Chukiche Paaul - 10 books and stories free download online pdf in Marathi

चुकीचे पाऊल! - १०

आता पर्यंत आपण बघीतले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुकडी सोबत प्रियांका गावडे यांचा अशासकीय गट माझ्या शाळेत पोहचला होता. तिथे ओंकार विषयी माहिती घेत त्याच्या शोधात शिपायांच्या गटाला तैनात करण्यात आले होते.

आता पुढे..!

पोलिसांची तुकडी शामल राहत असलेल्या ठिकाणी रवाना झाली. साधारण काहीच तासात आम्ही तिथे पोहचलो. बाहेरून खोलीचा दार कुलुपबंद नसल्याने शामल आत असल्याचे समजले. पोलिसांनी शिपायाला सांगून दार ठोठावले.

आतून शामलने दार उघडले. समोर मला आई-बाबा आणि पोलिसां सोबत बघून तो घाबरला. पळून जाण्याचा प्रयत्न करणार तोच त्याला शिपायांनी पकडले!

"हाच ना शामल?"

अधिकाऱ्यांनी आई-बाबांवर नजर टाकत विचारले.

"हो, हाच!"

दोघांनी होकारार्थी मान हलवली.

"कॉन्स्टेबल घ्या त्याला सोबत!"

असं म्हणत शामलला सोबत पोलीस ठाण्यात नेण्याचे आदेश देण्यात आले.

"तुम्ही आता घरी जाऊ शकता. शामलची ओळख पटावी म्हणून आम्हाला यांना सोबत घ्यावं लागलं होतं. आता तुम्ही काळजी न करता घरी जाऊ शकता. गुन्हेगारांना शिक्षा ही होणारंच. तुम्ही दिशाची काळजी घ्या." : सीमा राज यांनी हमी दिली.

मी विश्वासाने प्रियांका गावडे यांच्याकडे बघीतले. माझ्या जवळ येत त्यांनी मला छातीशी घट्ट कवटाळले आणि डोक्यावरून हात फिरवला.

"काळजी करू नकोस, आम्ही आहोत."

त्यांच्या या आपुलकीने मला खूप सुरक्षित वाटले. आम्ही सर्व घरी निघून आलो.

काहीच तासात ओंकारचा देखील छडा लावण्यात आल्याची माहिती आम्हाला देण्यात आली. त्याला ही पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

आधी विचारपूस करायला ओंकारला एका खोलीत नेण्यात आले. समोर पोलीस अधिकारी बसून ओंकारचे स्टेटमेंट घेणार होते.

"तुमचे पुर्ण नाव सांगा?"

"ओंकार गोवर्धन खंडागळे."

"राहणं?"

"मुंबई."

"शाळेत कधी पासून काम करताय?"

"२०११ पासून."

"तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे?"

"काही नाही!"

"का केलंत तुम्ही त्या मुलीसोबत असं?"

"माफ करा साहेब, चुकून घडलं!"

"चुक ही एकदा होते. तुम्ही अजून ही तिच्यासोबत तेच कृत्य करत असल्याचे त्यांनी स्टेटमेंट दिले आहेत; त्यांच काय?"

"साहेब, तिच्याकडून मला प्रत्येक वेळी प्रतिसाद मिळत होता! मग यात माझीच चूक असं आपण कसं काय म्हणू शकता?"

"बास! अरे ये त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून उलट तिलाच दोष देताना लाज कशी वाटत नाही रे? ते काही नाही तुझ्यासारख्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा कशी देता येईल हाच विचार करू आता. यापुढे मी जे विचारेल ते खरं खरं सांगायचं. तू हे सर्व का केलं?"

"ते माझ्याकडून घडलं. मी मुद्दाम करत नव्हतो. ती दिसायला सर्व मुलींमध्ये चांगली होती. आम्ही अधून मधून बोलायचो. तिला पहिल्यांदा स्पर्श केला; तेव्हा त्यावर तिचा प्रतिसाद मिळाला. तिने विरोध केला नाही. म्हणून मला वाटलं तिचा होकार असेल."

"बरं! तुझ्या विषयी करण्यात आलेल्या चौकशीत नेहमीच तू अशा कृत्यात असल्याचे समजते. तुझ्यावर जुना वासोटा पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन वर तू मुलींची छेड काढताना पुराव्यांवरून दिसून आला होतास. हे खरंय का?"

"हो, खरंय!"

"असं सांगताना लाज ही वाटत नाही! वाटणार तरी कशी? तुझ्या सारखी हरामखोर लोकं कधीच सुधारणार नाहीत! का करायचा तसा तू?"

"मुलींना छेडताना मजा वाटायची!"

"काय? मजा! निर्लज्जासारखं सांगायला लाजही वाटणार नाही; हो ना! आता मला सांग, काही वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलींच्या कापडांना काहीतरी लावताना तू आढळला होतास! काय होतं ते?"

"........!"

यावर माञ त्याला शांत राहिलेला बघून अधिकारी ओरडले.

"सांगतो का हरामखोर आता?"

असं म्हणत त्यांनी त्याच्या कानशिलात भडकावली! घाबरून त्याने सांगायला सुरुवात केली.

"ते एक वेगळ्या प्रकारचं गोंद होतं, जे मी वापरायचो."

"का? तेच गोंद वापरण्यामागचं कारण समजेल का?"

