जल तू ज्वलंत तू! - 8 - अंतिम भाग in Marathi Novel Episodes by Prabodh Kumar Govil books and stories Free | जल तू ज्वलंत तू! - 8 - अंतिम भाग

जल तू ज्वलंत तू! - 8 - अंतिम भाग

8

---------------

आजोबांनी जेव्हा ही कथा पूर्ण केली. सगळे मन लावून ऐकत होते. हा रोजचा कार्यक्रम होता. रात्रीच्या जेवणानंतर दोनही मुलं आजोबांजवळ येऊन बसत आणि कथा पुढे सुरू होई. त्या मुलांच्या आई-वडिलांनी सुद्धा ही गोष्ट ऐकली होती.

या गोष्टीचा फायदा असा झाला की, मुलांच्या मनातून ‘आत्मा’ची भीती नाहीशी झाली. गेल्या काही दिवसात घडलेल्या चमत्कारिक घटनांनी त्यांच्या मनात भीती दडली होती. त्यांना कळले होते की, आत्मा एक निरागस प्राण असतो. तोसुद्धा आपल्या दु:खात बुडालेला. तो कोणाला काय त्रास देणार?

आजोबांनी सांगितले की आत्मा पाण्याच्या बुडबुड्यासारखा जाणवतो. तो कायमचा नसतो. त्याच्यामुळे कोणाला काही त्रास होताना किंवा भीती वाटताना पाहिले, तर ते सुद्धा क्षणिक प्रभावासाठी असते. बाकी सगळा आपल्या मनाचा खेळ आहे, किंवा ऐकलेल्या गोष्टी आहेत.

मुलांना आजोबांचे हे म्हणणे मजेशीर वाटले की, जेव्हा माणूस नवीन जन्म घेतो, कोणत्याही रूपाने का असेना, पण क्षणभर जीव तळमळतो. जर तो मागच्या जन्मातील अतृप्त आत्मा असेल तर तो आपल्या मनातले सांगण्याचा प्रयत्न करतो. काही उपायांनी संतुष्ट होऊन तो आपल्या नवीन जन्माकडे वळतो.

मुलांना जे काही समजले, जितके समजले, त्यामुळे त्यांचा ताप कमी झाला. ते मोकळ्या हवेत खेळायला गेले. तिथे आसपासच्या घरातील मुले खेळायला जमली होती.

हातात सुपाची बाटली घेऊन मुलांचे आई-वडील आजोबांसमोर असे बसले होते, जणू हालचाल करणे विसरले असावेत. त्यांना या योगायोगाचे आश्चर्य वाटत होते की, त्या दोन अमेरिकन मुली त्यांना अचानक पर्यटनस्थळावर भेटल्या, त्यांनी त्यांना योग्य व्यक्तीकडे सोपवले. त्यांच्या सान्निध्यात त्यांची बाधा आपोआप संपली. या परक्या देशात त्यांचे काय झाले असते, जर ते अशा संकटात इकडेतिकडे फिरत राहिले असते. आजोबा म्हणाले, जसे अंडाशयात शुक्राणू डिम्बकडे धावतात, तसे कोट्यवधी प्राण या जगात येण्यासाठी तळमळत असतात. वीर्य निसर्गाने बनवलेले जादूई जल आहे. त्यात भूत, भविष्य, वर्तमानाची सगळी रहस्ये दडलेली असतात. शरीरातून याच्या बाहेर पडण्याची व्यवस्थासुद्धा अद्भुत आहे. दुसर्‍याच्या शरीराला पाहून, स्पर्श करून, विचार करून, हे जीवनजल उसळू लागते. जेव्हा बाहेर येते, तेव्हा शेकडो जादूई कहाण्यांची बीजे घेऊन येते.

“एका भांड्यातून दुसर्‍या भांड्यात हे जल टाकण्याच्या पद्धती आणि आकांक्षामध्ये आत्मा-परमात्म्याचे रहस्य दडलेले आहे.” आजोबांचे बोलणे आश्चर्याने ऐकणार्‍या मुलांची आई ट्रे उचलून स्वयंपाकघराकडे जाऊ लागली, तेव्हा अंधार पडू लागला होता.

