Swash aseparyat - 1 books and stories free download online pdf in Marathi

श्वास असेपर्यंत - भाग १


दिन-रात मेहनत करून ,
कष्ट उपसून ,
आपल्या पिलांना वाढविणाऱ्या त्या आई -बाबांना,
आयुष्यभर साथ देऊन मैत्रीत जीव लावणाऱ्या,
प्रत्येकचं मित्रांस,
प्रेम हे पवित्र नातं आहे ,हे मानून,
तिच्या / त्याच्या आठवणीत संपूर्ण आयुष्य एकटे वेचणाऱ्या,
प्रत्येकचं प्रियकर,प्रेयशीस,
आयुष्यात सुख दुःखाचे डोंगर चढतांना,
डगमगून न जाता ते दुःख आपलं मानून,
आयुष्याची वहिवाट चढणाऱ्या योध्यांसाठी,
“श्वास असेपर्यंत ” हे पुष्प,
सर्वांसाठी समर्पित......

️ सुरज मुकिंदराव कांबळे







आज चंद्राचा प्रकाश इतर दिवसांपेक्षा जास्तचं तेज दिसत होता,कदाचीत तो पौर्णिमेच्या जवळपास चा दिवस असावा. बाहेरची सर्व पृथ्वी त्या दुधाळ रंगात न्याहाळून निघत होती. सगळीकडे चंद्राचा प्रकाश पसरला होता,जणू वाटत होते की आज या पृथ्वीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे की काय?? चंद्रासोबत त्याचे सखे , सोबती म्हणजे चांदण्या,तारका अजून जास्तच लुकलूकतांना दिसत होत्या. त्या तारकाही आपलं तेज पसरविण्याचा प्रयत्न करू पाहत होत्या. त्या शीतल प्रकाशातील तारका म्हणजे पृथ्वीने घातलेल्या त्या पांढऱ्या शुभ्र सफेद साडीवर चमचमणाऱ्या लुकलूकित टिकल्याचं. त्याचप्रमाणे काहीं चांदण्या साडीवर नक्षीकाम केल्यासारख्या शोभून दिसत होत्या, डिसेंबर महिन्याचा तो शेवटचा दिवस होता.जिकडे तिकडे गार - गार वारा अंगाला हळूच स्पर्श करून जात होता,जणू तो मला विचारत असावा,बघ तुझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या प्रेयसीची आठवण येते की काय???मला वाटलं हा वारा माझी थट्टा करत असेल असं मी माझ्या मनाला समजावून सांगितलं.

जिकडे तिकडे - निरव शांतता पसरली होती. त्या रस्त्यावर मी एकटाच चाललो होतो,त्या संध्याकाळी मी नविन वर्ष येण्याची आणि जुन्या वर्ष्याला रामराम करण्यासाठी मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये चाललो होतो. माझे मित्र अगोदरच पार्टीमध्ये गुंग झाले होतें, त्या पार्टी साठी मित्रांनीच केक अन् काय काय??? आणले होते. पार्टी एका बऱ्यापैकी असणाऱ्या रेस्टॉरेंट मध्ये चालली होती.माझे मित्र आप - आपल्या मित्र - मैत्रिणी मध्ये गुंतले होते. कुणी एक गाण्यावर डान्स करत होते, तर कुणी एक त्यांच्या प्रेयशीची गिफ्ट न दिल्यामुळे समजूत काढत होते,तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत होते.

मी या वातावरणात नवीन असल्याने मी नुसताच एक स्मित हास्य आणि हाय हॅलो करत एकटाच आपल्या जागी बसून होतो. पार्टी मध्ये सगळे थकल्यानंतर सर्वांनी जेवणावर मोठ्या जोमाने ताव मारावयास सुरुवात केली. मी मात्र ऐटीत खात बसलो होतो,म्हटलं आपल्याचं मित्रांची पार्टी आहे, कुणी काय आपल्याला इथे म्हणणार नाही . तसं ही हॉस्टेल चे जेवण कधी गोड लागलं नाही की आम्ही एखाद्या लग्न सराईत जेवण करावयास जात असू. तेव्हा आम्ही " बिन बुलाये मेहमान पधारे " असंच असायचो. गावातही आठ- नऊ वाजले की जेवणाचं ताटं समोर यायचं त्यामुळे जेवण लवकर करण्याची सवय लागलीच होती. पण आज संध्याकाळचे साडे बारा वाजले होते, भुकेने व्याकुळ झालो होतो,म्हणून काही एक विचार न करता जेवण करत होतो,जेवण करतांना आपलं एक धोरण आहे,जेवताना कुणाशी बोलू नये,घास कमी जातात न हो,आणि जेवायला वेळ पण लागत नाही. वेळ लागला की लोकं नावं ठेवतात, मिचक मिचक जेवतो हा म्हणून,किंव्हा एक घास बत्तीस वेळा चावून खातो की काय??म्हणून आपलं पटकन जेवायचं आणि मोकळं वायच म्हणजे म्हणणारे म्हणतील किती कमी जेवण करतो हा...तेवढंच मनाला फार बरे वाटत असायचं, पण सर्व या उलटंच होतं. माझे मित्र याबाबतीत मात्र थोडे वेगळेच होते, रेंगाळत जेवणारे हे लोक स्वतः हा खायचं न तर आपल्या प्रेयसीला सुद्धा प्रेमाचा घास भरवून देत होते. तसा दिवस ही मोठाच म्हणायचं ना,आता नववर्षाच्या अगोदरचा दिवस म्हणजे आजच्या तरुणाईला एक सण चं असतो. मग या दिवशी पार्टी वैगरे चालतेच, तेवढे घरचे परवानगी सुद्धा देतात,एकदाची सर्वांची जेवण आटोपली.रात्रीचा एक - सवा एक झाला असावा , सर्व मित्र आप आपल्या गाडीने घरी जाण्यासाठी निघाले. एक मित्र सोडून देणार होता,पण मिच त्याला नकार दिला, आणि सांगितलं की जवळच खोली आहे,पायी पायी गेलं तरी लगेच दहा मिनिटात पोहोचतो,म्हणून मी आपला पायदळ निघालो. तशी खोली लांब होती,पण माझ्याच्याने कुणाला त्रास होऊ नये म्हणून मी मित्राला नकार दिला,एक तर त्यांनी पार्टी आयोजन केली,मी फक्त जेवायसाठी म्हणून गेलो होतो.

एकटाचं रस्त्याने टेहळणी करत चाललो होतो. म्हटलं संध्याकाळी असणाऱ्या या निरव शांततेचा अनुभव घ्यावा. अधून मधून चालता एखादा बोका माझी वाट अडवत होता. शुक् - शुक केलं की पळत सुटत होता, एक अर्धा पक्षी चिवचिव करीत होता,थोडी लांबच होती खोली,चालत- चालत रस्त्यात असणारी कुत्री अंगावर येऊन भूकंत होती,झाडाची पाने त्या थंड वाऱ्यामुळे झुलत होती,जणू ती माझ्याकडे पाहून हसते की काय असाच भास मला होत होता,बराच वेळ चालून पाय थकले होते,पण खोलीवर जाणं तर गरजेचं होतं. पण अचानक वातावरणात बदल घडून आला,सगळी चक्र उलटी फिरू लागली,रस्त्यात असणारी निरव शांतता आता भंग पावली होती. झाडाच्या वाळलेल्या पानांचा आवाज येऊ लागला,वारा आता वेगात वाहायला सुरवात झाली,तशी थंडी जास्त भरत होती,घरट्यात असणाऱ्या पक्ष्याची किलबिल,चिवचिव सुरू झाली,कारण त्यांना माहिती झालं असावं की आता आपल्यावर संकट येणार,आपली बांधलेली घरटी कदाचित या वाऱ्यामुळे तुटून पडणार. पुन्हा आपली पिल्ले आणि आपण अनाथ होऊ,म्हणून ते अधिकच चिवचिव करीत होते. होती नव्हती कुत्रे सुद्धा आडोश्याला गेली,त्यांची भुंकने थांबली,सगळीकडे चक्क काळोख पसरला होता.चंद्र पूर्वी नाजूक गुलाबाच्या कळीसारखा टवटवीत दिसणारा,आता कुठे तरी काळ्या कुट्ट राक्षसा सारख्या दिसणाऱ्या ढगांमध्ये लपून बसला होता,सगळी निरव शांतता त्या जोराच्या वाऱ्यामुळे कधीची भंग झाली होती,मी मात्र आता वेगाने पावले टाकावयास सुरुवात केली,पाऊस आला तर ओला होईल, थंडी भरेल अंगात म्हणून मी रपरप चालत होतो. मध्येच विद्युलता जोराने कडाडत होती, चमकत होती, जोराचा पाऊस येणार हे नक्की झालं होतं...
तोच रस्त्याने थोडा समोर चालत नाही तीच पावसाने लगेच हजेरी लावली,तो काही हळुवार कोसळणारा पाऊस नव्हता तर वेगाने बरसणारा होता.सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असं दुहेरी द्वंद्व युद्ध इथे लागलं होतं. कधी पाऊस वाऱ्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करत होता,तर कधी वारा पावसावर विजय,पण दोघेही मोठ्या आकांताने बरसत होते. एकटा मी आता भिजण्यापासून संरक्षण कुठे मिळते का कुठे आडोसा मिळतो का हे शोधू लागलो. शेवटी रस्त्यात एक कडुनिंबाचं झाड दिसलं,त्याच्या खाली जाऊन उभा राहिलो. विद्युलता मध्येच कडकडाट करीत होती, चमचम करून निघून जात होती . आता मनात भीती भरली होती वीज जर या झाडावर पडली तर आपलं काही खरं नाही, उगाचं आपल्याला जीव गमवावा लागेल पण तिथे थांबण्याशिवाय दुसरा पर्याय सापडत नव्हता. म्हटलं "जो होगा देखा जायेगा" . पण पाऊस आणि वारा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नव्हता. झाडात किती वेळ उभा राहणार, भिजलो तर होतोच म्हणून दूरवर नजर फिरवू लागलो काही समोर घर आहे का????? कारण तो सुनसान रस्ता होता,आणि तिथे कुणाचं घर आढळणार हे अशक्य होतं, एकदम शहराच्या बाहेर पडावं असा तो रस्ता होता, तितक्यात एका घरावर नजर पडली,वाऱ्यामुळे शहराची दिवे,लाईट गेली होती, पण त्या घरात एक मिणमिण करणारा दिवा, सोबत वाऱ्याने फडफड करणारा उजेड दिसला. म्हटलं आपण इथे थांबण्यापेक्षा त्या घरी गेलेलं बरं. आपल्याला आश्रय नक्की मिळेल,आणि आपलं या पाऊसापासून आणि थंडगार वाऱ्यापासून संरक्षण होईल,म्हणून मी त्या घराकडे धाव घेतली. त्या घराच्या दरवाज्यासमोर उभा राहिलो. दरवाजा काही एवढा मजबूत वाटत नव्हता,पण घराला शान म्हणून तो जुना दरवाजा लावून होता. मी दाराची कडी वाजवली,कुणी बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. मनात विचार आता भलतेच येऊ लागले,एवढ्या सुनसान रस्त्यावर शहराच्या बाहेर हे एकटंच कुणाचं घर असणार????काही भूत बित म्हणतो तो प्रकार तर इथे नसणार ना ???? नाना तर्हेचे विचार सुरू झाले,पण दार काही उघडण्यासाठी कुणी बाहेर आलेल नव्हतं. माणसाचे विचार जिथं नाही तिथं भलतंच सुरू असतात,ज्या गोष्टीवर विचार करावयास हवा त्या गोष्टीचा कधी मनुष्य विचार करणार नाही. आता हेच घ्या न की आता पर्यंत शांत असणार वातावरण अचानक बदलून गेलं, असा अचानक बदल होईल याची कुणी कल्पना ही केली नव्हती,पण पाऊस आला,आणि मी नसल्या गोष्टीवर विचार करू लागलो की इथे भूत प्रेत तर नसणार...पाऊस सुरूच होता अचानक येण्याचं कारण असं असावं की मागील वर्षी तुम्ही पापे केलीत, निसर्गाची नासधुत केली, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला नाही तरी बघा तुम्ही कसे पार्टी करता,नाचता. तिकडे आईबाबा मरमर काम करून तुम्हाला वाढवतात, म्हणून ही पापे या पावसाने धुतली आहे नवीन वर्षी तरी चांगले कर्म करा,सेवाभावी वृत्ती जपा,असा हा पाऊस कदाचित या स्वार्थी बनलेल्या माणसाला सांगत असावा.