"ते मुलींच्या कपड्यांवर घट्ट बसायचे आणि निघाल्यावर तेवढ्या भागातून त्यांची कातडी बघायला वेगळीच मज्जा वाटायची!"

"हरामखोर साले! कसल्या मानसिकतेचे रे तुम्ही?"

त्याला त्याच्या घाणेरड्या कृत्याचा पश्चात्ताप नाही, हे अधिकाऱ्यांनी त्याच्या हावभावा वरून हेरले आणि त्याच्या कानशिलात दोन जोरदार भडकावल्या!

ओंकारच्या या चौकशीत तो पाशवी मानसिकतेचा असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. पुढे त्याच्यावर सोबतंच त्याच्या मागील इतिहासाची चौकशी न करता त्याला कर्मचारी म्हणून रुजू करणाऱ्या माझ्या शाळेवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे त्यांनी मनाशी ठरवले आणि लगेच न्यायालयीन आदेश कसे लवकरात लवकर पूर्ण करता येतील यावर काम सुरू झाले.

ओंकारच्या चौकशी नंतर शामलला आत बोलवण्यात आले. तो आत आला आणि घाबरतंच खुर्चीत बसला.

"सर, मी काहीही केलेलं नाही!"

"शांत बस, जे विचारण्यात येईल ते नीट सांगायचं!"

"मला सांग, दिशा सोबत तुझे संबंध होते की, नाही?"

"नाही म्हणजे हो…! ते मी…..! तिनेच मला….! म्हणजे आम्ही दोघे ही…!"

पोलिसांनी विचारताच तो चांगला घाबरला.

"सरळ मुद्द्यावर येऊ, दिशा आणि तुझ्यात त्या दिवशी जे काही घडले त्याचे परिणाम आज तिला सहन करावे लागत आहेत. म्हणून त्या वेळेस जे काही तुमच्यात झाले, ते सविस्तर सांगायचे. खोटं सांगून तुला यातून वाचता येणार नाही. कारण, तुझ्या आणि तिच्या वैद्यकीय अहवालावरून सर्व स्पष्ट झाले आहे."

वैद्यकिय अहवालाचे नाव ऐकताच शामलला घाम फुटला!

"वैद्यकिय अहवाल!"

"हो, वैद्यकिय अहवाल! ज्यावरून तूच तिच्यासोबत ते सर्व केले असल्याचे तुझ्या आणि तिच्या वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तू असं का केलं, याचं उत्तर हवंय?"

"सर….! ते, मी काही नाही….!"

त्याच्या या बोलण्यावर अधिकारी चांगलेच चिडले.

"ते ते, मी मी नंतर! आधी खरं खरं सांगायचं!"

त्यांचा खाकी रूबाब बघून तो घाबरला आणि सांगायला सुरुवात केली.

"सर, मला दिशा पहिल्या नजरेत आवडली. त्यानंतर तिचा प्रतिसाद बघून माझ्या मनात कामूक भाव निर्माण झाले. नंतर जेव्हा तिच्या खोलीत मी प्रवेश केला, तेव्हा तिने कुठलाच विरोध न करता मला स्वतःला सोपवून दिले. त्यानंतर माझे स्वतःवरचे नियंत्रण सुटले आणि आमच्यात ते सर्व घडले."

मोठा सुस्कारा सोडत तो बोलला.

"तुला कल्पना तरी आहे! एका अल्पवयीन मुलीसोबत हे सर्व घडल्यास, ते गुन्ह्याच्या व्याख्येत मोडतं आणि त्यासाठी कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते?"

".....!"

यावर पुढे शामल काहीही न बोलता रडायला लागला. पोलिसांसमोर हात जोडून स्वतःवर कारवाई न करण्यासाठी विनवणी करू लागला. माञ त्याने केलेला गुन्हा हा क्षमापात्र नव्हता!

"कॉन्स्टेबल मोहिते, घ्या दोघांना आत! न्यायालयीन आदेश येतील तेव्हा यांची न्यायालयात रवानगी करू!"

कॉन्स्टेबल आले आणि दोघांना आत घेऊन गेले.

काहीच तासात दोघांना न्यायलायीन कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले. दोघांची रवानगी न्यायालयात करण्यात आली. काहीच तासात दोघांचे न्यायालयीन आदेश देण्यात आले असले; तरी कायदेशीर कारवाईला उशीर होत होता.

दिवस जात होते आणि इकडे मी माञ झालेल्या प्रकरणातून अजूनही बाहेर येण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शामल सोबत घडलेल्या त्या दिवशीच्या प्रकाराविषयी मनात वेगळ्याच भावनेने जन्म घेतला होता. भावनेच्या भरात माझ्याकडून पडलेले "चुकीचे पाऊल" माझ्यासाठी किती धोकादायक याची जाणीव झाली.

आरोपींना पकडण्यात आणि पोलिसांची प्रक्रिया पुर्ण होण्यात काही दिवस निघून गेले. त्या दिवसांत मी स्वतःला नको तितका दोष देऊन पश्चाताप केला. घरच्यांनी अक्षरशः माझ्याशी बोलायचे बंद केले. शाळेकडून माझ्यासाठी विशेष रजा मंजूर करण्यात आली. त्यामुळे मला घरी राहणे शक्य झाले. पण, घरच्यांच्या वागणुकीचा त्रास मला सहन करावा लागला. त्यांचा अबोला मला सहन झाला नाही आणि एक दिवस मी स्वतःला संपवण्याचा विचार केला.
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके