ठांनी तिला त्याबद्दल विचारले. तेव्हा तिने असे सांगितले की सुजित सरांच्या ऑफिसमध्ये डिक्टेशन घेत होते. सुजित सरांचे नाव ऐकताच तिचा वरिष्ठ गप्पच झाला.
हळूहळू त्या दोघांच्या मैत्रीबद्दल सगळेजण बोलू लागले. गोष्ट सगळीकडे झाली. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. सुजित सरांबद्दलचा आदर कमी व्हायला लागला. चुकून पण उलट न बोलणारे लोक सुजितशी थोडं उर्मटपणे वागायला लागले. सुजीतला हे सगळं जाणवत होतं. कळत होतं. त्या धुंदीतच तीन-चार महिने गेले. काही जणांनी सुजित सर व शिवानीला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलेले पाहिले. काही जणांनी शिवानीला सुजितसरांच्या कारमध्ये बसताना पाहिले. काही जणांनी उच्चभ्रु लॉजमध्ये आत जाताना बाहेर पडताना त्यांना पाहिले.
मालकांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही महिन्यांनी जेव्हा सगळेच बोलू लागले. तेव्हा त्यांना वाटले असेलही खरे ! काही महिन्यांनी या गोष्टीचा कंपनीवर परिणाम नको म्हणून त्यांनी सुजितला समज दिली. तरीही तो ऐकेना. तो करायचं तेच करत राहिला. अनेक वेळा सांगून पण तो ऐकत नाही म्हणल्यावर त्यांनी सुजित चा पगार भत्ता कमी केला. पण तरीही तो ऐकला नाही. काय व्हायचं असेल ते होऊ दे असा सुजितचा अटीट्युड होता. मग मात्र त्यांनी सरळ या लफड्याकडे दुर्लक्ष केले. सुजित सारखा राबणारा गुलाम त्यांना गमवायचा नव्हता.
कर्णोपकर्णि होत होत ही गोष्ट सुजितच्या बायकोला समजली. तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने सुजीतला त्याबद्दल विचारले तर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. एकदा तिने सुजीत च्या मोबाईलवर मेसेज वाचला. या ना गडे ! असा मेसेज शिवानीने त्याला पाठवला होता. त्याबद्दल विचारल्यावरही सुजितने उडवाउडवीची उत्तरे दिली. मग शेवटी तिने तिच्या भावाच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हापासून तिचा भाऊ सुजितचा गुपचूप पाठलाग करु लागला. लवकरच त्याला व सुजितच्या बायकोला सत्य समजले. त्यांनी सुजीतला रंगेहाथ पकडून त्याचं तोंड काळ करायचा प्लॅन बनवला.
एके दिवशी सुजित च्या बायकोला भावाचा फोन आला. पटकन रिक्षा करून ये म्हणून. सुजित ने त्याच्या मित्राची एक रूम भाड्याने घेतली होती. वरती पहिल्या मजल्यावरच्या मोकळ्या गच्चीवर असलेल्या त्या रूम मध्ये तो आणि शिवानी भेटत असत. सुजित ची बायको व तिची आई रिक्षाने तिथे पोचल्या. मेव्हण्याने दारावर थाप मारली - भाऊजी दार उघडा ! सुजितने होलमधून पाहिले तर त्याचा मेव्हणा बायको सासू बाहेर उभे होते. त्यांनी पटकन कपडे केले. तोपर्यंत बायको बाहेर डोकं बडवून घ्यायला लागली छाती बडवून घ्यायला लागली ओरडू लागली की आता वरून उडी मारून जीव देते. सासु पण गोंधळ घालू लागली. मेव्हणा म्हणाला, " आज तुझं तोंड काळ करून तुझी धिंड काढतो! बाहेर ये ! "
सुजित शिवानीला धीर देत होता. बायको आरडाओरडा करत म्हणाली, " कोण आहे ती सटवी तिचा आज जीवच घेते तिचे कपडे फाडते. "
शिवानी बद्दल तिने तसं बोलल्याने सुजीतला राग आला. आयुष्यात पहिल्यांदा एक भयंकर रागाची सणक सुजित क्षीरसागरच्या डोक्यात गेली. रूममध्ये एक कपडे अडकवायचा रॉड होता. तो त्याने उपसून काढला. धाडकन दार उघडल. समोर मेव्हणा होता. त्याला खाली ढकलून दिले. तो जिन्यावरून गडगडत खाली गेला. त्याच्या डोक्याला खांद्याला मार लागला. अर्धवट संभ्रमावस्थेत तो तिथेच पडून राहिला. सुजितचा तो रुद्रावतार बघून बायको व सासू घाबरल्या. सासूच्या हातात काळी रंगाची बाटली होती. ती तीने टाकून दिली व मुलाला बघायचं निमित्त करून खाली पळालि. तो खालच्या अंगणात पडला होता.
सुजितने बायकोला विचारले,"काय म्हणत होतीस ?" बायको घाबरून हळू आवाजात म्हणाली ,"काही नाही!" सुजित म्हणाला," वरून उडी मारून जीव द्यायचा म्हणत होतीस ना ! "
बायको अममम् असं करु लागली.
सुजित म्हनाला ," एवढ्या उंचीवरून काय मरत नाही!" बायको त्याच्याकडे बघत होती.
सुजित म्हनाला "मग मार की उडी ! की ढकलून देऊ ? " बायकोने घाबरून धूम ठोकली. पण जिन्यावरून जाताना तिचा पाय मुरगळला व ती पडली.
सुजित गरजला," शिवानीला जर कोणी काही म्हणलं तर माझ्या पेक्षा वाईट कोण नाही लक्षात ठेव. "
मग शिवानी कडे वळुन तो प्रेमाने म्हणाला," चल सोनू!"