बराचं वेळ झाला आंत
मधून कुणाचा प्रतिसाद आला नाही. शेवटी नाईलाजाने दरवाजा थोडा जोर लावून आत ढकलला,तर तो कडी लावून नसल्याने आपोआप उघडला.घराच्या आतमध्ये पाहतो तर काय!!!जिकडे तिकडे अंधार पसरला होता,अंधार असल्याने चालताना थोडा दचकत होतो, तोच थोडा पुढे आलो तर एक मिणमिण करणारा दिवा दिसला,आजूबाजूला नजर फिरवली तर काही भांडे इकडे- इकडे पडून दिसली,बाहेर अजूनही पाऊस पडत होता पण मी मात्र आता निश्चींत झालो होतो.पाण्यापासून माझा बचाव झाला होता,मी आतमध्ये अजून आवाज लावला,अहो कुणी आहे का इथे???मला खात्री झाली होती की या घरात कुणीतरी नक्की राहत असणार,कारण जेव्हा दिवा जळतो आहे म्हणजे घरात नक्कीच कुणीतरी आहे.रात्रीचे दोन वाजले होतें, बिचारे सर्व गाठ झोपेत असणार ,त्यामुळे माझा आवाज काही त्यांच्या पर्यंत पोहचत नसावा. तस ही मी जास्त आत जाऊ शकत नव्हतो,मी नवीन,आणि अचानक कुणी घरात घुसल्यावर समोरच्यांना भीती वाटणार म्हणुन मी तिथेच इकडे इकडे नजर फिरवली तर दिव्याच्या खाली एका बाजेवर, खाटीवर एक व्यक्ती अंगावर घेऊन झोपी गेला होता,आता ती व्यक्ती बाई आहे की माणूस आहे हे ओळखणं कठीण होत.जर बाई असली तर ती आपल्याला एकाएक पाहून घाबरणार,जरी मी काही वीस वर्ष्याचा असलो तरी भिण्याचं आलंच,आणि जर माणूस असला आणि तो वैचारिक असला तर आपल्याला विचारपूस करून थोडा आश्रय देईल आणि वैचारिक नसला तर नक्कीच आपल्याला शिव्या हासडणार, म्हणेल मेले कुठंचे आमचं घर म्हणजे विश्रामगृह झालं की काय,कुणी ही कधी ही येतो,पण माझ्याकडे पर्याय नव्हता त्यामुळे बाहेर भिजण्यापेक्षा शिव्या खाणं बेहतर होत, म्हणून मी त्यांना आवाज देऊ लागलो. अहो काका, " मी पाऊसात अचानक सापडलो,आणि माझी खोली लांब असल्याने मी इथे थोडा वेळ राहू काय???" पण तो इसम,ती व्यक्ती काही केल्या जागी होत नव्हती . पूर्ण शरीर थकलं होत,शेवटी खाली बसलो, वर नजर फिरवली,जुनाट पत्रे घरावर टाकलेले होते,काही पत्र्यातून छिद्र असल्याने ते बरोबर त्या ठेवलेल्या भांड्यात पडत होत, त्याचं एका भिंतीवर बाबासाहेब आंबेडकर यांचा जुनाट फोटो टांगलेला दिसला. डोळ्यावर आता झोपेची तंद्री आलेली होती, तसाच पडून असता एक शेवटला पर्याय म्हणून त्या व्यक्तीला आवाज दिला,तेच थोड्या वेळाने त्या व्यक्तीला जाग आली,त्याने एक हातात काठी पकडली आणि कमी आवाजात कोण आहे म्हणून हाक दिली...आता कुठे माझ्या जीवात जीव आला होता,मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो ते आपल्या खाटेवरती टेकून बसले आणि माझी विचारणा केली. अरे बाळा," एवढ्या रात्री कुठे फिरतो आहेस??" "एकटाच कसा भटकतो आहे??" बोलताना ते खोंकत होते,
मी म्हणालो बाबा, " रस्त्याने खोलीकडे चाललो होतो,मित्रांनी नवीन वर्ष्याच्या आगमनासाठी पार्टी आयोजित केली होती,तिकडूनच खोलीकडे येत होतो,पण अचानक वातावरणात बदल झाला,आणि मध्येच पाऊस सुरू झाला. स्वतः चा बचाव व्हावा म्हणून मी या रस्त्यावर एक नजर फिरवली तर तुमचं घर दिसलं,आणि तुमच्या घराकडे धाव घेतली."
बाबा म्हणाले , ठीक आहे...बरं केलंस आला तर!!! ये निवांत बैस. आता माझ्या मनातून भीती पूर्ण नाहीशी झाली होती कारण ते बाबा वैचारिक वाटले आणि माझ्या शिव्या ही वाचल्या होत्या, त्यांना पाहून वाटलं की शहराच्या बाहेर एकट्या घरात कुणी मुले,बाळे नाही,कुणी महिला नाही आणि हे एकटेच इथे का राहत असतात,यांचा परिवार कुठे असणार,इत्यादी विचार मनात तरळून गेले. त्यांचा तो पांढऱ्या दाढीने वाढलेला चेहरा,डोक्याचे पिकलेले केस,अंगावर अंग झाकता येईल असें मळकट कपडे,आणि अंगावर फाटका शाल ,वय जवळपास साठ च्या वर असावा असा माझा अंदाज. त्यांच्याकडे पाहून मला त्यांच्याविषयी अधिकच उत्सुकता लागली होती,की हा व्यक्ती कोण असावा???अधूनमधून घरात गार वाराही शिरत होता, घरातील तो टिमटिम करणारा दिवा,हवेची झुळूक आली की विझतो की काय अस वाटायचं,पण तो ही हवेला टक्कर देत होता, तो ही पर्वतासारखा जळत होता,त्या दिव्यालाही आता या वादळाशी संघर्ष करण्याची सवय झाली असावी.पण तो आपला प्रकाश घरात पसरवत होता.बाहेर पाऊस आग ओकल्यासारखा ओकतच होता,थांबणार नाही हे जवळपास समजलच होत.