भारतीय गृहिणी स्वयंपाकघराला आपले घर समजू लागतात. आजोबांना आपल्या पाहुण्यांबरोबर कौटुंबिक जीवन जगण्याचा आनंद मिळत होता. वेगवेगळे भारतीय पदार्थ खायला मिळत होते.

बरेच दिवस झाले होते. भारतीय पाहुणे आता परत जाऊ इच्छित होते. त्यांना अमेरिका प्रवासात सुद्धा भारतीय तत्त्वज्ञानासारखे रहस्य ऐकावे लागले होते. पण येथील सरळ, प्रामाणिकपणा त्यांनी मान्य केला होता.

मुलांचे वडील नेहमी गप्प, गंभीर होऊन फक्त ऐकण्याचे काम करत होते. ते म्हणाले, “मला एक गोष्ट सारखी खटकत आहे. तुमच्या कथेत हा ऑरेंज मासा काय होता, असा मासा असतो का? तो इथेच असतो का? त्याला फिन्जानच्या मित्राने आर्नेस्टनेही पाहिले होते. तो कुठे मिळतो?”

आजोबांनी स्मित केले. त्यांना समाधान होते की त्यांनी सांगितलेली दीर्घकथा भारतीय परिवाराने लक्ष देऊन ऐकली होती. कथेच्या पात्रांशी एकरूप झाले होते. त्यांची नावेसुद्धा लक्षात होती.

आजोबा म्हणाले, “हा मासा दुर्गम पाण्याच्या ठिकाणी मिळतो. हा स्वच्छ पाण्यात जन्माला येतो. काचेसारखे चमकणार्‍या पाण्यात त्याच्या तळाचे वाळूचे कण मोजता येतील एवढे स्वच्छ पाणी!”

मुलांच्या वडिलांना आठवले, नदीच्या उगमस्थानावर असेच पाणी असते. प्रवास करताना अशी स्थळं पाहिली होती. पण तिथे त्यांना सोनेरी मासा दिसला नव्हता. त्यांना याबद्दल माहिती नव्हती. दिसलाही असेल, पण त्यांनी लक्ष दिले नसेल.

आजोबा सांगत होते, “हा मासा आपल्या शरीातून असा गॅस सोडतो की त्यामुळे पाणी गढूळ होते. आसपासचे कीटक उथळ पाणी समजून पोहत येतात, पण हे पाणी खोल असते, आणि तिथे भोवरा असतो. ते कीटक त्या भोवर्‍यात बुडतात. ते या सोनेरी माशाचे खाद्य बनतात.” आजोबांनी दिलेली ही माहिती आश्चर्यचकित करणारी होती की, अनेक तांत्रिक या माशापासून विलक्षण औषधं तयार करतात. ते याला प्राण रचण्याची क्षमता असलेला मासा समजतात. निसर्गाचे रहस्य ठेवण्याची ही गुहा आहे.

ते ऐकून मुलांच्या वडिलांच्या अंगावर शहारे आले. त्यांना आठवले, भारतात अनेक हाकीम, तांत्रिक, ओझा अशी औषधं तयार करतात. त्यांनी या गोष्टींकडे गंभीरपणे पाहिले नव्हते. आता आपल्याच मुलांच्या बाबतीत, परदेशात घडलेल्या घटनांमुळे त्यांना विचार करावा लागत होता. आता त्यांना आजोबांचे बोलणे अविश्वसनीय वाटत नव्हते. सोनेरी माशात नर-मादी वेगवेगळे नसतात. एकाच शरीरात दोन्ही व्यवस्था असते. त्यामुळे ते प्राण निर्माण करू शकतात. त्यांचा मृत्यूसुद्धा अलौकिक असतो. मासा मारला जात नाही.

रात्री उशिरा जेवणाच्या टेबलावर जेव्हा मुलांना कळले की, आता ते परत जाणार आहेत, तेव्हा त्यांना बरं वाटले नाही. त्यांनी आजोबांकडे पाहिलं. ते इडलीचा आनंद घेत होते. मुलांच्या आईने सगळ्यांना इडली वाढली होती. मोठ्या पांढर्‍या चमच्याने सांबार पीत आजोबा मुलांना हिमालयावर बसलेले शिव वाटत होते, तर कधी लॉनमध्ये त्यांच्याबरोबर खेळायला आलेल्या मुलासारखे! येथून जाणे मुलांना आवडले नव्हते.

मुलं आता पूर्णपणे बरी झाली होती. वडिलांनी सांगितले, की आता एक-दोन दिवसात ते न्यूयॉर्कला जातील. आजोबा मुलांचे बोलणे ऐकत होते. आजोबांना सुद्धा हे चिमुकले पाहुणे जावे असे वाटत नव्हते. आजोबांनी आपल्या कहाणीने मुलांचे ज्ञान वाढवले होते, तर मुलांनी आपल्या जिज्ञासेने आजोबांच्या एकाकी जीवनात प्राण ओतले होते. मुलं आपल्या राहिलेल्या प्रवासाबद्दल जागरूक झाली. मुलं सगळं लवकर विसरतात आणि पुढचा विचार करू लागतात. मुलं खेळून दमली होती. जेवण झाल्यावर झोपायला गेली.

आजोबा हळूच म्हणाले, “पुढच्या शनिवारी माझ्या दोन्ही मुली येतील. त्या मला सांगून गेल्या आहेत की, त्या येईपर्यंत तुम्हाला जाऊ देऊ नये.” आजोबा आपल्या नातींना मुलीच म्हणत असत. तेव्हा भारतीय दांपत्याच्या लक्षात आले की, त्यांनी परतण्याचा कार्यक्रम आपला आपणच ठरवला. आपल्या यजमानाची परवानगी घेतली नव्हती. ते थोडे लज्जित झाले. मुलांची आई म्हणाली, “ठीक आहे. आपण म्हणाल तेव्हाच आम्ही जाऊ. त्या मुलींना भेटल्याशिवाय जाणे आम्हालाही जमणार नाही.”

या आपलेपणाने आजोबा अभिभूत झाले. जेवणं झाल्यावर मुलांची आई आवाराआवर करू लागली. वडील आजोबांबरोबर त्यांच्या खोलीत गेले. आजोबांनी कपाटातून काही फोटो काढले व त्यांना दाखवले. फोटो बरेच होते. त्यात त्या चिमणीच्या घरट्याच्या अनेक आकृत्या होत्या, जे आजोबांच्या घराबाहेर बनवले होते. मुलांचे वडील शहारले. त्यांना आठवले, असा फोटो हॉटेलमध्ये फळांच्या डब्यावर होता. त्या डब्याला त्यांच्या मुलीने हात लावल्याबरोबर आग लागली होती. तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला.

रात्र बरीच झाली होती. पण अमेरिकेत रात्र आणि दिवसात फार अंतर नव्हते. ते लोक आज सकाळपासून घरातच होते. त्यामुळे त्यांना झोप येत नव्हती. मुलांच्या वडिलांनी तो किस्सा आजोबांना सांगितला.

ते ऐकून आजोबा हसले व म्हणाले, “हो, माझ्या मुलीने मला सांगितले होते. हा देश असाच संपन्न झालेला नाही. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले होते.”

हे ऐकून मुलांचे वडील चकीत झाले होते. त्यांना वाटले, या घटनेत देशाच्या संपन्नतेचा प्रश्न कुठे आला? आजोबांना घरट्याचा विषय टाळायचा आहे का? त्यांना घरट्याचा उल्लेख आवडला नसावा. पण तसे नव्हते. आजोबा त्यांच्या प्रश्नाचेच उत्तर देत होते. ते म्हणाले, “अमेरिकेत जगातल्या अनेक वस्तूंना पेटेन्टच्या रूपाने आपले करून घेणे आणि जगापुढे चमत्कारिक पद्धतीने ठेवणे ही रीत जुनी आहे. ही तशीच घटना होती. ज्या कंपनीने आजोबांकडून घरट्याचा फोटो खरेदी केला होता, त्यांनी फोटोच्या रंगात काही रसायने मिसळली होती. ती रसायने वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या क्रिया करत असत. कधी त्या रसायनामुळे रंग बदलत असत. कधी तापमान कमी जास्त झाल्याने वेगवेगळे प्रभाव दिसून येत. कधी बर्फासारखे गार होत. कधी थ्री डीसारख्या रचनेत येत. त्यात ठेवलेल्या फळांचे संरक्षण होत होते.