शिवानीचा हात धरून तो खाली आला. व बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत निघून गेला.
त्यादिवशी सुजित ची बायको भांडण करून माहेरी निघून गेली. आईने शिवानी बद्दल विचारले तर सुजित ने खरं आहे असे सांगितले. दोन दिवस आई सुजितशी बोलली नाही. पण नंतर ती पहिल्यासारखं बोलू लागली. तिने या विषयातून अंग काढून घेतले.
दहा दिवसांनी सुजित ची बायको मुलांना घेऊन परत आली. सासुनेच तिला शिवानी चा विषय काढू नको असे सुचवले. ती पण तो विषय टाळून वागू लागली.
त्र आल्या आल्या सुजित ने मुलांना जवळ घेतले. मुलांना बघून त्याला खूप आनंद झाला. पण मुलं त्याला म्हनाली,"पप्पा आम्हाला शिवू नका तुम्ही घाणेरडे आहात तुमचं दुसऱ्या बाई बरोबर लफडं आहे!" सुजित म्हनाला कोणी सांगितलं? मुलं म्हणाली,"आई म्हणाली!" सुजित त्यांच्यापासून दूर झाला. पण संध्याकाळपर्यंत मुलं सगळं विसरून त्याला येऊन बिलगली.
त्यानंतर सहा महिन्यांनी शिवानीचे लग्न ठरले. सुजित तिच्यासाठी सगळं काही सोडायला तयार होता. कारण त्याची मुले आता मोठी झाली होती. त्याने त्याच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या व इथून पुढे पण पार पाडणार होता. पण शिवानीला आपला नवरा तरुण असावा असं वाटत होतं.
शेवटी ती जाणार! हे सुजित ने जाणले. त्याला खूप वाईट वाटले. ते पाहून शिवानीने त्याला विचारले," सर मी कधीच विचारलं नाही पण आज विचारते खरच तुमच्या आयुष्यात माझ्या पहिला कुठलीच स्त्री आली नाही?" सुजित म्हणाला," नाही ! माझ्या आयुष्यात तुझ्या शिवाय कोणी पण आली नाही ! अगदी बायको पण आली नाही !"
शिवानीला वडील नव्हते आई थकली होती भाऊ लहान होता घरी गरीबी होती . जिथे लग्न ठरले होते ते घर मध्यमवर्गी होते.
लग्नापूर्वी सुजित तिला म्हणाला," हे बघ लग्न एकदाच होत असतं पैशांची अडचण आहे म्हणून हौसेला मुरड घालू नकोस शॉपिंगला जाताना मी येतो तुझ्याबरोबर! जे आवडेल ते घे !"
तिच्या लग्नापूर्वी सात दिवस सुजित ने रजा टाकली. तेंव्हा सुट्टी द्यायला मालक तयार नव्हते. पण सुजित ने निक्षून सांगितलं की शिवानी च लग्न आहे मी सुट्टी घेणार आहे आणि त्याने फोन कट केला .
शिवानीचा ड्रेस शालू पैठणी इत्यादी सर्व खरेदी सुजितने करून दिली. एक चार तोळ्याचा कंठहार खूप सुंदर होता तो शिवानीने घ्यावा अशी सुजितची खूप इच्छा होती. पण हा एवढा महाग दागिना कुठून आला? या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे म्हणून शिवानीने तो नाकारला. तरी एक तोळ्याची एक छान अंगठी सुजितने तिला घेऊन दिलीच. लग्न दुसऱ्या जिल्ह्यातील तालुक्याच्या गावी होतं. तिकडे वरातीत नवरा नवरी दोघांनापण घोड्यावर बसवतात. वरातीत सुजित क्षीरसागर पहिल्यापासून शेवटपर्यंत बेधुंद होऊन नाचत होता. नाचता नाचता एका क्षणी तो थांबला. वरातीतून बाहेर आला. एका कमरे एवढ्या उंच लोखंडी कट्ट्यावर, दोन्ही हात ठेवून, मान खाली घालून, दम खात उभा राहिला. एक मित्र त्याला परत नाचण्यासाठी बोलवायला आला त्याच्याकडे सुजित ने मान वर करून डावीकडे त्याच्याकडे पाहिले तेव्हा सुजितचे डोळे पाण्याने पूर्ण भरले होते. मित्राने काय झाले म्हणून विचारले तर तो काही नाही असं म्हणाला हसला व मित्राचा हात पकडून त्याला नाचायला घेऊन गेला.
ज्यांनी ज्यांनी सुजितला नाचताना बघितले ते सर्व म्हणाले की तो खूप छान नाचला. पण त्या बघणाऱ्यांमध्ये ज्यांना ज्यांना सुजितची ही गोष्ट माहीत होती ते म्हणाले - यापेक्षा तो ढसाढसा रडला असता तर बरं होतं. त्याचं हसणं त्यांना सकाळच्या हास्यक्लबातील लोकांच्या हसण्यासारखं वाटलं.
लग्न झाले. सुजित परत आला. तिच्या वैवाहिक आयुष्यात समस्या नकोत म्हणून त्याने तिला परत फोन केला नाही. तो परत कामावर रुजू झाला पहिल्या सारखाच मान मोडून काम करू लागला. आई तो विषय विसरून गेली आहे. मुलं मजेत आहेत. बायकोने पण मोकळा श्वास घेतला आहे. ती तिच्या मूळ स्वभावानुसार पहिल्या सारखंच तुसडेपणाने त्याच्याशी वागते. फक्त ती टवळी परत आली तर ? एवढीच एक भीती तिला सतावत असते यामुळे तिला बीपीचा त्रास सुरू झाला आहे.
समाप्त.
लेखक - नीलकंठ लोकायत
उर्फ अमित गायकवाड.