मी बाबांचं निरीक्षण करत होतो. मनात उठलेल्या वादळाच उत्तर कसं मिळेल याचा विचार करत होतो,पण या भित्र्या मनाला विचारण्याची हिंमत होत नव्हती,आणि विचारणार तरी कसा हो???? एक तर आपण त्यांच्या घरी आश्रय घेतला,वरून ते बाबा थकलेले दिसत होते, माझ्यामुळे त्यांची झोप मोड झाली होती. आता जर त्यांना उलट सुलट प्रश्न विचारले तर ते काही म्हणतील,त्यांना त्रास होईल,म्हणून थोडा वेळ गप्प बसलो,पण मन मात्र अस्थिर होते. तेवढ्यात बाबांनीच मला विचारणा केली की, " तुझं नाव काय बाळा???" आणि इथे काय करतो आहे???" काही शिक्षण सुरू आहे का इथे???इत्यादी प्रश्न विचारले. ... आता तर मला बोलण्याची संधी चालूनच आली होती,पुन्हा मनात वाटलं आता दिवस निघायला दोन अडीच तास शिल्लक राहिले आहेत,म्हटलं झोपी जाण्यापेक्षा बाबा सोबत चर्चा करूया. मग दिवस उजाडला की निरोप घेऊ,म्हणून मी आता भिंतीला टेकून आरामात बसलो,पाय सरळ पसरून दिले.आणि बाबांशी बोलायला सुरुवात केली.