हे ऐकून वडील स्तब्ध झाले. त्यांच्या लक्षात आले की, मुलीने घरट्याचे चित्र नखाने खरवडले असेल. त्यामुळे नखांमधील कॅल्शियमने घरट्याच्या चांदीच्या रंगाने पेट घेतला आणि ते घाबरले.

वडिलांच्या लक्षात आले की, शास्त्र कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते. नाहीतरी ते लोक अशा देशात होते, ज्याने चंद्रावर पाय ठेवला होता. मंगळ ग्रहावर कोट्यावधी वर्षांपूर्वी आलेल्या पुराच्या फासिल्स्चा अभ्यास करत होता. त्यांनी हे सगळं मुलांच्या आईला सांगितले तेव्हा तीसुद्धा चकीत झाली होती. आजोबा रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी बोलत बसले होते.

सकाळच्या उन्हाने बागेतील दवबिंदूंवर हिर्‍याचे कण बनवणे सुरू केले. तेव्हा मुलांना कळले की, ते आणखी काही दिवस तिथे राहणार आहेत. त्यांचा उत्साह वाढला. ते सुद्धा त्यांच्या दोघी ताईंना भेटण्याची प्रतिक्षा करू लागले. त्या दोन दिवसांनी वीकएन्डला तिथे येणार होत्या.

आज मुलांच्या आग्रहाने आजोबांनी सगळ्यांना बाजारात नेले. मुलांच्या वडिलांनी एका भारतीय स्टोअरमधून आजोबांसाठी रेश्मी कुडता आणि धोतर खरेदी केले. ते कपडे पाहून आजोबांचे डोळे भरून आले. आजोबांनी आपल्या पाहुण्यांसाठी भेटवस्तू घेतल्या.

पाहुण्यांना आश्चर्य वाटले. आजोबा जेव्हा घराबाहेर निघाले तेव्हा कोणाच्याही मदतीशिवाय चालले. त्यांचा उत्साह आणि चपळता लहान मुलांसारखी होती. सतत संघर्ष आणि सक्रियता यामुळे हाडं लवचिक होत असावीत.

संध्याकाळी आजोबा मुलांबरोबर थोडावेळ खेळायला मैदानात गेले. असे वाटत होते, इतके दिवस एकटे राहून आजोबांनी फक्त वय घालवले होते. जीवन नाही. ते त्यांच्या खिशात असावे. संध्या प्रकाशात आजोबांच्या घराजवळच्या झाडावर बनवलेल्या घरट्याचे आकर्षण मुलांमध्ये होते. आता ते त्या घरट्याला घाबरत नव्हते. आता त्यांना जिज्ञासा होती की, आजोबा म्हणतात तसे त्या घरट्यात आपोआप अंडी कशी येतील? मुलांनी त्या घरट्याभोवती पक्ष्याला पाहिले नव्हते. घरटे शिवमंदिरात ठेवलेल्या शंखासारखे पांढर्‍या गुलाबी प्रकाशाने चमकत होते. त्याच्या काड्या सोन्याच्या तारेसारख्या दिसत होत्या. ते घरटे बनावटी वाटत नव्हते. पूर्णपणे नैसर्गिक दिसत होते. मुलं अमेरिकन वातावरणाशी परिचित झाली होती. जवळपासच्या मुलांबरोबर खेळताना त्यांना बरीच माहिती मिळाली होती. भारतात गेल्यावर ते ती माहिती आपल्या मित्रांना सांगणार होते. बफलो नगराचा तो शांत निर्जन भाग त्यांच्या मनात ठसत होता.

बफलो शहरापर्यंत आजोबांच्या दोन्ही नातींबरोबर येताना मुलांच्या आईला हे ऐकून आश्चर्य वाटले होते की, त्या दोघींना भारताबद्दल इतकेच माहीत आहे की, तिथे सिम्मी ग्रेवाल नावाची अभिनेत्री आहे आणि तिथे पाण्याची समस्या आहे. त्याहून जास्त आश्चर्य हे पाहून झाले की, आजोबांच्या खोलीत असलेल्या पुस्तकं आणि डायर्‍यांमध्ये भारताबद्दल बरीच माहिती होती. कोणाची डायरी वाचू नये असे संस्कार तिच्यावर होते, म्हणून तिने डायर्‍या वाचल्या नव्हत्या. पण एखादे पुस्तक वाचायला घेतले होते. “पुस्तक त्याचे असते जो ते वाचतो,” हे वाक्य एका पुस्तकावर लिहिलेले होते. त्यामुळे त्यांना पुस्तकं घेताना संकोच वाटला नाही. अशाच एका पुस्तकात पाश्चिमात्त्य देशाच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला होता. भारतात पाश्चिमात्त्यांबद्दल जे विचार आहेत त्याहून ते अगदी वेगळे होते.

पश्चिमेकडे शरीराचे अवयव लपवणे शिकवले जात नाही. त्यात कोणतेही रहस्य नाही. शरीराच्या परंपरा स्पष्ट आहेत. त्या परंपरांची आपआपली कर्तव्ये आहेत. त्या परंपरांवर हरकत घेण्याचा कोणाला अधिकार नाही. जे पूर्वेकडचे देश असं करतात ते वैज्ञानिक स्वास्थ्याच्या नावाखाली नुकसान करून घेतात. शरीरातील शेकडो हाडं, हजारो अंग, लाखो पेशी, डझनवारी क्रियांमधून कोणाला आपण अवर्णनीय, त्याज्य, टिपण्णी न करण्यायोग्य ठरवू शकतो? आणि का?

पुस्तकात मन रमत होते पण मुलांच्या वडिलांनी चहाची ऑर्डर दिली. त्यांना चहा बनवायला किचनमध्ये जावे लागले. भारतीय पद्धतीने बनवलेला चहा आजोबांना आवडू लागला होता. आईने भारतीय पद्धतीने चहा बनवला.

त्या लोकांना माहीत होते की, दोघी बहिणी शनिवारी आल्या तरी त्यांना लगेच जाऊ देणार नाहीत. म्हणून त्यांनी रविवारी परत जायचे ठरवले. या बदलाने मुलांना आनंद झाला होता. वातावरणात बदल होऊ लागला होता. मुलांना आपला देश, शहर आठवू लागले होते. त्यांना येथील काही मित्रांची नावे, दुकानांची नावे आणि पक्वांन्नाबद्दल बरीच माहिती मिळाली होती. ती त्यांना त्यांच्या मित्रांना सांगायची होती.

असं म्हणतात की, संस्कृतीच्या आदानप्रदानाचे माध्यम मुलं असतात. ते राहणी, खाणेपिणे, भाषा, व्यवहार यांची माहिती लवकर समजून घेतात. या भारतीय मुलांना त्यांच्या वयाच्या बरेच पुढे नेले होते. त्यांना त्यांच्या शाळेतील असे उदाहरण माहीत होते की, एका मुलीने एका मुलाबद्दल तक्रार केली होती की, त्याने तिला ‘किस’ मागितले होते. शिक्षकांनी त्या मुलाला वर्गाबाहेर काढले होते. इथे मुलं खेळता खेळता आपल्या साथीदाराचे चुंबन घेत होती.

संध्याकाळी आजोबांनी बनवलेल्या घरट्याला स्पर्श करण्यासाठी काही मुलं झाडावर चढली. बाकी मुलं खाली उभी राहिली. सगळ्यांना जाणून घ्यायचे होते की घरट्यात अंडी आली आहेत का? पण तिथे अंडी नव्हती. अंडी येण्याची शक्यता नव्हती.

त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर मुलं आपल्या खोलीत झोपायला गेली होती. मुलांची आई पण झोपली होती. पण आजोबा आणि मुलांचे वडील बोलत बसले होते.

दुसर्‍या दिवशी शनिवार होता. आजोबांच्या नाती येणार होत्या. आईने सकाळी लवकर उठून नाष्ट्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले होते. मुलं उत्साहात होती. एक तर दोघी ताई येणर होत्या. आणि दुसरे म्हणजे परत जाण्याची वेळ जवळ आली होती. आजोबा प्रसन्न होते. आई थोडं थोडं सामान पॅक करू लागली होती. दोन्ही मुलांना आजोबांनी घेऊन दिलेले गिफ्ट त्यांनी पॅक करू दिले नाही. त्यांना ते ताईला दाखवायचे होते.

आजोबा लॉनवर खेळणार्‍या मुलांना सांगत होते, “तुमच्या ताईंना इंडियाबद्दल फार थोडी माहिती आहे. आज त्या येतील तेव्हा त्यांना जास्तीत जास्त माहिती द्या आणि शक्य असेल तर त्यांना...”

आजोबांचे वाक्य अर्धे राहिले. त्याआधी मुलांचे वडील म्हणाले की ते सगळ्यांना भारतात येण्याचे आमंत्रण देतील. आजोबांना याचा खूप आनंद झाला. ते म्हणाले, “आता मी प्रवास करू शकत नाही, पण या मुली भारतात जाऊन खूप खूश होतील.” तेवढ्यात कारचा आवाज आला.

दोघी बहिणी कारमधून उतरल्याबरोबर मुलं त्यांना बिलगली. मुलींनी प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. पाहुण्यांना आनंदात पाहून त्यांनाही आनंद झाला. त्यांनी सांगितले की, ते लोक आता परत जाणार आहेत. तेव्हा त्यांनी विचारले, “आता मुलांना बरं वाटत आहे ना?” मोठी बहीण म्हणाली, “हो. बघा, आता त्यांच्या डोक्यावर चक्र नाही.”

“डोक्यावर चक्र कसे असते?” मुलाने विचारले.

जेव्हा एखादा अस्वस्थ ‘पास्ट’ या जगात फिरत असतो तेव्हा तो कोणाच्याही चेहर्‍यावर सात रंगांचे चक्र बनवून फिरू लागतो. या रिंगमुळे त्या व्यक्तीची कनेक्टिव्हिटी थोड्या वेळेसाठी भूतकाळातील एखाद्या व्यक्तीशी जोडली जाते. जो जगातील कोणत्यातरी ग्रहावर फिरत असेल. जग ग्रहांच्या माध्यमातून आपला भूतकाळ व संभाव्य भविष्यकाळाशी जोडलेले आहे.

मुलांच्या आईला आठवले, हे सगळं त्यांनी त्या पुस्तकात वाचले होते. त्यात हेही लिहिलेले होते की, जेव्हा कोट्यवधी स्पर्म डिम्बकडे धावत असतात, तेव्हा त्यांच्या गर्दीत असा अतृप्त आत्मा सुद्धा असतो. त्याला पुन्हा जन्म हवा असतो. हा आत्मा आपली कार्यकारिणी शोधत असतो. आत्म्याच्या प्रभावाने दुसर्‍याच्या शरीरात जागा बनवण्याची इच्छा होते. याच कारणााने रावण सीतेला घेऊन जातो, मीरा दगडाच्या मूर्तीवर डोके आपटते. याच्याच तापाने भस्मासूर शिवाच्या मागे धावतो.

घरात हास्यविनोद चालला होता. त्या रात्री दोघी बहिणी तिथेच राहिल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी पाहुणे न्यूयॉर्कला जाणार होते. तेथून कॅनडा एअरपोर्टवरून त्यांना भारताचे विमान पकडायचे होते.

मुलं दिवसभर आपल्या ताईंबरोबर होती. मम्मीने बनवलेले स्वादिष्ट पदार्थ सगळ्यांनी मिटक्या मारत खाल्ले होते.

दोघी बहिणी दिसायला एकसारख्या होत्या. आता मुलं त्यांना ओळखू लागली होती. ती त्यांना मोठी ताई, धाकटी ताई म्हणत होती. त्या दोघींनी मुलांची नावं ठेवली होती. त्या मुलीला सीमी म्हणत आणि मुलाला ‘वाटरमेलन.’ या नवीन नावाने मुलं तर खूश होतीच, त्यांचे आई-वडील सुद्धा अभिभूत झाले होते.

मुलं त्या संध्याकाळी बाहेर खेळायला गेली नाहीत. कारण बफलो नगरात ती त्यांची शेवटची संध्याकाळ होती. आता पुन्हा ते अमेरिकेला येतील की नाही कोण जाणे?

संध्याकाळी पाहुणे आणि यजमान लॉनवर खेळायला आले. मुलांनी आपल्या आई-वडिलांना पहिल्यांदा आपल्याबरोबर खेळताना पाहिले. मुलांनी बॉल घेतला. मुलींनी बॅट. आजोबा व्हरांड्यात आरामखुर्चीवर बसून खेळ बघत होते.

एकदा धाकट्या ताईने जोरात बॉल मारला तो फुलांच्या ताटव्यात जाऊन पडला. दोन्ही मुलं बॉल शोधत फुलांच्या ताटव्यापर्यंत पेाहोचली. मुलीने बॉल आणला होता. मुलाने दोन लाकडी जुन्या पाट्या आणल्या होत्या. त्या पाट्या त्याला भिंतीशी उभ्या करायच्या होत्या. विकेटसारख्या. पाट्या घेऊन तो उजेडात आला. त्याने पाट्यावर लिहिलेली नावे वाचली. बागेत पडलेल्या त्या पाट्या वास्तविक नेम प्लेट्स होत्या. त्यावर लिहिलेली अक्षरं आता धुरकट झाली होती. ती नावं होती, सना रोझ आणि सिल्वा रोझ!

नाव वाचल्याबरोबर मुलगा चमकला. तो आपल्या बहिणीकडे धावला. “अगं बघ ही कोणाची नावं आहेत!” मुलीने नावं पाहिली. ती दुप्पट उत्साहाने उसळली. मुलांच्या डोक्यात आतापर्यंत आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतील पात्रं जिवंत होती. त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या दोन्ही ताई म्हणजे सना आणि सिल्वा आहेत. फिन्जानची मुलगी डेलाच्या मुली होत्या. याचा अर्थ आजोबांच्या कथेतील घर हेच होते आणि आजोबा फिन्जान होते!

मुलांचेच नाही तर आई-वडिलांचे अंग शहारले की त्यांना सांगण्यात आलेली गोष्ट काल्पनिक नव्हती. या घराची वास्तव कथा होती. मुलं एकदम म्हणाली, “आजोबाच फिन्जान आहेत... फिन्जान अंकल जिवंत आहेत. फिन्जान अंकल मेले नाहीत... आजोबाच फिन्जान आहेत.”

दोन्ही मुलं आजोबांकडे धावली. त्यांना फिन्जान आजोबांना स्पर्श करायचा होता. त्यांच्याशी बोलायचे होते. त्यांची क्षमा मागायची होती की, त्यांनी मेणबत्त्या पेटवून आजोबांसमोरच त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यांना आजोबांना विचारायचे होते की, त्यांना अजूनही आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे का?

तिकडे मम्मीने ज्यूस बनवला होता. ज्यूसचे ग्लास ट्रेमध्ये घेऊन पहिला ग्लास आजोबांना द्यायला गेली. तेवढ्यात आजोबांचे डोके एका बाजूला कलंडले. आजोबांचे प्राण उडून गेले होते. त्यांचा चेहरा खाली वाकला होता. गुलाबी रेषांनी बनलेला तो टेडीबेअर आता खरंच एक निर्जीव खेळणं झाले होते.

सना आणि सिल्वाला कळेना की अगोदर आपल्या आजोबांचा पार्थिव देह सांभाळावा, की त्या भारतीय पाहुण्या मुलांना सांभाळायचे, जे आता बेशुद्ध पडायला आले होते. आई-वडील चकित झाले होते. त्यांच्या समोर त्यांचा संरक्षक, त्यांचा यजमान स्वर्गवासी झाला होता.

थोड्या वेळाने सिटी ऑफिसमधून तिरडी घेऊन एक व्हॅन आली. त्या घाई गर्दीत मुलांनी पाहिले, थोड्या अंतरावर झाडावर असलेल्या घरट्याभोवती काही पक्षी फडफडत होते. तिथे जादूने तीन लहान लहान अंडी आली होती. मुलं बघत होती की घरट्यात तीन अंडी होती. रस्बी आंटीच्या आईच्या हातातून वाळवंटातल्या तापलेल्या वाळूवर तीन अंडी पडून फुटली होती. मुलांचे डोळे वाळवंटातील वाळू झाले. त्यावर अश्रूंचा समुद्र पडू लागला!

- समाप्त -

Rate & Review

uttam parit

uttam parit 2 weeks ago

Swati Jagtap

Swati Jagtap 2 months ago

Prabodh Kumar Govil