" माझं नाव राहुल आहे. "
मी इथे बी.ई.म्हणजे इंजिनिअरिंग करतो आहे..
हॉस्टेल वर नंबर लागायचा आहे म्हणून सध्याची खोली भाडयाने करून राहतो आहे. आई बाबा गावी रोजमजुरी,आणि घरची असलेली काही शेती करतात.घरच्यांचं स्वप्न आहे की मी नोकरीवर लागून आमची होणारी दगदग कमी होईल,म्हणून मी इथे अभ्यास करतो आहे,तेवढ्यात वाक्य थांबवत बाबा म्हणाले,
“अभ्यास कर राहुल!!!”

घरच्या परिस्थितीकडे बघून जोमाने ,जिद्दीने अभ्यास कर आणि लगेच यश संपादन कर,आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण कर.आपल्या परिवाराबरोबर या समाजाशी एक आपलं नातं आहे त्यामुळे या समाजासाठी काही आपलं देणं असते ते ही सर्व बरोबर झालं की करशील..

संवाद आता आमचा वाढत चालला,मीच त्यांना थांबून म्हणालो,
ठीक आहे बाबा. मी नक्कीच मन लावून अभ्यास करतो,पण एक प्रश्न,अनेक प्रश्न मनात उठत आहेत,ते तुम्हाला विचारले तर चालतील काय????

अरे बाळा , " तू विचार कसला करतो, मनात आहे ते अगदी तुझा एक जवळचा म्हणून विचार!!!!! बाबां सावकाश बोलले,

मी म्हणालो,
" या वस्तीच्या बाहेर, जिथे जवळपास कुणाचं घर नाही,तिथे तुमचं एकट्याच घर का???आजूबाजूला स्मशानभूमी आहे आणि तुम्ही अजूनही इथे का राहता, तुमचा परिवार कुठे आहे,तुम्ही कोण आहात, असे कितीतरी प्रश्न एकावेळेस विचारून टाकले..."

अरे, अरे सावकाश! थोडा आपल्या प्रश्नाच्या गाडीला ब्रेक लाव!!!!!माझ्याकडे बघतो आहे आहे न म्हातारा झालोय,थकलो आहे,बोलताना दम लागतोय...

एवढे प्रश्न एकावेळेस??????तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे पण सावकाशपणे देईल,"
असें बाबा उत्तरले..
तुझ्या सर्व शंका - कुशंका ,त्याचं मी माझ्या वतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल,
नाहीतरी इतक्यात आमची विचारपूस कुणी करत नाही,तू तर प्रेमाने माझी विचारपूस करतो आहे...या आयुष्यात असणारी सारी सुख दुःखे,प्रेम,विरह,सर्व काही तुझ्यासमोर मांडणार आहे,पण जर तुला माझी ही करूणकहानी ऐकायची ईच्छा असेल तर????

मी म्हणालो, " तुम्ही सांगायला सुरुवात करा....आपल्याकडे पूर्ण रात्र शिल्लकच आहे. तस ही आता झोप उडालीच आहे,
ऐकतो बघा पूर्ण..""""

बाबांनी आपली बसण्याची जागा नीट केली,अंगावर असणारी शॉल व्यवस्थित केली आणि त्यांनी आपल्या जीवनाची कहाणी सांगावयास सुरुवात केली...लक्ष देऊन ऐक मग राहुल...

क्रमशः......